Saturday 9 July 2022

माझ्या डायरीतून- ६२

अद्‍भुत करार- आयुष्य रीन्यू केल्याचा

३०. ७. २०१३

माझ्यातल्या सामान्यपणाचं दर्शन मलाच घडवणारी (कदाचित दुसर्‍यांनाही) एक चुक माझ्याकडून झाली... काल धांडे लॅबमधे एक बाई चौकशीला आल्या होत्या. त्यांना शुगर टेस्ट करायची होती जेवणानंतरची आणि आल्या होत्या सकाळी. उलटसुलट काहीतरी पुन्हा पुन्हा विचारत होत्या. लॅबमधला माणूस पुन्हा पुन्हा नीट माहिती देत होता. सगळे ऐकत होते. त्यांच्या प्रश्नोत्तरात एकदा मी हसले. इतर काहीजणही हसले... नंतर वाटून गेलं मी हसायला नको होतं. त्या बाई गोंधळल्या असतील. वयामुळं काय विचारायचं कळलं नसेल.. वैतागल्या असतील. विसरत असतील... लॅबमधला माणूस न वैतागता ‘पेशंट’ला समजून घेत बोलत होता आणि मी हसले. मी बरं नाही केलं...!

....

७.८.२०१३

काल केमो संपवून घरी यायला रात्र झाली... खूप उशीर झाला पण फ्रेश वाटलं आल्यापासून. मात्र दवाखान्यात चिडचिड झाली. सलाईनच्या प्रत्येक बाटलीचा वेळ ठरल्यापेक्षा लांबत गेला.. धीर धरणं अवघड जात होतं..

पण आज सुरुवात छान झालीय. ‘लम्हा लम्हा’ अनुवाद, मेल्सना उत्तरं अशी कामं उत्साहानं करता आली... केमो-औषध आणि इंजेक्शन इ. आपला प्रभाव दाखवायला लागलेत... केमोचा परिणाम म्हणून सगळी नखं काळी पडलीत. पण त्याची शेड एकसारखी आहे. नेलपेंट लावल्यासारखी. डॉ. रानडे म्हणाले हे रेअर आहे. फोटो काढून ठेवा... डॉ. रुचा यांनी फोटो काढून घेतलाय.

.....

१४.८.२०१३

प्रतिभा (माझी बहीण) म्हणाली, आपण भोवतीच्या प्राणवायूमधून थोडा आपल्यासाठी शोषून घेत असतो.... आपली प्रत्येक पेशी श्वास घेत असते.... हा विचार मनात घोळत राहिला.... `ईशावास्य' मधला सतरावा मंत्र आठवला. ‘वायुरनिलममृतमथेदं...’ (वायुः अनिलम् अमृतम् अथ इदम्...) ‘भोवतालचा प्राणवायू अमृतम् असतो. म्हणजे अ-मृत... न मेलेला.. सतत जिवंत असलेला...’ असा याचा अर्थ आत्ता एकदम जाणवला... आपण आत घेतला की तो आपला होतो, वापरला जातो.

वैश्विक प्राण आपल्या आतल्या अस्थिर प्राणाला असंख्य मितींमधून लगडलेला असतो. शब्द, स्पर्श, रस, रूप गंधामधून अव्याहत होणारी त्याची आवक-जावक... देवाण-घेवाण उत्कटतेनं अनुभवणं म्हणजे आत्ता.. या क्षणात जिवंत असणं..! आपल्या असण्याचा अनुभव घेणं. अशा प्रत्येक क्षणी आयुष्य रीन्यू केल्याच्या करारावर सही होत असते... काल या आशयाची कविता लिहिली आणि एकदम खूप छान वाटलं... ही कविता लिहिताना सुचण्याचा आवेग थ्रीलिंग होता.. लिहून झाल्यावर लिहिता येण्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं.

शारीरिक आजार इतक्या खोलवर नेऊन असं काही घडवत असेल तर त्याला सलाम... डॉक्टर्स आजारावरील उपचारांचे साइड इफेक्ट्स सांगतात.. मला त्यांना असे काही पॉझिटीव्ह साइड इफेक्ट्स सांगता येतील...

***

आसावरी काकडे

No comments:

Post a Comment