Thursday 14 July 2022

माझ्या डायरीतून- ६७

त्रास सुसह्य आहे तरी...

१९.४.२०१४

सध्या होणारा त्रास स्वाभाविक आणि सुसह्य आहे. इलाजही फारसा त्रासदायक नाहीए. हे सगळं सहज हसत खेळत स्वीकारता येण्यासारखं आहे. तरी कमालीचा कंटाळा आलाय.... चिडचिड होतीय मनात प्रचंड... फेकाफेकी.. आदळाअपट करावी... ओरडावं जोरात असं वाटतंय.... रडू येतंय.. त्याला समजवायचा कंटाळा आलाय... मरू मरू मरू झालंय मन..!

दुसर्‍यांदा बोनडेन्सिटी टेस्ट केली तेव्हा ती नॉर्मल / नॉर्मलच्या जवळ जाईल अशी उमेद बाळगून होते. पण काहीच फरक पडलेला नाही. नवा डॉ. नवा इलाज सुरू केलाय.. लगेच काय बरं वाटणार? पण निराशा दबा धरून बसल्यासारखी लगेच झडप घालतेय.... पाय जवळ घेता येत नाहीएत.. खाली बसता येत नाहीए. वाकता येत नाहीए.... हे स्वीकारता येत नाहीए अजून. चिडचिड होतेय.. त्यात त्यात गुरफटतेय.. दुसर्‍या कशात मन रमत नाहीए. काहीच वाचवत नाहीए. लिहायला सुचत नाहीए. सुचावसं वाटत नाहीए.... पुरे पुरे झालंय सगळं...

दाबून धरलेला हुंदका जोरात फुटावा तसा केव्हापासून धरून ठेवलेला धीर सुटलाय... सैरभैर झालाय...

.....

२९.५.२०१४

काल वीणा देव यांचा अमेरिकेतून फोन होता. यंदाच्या मृण्मयी पुरस्कारासाठी त्यांनी माझी निवड केलीय. विजय देव पण बोलले. अभिनंदन केलं दोघांनी... ऐकून खूप छान वाटलं. एक्साइट व्हायला झालं... आठ जुलैला कार्यक्रम आहे. त्या पूर्वी निमंत्रण द्यायला दोघं घरी येणार आहेत....

....

१८, २६.६.२०१४

सुटलेला धीर गोळा व्हायला लागला. काळजी घ्यायची, करायची नाही हे जमायला लागलंय... ‘बोनडेन्सिटी’नं कॅन्सरची काळजी झाकून टाकलीय. ती आपोआप मिटत जाईल. तिकडे लक्ष जाऊ नये, त्याला आपापलं बरं व्हायला अवसर मिळावा म्हणून या दुसर्‍या लक्षवेधक प्रश्नाची योजना असावी..! ‘फ़ानूस बन के हिफाजत’ करतो आहे तो ज्योतीची..! आज छान वाटतं आहे.

.....

‘अथाह’ कादंबरीचा अनुवाद करायला गती आलीय... काही कार्यक्रम.. लेख.. कविता लेखन.. चालू आहे. आठ जुलैच्या कार्यक्रमाचं मनोगत तयार करतेय.. ‘निरोपा’ची तयारी ठेवली तरी तो क्षण येईपर्यंत तो येणारच नसल्यासारखं जगायला अशी निमित्त छान असतात...!

......

९.७, ७.८, २२.११.२०१४

कालचा मृण्मयी पुरस्कार वितरण सोहळा उत्तम झाला. एकूण कार्यक्रम, माझं भाषण आवडल्याचे आभिप्राय मिळाले.. घरी येऊन, फोनवर, फेसबुकवर अभिनंदनाचा वर्षाव झाला... मजा आहे..

‘लम्हा लम्हा’ अनुवादित कवितासंग्रह प्रकाशित झाला. प्रती हातात आल्या.

‘तू लिही कविता’ अनुवादित कवितासंग्रहाचं प्रूफ चेकिंग झालं... पुस्तकाचं काम रीतसर चालू आहे. ‘अथाह’ या कादंबरीच्या अनुवादाचं काम शेवटच्या टप्प्यावर आलंय.. आकाशवाणीसाठी नाटकांचे अनुवाद करतेय... अशी कामं बरीच होतायत पण स्वतःचं नवीन काही सुचत नाहीए. वाचनही होत नाहीए. थोडा वेळ छान आणि बराच वेळ बधीर अशी अवस्था आहे.

.....

१३.१२.२०१४

वेगवेगळ्या कामांत सध्या दिवस भराभर जाताहेत. रुटीन व्यवस्थित निभावता येतंय. एकूण ठीक आहे. तरी अस्वस्थता पार्श्वभूमीवर आहे.... ही कोणत्या सृजनाची चाहूल असेल काय?

चालता चालता समोर डोंगर उभा राहिला. उचललेलं पाऊल टेकवणं भागच होतं. लांब रुंद पसरलेल्या डोंगराला वळसा घालून पुढं जाणं शक्य नव्हतं. पाऊल टेकवावंच लागलं डोंगरावर... ते टेकवल्यावर दुसरं उचलावं लागलं.. टेकवावं लागलं... करता करता डोंगर पार झाला. वाटलेलं पलिकडे नवं जग असेल. पूर्वी कधी न पाहिलेलं. पण डोंगर पार करून चालताना लक्षात आलं की सर्व तेच आहे...! रोजच्या गादीवर झोपून उठल्यावर रोजचंच घर दिसतं आणि दिनचर्या सुरू होते तसं झालं.....

कळेनासं झालं डोंगर पार केल्याचा आनंद मानायचा की एवढं करून त्याच त्या जुन्या जगात चालावं लागण्याचं वाईट वाटून घ्यायचं... नवं काही मिळालं नाही म्हणायचं की होतं ते आबाधित राहिलं म्हणायचं? आणखी चालण्यासाठी मिळालेल्या जुन्याच रस्त्याचं काय करायचं म्हणत बसायचं की आणखी चालण्याची सुसंधी मिळाली म्हणायचं?

या वाढवून मिळालेल्या मुदतीचं काय करायचं?

***

आसावरी काकडे

No comments:

Post a Comment