Wednesday 13 July 2022

माझ्या डायरीतून- ६६

उपचार-चक्र चालूच...

४, ५, ६.४.२०१४

ठरल्याप्रमाणे बोनडेन्सिटी टेस्ट झाली. जवळ जवळ जैसे थे च रिपोर्ट आहे. आणखी खालावला नाही याचं समाधान मानायचं की उपायांची इतकी मोठी फौज तैनात करूनही फारसा फरक पडलेला नाही याचं वाईट वाटून घ्यायचं? Come what may..! असं म्हटलं जोरात.... तरी मूड गेलाच आहे. थकल्यासारखं वाटतंय.

.....

सकाळी मूड छान होता. अनुवादासाठी अकादमीची परवानगी मिळाल्यावर बिंद्या सुब्बा यांच्या ‘अथाह’ या नेपाळी कादंबरीचा अनुवाद करायला सुरुवात केली. नव्या कामाची नवी फाईल ओपन केलीय. ‘तरीही काही बाकी राहील’ हा अनुवादित कवितासंग्रह पद्मगंधाकडून तयार होऊन हातात आला. त्याचा आनंद साजरा करून झाला....

.....

ब्लड रिपोर्ट नॉर्मल आहे. कमी झालेलं वजन वाढलंय.... सगळे रिपोर्ट घेऊन डॉ. रानडें /डॉ. भट्ट यांना दाखवायला गेलो. जैसे थे बोनडेन्सिटी रिपोर्ट पाहून त्यांनी त्या विषयातले तज्ञ डॉ. श्रीरंग गोडबोले यांना भेटायला सांगितलं. भेटलो. त्यांनी सर्व तपासून औषधं लिहून दिली. रोज एक इंजेक्शन घ्यायचं आहे. आपलं आपण घेता येतं. सहा सात महिन्यांनी बोनडेन्सिटी टेस्ट करून परत बोलावलंय.... उपचार चक्र चालूच राहणार असं दिसतंय.

.....

भाच्याचं लग्न ठरलंय. त्या निमित्तानं शिवायला टाकलेले ड्रेस शिऊन आले. बजावून सांगूनही टाईट फिटिंग केलंय. बघून भयंकर चिडचिड झाली. जोरात ओरडावसं वाटलं.... नवं मंगळसुत्र करून आणलंय. छान झालंय. पण अंगच सपाट झाल्यामुळे भिंतीवर अडकवल्यासारखं दिसतंय. ड्रेसचंही तसंच... आता फक्त घालकाढ करण्यातली सुविधा पाहायाची... एकीकडे मनातल्या मनात ‘निरोपा’ची तयारी तरी एवढा संताप... एवढं असमाधान?.... असूदेत.. जिवंतपणाची ही लक्षणं असूदेत...!

.....

९,१०.४.२०१४

‘सीव्हीअर आस्टोपोरेसीस’- डॉ गोडबोले यांनी केलेलं निदान. ‘कॅन्सर तर गेलाच कुठे’ रानडे म्हणाले होते तसं झालं. आता काळजी घेण्यासारखा, करण्यासारखा नवा भिडू आलाय. त्यानं आधीच्या भिडूला खो दिलाय... नवा भिडू तसा अनेकांच्या ओळखीचा आहे. आणि उपाय करणं अवघड नाहीए..

.....

आजपासून डॉ गोडबोले यांनी लिहून दिलेलं टिरीऑस इंजेक्शन घ्यायला सुरुवात केलीय. सोपं पण आहे आणि दुखतही नाही.... काल संजीवनी बोकीलचा फोन आला होता. तिनं डॉ. श्रीरंग गोडबोले यांच्याबद्दल अश्वस्त केलं. म्हणाली की त्यांच्या क्षेत्रातले ते पुण्यातले एक नंबरचे डॉक्टर आहेत. डॉ. कसबेकर यांच्याबद्दलही तिनं असाच भक्कम विश्वास दिला होता. उपचारांच्या यशात डॉक्टरांवर विश्वास ठेवता येणं हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. संजीवनीमुळे मला सुरुवातीपासून हा दिलासा मिळाला..!

.....

११.४.२०१४

रेडीएशन घेण्याच्या काळात रुबी हॉलमधे मीनाक्षी आपटे भेटल्या होत्या. मी रेडीएशनसाठी तयार होऊन बाहेर बसले होते आणि त्या आतून रेडीएशन घेऊन येत होत्या. व्हीलचेअरवरून. आमची नजभेट झाली. परिचय नव्हता तरी त्या प्रसन्न हसल्या. मीही हसले. पण पाठोपाठ रडूच आलं.... नंतर त्यांचं नाव विचारून घेतलं. लक्षात राहिली ती भेट...

‘मिळून सार्‍या जणी’मधे त्या गेल्याची बातमी वाचली. हळहळले... चुटपुट वाटली... खरंतर असं काही वाचलं की सुटली ती व्यक्ती म्हणून बरं वाटतं हल्ली... मग आत्ता चुटपुट का लागली? वाईट का वाटलं? कशानं गेल्या हे कळण्याची उत्सुकता का वाटतेय? त्या जवळच्या वाटल्या म्हणून की त्यांचा आजार जवळचा आणि म्हणून त्याचं हे भवितव्य जवळचं वाटलं म्हणून? मृत्यू दूर असतो तोपर्यंतच ‘मनाची तयारी’ वगैरे असते? जवळ आल्यावर पळावसं वाटतं?

***

आसावरी काकडे

No comments:

Post a Comment