Sunday 29 May 2016

शहाणी निरागसता..

४ १ १९९८

‘तादात्म्यानं जगणं ही सुद्धा एक क्रिएटिव्ह गोष्ट आहे..!’
*
आत्ता डोळे मिटून काही क्षण बसले तर जाणवून गेलं की सगळं काही घडत जातंय. योग्य तेच.... आणि तो अभंग आठवला- ‘जेथे जातो तेथे । तू माझा सांगाती...’ आता मी फक्त ओझं सुपूर्द करायचं बाकी आहे.. विश्वासाच्या हाती..!
*

६ १ १९९८

काल दिवसभर जडपणा जाणवत राहिला. ‘ओझं’ सुपूर्द करता आलं नाही बहुधा... ओझं बाळगायची हौस मिटली नाहीय की ज्याच्या हाती सुपूर्द करायचं त्याच्या अस्तित्वाविषयी पुरेसा विश्वास नाही? काल रात्री असं जाणवून गेलं की थकलेली मान टेकवावी असा खांदा आहे असं मानता येत नसेल, असा विश्वास वाटत नसेल, बुद्धी, विवेकावरच विसंबायचं असेल तर ते ओझं, ते थकलेपण हे सुद्धा काल्पनिक आहे, मीच निराधार काळजीनं, विचारानं ते वाढवून घेतलंय, जसा मान टेकवावी असा खांदा नाही तसं थकवणारं ओझंही नाही हे शहाणपण मला का अनुसरता येऊ नये?
*

७ १ १९९८

काल ‘ओझं’ आणि ते सुपूर्द करावं असं विश्वसनीय ठिकाण याबद्दलचे दोन दृष्टिकोन सुचले. एक, दोन्ही आहे असं मानायचं. ओझं सुपूर्द करून हलकं व्हायचं आपण किंवा दोन्ही नाही हे समजून घ्यायचं खूप आणि निवांत व्हायचं. काल मंजूशी बोलता बोलता असं लक्षात आलं की ‘नाही’ हे समजून घ्यायचं पण तरी ‘आहे’ असं मानण्यात ‘सोय’ आहे. काव्य आहे. ती एक हार्दिकपणे जगण्याची सुंदर शैली आहे. दीपू कशी रमलेली असते आपल्या कल्पना-विश्वात तसं निरागस, निर्विकल्प व्हायचं आणि रमायचं आस्तिकाच्या कल्पनेत. सर्व संतांनी अनुसरली ही पद्धत. अशी शहाणी निरागसता प्रयत्नांनी येईल? की सहज असायला हवी?
*

९ १ १९९८

प्रकाशाचा नाद मालवला तेव्हा नीरव काळोख तिथं होताच हे लक्षात आलं..!

काल सकाळी संस्थेत फिरायला गेले होते. तिथे मुलींची कवायत चालली होती. बाssए मुड.. लेफ्ट..राइट.. असा आवाज ऐकून तिकडे गेले. ते दृश्य बघताना डोळे भरून आले. ओघळलेल्या आश्रुंना कारण नव्हतं कळलेलं...

रोज बँकेत जाताना मेटॅडोरमधे जोशीबाई येतात. त्या आजी झाल्यायत. धावपळ करून घरातलं आवरून  मेटॅडोर गाठतात. मुलगा स्कुटरवर आणून सोडतो. गाडीचा पाठलाग करत येतात दोघं. कुणाला तरी दिसल्या की गाडी थांबवली जाते. मग त्या जेत्याच्या आविर्भावात गाडीत चढतात. त्यांचा खुललेला चेहरा मला खूप आवडतो. अशी छोटी छोटी युद्ध प्राण पणाला लावून लढायची आणि विजय साजरा करायचा...!
*

११ १ १९९८

‘अनुदिनी अनुतापे... घडी घडी विघडो हा निश्चयो अंतरीचा... तळमळ निववी रे राम कारुण्य सिंधो... ’ शुभमंगल सावधान ऐकताच खरोखर सावधान झालेल्या आणि संसार सोडून निघून गेलेल्या समर्थ रामदासांना सुद्धा असं म्हणावं लागलं? .. की ही एक सार्वत्रिक तळमळ त्यांच्या शब्दांतून व्यक्त झाली? ... कर्वे संस्थेत फिरायला जाते तिथे वाटेत कोपर्‍यावर एक चहाचं दुकान आहे. तिथे चक्क करुणाष्टकं लावलेली असतात. फिरून येताना ऐकू येतात...

तिथेच कोपर्‍यावर इमारतीशिवाय असलेल्या रिकाम्या, म्हणून उकिरडा झालेल्या जमिनीच्या तुकड्याकाठी एक बाई, गोळा करून आणलेल्या कचर्‍याचं भलं मोठं पोतं उशाला घेऊन चिंध्याचिंध्यांचं पांघरूण डोक्यापासून घेऊन झोपली होती... एक चैतन्यपूर्ण मानवी देह कचर्‍यात... माथ्यावरच्या नित्यनवेपणानं सुंदर दिसणार्‍या आकाशाखाली? आणि मी काय करतेय इथे त्यासाठी?... हा गहिवर कसला? श्रद्धांजली.. आदरांजली.. मुर्दाड निरीक्षक.. अनेकांसारखी एक रस्त्यावरून जा-ये करणारी वाटसरू केवळ? असो...!!

क्षितिजातून डोकावणारा लालचुटुक सूर्याचा गोल वर अनंत अंतरावर.. आणि इथे खाली पोटापाण्यासाठी निघालेल्या म्हातार्‍या हातगाडीवाल्याच्या ओठात बिडीचा लालचुटुक जळता गोल.. एकानंतर दिसलेले दुसरे दृश्य...!

आज दादाजींशी गप्पा झाल्या.. भीतीबद्दल ते म्हणाले, एकेकाचा एकेक वीक पॉइंट असतो. कुणाला राग अनावर होतो.. कुणाला भीती..! to overcome it is to understand it thoroughly..!

***

Monday 16 May 2016

आत आणखी एक खोली असतेच..

२७ १२ १९९७

उठायला उशीर झालाय. करावंसं वाटतंय त्याची आणि करावं लागतंय त्याची एकमेकांत झटापट चाललीय. ‘करावं लागतंय’ त्याचीही मी आभारी आहे. कारण त्यामुळे करावंसं वाटतंय त्यातली ओढ, उत्कटता वाढतेय. आज या झटापटीत सगळं उलटं सुलटं चाललंय.

परवा एकदा प्राणशक्तीशी स्वतःला जोडणं म्हणजे काय? हे उमगलं. ते मी लिहिलं. ते लिहिताना हेही आत कुठेतरी लुकलुकत होतं की माझं हे उमगणं म्हणजे आत्तापर्यंत या संदर्भात कुणी कुणी काय काय म्हणून ठेवलंय ते समजून घेणं आहे फक्त. प्रत्यक्ष अनुभूतीचा क्षण कसा असेल?
***

२९ १२ १९९७

आज एक झाड बघितलं. त्याला टेकवून एक सायकल उभी करून ठेवली होती. एखादी काठी रोवून ठवल्यासारखा तो एक निष्पर्ण बुंधा होता अगोदर. मी जातायेता रोज बघायची. त्याला हळू हळू पानं फुटली. एकापुढं एक पानं येत गेली तशा त्यांच्या फाद्या झाल्या. ( कसं ना पानं येतायेताच फांदी बनत/घडत जाते... मग पानं गळून पडली तरी फांदी तशीच राहते. नव्या पानांसाठी. त्यांना उगवून येण्याच्या खुणा जपत...) एक दिवस त्या झाडाकडे विशेष लक्ष गेलं. त्याचा आकार नृत्याच्या एखाद्या मुद्रेसारखा झाला होता. मग ते तसंच वाढत राहिलं. झाड झालं. इतर अनेकांसारखं. इतर अनेकांत मिसळून गेलं. आज पुन्हा एक काठी रोवल्यासारखा बुंधा दिसला तेव्हा या सगळ्याची आठवण झाली. मागे वळून पाहिलं तर तो वाढून झाड झालेला आधीचा बुंधा झाड म्हणून बाजूला उभा होता. कुणीतरी त्याला सायकल टेकवून ठेवली होती.

***

३१ १२ १९९७

आज सकाळी प्रार्थनेच्या वेळी मी स्वतःसाठी प्रार्थना केली. असूदे इच्छा. असतेच ना ती आत. आज व्यक्त केली मनातल्या मनात. विसरण्यासाठी. त्यातून मुक्त, दूर होण्यासाठी. असं होता यावं ही पण एक इच्छा धरायला हवी.

हे वर्ष कसं गेलं कळलं नाही. ज्यात रमावं, चवीचवीनं आनंद घ्यावा अशा घटनाही पटकन दृष्टिआड झाल्या.

आता एम. ए. करायचं डोक्यात आहे. त्याचा ताण घ्यायचा नाही असं ठरवलं तरी पुन्हा पुन्हा येतोच आहे. येऊदे. त्याला त्याच्या जागी बसवून मी आत जाईन. आत आणखी एक खोली असतेच. आतल्या खोल्यांचा शोध लागत जाईल अशामुळे..!


***  

Sunday 15 May 2016

पूर्ण विकल्परहित अवस्था म्हणजे श्रद्धा..!

२० १२ १९९७

काळजी, दोलायमानता, होईल की नाही.. काय होईल.. असा कोणताही विकल्प नसलेली पूर्ण विकल्परहित अवस्था म्हणजे श्रद्धा..! पण अशी अवस्था प्राप्त होणं अवघड आहे. म्हणून विकल्पांच्या जागी काही तरी नेमलं जातं. त्यावर श्रद्धा ठेवली जाते. पण ही एक तात्पुरती सोय आहे हे लक्षात घ्यायला हवं...!

*
झाडं धुक्यात बुडली होती. दूर डोंगरांवरची झाडं अंधुक दिसतात तशी अगदी जवळचीही दिसत होती. पारंब्या जमिनीत घुसून खोड होता होता दोन वटवृक्ष एकच असल्यासारखे सलग झालेयत. त्या वटवृक्षाच्या पलिकडे दूर एक दिवा लागला होता. धुक्यातून दिवेही विस्कटलेला प्रकाश संभाळत असल्यासारखे दिसत होते. त्या एक झालेल्या वटवृक्षाच्या दाट फांद्यांमधे छोट्या खिडकीएवढा भाग मोकळा होता. तिथून तो दिवा दिसत होता. दुरून तो त्या झाडाचाच प्रकाशित अवयव असल्यासारखा दिसत होता. जाता जाता दिसलेले ते दृश्य स्मरणात राहिले...
***

२२ १२ १९९७

अजूनही खूप दाट धुकं आहे. खिडकीतून दिसतंय. धावत जावंसं वाटलं धुक्यात. का वाटते त्यात मजा? निघाले. उशीर झाला होता तरी. घरातल्याच कपड्यात होते तरी. दार उघडलं. बाहेर पाऊल टाकणार तर खाली जिण्यात एक कुत्र दिसलं. वर बघत होतं. मी त्याच्याकडे बघितलं तर तोंड वळवून जिण्यात बसून राहिलं. मी जाऊ नये असं वाटत असल्यासारखं. मग घरात आले. बाल्कनीचं ग्रील उघडून बघितलं डोकावून. पुन्हा दाट धुकं दिसलं. पुन्हा जावंसं वाटलं. पण न जाता आतच आले... कधी कधी सौंदर्य न अनुभवणं हाही एक अधिक तरल अनुभव असू शकतो...!
***

२६ १२ १९९७

आजही खूप धुकं होतं. या धुक्याला क्षणभर आकाश मानून ‘आले दारात आकाश’ हा आनंद निःसंकोच का घेऊ नये? साध्या योगायोगाला ‘विठ्ठलाची कृपा’ मनण्यात केवळ एक रीत, सवय असेल. पण याची सुरुवात ज्याने केली, ज्याच्या तोंडून हे प्रथम उमटले त्याच्या मनात तेव्हा कोणते भाव असतील? नम्रता भक्ती अंहकारविरहितता.. असेलच. पण योगायोगातल्या अश्चर्य-भावनेला कृपेचा अमूर्त रंग देण्यात काव्यही आहे... काल बोलता बोलता विचार करण्याचा हा एक दर्शनबिंदू सापडला.

तुकारामांचे भक्तीचे तत्त्वज्ञान समजून घ्यायचेय. ‘बोलविता धनी वेगळाची’ ही अवस्था तर कुठल्याही कलाकाराची असते. पूर्ण निर्मिती-प्रक्रियाच अबोधपणे होत असते. शास्त्रीय चिकित्सा करून त्याचे भलेही कुणी विश्लेषण करोत पण त्या प्रक्रियेवर आपले नियंत्रण नसते. ती प्रक्रिया सुरू व्हावी म्हणून काही करता येत नाही कुणाला. शिवाय त्याची शास्त्रीय चिकित्सा एका बाजूला आपलं बौद्धिक काम करत असली तरी अशा अनुभवाचे ‘बोलविता धनी वेगळाची’ असे काव्यात्म वर्णन भावनिक पातळीवर वेगळ्या स्तरावरचे आकलन करून देणारे असते..!

*** 

Friday 13 May 2016

तर ते एक दप्तर होतं...

११ १२ १९९७

मी रोज फिरायला जाते तिथल्या भल्या मोठ्या वटवृक्षाखाली एक कुत्र उभं आहे असं दुरून वाटत होतं. पण ते इतकं निश्चल कसं उभं आहे? आणि त्याचा रंगही निळसर कसा? असं वाटून कुतुहलानं त्याच्याजवळ गेले तर ते एका दगडावर ठेवलेलं दप्तर आहे असं लक्षात आलं. तिथं अभ्यासाला आलेल्या एका मुलीनं ते ठेवलं होतं तिथं... मला हसू आलं माझ्या प्रथम वाटण्याचं... दुरून काही ग्रह करून घेणं किती हस्यास्पद असू शकतं ना?

***

१६ १२ १९९७

सूर्य उगवण्यापूर्वी असते तसे आकाश केशरी होत होते आणि धुके पसरले अनावर. त्या दोघात किती अंतर असेल? त्या दृश्यापासून कित्येक प्रकाशवर्षे दूर असलेल्या मला ते गुलाल उधळल्यासारखे दिसत होते. त्याच्याकडे पाहात भराभर पावलं टाकत फिरायचा व्यायाम करायला निघाले होते. असंच चालत राहिलं तर त्या दृश्यात मिसळून जाऊ आपण असा एक गंमतीशीर विचार येऊन गेला मनात... आत ग्राउंडवर सुद्धा सगळं मस्त वातावरण होतं. व्यायाम करताना वाकून वर पाहिलं तर त्या धुक्यातून वर चंद्र दिसला. आ हा हा.. असा उद्‍गार उमटला..!

*

जगण्याविषयीचं आकलन वाढवणारं शहाणपण ज्या वाटेनं गेल्यावर फूल उमलावं तसं उगवतं मनात ती वाट परतून पुन्हा जगण्याशी का भिडत नाही? 

ते शहाणपण जगण्यात उतरण्यासाठी लागणारी तटस्थ अलिप्तता आणि शहाणपण उगवू देण्यासाठी हवी असलेली उत्कट माती एकत्र कशी येणार म्हणा..!

*** 

Tuesday 10 May 2016

मृत्यू आहे कुठं?

२ १२ १९९७

परवा नाशिकहून येताना खिडकीतून पाहत होते बाहेर. दूर दूरपर्यंत पसरलेला विस्तार आणि माझं लाडकं आकाश.. बघता बघता पोटात खड्डा पाडणारा विचार मनात येऊन गेला... हे सर्व आपण बघू शकतो... म्हणजे जिथपर्यंत दृष्टी पोचते तिथंपर्यंत पोचू शकतो. विस्तारू शकतो.. जे बघूच शकत नाहीत त्यांचे क्षितिज कुठे असेल? त्यांच्या पापणीत? त्वचेत?.. की कल्पनेनं, मनानं ते दृश्याच्या सीमा ओलांडत असतील? कितीतरी अंध डोळसांपेक्षा कर्तृत्ववान असतात हे माहितीए. तरी प्रत्यक्ष नाही दिसलं ती उणीव राहणारच...
*

घाणीतून जीव (किडे, आळ्या, पाखरं, मच्छर..) जन्माला येतात.. त्यावर पोसले जातात. विषारी द्रव्य निर्माण करणारे किंवा आपल्या शरीरात पोसले जाणारे रोगजंतूही जिवंत जीव असतात. एडस, कॅन्सर सारखे प्राणघातक आजार जीव असलेल्या जंतूंमुळे होतात. ... यात नवं काही नाही. पण हे सगळं आज जिवंतपणाच्या दिशेनं उमगलं... जीवनच भरलेलं आहे की सगळीकडे.. मृत्यू आहे कुठं? जे एकाच्या मृत्युला कारण ते दुसर्‍याचा जीवनाधार..!
***

३ १२ १९९७

काल सकाळी अचानक ‘विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले..’ ही ओळ आठवली आणि डोळ्यात पाणी आलं.. खोलवर काहीतरी जाणवत राहिलं बराच वेळ...
*

मृत्यू आहे कुठं?... कालचं हे जाणवणं (लिहिता लिहिता आलेला फील) पसरत गेलं. वाटलं माणसानं आपल्या बुद्धीच्या बळावर एकेका आपत्तीवर मात केली. उपाय शोधले. एकेका आजाराचं निर्मूलन केलं आणि जेत्यासारखा जगत राहिलाय... या उपायांनी कदाचित काही रोगजंतूंचा (काही स्पेसीज) नायनाट झाला असेल. पण त्यांच्या विनाशातूनच अंकुरलेली, फोफावलेली दुसरी जमात नव्या जोमाने फैलावते आहे...  ना बुद्धी, ना साधनं, ना प्रयोगशाळा... कुठे काय घडतं? कसं अंकुरतं चैतन्य मृत्युच्या भयंकर रूपात? ... अर्थात हे भयंकरपण माणासासाठी. जीवसृष्टीतल्या एका जातीसाठी.. मूलतः भयंकर असं काही नाही. ही सगळी विशेषणं केवळ सापेक्ष आहेत..!
***   

७ १२ १९९७

‘सद्‍बुद्धी’ म्हणजे आपली इच्छा आणि स्वयंभूपणे कार्यरत असलेल्या वैश्विक शक्तीची  इच्छा यातला फरक कळणं. त्या शक्तीच्या इच्छेशी आपली इच्छा जुळवून घेता येणं...
*

रात्री दात घासत होते. कृत्रिम दात लावलाय त्याच्या बाजूचा दात किडलाय बहुधा. भोक पडलंय तिथं. त्यात अन्नकण अडकून बसतात. ते स्वच्छ नाही केलं तर कीड वाढत जाईल. कीड म्हणजे ‘जीव’च की. या जाणिवेनं आणखी पुढे नेलं. आपल्या शरीरात असे आणखी काय काय असेल. काही घडवणारे. काही बिघडवणारे.. खुद्द आपण म्हणजे कोट्यवधी पेशींचा समूह आहोत... क्षणभर थरारलं मन या जाणवण्यानं ! प्रत्येक पेशी म्हणजे एक स्वतंत्र जीव. अशा असंख्य पेशींनी गच्च जोडलेला असतो देह. एकसंध दिसतो म्हणून छान वाटतं. सूक्ष्मदर्शकातून एखाद्या धातूचे कण कण वेगळे दिसतात तसे शरीराचेही दिसत असतील का?.. गंमत..!
***  

आपल्या त्वचेबाहेर आपली उडी जाऊच शकत नाही..!

१७ ११ १९९७

रोजचा दिवस नवंच रूप घेऊन समोर येतोय..

कौतुकाच्या अभिप्राय-पत्रांना उत्तरं द्यायचा उत्साह ओसरलाय. सगळं खरंतर मनासारखं होऊनही मधुन मधून इतका प्राणांतिक कंटाळा कसा येतो? की ती उत्साहाची दुसरी बाजू आहे? बॉल उसळून वर येण्यासाठी जमिनीवर आपटावा लागतो. ही उदासी.. कंटाळा म्हणजे असं आपटून घेणं आहे?
***

२१ ११ १९९७

Creative silence असं कुठं वाचल्याचं आठवत नाहीए. पण ही संकल्पना मनात घोळतेय. काहीच न करता प्रगाढ मौनात स्थित झालेली एखादी व्यक्ती अखंड.. एकसंध अशा शांततेच्या प्रदेशात पोचते. ती शांतता स्वयंभूपणे निर्मितीक्षम असेल.. असं काहीतरी. किंवा अशा मौनाच्या जरा अलिकडे मनात उमटणार्‍या प्रार्थना, विचार एखाद्या यानासारख्या प्रभावीपणे अवकाशात भ्रमण करून कुणा मनात प्रेरणा उत्पन्न करू शकतील. त्या प्रेरणेतून कृती घडू शकेल. कधी कधी आपल्याला अचानक काही सुचतं ते अशा अदृश्य प्रक्षेपणामुळेच.. Creative silence म्हणजे असं काहीतरी असेल..!
***

२३ ११ १९९७

व्यक्त होण्याची गरज इतकी अनावर का होत असेल?... ज्याला प्रथम अशी इच्छा झाली आणि मग सृष्टी निर्माण झाली असं म्हणतात त्या ‘ब्रह्मा’चेच आपण अंश असतो म्हणून..!
*
धुक्यात झाकून गेलेली वाट दिसत नसली तरी आपण चालत राहतो तसा विश्वास ठेवावा जगताना.
*

२४ ११ १९९

नवीन काही नाही. तेच भोवरे. त्याच गटांगळ्या. तीच भीती... दुःख क्लेश घुसमट.. सगळं तेच नव्या पानावरही..!

नेमाडे यांचं ‘टीका स्वयंवर’ वाचतेय अधुन मधून. जवळ जवळ सगळ्यांना तुच्छा लेखणार्‍या चित्र्यांचीही पार उलटी सुलटी केलीय एका लेखात. (अ‍ॅन अँथॉलॉजी ऑफ मराठी पोएट्री- संपादक दिलीप चित्रे) ते वाचून एक गंमतीशीर रिलॅक्सेशन मिळालं. मानदंड मानावा असं कुणी नाहीच तर..! आता कुठल्या आदर्शाचा ताण घ्यायला नको! ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे’.. आत्मनिष्ठा / जाणीवनिष्ठा हा एकमेव निकष ठेवावा लेखनात. मग ते कोणत्याही दर्जाचे निपजले तरी ‘प्रामाणिक’ हा एक गुण तरी त्यात नक्कीच असतो. उड्या मारत राहायचं. शेवटी लक्षात असू द्यायचं की आपल्या त्वचेबाहेर आपली उडी जाऊच शकत नाही..!
***

२५ ११ १९९७

काल बरं नसण्याचा एक अर्थ सापडला. आपला ego, अहं आपलं अस्तित्व सिद्ध करण्याच्या मागे असतो. स्वतःत काही वाढवून किंवा स्वतःतलं काही कमी करून.! स्वतःत काही वाढवता आलं नाही की काहीतरी कमी करायचं! ते म्हणजे आजारपण...

***

Monday 9 May 2016

डुबोया मुझको होने ने..!!

२८ १० १९९७

आज थोडी काठावर आलीय. ही सगळी भावनिक उलथापालथ शरीरातल्या हार्मोन्सच्या पातळीत बदल झाल्याने होते... पाऊस पडतो तेव्हा तो नुसता पाऊस कुठे असतो? वणवे सोसलेले असतात आधी.. त्या सगळ्या प्रक्रियेतून जावंच लागतं. मग कोसळतो पाऊस. हलकं होतं आभाळ... हे कळतं सगळं. पण त्या त्या वेळी नाही उपयोगी पडत.!

पण हे किती बरं आहे ना! नाहीतर एकचएक निरभ्र अवस्था राहिली असती. प्रश्न अनुत्तरित राहाणं जितकं अस्वस्थ करणारं तितकं जगवणारं.. जिवंत ठेवणारं.. काव्य आहे त्यात. पुढचाच क्षण.. माहीत नाही उचललेलं पाऊल कुठे पडेल.. पडेल की नाही.. या माहिती नसण्यात किती मौज आहे ना..!
***

२९ १० १९९७

‘साधना’ दिवाळीअंकात मिर्झा गालीब यांच्यावर नंदिनी आत्मसिद्ध यांचा एक लेख आहे. त्यात एक शेर आहे- 

‘न था कुछ तो खुदा था 
कुछ न होता तो खुदा होता  
डुबोया मुझको होने ने 
न होता मैं तो क्या होता?’.. 

लेखात यावर भाष्यही आहे थोडं. मला वाटलं, इथे ‘मैं’ म्हणजे सर्वनाम ‘मी’ नाही. ‘मैं’ म्हणजे अहं- ego. अहं म्हणजे मी आहे, असण्याची जाणीव. जी पाची ज्ञानेंद्रियांमार्फत होत असते सतत. ‘मी’ आहे या असण्याच्या जाणीवेमुळे समग्रतेशी एकरूप असणं बाधीत होतं. ही जाणीव जेवढी तीव्र तेवढं समग्रतेतून दुरावणं आणि जेवढी कमी तेवढं निकट जाणं... ‘न होता मैं तो क्या होता?’ तो सीर्फ खुदा होता..! लेकिन डुबोया मुझको होने ने..!!
***

७ ११ १९९७

कितीही कामं असली तरी moment to moment जगता आलं तर अधिक कामं अधिक कुशलतेनं प्रभावीपणे होतील. दुसर्‍या क्षणाच्या घरात जाताना पहिल्या क्षणाचं ओझं बरोबर न्यायचं नाही. तिथं मोकळं जायचं...
*
छोट्या शब्दांवर विश्वास ठेवून मी सोपवते आतला मौल्यवान आशय त्यांच्या हाती तेव्हा तेही सर्वशक्तीनिशी जतन करतात तो आपल्या आकारांमधे आणि पोचवतात खुलेपणानं त्यांच्याकडे येतील त्यांच्यापर्यंत...
*
काल गाडीतून जाताना उन्हाची तिरीप आली डोळ्यांवर तर पटकन डोळे मिटले गेले प्रतिक्षिप्त क्रियेने आणि आपल्या शरीरातील सर्व क्रियांच्या अद्‍भुत योजनेचे अपरंपार कौतुक वाटले. आपली प्रत्येक पेशी स्वयंपूर्ण असते एका मर्यादित अर्थाने. अशा ‘अचानक’ वेळी मेंदूच्या संदेशाची वाट न बघता तिथल्या पेशी स्वयंनिर्णय घेऊन टाकतात..!

***