Monday 4 July 2022

माझ्या डायरीतून- ५८

२.५.२०१३

काल सकाळी सुमन, आक्का, भाउजी भेटायला आले होते. नंतर मामा, मामी, गीता.. आले. थोडी दगदग झाली. पण दमायला झालं नाही. त्रासही नाही वाटला. मामा जताना म्हणाले, ‘मांडुक्य उपनिषद’ वाच...’ लगेच काढून वाचायला घेतलंय... बघू मन रमतं का ते. वैश्विक विचार.. एकत्व वगैरे सुंदर उद्‍धृताप्रमाणे तिरस्कारणीय वाटू शकते... या इथल्या वास्तवात ऑपरेशनमुळे पडलेला ‘खड्डा’ एकसारखा ठसठसत असताना मी ‘त्या’ वश्विक वास्तवाचे गोडवे कसे गाऊ शकणार? एकेक पान गळावया..ची आठवण गळणारे केस देत राहिलेत...

.....

७.५.२०१३

‘अमित आनंदाचे विश्व’ (लेखक- डॉ. मो. रा गुण्ये) मधील मांडुक्य उपनिषद वाचायला घेतलंय. मन रमतंय त्यात. एकूण अस्तित्वाचे ब्रह्म... हिरण्यगर्भ... वगैरे चार स्तर असतात तसे आपल्या अस्तित्वाचेही चार स्तर आहेत. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरिया... उपनिषदात याला चतुष्पाद म्हटलं आहे.

जागृतीत सर्वत्र व्दैत आणि व्दंव्द असतं... स्वप्नात दृश्य, द्रष्टा सर्व आपणच असतो. जागृतीत जाणीव स्थूल असते. स्वप्नात सूक्ष्म होते.....

ब्लॉग लिहायला सुरुवात केलीय. प्रतिसाद छान आहे. नवं काही तरी सुचायला हवं.... एकूण ‘कोशा’तून बाहेर पडतेय... ये तो होना ही था..!

.....

९.५.२०१३

‘सुषुप्ती’मधे मन सुद्धा निद्राधीन होतं. जागृती-स्वप्न या दोन अवस्थांमधे मन जागं असतं. ‘सुषुप्ती’मधे सर्व व्दैताच्या पार एकाकार अवस्थेत जीव पोचतो. पण तेव्हा मनासह सर्व निद्राधीन असल्यामुळे त्या एकत्वाची जाणीव होत नाही. सुषुप्तीतून स्वप्नात, स्वप्नातून जागृतीत आल्यावर मन, इंद्रियं जागी होतात. पण त्यांना ‘सुषुप्ती’मधला अनुभव आठवत नाही....

तेरा तारखेला ‘केमो-पोर्ट’ बसवायचा आहे. एक छोटं ऑपरेशन. त्यापूर्वी पुन्हा टेस्ट्स... शरीर पुन्हा पुन्हा फिटनेसच्या कसोटीला उतरतंय.... मोठ्या ऑपरेशनच्या ‘डॉक्टरेट’नंतर आता त्याला पुन्हा एम ए चा एक पेपर द्यायचाय.

‘ड्रेन’ एपिसोड झाल्यावर तिथल्या तिथं गुरफटलेल्या मनाला बाहेर पडण्याचा इशारा दिलाय. तरी मधून मधून ते मागे वळून बघतंय....

मधे एक दिवस मन छान बाहेर पडलं. इतकं की मागं वळून पाहिल्यावर ‘ऑपरेशन’ एपिसोड अख्खाच त्याला स्वप्नासारखा वाटला... हे खरंच घडलंय? असं वाटून गेलं...

.....

१२.५.२०१३

‘अमित आनंदाचे विश्व’ मधील मांडुक्य उपनिषदावरील भाष्य वाचून झालं... माणूस म्हणून आपल्या अस्तित्वाची एकमेव खूण म्हणजे विचार करता येणं. ‘I think, therefore I am’ हे देकार्त यांचे विधान या दृष्टीनं अर्थपूर्ण आहे. या संदर्भातील डॉ गुण्ये यांचं विवेचन वाचताना मनात एक कल्पना चमकून गेली... म्हणजे ‘निरोप’ घेण्याची ऐच्छिक अवस्था कोणती? उपाय थांबवण्याची रेष कुठे आखायची? या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यासारखं झालं...

वाटलं, मी विचार करू शकते, सर्वांचं हीत चिंतू शकते तोपर्यंत मी जगायला हरकत नाही. विचार ही पण एक कृती असते. किमान या स्तरावर कृतीशील राहाता यायला हवं. तोपर्यंत आपल्या प्रयत्नांच्या मर्यादेत जगण्यासाठीचे सर्व प्रयत्न, उपाय करायला हरकत नाही..!

प्रत्येक केस म्हणजे डॉक्टरांसाठी एक प्रॅक्टिकलचा पेपर असतो. मृत्यूनंतर अभ्यासासाठी देहदान करतात.... आपला आजार, आपली केस ही डॉक्टरांसाठी लहान-मोठी आव्हानं असतात. असा विचार केला तर आपल्या दुखण्याकडे जिवंतपणीच ‘देहदाना’चं ‘पुण्य मिळवण्याची संधी असं पाहता येईल. All that matters is attitude... घटनांचे अर्थ लावण्यावर त्यांचा आपल्यावर होणारा परिणाम अवलंबून असतो... (चाळीस वर्षांपूर्वीच्या माझ्या ब्रेनच्या ऑपरेशनचे सर्व पेपर्स कमांड हॉस्पिटलमधे ‘To be preserved’ असा रिमार्क मारून ठेवले होते... ते आठवलं..!)

असा विचार केल्यामुळे वेदना कमी झाल्या असं नाही पण चिडचिड... त्रासणं कमी झालं. सलाइनसाठी सुई लावताना शीर सापडेपर्यंत इथे-तिथे टोचून बघणार्‍या नर्सचा राग येईनासा झाला... 

***

आसावरी काकडे


No comments:

Post a Comment