Tuesday 9 August 2016

एक असणे फक्त

 ५.३.१९९८

मरू घातलेल्या घायाळ कबूतराचा संडासाच्या ड्रेनेजमधे खाली तोंड केलेल्या अवस्थेत संशयित मृत्यू... पाण्याच्या शोधात गेलं असेल तिथं खुरडत खुरडत.. -दोन तीन दिवसांपूर्वी

काळ्या ढगांच्या अनपेक्षित आक्रमणाचा आनंद घेणारा मावळता रसरशीत सूर्य... - काल

दप्तरातून पडलेलं पेन रस्त्यावर... रिक्षावर चिकटवलेलं शिवाजीचं चित्र...- एकदा

गळून पडलेल्या पानांच्या पसाऱ्यात आपल्या फांद्या पसरून त्यावर पाखरांना, खारीना खेळू देत असलेला वृद्ध वृक्ष .... - आज

कुणी येऊ जाऊ नये म्हणून रचून ठेवलेल्या दगडांच्या आडोशाला संसार थाटलेला माणूस... - येता जाता

सई, या सर्वांना सांभाळ तू...

आत्ता इथे खिडकीशी कोकीळा काल पाऊस पडून गेल्याचं सांगतेय ते मला फक्त ऐकायचं आहे...!

***

 १७.३.१९९८

खंत नाही समाधान नाही... काळजी नाही स्वस्थता नाही.... दु:ख नाही आनंद नाही... आजार नाही स्वास्थ्य नाही... हे सर्व रस्त्याच्या दुतर्फा उभं आहे. आणि मी मधून हेलपाटत चालते आहे. कधी इकडे तोल जातो.. कधी तिकडे...

इच्छा नाही अनिच्छा नाही... मरगळ नाही... उत्साह नाही....संभ्रम नाही... शांती नाही... उत्सुकता नाही.. अलिप्तता नाही...

हे सर्व नकार म्हणजे स्थितप्रज्ञता नाही.. की हतबल निराश अवस्थाही नाही...
एका प्रवासातली एक अवस्था... एक असणे फक्त..!

***

Friday 5 August 2016

व्यक्त करण्याची तऱ्हा नि:संशय सुंदर आहे...

23.2.1998

उड्डाणपुलाचं काम चाललंय. तिथून जाताना नेहमी एक दृश्य दिसतं...कबूतरांचा थवा त्या पुलावर घिरट्या घालत असतो. कावळे अशा घिरट्या घालतात तेव्हा त्यांच्यातला एखादा कवळा जखमी होऊन जवळपास कुठेतरी पडलेला असतो... असं दृश्य बरेचदा पाहिलंय. या कबूतरांचं घिरट्या घालणं मला त्या प्रकारचं का वाटलं? त्यांच्या उडण्याचा अवकाश हिरावून घेतला जातोय असं त्यांना वाटत असेल काय? ती आपला परिसर धरून ठेवू पाहात असतील? की आणखी थोडं उंचावर जायला मिळालं या आनंदात पुलाला, त्याचं बांधकाम करणाऱ्या माणसांना धन्यवाद म्हणत असतील..? त्यांची अंतर्गत प्रतिक्रिया काहिही असेल... पण ती व्यक्त करण्याची तऱ्हा नि:संशय सुंदर आहे... निळेपणाच्या पार्श्वभूमीवर मस्त फिरत राहायचं..!

पुलाच्या खाली तयार झालेल्या जागेतही झोपड्या करून राहतायत माणसं. कदाचित बांधकामावरचीच... हातगाड्या.. इ. मानवी संसार... जाता येता हे दृश्य दिसत असतं रोज..!
***

Thursday 4 August 2016

मी त्यांची ऋणी आहे..

१५.२.१९९८

या संपूर्ण विश्वात जे जे काही आहे त्याच्या उच्चतम भल्यासाठी वैश्विक प्राणशक्ती कार्यरत असते... हे सत्य आहे की केवळ positive thinking? की तसं मानणं सोयीचं आहे?

वासंतीला फोन केला होता. तिच्याशी या विषयावर बोलणं झालं. ती म्हणाली, Infinite च्या दृष्टीनं ‘उच्चतम भलं’ असं काही नाही. सगळं काही नुसतं ‘आहे’!.... ती गावाला जाणार होती. ती म्हणाली की तिकडे गेल्यावर ती तिचं नाव तारा वासंती असं ठेवणार आहे. स्वतःतील बदलांबरोबर नावासकट सगळं बदलून टाकायची गरज तिला वाटते. यात त्यामागची उत्कटता, समग्रता, हातचं काही न राखता पूर्णपणे बदलाच्या स्वाधीन होण्यातला खुलेपणा, धैर्य आहे. हे जाणवून गहिवरून आलं. आपण जुन्या ‘माझ्या मी’मधेच किती गुरफटून बसतो ना? बिनदिक्कत सगळं बदलण्यात असाही भाव असेल... स्वतःला पूर्ण विश्वासानं होऊ देण्यावर सोपवणं... जे वळण समोर येईल त्याच्यामागे फरपटल्यासारखं न जाता ते स्वीकारून त्याला स्वागतोत्सुक मनानं सामोरं जाणं... जीने का अपना अपना अंदाज..!
***

मी त्यांची ऋणी आहे
माझ्या घराची साफसफाई
करताना मी
माझ्या घरातला केरकचरा
जळमटं
धूळ
कागदाचे कपटे
दुर्गंधी...
टाकाऊ ते ते सर्व...
बाहेर फेकते आहे बिनदिक्कत
आणि ते निमुटपणे झेलताहेत!
मी ऋणी आहे
त्या उकीरड्यांची
ते माझ्या घरातली घाण
सहन करतात...
एकदाच नाही
पुन्हा पुन्हा!
मी त्यांची ऋणी आहे

मौनाच्या गाभुळलेल्या अवस्थेत
फांदीपासून
निखळतो आहे हा ऋणनिर्देश
शहाणपणाची खूण माझ्यासाठी
फांदीवर ठेवून...!

***

Tuesday 2 August 2016

इच्छांची ही आवर्तनं म्हणजे जगणं..!

      २९.१.१९९८

आपण जागे होतो, डोळे उघडतो त्या आधीच जागे झालेले असतो. पूर्ण जागे होण्याच्या आधीच्या स्टेशनात येऊन हेलपाटत असतो स्वतःत... हे जाणवणं, आपले अनुभव, विचार.. हे भाषेत असतं की भाषानिरपेक्ष असतं? भाषा-विज्ञानातला हा एक वाद किंवा अनुत्तरित प्रश्न या जागं होण्याच्या अवस्थांशी जोडता येईल...

आधी ते नुसतंच निराकारपणे जाणवतं. खरंतर जाणवतं त्याच्याही आधी ते आसपास दरवळत असणार. जाणवलेलं स्पष्ट होणं म्हणजे प्रातिभज्ञान आणि ते व्यक्त होणं म्हणजे कृती किंवा कलाकृती..!

***

३१.१.१९९८

एखादी गोष्ट व्हावी ही तीव्र इच्छाच वाट मिळेल तिथून पाझरणार्‍या पाण्यासारखी आपल्या कृतीतून पाझरत राहाते आणि मग तीच आपल्याकडून करवून घेते हवं ते. ती इच्छा किती जिव्हारी लागलेली आहे त्यावर सगळं आहे. याचंच वर्णन ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती..’ सारख्या श्रद्धेत करता येईल. अनुभवातून विश्वास वाढतो आणि मग कायमसाठी श्रद्धा बनून जातो.

ती इच्छा रक्तात भिनली की आपल्या अपरोक्ष, आपल्या निरपेक्ष सळसळत राहाते आत. आपल्याला वाकवते, वळवते, दमवते, धाववते, तृप्त करते हातचा ठेवून..! मग तो अतृप्तीचा कण सलत राहातो. ती पोसते त्यावर पुन्हा. पुन्हा दरवळू लागते आत... इच्छांची ही आवर्तनं म्हणजे जगणं..!

आधी पूर्ण विवेकानिशी ‘इच्छे’ची निवड करायची आणि मग विवेक बाजूला ठेवून स्वतःला इच्छेच्या आधीन करायचं.. ‘चालविसी हाती धरोनिया...’ असा अनुभव तेव्हा येईल.

***

Monday 1 August 2016

ज्ञानाचा पुनर्जन्म..!

२०.१.१९९८

ज्ञानेश्वर, तुकाराम या संतांनी काळाची आणि भाषेची आवरणं बाजूला सारून ‘ज्ञान’ समजून घेतलं आणि समजून सांगितलं. नवीन काही भर घातली? ज्ञान म्हणजे काय? आवरणं बाजूला सारणंच तर आहे. मूळ ज्ञान ज्याला प्राप्त झालं त्यानं तेच केलं फक्त. म्हटलं तर नवीन तेही नाही. म्हटलं तर प्रत्येकाला, अगदी शेवटचा बिंदू असलेल्या मला गवसलेलंही नवं..! कारण ज्ञान स्वयंभूपणे आहेच.

ज्ञानाची जगण्यातून अभिव्यक्ती होणं हीच ज्ञान होण्याचीही अवस्था आहे. प्रत्यक्ष प्रतीती हीच ज्ञानाची, ते मिळाल्याची खरी खूण आहे.

फुलात गंध असतोच. त्याच्या आस्वादाचा क्षण तो गंध जाणवण्याचा क्षण. गंधाचा पुनर्जन्म होतो अस्वादक्षणी. तसं ज्ञान होण्याचा क्षण हा ज्ञानाचा पुनर्जन्म..!

***