Tuesday 26 April 2016

मौन म्हणजे शब्दापासून शून्यापर्यंतचा प्रवास

२२ १० १९९७

      ‘जगावेगळं अध्यात्म’ – विमला ठकार यांचं पुस्तक वाचलं. त्यातलं मनानं टिपून घेतलं काही.. मौन म्हणजे शब्दापासून शून्यापर्यंतचा प्रवास. शब्द - नाद – आहत नाद – अनाहत नाद – शून्य. आहत म्हणजे घर्षण

      अहं ego म्हणजे somebodyness, somethingness, somebeingness… मौनात, शून्यात या अहंला स्थान नाही. कारण अहंचं अस्तित्व जे शब्द स्पर्श रस रूप गंध जाणीव यांच्यामुळे, यांच्या संदर्भातच आहे ते काहीच मौनात, शून्यात नाही. त्या भानरहीत अवस्थेत भीती वाटते. ज्याला लटकावं असा कुठलाच आधार न मिळून गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर भाररहीत अवस्थेत अधांतरी गटांगळ्या खाव्या तसा फील येऊन लगेच त्या अवस्थेतून अहं उसळून वर येतो. पटकन कशाचा तरी आधार घेतो. पण या अवस्थेला घाबरायचं कारण नाही. या अवस्थेतून खरंतर आपण रोज आपल्या नकळत जात असतो. रोज आपण झोपतो. त्या झोपेतला काही काळ अशा प्रगाढ निद्रेत.. शून्यावस्थेत जात असतो. त्यातून सुखरूप येतोच ना रोज स्वगृही परत? हा निद्रेत झालेला शब्दापासून शून्यापर्यंतचा प्रवास..! तोच जागृतावस्थेत केला की झाले...

      Living and dying from moment to moment... जीवन समग्र आहे. या सृष्टीतला प्रत्येक कण हा एकमेकाला जोडलेला आहे. त्यांच्यात परस्पर अभिमुखता- reciprocity.. mutuality आहे. निसर्गात एकप्रकारची व्यवस्था अंतर्निहीत आहे...

      परवाच एक कविता लिहिली. त्यात या interrelationचा संदर्भ आला. लिहिलंय - ‘कितना अद्‍भुत है / व्यष्टि का सृष्टी से / यह आंतरिक मेल..! असं काहीतरी जाणवावं आणि त्याचा तसाच उल्लेख वचनात, पुस्तकात मिळावा असं खूपदा होतं.. cosmic intelligenceचीच ही उदाहरणं असतील.

***

Sunday 24 April 2016

तिच्या फूलपाखरूपणावर कुठलं कवच घालता येईल

      ३० ९ १९९७

पिऊन झालेल्या चहाचा कप टेबल पुसायचं फडकं पेन त्यावर चष्मा डायर्‍या पुस्तकं मासिकं घड्याळ बॅटरी कापूस रेडिओ पेनस्टँड पैसे रिकामी फाइल कॉर्डलेस फोन आलेली पत्रं सुपारीची पुडी लेटरहेड चष्म्याची केस चिकटवलेलं चित्र... अडीच बाय चार फुटाच्या चौकोनात पसरलंय सगळं. आणखीही काही मावू शकेल इथे. ‘असूदे पसारा कोण इथे मुक्त’ या माझ्याच ओळी आठवत कशाकशानं भरलेली मनाची पिशवीही ओतू पाहतेय मी या चौकोनात..!

***

१० १० १९९७

आज सकाळी मेडिटेशनच्या वेळी खूप छान वाटलं. काही हवं असण्याचा भाव नव्हता. नुसतं जाणवून घ्यायचं की स्वयंभूपणे गोष्टी होत असतात. त्या प्रेरणांच्या स्वागतासाठी आपण मोकळं राहायचं फक्त... काही गाठल्याचा.. मिळवल्याचा भाव होता. उंच उडीत वर, त्या एका उच्च बिंदूशी असण्याचं जे निमिष तितकंच का होईना..!

मग नेहमीसारखी फिरायला गेले. मेघना भेटली. काहीतरी उत्कटतेनं तिला सांगायचं आहे असं वाटत होतं. पण वेगळंच काहीतरी बोलणं झालं. आता ती अकोल्याला जाणार आहे. तिला एकटं जाऊ देताना तिच्या फूलपाखरूपणावर कुठलं कवच घालता येईल असं वाटून गेलं...

.... कुठल्या संदर्भात मनात आलं आठवत नाही. पण असं वाटून गेलं की, ‘पहले जीने की इच्छा मरती है बाद में मनुष्य...’ मात्र एखाद्याची जगण्याची इच्छाच इतकी तीव्र असते की तिचे पडसाद घुसतात कुणाकुणाच्या मनात आणि त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी ते ओढल्यासारखे धावून जातात. मदत दुसरं कुणी करत नाही. ती व्यक्ती आपल्या अजाण इच्छाशक्तीनं मदत करवून घेते... आजच्या काळात भोवती इतकी अनास्था, तुटलेपण, बेफिकीरी दिसतेय.. या दृश्य वास्तवाचं दुसरं टोक तिथं असेल...

काल एक पत्र आलंय. बच्चूलाल अवस्थी ‘ज्ञान’ यांचं. ‘मौन क्षणों का अनुवाद’ या माझ्या कवितासंग्रहाच्या शीर्षकाचं मर्मच उलगडलंय त्यांना. पत्रात त्यांनी लिहिलंय, ‘जो मानस में एक क्षण की बात होती है वह अनुवाद में कई क्षणों का समय लेती है’ किती खरं आहे ना हे?

आज सकाळी अनुभवलेला क्षण अनुभवत असतानाच शब्दबद्ध व्हायला लागला तेव्हा शब्दांना रोकलं. वाटलं तो क्षण ‘पूर्ण’ अनुभवून तर होऊदे..!


***

Friday 22 April 2016

अरेच्चा इथून वाढायचं राहूनच गेलं..!

२९ ऑगस्ट १९९७

आज मनात आलं की जाणीवेचा प्रगल्भ होण्याचा प्रवास चालूच राहणार. ‘मी’ हे या प्रवासात लागलेलं गाव. या गावातला मुक्काम संपला म्हणजे प्रवास संपला असं होत नाही. या मुक्कामात ती ‘क्ष’ या पातळीत पोहोचली असेल तर पुढच्या मुक्कामात क्ष+..... अशीच सुरवात होईल ना ?
***

४ ९ १९९७

      रेडिओवर हिरव्या पाणकावळ्यांबद्दल माहिती सांगत होते. प्रजनन काळात त्यांच्या डोक्यावर हिरवा तुरा येतो म्हणे. आणि ते घरटी बांधायला लागले की नाहीसा होतो तुरा.. माहिती interesting वाटली. निर्मितीप्रक्रिया या विषयावर विद्यापीठात बोलायचं होतं. त्या संदर्भात विचार चालला होता. त्यामुळं या माहितीकडं लक्ष गेलं. आणि मनात आलं निर्मितीप्रक्रियेचा आंतरिक व्यवहार चालू असल्याच्या खुणा माणसाच्याही चेहर्‍यावर उमटत असतील का..?

१४ ९ १९९७

      आत्ता छान मूड आहे. बरं नाहीए तरी झाडासारखं थेंब थेंब वाढत जाणं अनुभवतेय. लिहिता लिहिता किंवा बोलता बोलता नवीन काहीतरी मिळतंय. किंवा माहीत असलेलं नव्यानं उलगडतंय...

      परवा लयबद्ध कवितेविषयी बोलताना म्हटलं, कविता गुणगुणाविशी वाटणं हा काही चांगल्या कवितेचा निकष होऊ शकत नाही. कवितेचा आशय मनात रेंगाळत राहिला आणि तो पुन्हा शब्दात वाचावा असं वाटलं तर ते गुणगुणल्यासारखंच नाही का? एखादी कविता गुणगुणली जाते तेव्हा आशयापेक्षा त्याची लयच आठवलेली असते. गुणगुणाविशी वाटते ती लय. आशय तेव्हा अभिप्रेत असेलच असं नाही...

      पूर येऊन गेला तरी या वेळचा पावसाळा दुरून गेला. त्यानं माझी दखल घेतली नाही. की मीच आक्रसलेली राहिले?.. बाहेर ढोल वाजतायत. त्याचा व्यत्यय होत नाहीए.

      फांदिवर पान.. फळ.. फूल उगवण्याचं ठिकाण किंवा बिंदू ठरलेला असतो. फांदीच्या प्रत्येक बिंदूतून पान उगवत नाही. जिथून उगवतं त्या बिंदूला उचकटून निघावं लागतं फांदितून. वाट करून द्यावी लागते पाना-फुला-फळाला. कोणता असतो हा नवं उगवण्याचा नेमका बिंदू?...

आपल्यावर आलेलं संकट, वाट्याला आलेलं दुःख किंवा टीका म्हणजे असे बिंदू असतात. तिथून फुटून बाहेर पडायचं. वाढायचं. बहरायचं. मनाला तर काय पडेल त्या फटीतून बाहेर पडता येतं. वाढता येतं.. म्हणता येतं की वाढायला नवी दिशा मिळाली. किंवा असंही की अरेच्चा इथून वाढायचं राहूनच गेलं होतं..!

*** 

Wednesday 20 April 2016

कशाची पूर्वतयारी आहे ही ?

२५ जुलै १९९७

      दिवस उजाडलाय. पाण झाकोळलेलंच आहे वातावरण. आकाशात ढगही नाहीत जमलेले. अख्ख आकाशच एक ढग झालंय की काय ? पावसानं ओथंबलेलंही वाटत नाहीय. नुसताच सुंद मुड आहे हवेचा. तळ्यासारख्या माझ्या मनाच्या पाण्यात प्रतिबिंबित झालंय हे सगळं ! बळेच स्वत:ला उठवून कामाला लावलंय. 

       हवेचं बरं आहे ना... वाटलं तरच वाहते प्रसन्नपणे. नाहीतर ठप्प राहाते निःशंकपणे. त्या त्या वेळच्या वाटण्याशी एकनिष्ठ. तिला भीती नाही वाटत की, पुन्हा प्रसन्नतेचा ऋतू येईल की नाही याची ! आतून फाकेल प्रकाश, उजाडेल या विश्वासाचीही गरज नसल्यासारखी हवा ‘असते’ नुसती. कधी ठप्प तर कधी सळसळत. दोन्ही ‘अवस्थाच’ केवळ..! हे स्वयंभू शहाणपण कसं विसरतं पुन्हा पुन्हा? की मरगळ आपला रोल इतक्या इंटेन्सली, खरेपणानं, बजावतेय की ती कायमसाठी आलीय मनात वास्तव्य करायला असं वाटावं!

       आजतर ती इतकी अस्ताव्यस्त पसरलीय मनभर की सकाळी फिरयला गेल्यावर आपापल्या दिनचर्येत मग्न झालेल्या तमाम लोकांचं कौतुक कौतुक वाटलं ओतप्रोत ! मुलांना शाळेत घेऊन जाणारा रिक्षेवाला, पेपर टाकणारी मुलं, मुलांची दप्तरं हातात घेऊन मुलांना शाळेत सोडायला जाणार्‍या आया, देवासाठी फुलं.. दुर्वा गोळा करणार्‍या गृहिणी, मस्तीत वाहनं चालवणारी माणसं.... वाटलं की उभारी धरून ही सर्व माणसं काहीतरी करताहेत हे किती बरं आहे ना ? 

       मरगळून, ढेपाळून सगळी ठप्प राहिली तर? भलेही ती आतून कशीही असतील, वरच्या या कृतींनाही महत्त्व आहेच आहे. कुणासाठी काही करायला हवं अशी बांधीलकी नसलेली माझ्यासारखी माणसं, काठावरून बघत राहतात नुसती. विचार करतात (किंवा करत नाहीत), अर्थ लावत राहतात सगळ्याचा, निष्कर्ष काढतात... जगणारी वेगळीच राहतात. आज असं वाटलं एकदम की काळजी करावा असा देहाचा संसार तरी आहे, हे बरं आहे ना ? एका अर्थी जमीनीवर यायला. नाहीतर .... काय माहीत ?

रुटीनमधें अडकलेल्या, सुखेनैव (?) गुंतलेल्यांच्या कौतुकाची मजल कुठंपर्यंत गेली माहीती आहे ? भ्रष्टाचार... इत्यादी, ‘कु’व्यवहारात गुंतलेल्या लोकांचंही एका अर्थी कौतुकच वाटलं. वाटलं की किती त्रास घेऊन ते निभावतायत आपला ‘कु’रोल ! या सर्वव्यापी मरगळीनं, निराशेनं, निष्क्रियतेनं त्याना थोडाही स्पर्श केलेला नाही. किती समरसून, at any cost, उमेदीनं ते निभावतायत त्यांनी निवडलेली लाईफस्टाईल !... की तेही नाईलाजानेच चाललेत पुढे... परतीची सोय नसलेल्या या वन वे रस्त्यावरून ?

***

२७ जुलै १९९७

वावटळीचा जागीच घुमवणारा वेग कमी झालाय. उडालेली धूळ हळुहळु खाली बसतेय. वाट चुकून भरकटलेले धुळीचे कण परतलेत आपल्या घरी. जमीन सुखावलीय मुलं सुखरूप परतल्यावर नकळत निःश्वास टाकणार्‍या आईसारखी. आतले प्रवाह कसलीशी चाहूल लागल्यासारखे आंतरिक ओढीनं निघालेत कुठेतरी .... कशाची पूर्वतयारी आहे ही ?

*** 

Monday 18 April 2016

काही सेकंदांचं ते दृश्य..

११ जुलै १९९७

आपल्या दुःखातून उजळून निघायचं, संकटातून नवा मार्ग काढायचा, नवं वळण नवी दिशा मिळवायची आयुष्याला.. हे संत तुकारामांनीही सांगितलंय. नुसतं सांगितलं नाही, तसं जगून दाखवलंय. ते म्हणतात, ‘बरं झालं शूद्र म्हणून जन्माला आलो नाहीतर अहंकारानंच बुडालो असतो. बरं झालं बायका मुलं मेली.. दुष्काळात सगळं उद्‍ध्वस्त झालं.. आता मोह करावा असं काहीच नाही उरलं. लौकिक आयुष्यातल्या या संकटांकडे त्यांनी असं पाहिलं. हे केवळ पराभव स्वीकारणं नव्हतं तर संकटातून तावून सुलाखून अधिक उन्नत करणार्‍या मार्गाचा शोध घेण्याची संधी आहे असं मानणं होतं... अशा आत्मशोधाचा पूर्ण आलेख असलेले अभंग इंद्रायणीत बुडवले तेव्हा तर या दृष्टिकोनाची कसोटीच होती. तुकाराम महाराज या कसोटीलाही उतरले. लोक म्हणतात की अभंग तरले... केवळ अभंग नाही ते स्वतःपण तरले....!
     
      परवा सातारला जाताना प्रवास अनुभवत होते. बाहेरचं धावतं दृश्य, ओव्हरटेक करणारी वाहनं, मागे पडणारी वाहनं.. झाडं.. रस्ते.. एका ट्रकला अमच्या एस. टी.नं ओव्हरटेक केलं. तेव्हा त्या ट्रककडे लक्ष गेलं.. २५-३० वर्षांचा तरूण ड्रायव्हर ट्रक्क चालवताना स्टीअरिंगवर हातानं ताल देत गात होता बहुधा. तो ड्रायव्हिंग एन्जॉय करतोय असं त्याच्या चेहर्‍यावरच्या हावभावावरून वाटलं. तो गाण्याच्या तालावर अंगही मजेत हलवत होता. आमची गाडी ओव्हरटेक करून पुढे जाताना गाडीकडे बघत जाओ जाओ असं इतक्या सहज गंमतीनं म्हणत होता की वाटलं आमचं पुढं जाणंही तो एन्जॉय करतोय. काही सेकंदांचं ते दृश्य, हा अनुभव त्या ड्रायव्हरच्या सर्व प्रतिक्रियांसह उगीचच लक्षात राहून गेला..!

***

Saturday 2 April 2016

हिणकस गोष्टीच आकार पेलत असतात..

२७ जून १९९७

      या असीमाच्या पसार्‍यात आपल्या नगण्यतेला काही सीमाच नाही ही जाणीव सतत क्षीण होत जाऊन मी म्हणजेच सगळं काही हे वाटणं इतकं ताजं, इतकं खरं होऊन आपल्याला लपेटून बसतं की बस..! पण हे किती बरं आहे ना? अभिमानानं, उमेदीनं जगायला बळ त्यातूनच तर मिळतं!... कोणी केव्हा केलं असेल ‘केव्हा काय वाटायला हवं’ असं जाणीवेचं प्रोग्रॅमिंग?

***

२८ जून १९९७

      कालचा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम छान झाला. पण अशा कार्यक्रमांचं भाबडं कौतुक आता वाटत नाही. उलट अशा उत्सवांमुळे कमअस्सल साहित्य / कला लोकांसमोर येतात. त्यांचाच गवगवा होतो. ती म्हणजेच कला / काव्य असा समज होतो... असे विचार मनात येऊन ‘काय चाललंय हे?’ अशी प्रतिक्रिया मनात उमटली. आणि लगेच असंही वाटलं की आपल्याबद्दलही इतर काहींना असं वाटत असेल.. हे जाणवून अस्वस्थ व्हायला झालं.

      आजुबाजूच्या सगळ्या अशा गुंत्यात, भंगारात मनाला न पटणार्‍या, बरं न वाटणार्‍या गोष्टी निर्ममपणानं नाकारायच्या ठरवल्या तर सगळ्यातून निवृत्तच व्हावं लागेल. जगण्यासाठी उमेद बाळगायची तर काही कमअस्सल गोष्टी स्वीकाराव्या लागतात. नाकारण्यात वाइटाबरोबर बरंही नाकारलं जातं. त्याहून अधिक बरं होण्याची शक्यताही नाकारली जाते. काकांशी बोलताना समजलेली ‘मिथून’ कल्पना इथे आठवतेय. शुद्ध गोष्ट शुद्ध स्वरूपात ‘आकार’ घेऊच शकत नाही. कल्पनेतून ती आकारात ‘उतरते’ तेव्हा हिणकस गोष्टीच तो आकार पेलत असतात. जसा मृण्मय देह चैतन्य, आत्मतत्त्व धारण करत असतो.!


*** 

Friday 1 April 2016

आपल्याही हालचाली अशाच कुणी निरखत असेल काय?

१९ जून १९९७

      काल आम्ही टेकडीवर फिरायला गेलो होतो. निघताना वाटलं नव्हतं की वरपर्यंत जाऊ. पण सहज जमलं. जरा थांबून अनुभवला भवताल. खाली उतरताना एका जागी बसावसं वाटलं. बसलो. आकाशाचा भव्य घुमट नेहमीच लक्ष वेधून घेत असतो आपल्या नित्य बदलत्या विलोभनीय रूपांनी. काल टेकडीच निरखत बसले. टेकडीत सरळ उभा छेद देऊन रस्ता करतायत. एका प्रचंड यंत्राच्या सहाय्यानं दगड माती बाजूला करायचं काम चाललंय. तिथेच बाजूला त्याचा भला मोठा ढीग तयार होतोय. टेकडीची ही उलथापालथ पाहातेय अधुनमधून.

तंद्रीत विचार करता करता जमिनीवर समोर लक्ष गेलं. मुंगळ्यापेक्षा किंचित मोठा एक किडा दिसला. चकचकित निळसर काळा रंग, चार-सहा पाय, दोन मिशा आणि एवढुसं धड. स्वतःच्या आकाराहून मोठा एक खडा (तो गोल दिसत होता. पोकळ होता की काय कोणजाणे.) मिशांनी ढकलत खाच खळग्यातून, त्याच्या दृष्टिनं कडेकपार्‍यातून तो कुठेतरी चालला होता. विलक्षण वाटत होतं त्याचं ते खडा ढकलत कुठेसं जाणं. एके ठिकाणी तो थांबला. दमला असावा असं वाटलं. पण नाही. मातीत रुतलेल्या दुसर्‍या त्याहून मोठ्या खड्याला उचकटून काढायचा प्रयत्न करत होता. खालून पायांनी माती उकरून ( माती पण कसे खेळ करू देते सगळ्यांना ना? कुणी अशी उकरतं माती तर कुणी प्रचंड यंत्राच्या सहाय्यानं..) मिशा की डोक्यानं तो त्या खड्याला धडका देत होता. त्याच्या मानानं ती प्रचंड मोठी शीलाच होती. त्याचे प्रयत्न फसले. सगळं तसंच तिथेच टाकून तो दुसरीकडे निघाला. बरोबर ‘तो खडा’ होताच आता वाटायला लागलं की ते कदाचित अंड्याचं कवच असेल. आत चिमुकली अंडी असतील? कोणजाणे किड्यांचं पुनरुत्पादन कसं होतं ते... तो किडा स्वतःहून मोठा खडा ढकलत चाललाच होता... त्याच्या गावीही नसेल की आम्ही त्याच्या हालचाली निरखतोय ते!

      अंधार झाला तसे आम्ही परतलो. पाऊस केव्हाही येईल ही शक्यताही होतीच. मोठा पाऊसच काय थोडी दमदार वार्‍याची झुळुक जरी आली तरी तो किडा त्याच्या दृष्टिनं मौल्यवान अशा त्या खड्यासह फेकला जाईल कुठेही. काहीच उरणार नाही त्याचं असं!

      आपल्या यच्चयावत् हालचाली अशाच कुणी निरखत असेल काय?

***   

२५ जून १९९७

संस्थेत फिरायला जाते रोज सकाळी. कडक उन्हाळा होता.. थंडी होती.. सध्या पावसाळा आहे. संस्थेतल्या झाडांशी दोस्ती झालीय. त्यांच्यातले बदल निरखत असते. निव्वळ खोडं आणि वाळक्या फांद्या असतात कित्येक दिवस.. गळून पडलेल्या पानांचे ढीग असतात. चालताना चुरा होतो त्यांचा. इतका बारीक की मातीत मिसळून जातो. आता पाऊस पडतोय ना तर त्या पानांचा थर जमिनीचाच भाग झालाय. असं वाटलं, ही जमीन नाही. शेकडो युगं दर ऋतुत गळणार्‍या पानांचे थर आहेत एकमेकांवर साचलेले! आणि ही ताजेपणानं चमकणारी झाडं आहेत ना ती म्हणजे जमीन आहे आतलं सृजनेच्छेचं वादळ घेऊन उफाळून वर आलेली..!  
***

२६ जून १९९७

      एक कविता लिहिली या आशयाची.. कविता म्हणजे फँटसाइजिंगच! फँटसाइज करण्यामुळं आपलं आकलन वाढू शकतं. समज वाढू शकते. एवढंच नाही तर फँटसाइज करता येण्यानंच फँटसाइज न करणं म्हणजे काय ते कळू शकतं... जगताना आपण एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो तेव्हा त्या गोष्टी नकळत फँटसाइज करतो. त्या आहेत तशा, तेवढ्याच बघायला आलं पाहिजे.