Sunday 24 July 2022

माझ्या डायरीतून- ७७

जगणं आपल्या हातात आहे. मृत्यू नाही..!!!

१-३१.१.२०२१

गुड मॉर्निंग ग्रुपवर ‘गीता आणि आपण’ हा गीतेतील निवडक श्लोकांचा उपक्रम झाल्यावर आता खलील जिब्रानच्या प्रॉफेट पुस्तकातील विचार अनुवादासह देण्याचा उपक्रम सुरू केलाय. अनुवाद माझा भाऊ भास्कर आपटे करतोय त्यामुळे मी त्या विषयात फार गुंतलेली नाही....

आज काहीतरी सुचायला हवं... नव्या वर्षाचं उद्‍घाटन करणारं...

ऑनलाईन कार्यक्रमांचा सिलसिला याही वर्षी चालू राहिला.. ‘विद्याताई, त्यांच्या पुस्तकातून’ या विषयावरच्या कार्यक्रमात मी त्यांच्या ‘साकव’ या पुस्तकावर बोलले..

शिकागो मराठी मंडळात ‘कविता आणि गप्पा’ असा कार्यक्रम झाला. माझ्या बरोबर संदीप अवचट होता. आमचं ट्यूनिंग छान जमलं.. कवितावाचनानंतरची प्रश्नोत्तरं छान झाली.. समाधान वाटलं.

......

१०.२.२०२१

एका कामाच्या निमित्तानं तीन अनुवादित पुस्तकं वाचली.. ‘काहीच नष्ट होत नाही’ मूळ हिंदी प्रियदर्शन. अनुवाद विजय चोरमारे, ‘वन पार्ट वुमन’ मूळ तमिळ- पेरुमल मुरुगन. अनुवाद प्रणव सखदेव आणि ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ मूळ तमिळ- सलमा. अनुवाद सोनाली नवांगुळ.

खूप वेगळं जीवनदर्शन घडलं एकेका पुस्तकातून...

३.३.२०२१

लसीकरण सुरू झाले आहे. एकेकजण लस घेऊन आल्यावर फोटो टाकतायत. अभिनंदन चाललंय.. इव्हेंट साजरा केल्यासारखं चाललंय... आम्हीही त्यात सामिल झालो.. मजाच वाटते आहे. पूर्ण जगाला वेठीस धरून मानसिकता बदलायचं हे सामर्थ्य अजब आहे.  

३-३०.४.२०२१

कोरोनाची दुसरी लाट आलीय. पुन्हा भीती.. अस्थिरता, लॉकडाऊन, ‘Ambulance’च्या सायरनचे आवाज...!

या वातावरणाचा एक परिणाम म्हणून काही होत असलं तरी लगेच डॉक्टरकडे जाणं थोपवावं लागतंय. एकप्रकारे परिस्थितीच निर्णय घेते आहे.

२१ तारखेला दुसरा डोस घेतला. त्रास झाला नाही. फायनल सर्टिफिकेट मिळाले. त्याला पासपोर्टचं महत्त्व आलंय...!

दुसरी लाट हातपाय पसरते आहे.. रोज धक्कादायक बातम्या कानावर येतायत.. वेगवेगळ्या कारणांनी अगदी जवळच्या नात्यातली, शेजारची माणसं गेल्याचं वृत्त कानावर येतंय.. एकावर एक अशा बातम्या आणि कोरोनाचा कहर त्यामुळे अस्वस्थता ठाण मांडून बसलीय...

.....

भैरवी पुरंदरेनं फेसबुकवर अनुभव लिहिलाय... आपला आपण श्वास घेता येण्यातला आनंद जबरदस्त आहे... काही दुखत असेल तर आपण सहनशक्ती वाढवू शकतो. पण श्वास घेता येत नसेल तर काय?.... तो घेता येण्यासाठी तिला सापडलेला उपाय म्हणजे आपण सगळ्यात आनंद घेणे.. दुसर्‍याला देणे.. मन आनंदी असेल तर प्राणवायूचं स्वागत होतं..! अनुभवातून आलेला तिचा हा विचार मननीय वाटला...

......

१-२०.५.२०२१

रोजचा सूर्योदय नव्याने आनंद देतो... उमलणारी तीच फुलं नव्याने लक्ष वेधतात... तशा शारीर वेदनाही रोज नवे रूप घेऊन येतात. या नवनवोन्मेषशाली वेदनांचा आनंद घेता आला तर..? किंवा वेदनेला जी प्रतिक्रिया दिली जाते तिलाच आनंद म्हटलं तर..?

ईशावास्य उपनिषद रोज म्हणता म्हणता ‘ओम पूर्णमदः...’ हा शांतिमंत्र, ‘ईशावास्यमिदं सर्वम्..’ हा पहिला मंत्र आणि ‘कुर्वन्नेवेह कर्माणी..’ हा दुसरा मंत्र यांच्या आशयाची अंतर्गत संगती काय आहे ते उमगलं... ‘ते’ पूर्ण आहे... तिथून वैश्विक आयोजन होते आहे. जे पूर्ण आहे तेच ‘इदं सर्वम्‍’ मधे वसतीला असते. आणि त्याच्या सहकार्याने ते आयोजन होते आहे.... या सर्वातला ‘मी’ एक किंचित कण...

वैश्विक आयोजनात मी स्वतःला समर्पित करते आहे. हे अर्घ्यदान... तुझे तुला.... हा वैश्विक आशय जाणवून, त्याला स्पर्श करून, ग्रेटर सेल्फशी हस्तांदोलन करून खाली, रोजच्या ‘मी’मधे उतरायचं आणि दिनचर्या पार पाडायची.. पहिल्या मंत्रातील ‘तेन त्यक्तेन’ म्हणजे कर्म करण्यासाठी खाली उतरणे..! Think Globaly act localy..!

‘कुर्वन्नेवेह कर्माणी... श्वास घेण्यापासूनची प्रत्येक लहान-मोठी, महत्त्वाची-बिन महत्त्वाची कृती-(कर्म) करत राहून शंभर वर्षे जगण्याची इच्छा धरावी. हेच आपल्या हातात आहे. दुसरं काही नाही. या कर्मांतून सुटकेसाठी मृत्यूची इच्छा धरणं चूक आहे... कारण जगणं आपल्या हातात आहे. मृत्यू नाही..!!!

आपण आपल्या देहाचे विश्वस्त असतो. हे ‘क्षेत्र’ रक्षणासाठी आपल्याला दिलेले आहे....

***

आसावरी काकडे

No comments:

Post a Comment