Sunday 29 May 2022

माझ्या डायरीतून- ४३

२५.६.२००८

आज आम्ही दोघं मनीषा दीक्षितच्या घरी गेलो होतो... चौघांच्या बर्‍याच गप्पा झाल्या.. ‘ताओ ऑफ फिजिक्स’ या पुस्तकातल्या काही संकल्पनांवर चर्चा झाली. antiparticle म्हणजे reverse time / negative time activity.

energy / matter.... जे जे व्यक्त ते भौतिक. जाणीव अव्यक्त असते.. सुपर कॉन्शसनेस म्हणजे ब्रह्म आणि देहातील जाणीव म्हणजे आत्मा असं काहीतरी वाटून गेलं.

Rem- Randum eye movement and Deep sleep असे झोपेचे दोन स्तर असतात. रेम झोपेत दिवसभराच्या सर्व गोष्टींचे मेंदूत व्यवस्थापन होते. अन्वयार्थ लावणे, दुर्लक्षित करणे, विकृत करणे (generalazation, delition, distortion) या प्रक्रियेतून स्मृतिकक्षात स्मृतीरूपात हे साठवलं जातं. माणसाचं व्यक्तित्व या स्मृतींनी बनतं.

प्रत्येकाला आतलं एक स्वप्न असतं. आणि एक बाहेरचं स्वप्न असतं. बाहेरचं स्वप्न म्हणजे जागेपणातलं जगणं. आतलं स्वप्न म्हणजे आंतर्विश्वातले विचार... बाहेरचं स्वप्न बदलायचं असेल तर आतलं स्वप्न बदलायला हवं. NLP- neuro linguistic programming या थेरपीमधे माणसाचं प्रोग्रामिंग बदललं जातं. जन्माला आल्यावर सर्व गोष्टी एका प्रोग्रामिंगनुसार चालू असतात. जीवन बदलायचं तर मूलभूत निवड, मूलभूत धारणा / विश्वास, प्रोग्रामिंग बदलायला हवं. स्वप्नात कुणीतरी पाठलाग करतंय. भीती वाटतेय. तर पुढे न पळता थांबून पाठलाग करणाराला विचारलं की का पाठलाग करतोयस? तर तो म्हणाला मी पाठलाग करत नाहीए... I am not chasing you, I am follwing you.... स्वप्न बदलणं म्हणजे स्वप्नाचा अन्वयार्थ बदलणं. आपणच ठरवलेलं असतं ‘आपलं बुवा असं आहे’. हे ठरवणं बदलायचं...

आजच्या चर्चेत अशा काही गोष्टी समजल्या.... आपल्या समोर सगळं काही खुलं असतं. आपण आपल्या नजरेत, आपल्या दृष्टिकोनातून, आपल्या पाहण्याच्या क्षमतेनं पाहतो. आपले मूलभूत विश्वास त्यातलं एवढंच निवडतात जे स्वतःचं समर्थन करतील. बाकीचं तसंच दुर्लक्षित राहतं.....

.....

२८.६.२००८

या संपूर्ण पृथ्वीवर एकाच वेळी जगत असतात असंख्य स्तरांवरची माणसं. अत्यंत प्रगल्भ ते अत्यंत हीन या दोन टोकांच्या अधल्या-मधल्या स्तरांवर असतं कुणी ना कुणी... एका ‘मी’मधेही वसलेली असते ही संपूर्ण रेंज... अत्यंत प्रगल्भ ते अत्यंत हीन यांच्या मधली...!

......

७.७.२००८

काल अक्षरस्पर्शचा कार्यक्रम झाला. नीलिमा कढे यांनी नृत्य, शिल्प, चित्र यामधील अवकाश या विषयावर मांडणी केली. चांगली केली. कलांचा आंतरसंबंध या बद्दलचं ऐकत असताना असं वाटलं की मूळारंभाचा शोध घेण्याच्या आंतरिक उर्मीतून घेतलेल्या शोध-प्रक्रियेत जे सापडतं ते व्यक्त करण्याचे वेगवेगळे मार्ग म्हणजे वेगवेगळ्या कला. या कला म्हणजे गाभ्यातून उत्स्फूर्तपणे प्रकटलेला पूजाविधीच असेल... एक प्रकारची रिचुअल्स असतील....  परवा दीक्षितांकडे झालेल्या चर्चेत ‘इन्स्टंट हीलींग’ संदर्भातलं ऐकतानाही असं वाटलं की या सर्व थेरपीज, युक्त्या म्हणजेही रिचुअल्सच... मनोभावे केलेली, निर्मितीचं समाधान देणारी कोणतीही कृती म्हणजे पूजाच की..!

....

कविता लिहिताना सुचणारे शब्द वेगवेगळ्या संस्कारांच्या थरांमधून येतात... ते ‘माझे’ नसतात. ‘माझ्या’ कवितेसाठी हे सर्व थर बाजूला करत शुद्ध ‘माझा’ शब्द शोधायला हवा.. कवितेत आयता हातात आलेला शब्द वापरणं म्हणजे अनुभव किंवा जाणीव नीट न न्याहाळणं. स्वतःचा शब्द शोधणं म्हणजे अनुभवाचं, जाणिवेचं स्वत्व शोधणं...

***

आसावरी काकडे

Wednesday 25 May 2022

माझ्या डायरीतून- ४२

२०.३.२००८

भारत सासणे यांची तीन-चार पुस्तकं आणलीयत वाचायला. त्यांच्या एकूण साहित्यावर दिवसभराचं चर्चासत्र आहे. ऐकायला जाणार आहे. होमवर्क म्हणून वाचायचीत... त्यातली ‘राहीच्या स्वप्नांचा उलगडा’ ही कादंबरी आणि काही कथा वाचल्या. तेवढ्यावरून सासणे यांच्या शैलीची थोडीशी ओळख झाली. त्यावरून जाणवलं ते असं- कथावस्तूनुसार ही शैली बदलत नाही. छोटी छोटी वाक्यं.. वर्णनात सर्व सूक्ष्म छटा आणणारी. विशेषणं सलग... एकेका वाक्यासारखी स्वप्नं, पाऊस, धुकं अशी प्रतिकं वारंवार येतात. कथा-कादंबरीतलं वातावरण जुनं-पुराणं.. मध्यमवयीन, मध्यमवर्गीय.. स्त्री पात्रं बर्‍यापैकी समजूतदार, धीट.. पुरुष-पात्रं निराश, उदास, आत्मविश्वास नसलेली, वेडसर, नियतीवादी, खिशात हात घालणारी..

राहीच्या स्वप्नांचा उलगडा... संथ.. त्याच त्याच वर्णनांच्या चालीनं जात विशेष काही उलगडलेलं स्पष्ट न करणारा... हा उलगडा आपण समजून घ्यायचा.. राहीला वह्या... इ. काही कारण सापडलं. पण त्यापेक्षा ते सापडवताना स्वतःतल्या क्षमतांचा शोध लागला हे महत्त्वाचं... डॉक्टर आणि लेले ही हतबल आणि स्थितीशरण प्यादी.... महांकालेश्वर संस्थानिक काळातला असतो तसा नोकर, स्वतःसाठी नाही ‘आमच्या’साठी ग्रंथ शोधायला आलेला हट्टी तंत्रमार्गी गोसावी, आरशात तोंड उघडून जीभ बाहेर काढून स्वतःला बघत रानकाळातलं आपलं सौंदर्य आठवत बसणार्‍या वृद्ध आईसाहेब... त्यांना मरणाची चाहूल लागलीय पण त्यांना जगायचंय... बाळासाहेब धास्तावलेले, विक्षिप्त हसणारे, काहीतरी घडावं म्हणून काहीही नाटकं करणारे, आजुबाजूच्या सर्वांना रुबाबात वापरून घेणारे... त्यांची पत्नी उतारवयात गर्भारपण सोसणारी, बंदीवान, उमेद नसलेली.. नंतर पुत्रप्राप्तीमुळे उत्साहित झालेली... एक नर्स आणि राही एवढी पात्रं कादंबरीभर त्याच त्याच स्वभावानिशी, त्याच त्याच अंधार-उजेड-गंध-धुक्यात वावरत राहतात.... दिवाणखाना, खोल्या कितीतरी, कबूतरखाना, रानगव्याचं डोकं भंतीवर लावलेलं हे नेपथ्य.. त्याची तीच तीच वर्णनं.... कादंबरीवाचन ठरवून पूर्ण केलं... स्वप्नांचा अर्थ उलगडण्यासाठी अबोध मन.. तळघर.. प्रतिकं इ. फ्रॉइडचे विचार आलेत. कर्मफळ सांगणारी एक कथा, आपण फुलपाखरू झालोय असं स्वप्न पडलं. (चिनी तत्त्ववेत्ता) ते स्वप्न की हे सर्व जगणं हे फुलपाखराला पडलेलं स्वप्न? असा प्रश्न पडण्याचा किस्सा.. असे काही आधार कथन-शैलीला...

एकूण सासणे यांची लेखन-शैली भारावून जाण्याइतकी आवडली नाही. एकदा वाचायला ठीक. वाचल्यावर आपल्या घडणीत काही मोलाची भर पडली असं वाटलं नाही. पण वेळ वाया गेला असंही वाटलं नाही...

......

गोव्यातल्या कार्यकमानंतच्या चर्चेतून आलेली अस्वस्थता अजून छान वाटू देत नाहीए. माझ्या लेखन-शैलीबद्दलचा आत्मविश्वास विचलित झालाय. या निमित्तानं अंतर्मुख होऊन विचार करण्यातून काही सापडलं तर ठीकच आहे....

मी जे समजून घेते आहे ते स्पष्ट विवेकाच्या, बुद्धीच्या मार्गानं. त्याला स्वप्नं इत्यादी गूढांचा काही आधार घ्यावा असं मला वाटलं नाही. आणि मला जे कळलंय ते मी थेट, प्रतिकात्मक न करता मांडते आहे. अभिव्यक्तीची कसरत.. मोडतोड नाही.. माझं आकलन वैचारिक, तार्किक, बौद्धिक आहे. त्याला विवेकाची आणि आकलन क्षमतेची, चिंतनाची जोड आहे. पण ध्यान-साधनेतून किंवा जगण्यातल्या व्यापक.. व्यामिश्र अनुभवातून आलेल्या अनुभूतीची जोड नाहीय... म्हणजे मुळीच नाही असं नाही. पण बौद्धिक आकलन ज्या पातळीवरचं आहे त्या पातळीवरची अनुभूती नाही... जगण्यातल्या अनुभवातून प्रतिमा, प्रतिकं येतात... त्या आशय व्यक्त करण्यासाठीच येतात असं नाही. बरेचदा त्यांच्यामुळे आतला अमूर्त आशय मूर्त होतो, स्वतःला कळतो. माझं जगणं, ‘साधना’ चिंतन... साधं, सरळ, एकमार्गी असल्यामुळे अणि मी माझ्या असण्याशी प्रामाणिक असल्यामुळे माझं लेखन साधं.. सरळ.. होतं आहे.

मी जगण्यातले अनेक अनुभव नाकारते आहे. भीतीपायी... शारीरिक, मानसिक बौद्धिक आळसापायी... तशा झालेल्या संस्कारातून मी बाहेर पडू इच्छित नाहीए. ‘उद्‍ध्वस्त’ व्हायची भीती वाटते मला. मी बिनधास्तपणे झोकून देत नाही स्वतःला. आता तर आवराआवर करण्याची मानसिकता डोकं वर काढायला लागली आहे. नकोच, कशाला, जाउदे, बास झालं हे म्हणणं सोयीचं, सोपं वाटतंय. थोडीफार उमेद, उत्साह आहे / दाखवतेय तो ह्यांच्यामुळे... परिस्थिती अनुकूल असल्यामुळे...!

......

२३.३.२००८

काल भारत सासणेंच्या साहित्यावर दिवसभर चर्चेचा कार्यक्रम झाला. सासणेंच्या लेखनाविषयी आदर वाटेल असे काही मुद्दे समजले. त्यांची मुलाखतही चांगली झाली. त्यातून त्यांचं प्रामाणिक, जमिनीवर पाय असलेलं, भूमिका स्पष्ट असलेलं व्यक्तिमत्व उलगडलं. प्रश्न-उत्तरं थोडक्यात झाली. रमेश वरखेडेंनी त्यांच्या लेखनाचा इझमलेस लेखन असा चांगला उल्लेख केला. म्हणजे कोणतीही एकच भूमिका (राजकीय इ.) न घेणं चांगलं, प्रगल्भ असा..

‘जी गुढं सर्वसामान्य माणसांच्या जगण्यात भाषांतरित होतात ती माझ्या लेखनात येतात.’ हे वाक्य लक्षात राहिलं.

स्वप्न म्हणजे आंतरिक उर्मी / शक्ती... इ. समजून घेता येऊ शकेल. पण अशी प्रतिकात्मक वर्णनं लिहिणं..वाचणं ही माझी आवड नाही. प्रतिकांचे अर्थ उलगडणं हे बेसलेस चिंतन होऊन बसतं असं मला वाटतं. ‘राहीच्या स्वप्नांचा उलगडा’ मधलं राहीचं स्वप्न आणि त्या आधारानं तिचं गावात येणं, वह्यांचा शोध, वह्यांच्या आधारानं वडलांवरचे आरोप दूर होतील ही समजूत.. त्यासाठी प्राणपणानं / प्राणापेक्षाही महत्त्वाचं शीलही पणाला लावून प्रयत्न करणं... हे समर्थनीय वाटलं नाही. असो. एक बरं की एकूण लेखन ( जेवढं वाचलं तेवढं) फारसं न आवडूनही चर्चासत्रामुळे सासणे या लेखकाविषयी आदर वाढला..!

***

आसावरी काकडे

Sunday 22 May 2022

माझ्या डायरीतून- ४१

१२.२.२००८

बहुभाषी कवीसंमेलनासाठी गोव्याला गेले होते. संमेलनानंतर गप्पा झाल्या. बोलताना ईशावास्य, हायडेग्गर हे विषय निघाले. या विषयात अधिक अभ्यास असलेल्यांबरोबर बोलताना जाणवलं की त्याविषयीच्या मी केलेल्या वाचनामुळं झालेल्या आकलनाबाबतचं माझं भारावलेपण बाळबोध, नवश्रीमंतासारखं आहे... अंतर्मुख, काहीशी अस्वस्थ झाले... अवधूत परळकर यांना, गीतेसंदर्भात अंतर्नाद अंकात त्यांनी  लिहीलेल्या लेखनाला प्रतिसाद म्हणून एक सविस्तर पत्र लिहिलं होतं.. ते वाचून त्यांचं छान, सविस्तर उत्तर आलं. ते वाचतानाही मनात आलं की माझ्यात्रातले प्रतिसादाचे मुद्दे, लेखनाचा सूर बाळबोध आहे असं त्यांना वाटलं असेल....

खरंतर अभ्यासाचा प्रत्येक टप्पा आपल्याला समजुतीच्या वाटेवर थोडं पुढे नेत असतो. पुढे गेल्यावरच कळतं की आपण मागे आहोत....!

......

२४.२.२००८    

मायमावशी अंकासाठी मंगेश पाडगावकर यांनी केलेल्या अनुवादांवर लेख लिहिण्याच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या वीस-पंचवीस अनुवादांपैकी सात अनुवाद वाचले. गुजराती कविता, कबीर, मीरा, सूरदास आणि शेक्सपियरची तीन नाटकं. या सर्व अनुवादांना दीर्घ प्रस्तावना आहेत.

सूरदास या अनुवादाच्या प्रस्तावनेत म्हटलं आहे, सूरदासाचे भक्ती-काव्य समजून घेण्यासाठी त्याचं चरित्र जाणून घेताना लोककथांचा आधार घ्यावा लागतो.... ते वाचताना जाणवलं की लोककथांचा अन्वयार्थ लावण्यातून सूरदासाची माहिती थोडीफार कळेल पण त्याहून अधिक त्यावेळचे लोकमानस कसे होते ते कळेल. तेव्हाचं सामान्यांचं वैचारिक मागासलेपण कळेल...

सूरदास साक्षात्कारी संत नव्हता. त्याच्या पदांकडे भक्ती-काव्य म्हणून पाहिले पाहिजे...’ प्रस्तावनेतला हा निष्कर्ष धाडसाचा वाटतो. काव्यात अनुभूती आहे की नाही कसं ठरवणार?

या निमित्तानं सूरदास वाचताना वेगळा आनंद मिळाला. कृष्णलीलांचं वर्णन हा भक्तीप्रकार म्हणजे जगण्यातल्या सर्व गोष्टीत ईश्वर-रूप बघणं.. त्या पातळीवरचा आनंद घेणं... ते सर्व (संसार) म्हणजे ‘माया’ किंवा खोटं किंवा पाप असं काही न मानता ते सर्व ईश्वर आहे असं समजून ते भोगण्यातला आनंद घेणं.....!

‘भ्रमरगीत’ भागात उद्धव गोकुळात येऊन गोपींना तत्त्वज्ञान सांगतोय- इथे तत्त्वज्ञान ‘प्रेम-भक्ती’च्या शेजारी ठेवून दाखवले आहे.... जे आवडेल ते घ्यावं...!

अशा भक्ती-काव्याचा पद्यात्म अनुवाद करणं सोपं नाही. त्यात अनेक त्रुटी राहाणं स्वाभाविक आहे. पण कितीही तडजोडी कराव्या लागल्या तरी मूळ आशयाचे सर्व आयाम अनुवादकाला माहिती होतातच. त्यापासून आपण किती दूर गेलोय हे माहीती असतं..!

......

२६.२.२००८

लेखाच्या निमित्तानं छान वाचन झालं... जुन्या काळातलं काहीही वाचताना जाणवतं की संत किंवा राजे महाराजे.. यांच्या खेरीजचा त्या वेळचा समाज बर्‍याच बाबतीत मागासलेला होता. त्या वेळेपेक्षा आताचा समाज वैचारिक दृष्ट्या खूप पुढे गेलेला आहे. त्या काळात जे ढोबळपणे, पुन्हा पुन्हा सांगितलं जायचं ते स्वाभाविकपणे आता कालबाह्य वाटतं. सूचकतेनं, सूक्ष्म विचार सांगणारी मांडणी आता प्रेक्षक, श्रोते, वाचक यांना हवी असते. मात्र ही बौद्धिक प्रगती वरवरची आहे. माणूस म्हणून तो आतून बदललेला नाहीए. कारण त्याला मिळालेलं शहाणपण भाषिक आहे. आणि भाषा ही प्रत्यक्ष जगण्यापासून वेगळीच असते. जशी डबा ही वस्तू आणि डबा हा शब्द दोन वेगळ्या गोष्टी आहेत... तसंच जगण्यातलं शहाणपण आणि त्याविषयीचं बोलणं यात अंतर आहे. माणूस भाषेत, भाषेच्या पातळीवर पुढे गेला आहे. जगण्याच्या पातळीवर नाही..!

***

आसावरी काकडे

Thursday 19 May 2022

माझ्या डायरीतून- ४०

३.१२.२००७

ईशावास्य उपनिषदावरचे अस्तित्वनो उत्सव हे गुजराती पुस्तक वाचतेय. गुजराती वाचताना आणि वाचल्यावर भाषा या माध्यमाची मजा लक्षात येतीय. भाषा ओळखीची नसल्यामुळे, पुरेशी येत नसल्यामुळे पूर्ण आशय कळत नाहीये. पण विषय ओळखीचा असल्यामुळे मथीतार्थ कळतोय. कळलेला, भावलेला आशय मनात रेंगाळणे हा जो भाग आहे तेव्हा खरी मजा येतेय. शब्दांखेरीज आशय स्पष्टपणे रेंगाळू शकत नाहीये. मूळ गुजराती शब्द लक्षात राहात नाहीयेत. त्यामुळे मनातल्यामनात अनुवाद होतोय. वाचतेय गुजराती कळतेय मराठी.... मातृभाषा आकलनात अशी काही मिसळून गेलेली असते की आकलन भाषेत होतेय हे आपल्या लक्षातही येत नाही. आशय लक्षात येतो किंवा बोलला / लिहिला जातो तेव्हा त्याची भाषेशी असलेली सांगड स्पष्ट होते. केव्हा केव्हा वाचलेलं, ऐकलेलं, पाहिलेलं, अनुभवलेलं मनात पडून असतं ते थोडीच भाषेच्या आवरणाची अडचण बाळगत असेल..!

cd च्या एवढ्याशा डिस्कवर केवळ शब्दच नाही तर पूर्ण दृश्य, भाषणे, गाणी... सर्वकाही पडून असतं ते कोणत्या रूपात? केवळ एक वायर विजेशी जोडून सगळं काही जिवंत होऊन उलगडत जातं डोळ्यांपुढे.... सगळं reduce करायचं सूक्ष्मात आणि हव तेव्हा उलगडायचं.... सूक्ष्माची शून्यता आणि पसार्‍याची / उलगडण्याची अनंतता या प्रतीकातून समजून घेता येण्यासारखी आहे.

शून्याचं / nothingnessचं चैतन्याशी- energyशी सतत अनुसंधान असणं (कोणत्याही दृश्य साधनांशिवाय) तर्कानी समजून घेता येईल....

हे कोडं उलगडण्याची ओढ केवळ जिज्ञासेपुरती की जगण्याशी जोडण्यासाठी?... जिज्ञासा तरी कशातून आली? जगताना पडलेल्या असंख्य प्रश्नांच्या प्रेरणेतूनच ना? एक प्रश्न दुसर्‍या प्रशनाला खो देत राहतो. हा खोखोचा खेळ उगमापर्यंत घेऊन जातो. उगमाला भिडलेल्या शेवटच्या प्रश्नानं सुरुवातीच्या प्रश्नाला समजावावं लागत नाही. कारण पहिला प्रश्न आपल्या क्षमतेचं उत्तर मिळवून दुसर्‍या प्रश्नाला खो देऊन खाली बसलेला असतो.... शेवटच्या प्रश्नाचं उत्तर / आकलन पहिल्या प्रश्नाला झेपणार नाही....ळागाळातला प्रश्न आणि शिखरावरचं उत्तर अशी सांगड घालता येणार नाही..!

......        

‘वुई जी’ एक चिनी संकल्पना- अर्थ – ‘महासंकट’ जे आपली दिशा चुकतीय हे दाखवून / सांगून ती बदलण्याची प्रेरणा देतं...

२२.१२.२००७ च्या  ‘गतिमान संतूलन’ या अंकातून.

आणखी थोडं लिहायला हवं होतं असं आता वाचताना वाटलं.

......

३१.१२.२००७

बरेच कार्यक्रम.. प्रवास.. लेखन-वाचन.. घरातलं पाहुण्यांचं येणं-जाणं... सर्व बाबतीत भरगच्च गेलेलं हे वर्ष उत्साह देणारं झालं.. धन्यवाद २००७ !

****

आसावरी काकडे 


Monday 16 May 2022

माझ्या डायरीतून- ३९

२९.९.२००७

ईशावास्यच्या पहिल्या मंत्राच्या पहिल्या ओळीत आहे विश्वाचं तत्त्वज्ञान आणि दुसर्‍याच ओळीत आता-इथं जगण्याचं भान..! मी पहिल्या ओळीच्या आशयाच्या भव्यतेत हरवत होते. ‘भिन्न’च्या निमित्तानं अंतर्मुख होऊन विचार करताना दुसर्‍या ओळीनं लक्ष वेधून घेतलं... मग एकूण तत्त्वज्ञान आणि दैनंदिन जगण्यातलं वास्तव यांची सांगड समजून घ्यायचा प्रयत्न झाला...

भोवतीचं क्लेशकारक वास्तव बदलायचं तर समजून घ्यावे लागतात सर्व आयाम ज्यामुळे ते घडतंय. ते समजून घेण्यासाठी केंद्रात शिरून मग परीघावर यावं लागतं. जरा दूर गेल्याशिवाय मावत नाही पूर्ण दृश्य छायाचित्रात. फोटोग्राफरला व्हावं लगतं अलग दृश्यापासून...

जरा बाजूला होऊन विचार केला की कळतात कारणं. पण ती कारणं सामान्य नजरेला दिसतात तशी, तेवढीच नसतात. त्या कारणांमागे गुंता वाढवणार्‍या कारणांची रांगच उभी असते. उदा. एड्स का? एक.. दोन.. तीन कारणं.. ती कळूनही का टाळली जात नाहीत? तर अज्ञान, बेपर्वाई, असंयम, अगतिकता, वखवख... या गोष्टी का? तर दारिद्र्य.. मणूस असण्याचं भान नसणं.. हे का तर वाढती लोकसंख्या.. हे का? पुन्हा पुन्हा असं पतन का? तर ‘निर्मिती’ची योजनाच तशी असेल..?

प्रत्येक समस्येच्या कारणांच्या मागे मागे जात राहिलं तर असे बरेच प्रश्न पडतात. मुळात हे सगळं इथं का आहे? काय स्वरूप आहे या असण्याचं? ज्यांना हे प्रश्न पडतात अगदी आतून, खूप आतून अस्वस्थ करतात ते जगण्याच्या भर माध्यान्हीतून एकेक प्रहर ओलांडत मौनाच्या गाढ निरभ्र अंधारात बसतात तप करत अस्वस्थतेचा स्फोट होईपर्यंत. तेव्हा त्यांच्या प्रज्ञेला ‘मा निषाद...’ सारखा टाहो फुटतो. आणि दाह शमल्यावर उमटतात ईशावास्यचे मंत्र जे उत्तर देत नाहीत इथे-आत्ताच्या प्रश्नांना. ते राहतात खूप दूर शिखरावर... पण म्हणूनच ते सार्वकालिक आणि सार्वत्रिक होऊ शकतात.. नेहमी समकालीन ठरतात. त्यातल्या शब्दांचं डीकोडींग करत करत प्रत्येकाला मिळवता येते आपापल्या ‘क्ष’ची किंमत. आपल्या काळाला अनुरूप असलेली...!

तत्त्वज्ञानाचे आदर्श अवघड असतात नेहमीच. अप्राप्य असतात. पराभव करणारे.. बिथरवणारे असतात खूपदा. तरी आवश्यक असतो त्यांचा उच्चार... त्यांचे प्रतिध्वनी निनादत राहणं अवती-भोवती आवश्यक असतं. कधी कुणाला कसा दिलासा मिळेल... आधार मिळेल कोसळत्या क्षणी काय सांगता येतं?

......

१.११.२००७

गोवा ट्रीप भरगच्च कार्यक्रमांची.. प्रोत्साहित करणारी झाली. सर्व कार्यक्रम पार पडल्यावर स्कुटर घेऊन फिरायला गेलो. दोना पावला, मीरामार, बामणोली, काकरा, कलंगुट.. इथं मनसोक्त समुद्र अनुभवला. काकरा बीच काकरा खेड्याला लागून. अगदी लहान. तिथे मच्छीमार त्यांची कामं करत होते. अखंड रोरावत लाटा उसळवून किनार्‍याशी धावणार्‍या, लक्ष वेधून घेणार्‍या समुद्राचं त्यांना कौतुक नव्हतं. अंगणात खेळत असलेल्या मुलांकडे कामात असलेल्या आईचं जसं जेवढं लक्ष असेल तसं.. तेवढंच लक्ष मच्छीमार आणि समुद्र यांच्यात होतं असं वाटलं. प्रत्यक्ष जगण्याहून काहीच मोठं नसतं.. समुद्र सुद्धा..!

मिळून सार्‍याजणीची प्रतिनिधी उज्ज्वला आचरेकर कडे जमलो होतो. गप्पा झाल्या. तिथं आलेली डॉ. नीलप्रभा तेलंग तिच्याकडे आलेल्या केसेसबद्दल सांगत होती... नवरा नंपूसक म्हणून घरातल्यांच्या संमतीनं दीरापासून मूल होऊ देणारी, काही वर्षांनी पाळी चुकली म्हणून भांबावलेली स्त्री,  बालविधवा असून इतकी वर्षे कुणाशी (रांडांशीही) संबंध न ठेवलेली, ते अभिमानानं.. आवर्जून सांगणारी प्रौढ स्त्री.... असं आणखी काय काय... ज्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असेल, ज्यांची सर्व क्षमता त्यासाठीच खर्ची पडत असेल त्यांना नीतीमान असण्याची, त्यावर चर्चा करण्याची चैन परवडत नाही..

अंतर्मुख होऊन विचार करायला लावणार्‍या या दोन आठवणी..!

***

आसावरी काकडे

माझ्या डायरीतून- ३८

२२.९.२००७

कविता महाजन यांची भिन्न कादंबरी वाचतेय. त्यातल्या वास्तव-दर्शनानं अवाक्‍ होतेय. रचिताचा नवरा विठ्ठल... तो बाहेरख्याली.. मुलं मोठी.. शिकतायत.  दोघंही शिकलेली आणि नोकरी करणारी... ही लोकलनं जाणारी. निवेदनातून लेखिक विश्वदर्शन घडवतेय. खचाखच शिव्या. रचिताच्या तोंडी न शोभणार्‍या. कुठून कुठून डोक्यात शिरलेलं भडाभडा बाहेर पडतंय कसंही कुठेही.. काही जागी भावना उत्कटपणे सुंदर होऊन प्रकटल्यायत... आत आग असेल तर धग आणि धूर दिसेल त्या फटीतून झिरपत राहणार..!

....

२३.९.२००७

शिकता शिकता ईशावास्यचं पद्यरूपांतर होतं आहे. आज अचानक शांति-मंत्राचं पद्य-रूपांतर करून झालं. चांगलं वाटतंय... ‘भिन्न’मधल्या वास्तव-दर्शनाचा मेळ कसा घालायचा या आकलनाशी? त्या आकलनाचा आनंद या दर्शनानं झाकोळलाय... अशा वास्तवांसाठी हे तत्त्वज्ञान काय करतं? हा प्रश्न विचलित करणारा आहे.

.....

२६.९.२००७

‘भिन्न’ मधलं वास्तव-दर्शन मला इतकं विचलित करतंय की वाटतंय वास्तवाच्या पूर्ण कॅनव्हासवर हेच एक वास्तव पसरलेलं आहे... जगात अशी दुःखं, अशा विकृती, अशी हतबलता, असे भ्रमनिरास, अशा फसवणुकी, असं निगरगट्टपणे जगणं.... अजून कितीतरी किती किती परीनं चाललेलं असेल. तरी बुचाच्या झाडाचा बहर टपटपत राहतोय... विजयाबद्दल जश्न मनवले जातायत... विसर्जनाच्या मिरवणूकी निघतायत बेभान जल्लोषात... केरवारे..चहा-नाश्ते.. जेवणीखाणी... सर्व आपापल्या जागी आपापल्या तर्‍हेनं चालू आहे....!

जगताना कुणाला स्वतःचेच प्रश्न दिसतात, छळत राहतात. कुणाला परिसराचे, कुणाला देशाचे, कुणाला जगाचे, कुणाला विश्वाचे, कुणाला विश्वाच्या आरंभ-अंताचे...! कुणाला कोणत्या प्रश्नांनी समूळ हलवावं, मेंदूच्या पेशींवर कब्जा करून कृतीशील.. चिंतनशील बनवावं हे प्रत्येकाच्या इच्छा-कुवतीप्रमाणे ठरणार. इच्छा-कुवत आत-बाहेरच्या, आज-इथेच्या घटकांनी ठरणार. ज्याच्या वाट्याला जे येईल ते प्रामाणिकपणानं करणं तेवढंच हातात आहे आपल्या. आणि हेही की यातलं एक श्रेष्ठ दुसरं हीन असं काही नाही हे समजून घेणं..! हे असंही समजून घेता येईल की एक विशालकाय व्यक्ती अनंत कालाच्या पटावर असंख्य हातांनी निभावत असते एकेक कर्तव्य त्यांची आंतरिक सांगड कळत नाही हातांना. आपल्यातील श्वास घेणार्‍या संस्थेला पचन संस्थेच्या कार्याचा परिचय असणार नाही. असून चालणार नाही. सर्व संस्थांच्या कार्याचं संतूलन राखलं जातं... समतोल ढळतो तेव्हा कोलमडतो डोलारा.. लहान चित्राचं असं विस्कटून जाणं मोठ्या चित्राचा तोल सांभाळणारा एक भाग ठरू शकतं... हा नियतीवाद नाही. नियतवादही नाही. हे आहे फक्त मर्यादा समजून घेणं..!

.....

टीम इंडियाची विजययात्रा चाललीय. त्यांना राजतीलक केलाय. ‘चक दे इंडिया’च्या तालावर नाचतायत सगळी. पाऊस कोसळतोय आणि हजारो सामान्य लोक जल्लोष करतायत... विजयरथाच्या बाजूनं धावत.. फूटपाथवर, इमारतींवर उभं राहून.. खेळडूंवर फुलांचा वर्षाव होतोय. स्तुतीचा आणि बक्षिसांचाही...

या प्रचंड गर्दीतल्या विजयीरथाच्या बाजूनं धावणार्‍या सामान्य सामान्य माणसाचं मन या क्षणी किती शुद्ध असेल.... ‘स्व’तून उठून देशाला विजय मिळवून देणार्‍यांचं निखळ, उत्स्फूर्त कौतुक करण्याइतकं मोठं झालं असेल..!

हेच समूह-मन हारलेल्या टीमला खाली खेचण्याइतकं खालीही येत असतं...!!

**

आसावरी काकडे

Sunday 8 May 2022

माझ्या डायरीतून- ३७

१६.७.२००७

‘अहं’चं विश्वात्मकतेत विसर्जन करायचं तर ‘अहं’ म्हणजे काय, कोण हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. ते समजून घेणं ही प्रक्रिया विसर्जनाच्या दिशेनंच जाणारी असू शकेल... ‘अहं’चे स्वरूप समजल्यावर ते या विराटाचाच अविभाज्य भाग आहे असं कळेल. मग विसर्जन ही क्रिया वेगळी राहणारच नाही..!

पण अस्तित्ववादी तत्त्वज्ञ सार्त्र वेगळंच काही सांगताहेत. त्यांच्या मते माणसाला जाणीव असल्यामुळे माणसाचा अहं- सेल्फ वस्तूविश्वाहून वेगळा आहे. वस्तू, वनस्पती, प्राणी... सगळ्यांनी भरलेल्या विश्वाचा अविभाज्य भाग नाही. हे वेगळेपण समजून घ्यायचं म्हणजे जन्मानं दिलेल्या वेगळ्या सेल्फचं, देहातल्या ‘मी’चं स्वरूप समजून घ्यायचं...

आध्यात्मिक ‘विसर्जन’ या संकल्पनेत देहात राहून देहातीत होणं अभिप्रेत आहे... या देहातल्या ‘मी’चं देहात असतानाच काय ते करायचं आहे.

‘ईशावास्य’च्या स्पष्टीकरणात हे सर्व कसं सामावून घ्यायचं? ‘मी- सेल्फ’च्या ‘वेगळं’ असण्या-नसण्याची सांगड कशी घालायची?

.......

२३.८.२००७

हैदराबाद-पुणे विमान-प्रवासात... ढगांचे प्रचंड पुंजके.. आकाश, त्यातले रंग.. क्षितिज.. सूर्यकिरणांमुळे चमकणारे ढग... त्यांच्या थरांमधून मधेच पृथ्वीवरचे रस्ते, शेतं, घरं.. यांचं दूरदर्शन...! आकाश अगदी हाताशी असल्याइतकं जवळ, ढग त्याच्या खाली आणि त्यांच्या खाली भूतल... या हाताशी असणार्‍या आकाशाच्या वर आणखी एक, तितकंच दूर असलेलं आकाश... एकाच दृष्टीक्षेपात तीन पातळ्या दिसत होत्या. भूतल, हाताशी आलेलं आकाश आणि वरचं/दूरचं नेहमीचं अप्राप्य आकाश... मी खालच्या पातळीपासून खूप वर गेले होते, त्या ‘उंची’चं सौंदर्य, आनंद अनुभवत होते. आणि ‘ते’ आकाश कितीतरी दूरच होतं...! विमान प्रवास नेहमी असं भारावून टाकतो. पण ते भारावलेपण टिकत नाही घरी पोचेपर्यंत सुद्धा..!

.....

१५.९.२००७

दादरला मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात टेकायला होईल, फ्रेश होता येईल म्हणून रूम बुक केली होती. त्याचा उपयोग झालाही.. नाहीही. फ्रेश झालेलं रूममधून खाली उतरेपर्यंतही टिकलं नाही. दादरहून ४५ नंबरच्या मंत्रालय बसनं चर्चगेटला पोचेपर्यंतचा एक प्रवासच झाला. बसमधून झालेलं ‘मुंबईदर्शन’ अवाक् करणारं होतं. गर्दी तर खूपदा अनुभवाला येते. वाहणारी माणसं दिसतात. पण काल बसमधून जाताना लागलेली दोन मजली(?) घरांची रांग पाहताना डोळ्यांवर विश्वासच बसेना. कच्च्या भिंतींच्या छोट्या छोट्या खोल्या आणि त्यावर माळा असावा तसा दुसरा मजला. त्यात ताठ बसताही येणार नाही इतक्या कमी उंचीचा. वर जायला शिड्या... खालच्या खोलीत, वरच्या जागेत, शिड्यांवर.. नजर पडेल तिथं उघडीवाघडी काळी हडकुळी माणसं.. लहान मुलं.. रस्त्यातही फुटपाथवर जागोजागी उघडी मळलेली माणसं झोपलेली डाराडूर... मधल्या आयलंडच्या जागी पार्क केलेल्या मोटरसायकलींवरही माणसं झोपलेली भर उन्हात भर वाहतुकीत... हे सगळं मी प्रत्यक्ष पाहात होते. अनाकलनीय, असंबद्ध उलगडणारं स्वप्न नव्हतं ते..! बसमधे विविधरंगी लोक चढत उतरत होते.. कंडक्टर भराभर पुढे मागे होत तिकिटं देत होता. भेंडीबाजार... इत्यादी स्टॉप येत होते मागे पडत होते. सगळ्याला एक गती होती. लय होती. केव्हाही काहीही होईल अशी मनाची तयारी असलेली स्वस्थता होती त्या धावत्या गर्दीला.... प्रत्येक माणूस, इमारती, दुकानं, रस्ते.. सगळंच वापरून वापरून जुनं, मोडकळीला आल्यासारखं.... जागोजाग मोठमोठी होर्डींग्ज राज्यकर्त्यांच्या हसर्‍या चेहर्‍यांची. कुठेही कशीही सांडलेली... वाहणारी त्यांची जनता.. तिनं काय करावं या चेहर्‍यांचं? त्यांनी काय करावं या अनावर, बेढभ जनतेचं? प्रत्येक प्रश्नापुढचा हतबलतेचा पूर्णविराम सगळ्यांनी स्वीकारलेला..!

......

१६.९. २००७

‘मुंबईदर्शन’ अजून कुरतडतंय.... यानं मी खरंच अस्वस्थ झालीय की असाही अनुभव मिळाला हे जमा बाजूत जमा करून घेऊन चक्क छान वाटून घेतीय? छान ग्रेट वाटण्याच्या शामियान्यात असुरक्षित वाटण्याच्या पताका फडफडत असतात आणि दुःख क्लेष त्रास होण्याच्या क्षणांना देणं चुकतं झाल्याच्या समाधानाची चमक असते का?

****

आसावरी काकडे

Friday 6 May 2022

माझ्या डायरीतून- ३६

 २९.४.२००७

ईशावास्य उपनिषदाचा अभ्यास चालू आहे. या उपनिषदांवरील भाष्यांवर अवलंबून न राहता थेट संस्कृतमधूनच समजून घेते आहे. वैदिक संस्कृत व्याकरण हाच अभ्यास-विषय असलेल्या भाग्यलता पाटसकर यांच्याकडून एकेक मंत्र शिकते आहे. त्या एकेका शब्दाची व्युत्पत्ती सांगत अर्थ समजावत आहेत. यातून होणार्‍या सूक्ष्म आकलनाचा थरार अनुभवते आहे. हे शिकत असताना संस्कृत भाषेविषयीही काही खोलातले उमगत आहे....

संस्कृत भाषेतली बहुतेक सर्व नामं ही क्रियापदाची साधित रूपं आहेत. किंवा सामासिक रूपं आहेत. (उदा. ईश् = ‘असणे’ चे ईश्वर = असण्याची क्रिया करणारा हे नाम, जग = जन्माला येऊन गमन करणारे ते जग) क्रियापदं गतीची / स्थित्यंतराची निर्देशक.. त्यापासून नामं बनतात. शक्ती आणि वस्तूमान (एनर्जी आणि मॅटर) यात जो संबंध तोच क्रियापद आणि नाम यात आहे. ‘क्षेत्र’ (फील्ड) साकळून ‘कण’ (पार्टिकल) बनतात तशी क्रियापदापासून नामं बनतात. वैश्विक प्रक्रियेशी संस्कृत भाषा अशी निगडित आहे..!

......

९.७.२००७

अरुण गद्रे यांचं ‘भावपेशी’ हे पुस्तक वाचते आहे.- पेशीचे तीन भाग- पेशीकेंद्र- डीएनएच्या प्रथिनांनी बनलेलं, पेशीद्रव- यात जिवंत ठेवणारी यंत्रणा असते, पेशीभिंत- बाह्य जगापासून स्वतंत्र अस्तित्व देणारी. या मूळ पेशीचे विभाजन होत होत अब्जावधी पेशींमुळे एकेक अवयव बनत माणूस तयार होतो. आणि तो ‘पूर्ण’ झाला की त्याच्यात ‘पूर्ण’ माणूस तयार करणारी, माणसाचा सारांश असलेली बीजं तयार होतात. स्त्री-पुरुष बीजांच्या संयोगातून माणूस तयार होतो. ‘भावपेशी’ मधली ही माहिती तशी नवीन नाही. तरी ‘पेशीभिंत’ आणि ‘माणसाचा सारांश असलेलं बीज’ या कल्पना थ्रिलींग वाटल्या. अब्जावधी पेशींच्या सर्व क्षमतांचा सारांश असलेली असंख्य बीजं माणसात तयार होतात.. कुठल्या पेशींनी हात व्हायचं, कुठेल्या पेशींनी हृदय व्हायचं.. इत्यादी डीएनएच्या अज्ञावलीतून ठरतं म्हणे....

हे वाचून मनात आलं, अशा असंख्य आश्चर्यांना अंगाखांद्यावर खेळवत आपण वावरत असतो... धावत असतो एखाद्या रेलवेसारखे... तिच्या आत आणि बाहेर असतात अशी असंख्य आश्चर्ये..! आणि सगळ्यात मोठं आश्चर्य हे की आपल्याला यातलं काहीही समजलं नाही तरी हा खेळ निर्वेध चालू असतो.

......

१५.७.२००७

काल बागेत बाकावर बसले होते. तेव्हा आकाशात भिरभिरणारं एक पाखरू दिसलं... (ईशावास्य उपनिषदाचा अभ्यास सतत मनात घोळत असल्यामुळे) वाटलं ‘ईशत्व’ बरोबर घेऊन किती सहज मजेत भिरभिरतंय ते.... न आकाशाच्या असीमपणाची धास्ती न ईशत्वाच्या आशयाची चिंता...! एक कविताच दिसली त्याच्या रूपात...

आज वाटलं ते पाखरू आपल्यातल्या ईशत्वाशी खेळतंय ते अजाणतेपणी. जाणतेपणानं, जाणीवेचा विषय करून ईशत्वाशी खेळणं म्हणजे भक्ती.... ईश हा जाणीवेचा विषय होण्याच्या अनुभवाचा अनुभव घेत राहणं म्हणजे भक्ती... या सततच्या अनुभूतीचंच वर्णन संत तुकारामांनी ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती / चालविसी हाती धरोनिया’ असं केलं असेल. आपण असतो त्या प्रत्येक क्षणाला आपलं ईशत्व (म्हणजे असणेपण) आपल्यात असतंच. त्याची जाणीव जागी होते तेव्हा त्याची सोबत असल्याचा आनंद होतो...

विषयाचा नुसता अनुभव येऊन चालत नाही त्या अनुभवात आपण उपस्थित असावं लागतं..!

**

आसावरी काकडे

Sunday 1 May 2022

माझ्या डायरीतून- ३५

२१.३.२००७

मुंबई-नागपूर-मुंबई विमान-प्रवासात दोन्ही वेळा खिडकीजवळ जागा मिळाली. इतक्या खूप उंचीवरून खाली बघताना टोलेजंग इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या, वाहनं काडेपेटी एवढी दिसत होती. विमान आणखी उंच गेलं तसं त्रिमिती चित्र सपाट होत गेलं. भल्या मोठ्या कॅनव्हासवर अमूर्त शैलीत केलेल्या पेंटिंगसारखे लहान मोठे चौकोन... लांब लांब रस्ते.. जलप्रदेशाचे पट्टे.. मग पुढे पर्वतरांगा... खालून वर पाहताना उंच दिसतात. त्याच्या विरुद्ध वरून खाली पाहताना बुटक्या दिसत होत्या. पर्वत उंच असतात की बुटके? आपण कुठे आहोत त्यावर याचं उत्तर ठरेल... माणसं.. घटनाही अशाच आपण ‘असतो’ त्यानुसार ‘दिसतात’...

अशा प्रवासाची सवय नसल्यामुळे आकाशातून जातानाचा अनुभव भरभरून घ्यावासा वाटत होता.... मधे काही काळ तर विमान इतक्या उंचीवर होते की खालचं काहीच दिसत नव्हतं. नजर पोचेल तिथपर्यंत आकाशच आकाश एकच एक स्थिर असं. त्या दृश्याच्या पुढून प्रचंड वेगाने जातानाही बाहेरचं दृश्य तेच राहिल्यामुळे विमानही स्थिरच आहे असं वाटत होतं. गतीचा अनुभव बाहेरचं दृश्य वेगात बदलण्यामुळे येतो. दृश्य स्थिर तर धावणारे आपणही स्थिरच वाटतो. प्रचंड वेगात जात असूनही तो वेग आपल्यात मुरल्यामुळे जाणवत नाही... पृथ्वीवर तिच्या दुहेरी भ्रमणाचा वेग मुरवून आपण स्थिरच असतो की..! आपल्या आतल्या शारीर स्थित्यंतराची गती तरी कुठे जाणवते आपल्याला?

विमानप्रवासानी दिलेल्या या अद्‍भुत अनुभवापुढे ज्यासाठी गेले होते तिथले अपेक्षाभंग आणि दुखावणारे अनुभव छोटेसेच वाटले. मूड गेला. कंटाळा आला तरी त्रासले नाही. आतपर्यंत दुखले नाही. शांत राहता आलं आणि घरी परतल्यावर बरंच काही मिळवून आल्यासारखं वाटलं..!

......

१८.४.२००७

कुंडीत एक कळी आली होती. ती काल उमलली. तिला ऊन लागेल म्हणून कुंडी उचलून सावलीत ठेवताना धक्क्यानं फूल गळून पडलं. वाईट वाटलं.. उचलून घेतलं. वाटलं देवाला घालावं. पण मग वाटलं त्याचा वास घेता येणार नाही. आणि असं त्याचा आस्वाद न घेताच देऊन टाकायचं... बरोबर वाटेना. खरंतर त्याचा आस्वाद घेणं, तो जाणवणं हाच पूजाविधी नाही काय? हा आस्वाद ‘मी’ घेणं यात ‘मी’ म्हणजे जाणिवेचं एक रूप... फुलाला जिवंत आस्वादाची दाद मिळाली तर ते अधिक सुखावेल ना?

......

२५.४.२००७

भाचीच्या साखरपुड्याला कोल्हापूरला जाऊन आले. भावाशी गप्पा झाल्या. त्यात त्याला पडलेले प्रश्न विचार करण्यासारखे वाटले. विचार कुठून येतात? आणि आनंदानं मोहरून यावं असं बरंच काही घडत असूनही तितकं मोहरता का येत नाही?

परतीच्या प्रवासात नकळत त्यावर विचार झाला.... विचार म्हणजे काय? त्याचं द्रव्य कोणतं? हे लक्षात घेतलं तर ते कुठून येतात ते समजू शकेल. मला वाटतं विचार म्हणजे वाटण्याचं, जाणवण्याचं शब्दांकन... भलेही ते मनातल्या मनात असेल. अमूर्त रूपात काहीतरी वाटतं/ जाणवतं ते शब्दांकनामुळं विचाररूपात व्यक्त होतं....

अमूर्त रूपात जे वाटतं/ जाणवतं ते म्हणजे आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या रासायनिक द्रव्यांच्या विशिष्ट प्रमाणात एकत्र येण्यातून निर्माण होणार्‍या क्रिया-प्रतिक्रिया..! विचार जर असे शरीरातल्या रासायनिक प्रक्रियेतून निर्माण होत असतील तर ते बदलणं शक्य आहे.. ! त्यासाठी आहार नियंत्रण, यम-नियम-प्राणायाम इत्यादी मार्ग सतत सांगितले जातात. ते करणं हातात आहे. पण विचार बदलावेसे वाटणं, हे ‘वाटणं’ टिकून राहाणं, आणि त्याचा तीव्र इच्छाशक्तीनिशी पाठपुरावा केला जाणं हे अधिक अवघड आहे..! त्यासाठी तर वाचन-मनन.. स्व-संवाद करणारं डायरीलेखन..!

**

आसावरी काकडे

माझ्या डायरीतून- ३४

१४.२.२०७

मनात आल्यावर लगेच सातारला जाऊन आले. जाताना वाटेत विनोबांचं ‘रामनाम - एक चिंतन हे छोटसं पुस्तक वाचलं. अनेक संत नामस्मरणाबद्दल सांगत असतात. पण मी निमुट श्रद्धाळू नसल्यामुळे नमस्मरण ही अशी काय प्रक्रिया आहे की ते एक भक्तीचं साधन व्हावं? या जिज्ञासेतून या संदर्भातलं काही काही वाचत असते. विनोबांसारख्या विवेकी कार्यकर्त्यानेही यावर पुस्तक लिहावं हे मला उत्सुकता वाढवणारं वाटलं. म्हणून प्रवासात बरोबर घेतलं. त्यात तीन महत्त्वाचे मुद्दे मिळाले.

१- रामनाम.. खरंतर कुठलंही ‘नाम’ हे अंतःकरण शुद्धीचं साधन आहे. त्याचं उच्चारण म्हणजे अंतरजगत आणि बहीर्जगत यांच्या मध्यावर ठेवलेला दिवा. तो दोन्ही उजळवतो. तुलसीदासाच्या दोन ओळी दिल्या आहेत-

‘रामनाम मनी दीप धरु दीह देहरी व्दार

तुलसी भीतर बाहेरहू जौ चाहती उजियार

२- ईश्वरनाम, वैराग्य, अध्यात्म... अशा गोष्टीमधे ढोंग, दंभ आहे. फसवेगिरी आहे. म्हणून अपण ते नाकारतच चाललो आहे. असे एकेक पवित्र शब्द (मार्ग) आपण पुसायला लागलो तर ते फार भयंकर होईल. ते नव्या रूपात पुन्हा पुन्हा समोर यायला हवेत.

३- विष्णुसहस्रनामात दोन नावं आहेत- शब्दातीगः , शब्दसहः . त्यांचा अर्थ ईश्वर शब्दापलिकडे आहे पण तो शब्द सहन करतो.

......

२१.२.२००७

काल ‘बोल माधवी’ या माझ्या अनुवादित कवितासंग्रहाला अनुवादाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. लोकसत्ता आणि ई टीव्हीवर बातमी दिली गेली. दिवसभर अभिनंदनाचे फोन येत राहिले. त्या निमित्ताने हा अनुवाद करताना काय काय जाणवलं ते आठवत राहिलं....

‘बोलो माधवी’ कवितासंग्रहातील कवितांचा विषय असलेली कथा अंगावर येणारी आहे. तिचं कुठेही भांडवल न करता, त्यातल्या ‘आकर्षक’ गोष्टी अधोरेखित न करता ती कथा परिशिष्टामधे यथातथ्य निमुटपणे ठेवून दिलीय. त्या कथेचं पूर्ण आंतरिकीकरण करून त्यातलं माधवी हे पात्र / व्यक्तीरेखा समजून घ्यायचा, तिला बोलतं करण्याचा प्रयत्न या कवितांत केला आहे. आणि हे करताना काळ, इतिहास, कविता या मूलभूत संकल्पना प्रस्तावनेमधे स्पष्ट करून घेतल्या आहेत. कवितांमधे माधवी येते ती केवळ प्रतिमा बनून... पूर्ण तपशील लगडलेला तो काळ परिशिष्टातल्या कथेत बांधून ठेवलाय आणि त्या संदर्भातल्या उत्कट प्रतिक्रियांना काव्यरूप दिलंय. प्रतिमेला चिकटून काही तपशील येतो जो आजच्या वास्तवाशी जोडता येतो.

इतिहास आणि कवितेचा संबंध समजून घेतला आहे. इतिहास-पुराणातला साररूप आशय काळाला भेदून खेचून आणलाय आणि वर्तमानाच्या मुशीतून काढून त्या समकालिन आशयाला कविताबद्ध केलंय.

कालसापेक्ष तपशील वजा करून त्यातल्या वृत्ती-प्रवृत्तींना अधोरेखित करत ही कविता आजच्या स्त्रीवास्तवाचं चित्रण करते.

रचनाकाराची निर्मित पात्रं लोकमनात रुजून निर्मात्यापासून अलग होऊन स्व-तंत्र होतात. काळ आणि तपशील गळून पडतो आणि सदैव समकालिन आशय प्रक्षेपित करणारी प्रतिमा बनून ती अमर होतात. ‘माधवी’ हे असं पात्र आहे.

माधवीला समजून घेण्यातली कवीची तात्त्विक, प्रगल्भ भूमिका महत्त्वाची आहे. या आकलन प्रक्रियेतून मिळालेल्या आशयाला काव्यात्म पातळीवर नेतानाची कवीची खानदानी, उत्कट आणि प्रामाणिक शैली प्रभावी आहे.

यात केवळ माधवीच्या आधाराने आजच्या स्त्रीवास्तवाचे चित्रण केलेले नाही तर या वास्तवाला एक पुरुष या नात्यानं मीही जबाबदार आहे... त्यातून मुक्त होण्यासाठी काय प्रायश्चित्त घेऊ माधवी? असा प्रश्न विचारलेला आहे.

या अनुवाद-प्रकियेच्या प्रभावातून नंतर माझा ‘स्त्री असण्याचा अर्थ’ हा कवितासंग्रह आला. त्यातल्या एका कवितेत आलेली ओळ ‘पुरुषही पेलू शकतो असं स्त्रीपण’ हे ‘प्रायश्चित्त’ आणि एकेका कवितेतील व्यक्तीरेखेतून आलेलं असं स्त्रीपण म्हणजे काय त्याचं चित्रण.. म्हणजे ‘बोल, बोल माधवी / स्त्री कधी बोलणारच नाही काय?’, ‘काय प्रायश्चित्त घ्यायला हवंय?.’...या ‘बोल माधवी’तील कवितांमधे आलेल्या दोन प्रश्नांची उत्तरंच आहेत असं आता विचार करताना जाणवलं..

२००१ साली केलेला अनुवाद आणि २००५ दरम्यान लिहिलेल्या ‘स्त्री असण्याचा अर्थ’ मधील कविता ही स्वतंत्र निर्मिती यांच्यातला हा आंतरसंबंध समजून घेण्यासारखा आहे.

......

२८.२.२००७

देकार्त – पास्कल संवाद असा एक लेख वाचनात आला. त्यातला एक उल्लेख लक्षात राहिलाय- पृथ्वी सूर्याभोवती फिरते या कोपर्निकसच्या मताला पुष्टी देणारा सिद्धान्त देकार्तने मांडला पण प्रसिद्ध केला नाही. या संदर्भात देकार्त म्हणतो, ‘हा सिद्धान्त म्हणजे संकटाला निमंत्रण.. चर्च सामर्थ्यवान आणि शंकेखोर आहे. आणि मी काही रोज शूर असत नाही...’ हे वाचल्यावर माझ्यातल्या घाबरटपणाला मला माफ करता आलं.

***

आसावरी काकडे