Sunday 27 February 2022

माझ्या डायरीतून- १७

४.१.२००४
कालचा रा.ग.जाधव सरांच्या मुलाखतीचा कार्यक्रम छान झाला. त्यांचे विचार ऐकताना, खूप वाचन असलेला व्यासंगी माणूसही इतका सकारात्मक विचार करू शकतो हे जाणवून छान वाटलं.  ‘we all are guilty for all of us’ अशी बरीच मननीय विधानं कोट करत, अनेकांचे संदर्भ देत एकूण साहित्य व्यवहार आणि समाज-जीवन यावर केलेले त्यांचे भाष्य आवडले. खूप दिवसांनी एखाद्या कार्यक्रमाने प्रभावित झाले.
.....

२८.१.२००४
अस्वस्थ समाजाचा एक घटक असलेली मी अस्वस्थ आहे.... ‘आपल्याला वाटतं तेवढी परिस्थिती वाईट नसते.... श्रद्धा.. सबुरी.. लोका समस्ता सुखिनो भवन्तु...’ अशा समजुतींची चारी बाजुंनी फिल्डींग लावली आणि स्वस्थ व्हायचा प्रयत्न केला. तरी, असं स्वस्थ होणं म्हणजे पलायन... मुर्दाड होत जाणं असा एक क्षीण टाहो फुटण्याच्या प्रयत्नात होता. पण परीक्षेचा फॉर्म भरायचा होता.... इ. व्यापामुळे तिकडे दुर्लक्ष होऊ शकलं... ताण घ्यायची एक ठराविक क्षमता असते. ती अनेकात विभागली गेली त्यामुळे प्रत्येकाच्या वाट्याला थोडी थोडी आली.
.....

१५.२.२००४
मनाची अस्वस्थ चलबिचल स्थिरावण्यासाठी त्याला समजुतीचे वळसे देताना वाटलं की होऊदे ना चलबिचल. मी कशाला लक्ष देतीय? प्रतिक्रिया न देणं हा एक यावरचा उपाय आहेच. मग असंही वाचलेलं आठवलं की मनाची चलबिचल ही शरीरातील रासायनिक प्रक्रियेचा परीणाम असते. शरीरातील प्रेरित झालेल्या पेशींचा आवेग स्थिरावायला वेळ लागू शकतो. अस्वस्थतेचं कारण संपताक्षणी त्यांनी स्व-स्थ व्हावं ही अपेक्षा तशी चुकीचीच. वेगात असलेली गाडी हळूहळू थांबवावी लागते.

तर मनाची चुळबुळ ही एका अर्थी शारीरिक घटना.... तिला प्रतिक्रिया देणारी ती म्हणजे ‘मी’?.. ‘स्व’? मग ती थांबावी म्हणून प्रयत्न करणारी कोण? हे सगळं अनुभवणारी, त्याचा अन्वयार्थ लावणारी कोण? ...
तत्वज्ञानाच्या संकल्पना कोशात 'स्व' - 'सेल्फ'ची एक छान व्याख्या आहे-

'Self' is the elusive 'I' that shows an alarming tendency to disappear when we try to introspect it.'

त्यामुळे 'मी' कोण हे कधी ठरतच नाही..!
***
आसावरी काकडे

माझ्या डायरीतून- १६

३.१०.२००३

सध्या नवरात्र चालू आहे. माईकवर मोठ्या आवाजात गाणी.. आरत्या चालल्यायत. आश्चर्य म्हणजे काल लिहिण्यात मी एवढी गढले होते की त्या कर्कश्य आवाजावर चक्क ताल धरला गेलाय हे लक्षातही आलं नाही. गाणं होतं डोकं फिरलया... लगीन ठरलया... नेहमीप्रमाणे एक्साईट होण्याइतपत चिडचिड होण्याऐवजी ही सहज प्रतिक्रिया जाणवून मजाच वाटली..! हा काही माझ्यातला बदल वगैरे नाहीए. काल तब्येत चांगली होती असं फारतर म्हणता येईल.

......

४.१०.२००३

काल एकांशी फोनवर बोलणं झालं. ‘परमेश्वराची लीला बघा कशी असते’ असं ते एका संदर्भात म्हणाले. ऐकून आश्चर्य वाटलं... परवा डाळिंब सोलताना आतली रचना पाहून अशा निर्मितीचं आश्चर्य वाटलं... ही परमेश्वराची लीला म्हणता येईल. पण कितीही आश्चर्यकारक असल्या तरी मानवी घटनांना परमेश्वराची लीला कसं म्हणता येईल? गणितात जे उत्तर शोधायचंय त्यासाठी प्रश्नात एक अक्षर घालतात.. गणित सोडवून त्या अक्षराची किंमत काढायची असते. ‘परमेश्वराची लीला’ हा गणितातल्या त्या ‘क्ष-य’ सारखा एक पोकळ आकार आहे. जे कळत नाही, गूढ आहे त्याबद्दलचं नवल व्यक्त करणारा एक आविष्कार फक्त..!

......

७.११.२००३

डायरीतील जुनी पानं वाचताना किती कसा विचार करत होते ते पाहून सध्या तसा विचार होत नाहीए याचं नवल वाटलं. खरंतर एम ए अभ्यासामुळे ‘तत्त्वज्ञान’च इकडे तिकडे चोहीकडे अशी स्थिती आहे.. तरी?.... आता भराभरा नुसतं ग्रास्प करणं चाललंय. तिथं रेंगाळता येत नाहीए. परिक्षेत स्वतःच्या विचारांना जागा नाहीय. कदाचित परिक्षार्थी म्हणून चाललेल्या वाचनात मला रस नाहीए...

बर्‍याच घुसळणीनंतर मी श्रद्धा.. भक्तीभाव समजून घ्यायला लागले होते. अभ्यासानी त्याला खिळ घातलीय. विचारांची उलथापालथ झालीय. नव्या आकलनाचं व्यवस्थापन करायला वेळ मिळत नाहीए. चिडचिड.. कंटाळा... लगेच ताबा घेतायत मनाचा..!

......

३१.१२.२००३

एकूण वर्ष चांगलं गेलं. बराच प्रवास.. वाचन.. अभ्यास.. ‘मेरे हिस्से की यात्रा’, ‘बोल माधवी’ हे दोन कवितासंग्रह... तरी कंटाळा सारखा भोवती घुटमळत राहिला.. नव्या वर्षात त्याच्या विळख्यातून बाहेर पडायला हवं..!

***

आसावरी काकडे

माझ्या डायरीतून- १५

१७.७.२००३

Problems of Philosophy हे रसेलचं पुस्तक वाचतेय. काही काही आकलनाच्या जागा दीर्घ श्वास घ्यावा इतपत वर उचलतायत. पुन्हा जैसे थे..

सध्या सकाळी योगासनाच्या क्लासला जातेय. तिथं आसनं करताना अवयव ठराविक दिशेने, ठराविक पद्धतीने ताणायचे असतात हे समजले... रसेलचं पुस्तक वाचताना बुद्धीला तसा ताण पडतो आहे. बुद्धीला पद्मासान किंवा शीर्षासन जमायला लागलं की तिच्या आकलन कक्षेत थोडं काही येऊ शकेल..

हे पुस्तक वाचताना मला काय, किती समजतंय त्याबरोबरच जी कसरत होते आहे त्यामुळे बुद्धी तंदुरुस्त होईल. असंही मनात आलं की बुद्धीला कळणार्‍या या गोष्टींमुळे माझ्या जगण्यात काय, कसा फरक पडेल? मनात निर्माण होणार्‍या भावनांचं काय? योग्य आकलनामुळे त्यांचं व्यवस्थापन शक्य आहे काय?

.....

२१.७.२००३

आज टेकडीवर फिरायला गेलो होतो. दोन तीन महिन्यांपूर्वी याच टेकडीवर गेलो होतो तेव्हा सर्व परिसर उन्हानं कोळपून गेला होता. वाळलेल्या काड्यांसारख्या फांद्या तोलत ओकीबोकी झाडं सर्वभर पसरलेली.. आणि जमिनीवरचं गवत जाळल्यासारखं झालेलं... इतकं वैराण होतं दृश्य की इथं परत कधी हिरवं काही उगवेल यावर विश्वासच बसला नसता. पण आज बघितलं तर सगळं हिरवंगार..! राहून राहून समाधान कौतुक आश्चर्य वाटत राहिलं. वाटलं, कोणतीच अवस्था Hopeless असत नाही. असणार नाही. There is always a way leading to Hope..!

१३.८.२००३

दुःख, निराशा, कंटाळा, उदासीनता, नाउमेद... इत्यादीमुळे मनाचं भांडं जितकं खरवडून निघेल, जितकं खोल, रुंद होईल तितकं नंतर या सगळ्याच्या टोकाशी असलेल्यांची पाळी येईल तेव्हा ते घ्यायला मनाचा पैस वाढलेला असेल. गेले कित्येक दिवस हे पोखरणं चालू आहे...

‘मिळून सार्‍याजणी’मधे गौरी देशपांडे यांचं पत्र वाचलं. पत्रातून व्यक्त होणारी निराशा पाहून आश्चर्य वाटलं. त्याच्या शेजारी माझा कंटाळा/निराशा ठेवून पाहिली. आणि कितीजणांचे कितीतरी कंटाळे आठवले.. कंटाळा ही चीज आहे तरी कशी? ती भावस्वरूप आहे की उमेदीचा अभाव असं आहे तिचं स्वरूप?

***

आसावरी काकडे

माझ्या डायरीतून- १४

११.४.२००३

संध्याकाळी डोंगरावर फिरायला गेलो. उन्हं उतरल्यावर हळूहळू छान प्रसन्न वाटू लागलं. फिरून येताना वाटेत बाकावर बसलो जरा वेळ. हे बासरी वाजवत होते. एक मतिमंद मुलगी वडलांबरोबर फिरायला आली होती. दोघं आमच्या मध्ये येऊन बसली. माझी चलबिचल झाली... परत जाताना ती मुलगी ह्याना म्हणाली, तुम्ही छान वाजवता. तुमचं नाव काय? मग ह्यानीही तिला नाव विचारलं. तिनं नाव सांगितलं. ‘हे माझे बाबा’ म्हणून ओळख करून दिली. आम्ही ‘सद्‍भाव’ मधे राहतो. आमच्याकडे या असं म्हणाली. त्या दोघांमधला हा साधासाच संवाद ऐकताना डोळ्यात पाणी आलं. ती आली तेव्हा तिच्याकडे बघून कसंतरी वाटलं होतं. दया वगैरे.. पण तिचं बोलणं ऐकल्यावर वाटलं, खरंतर तीच नॉर्मल आहे. सहज आहे. तिचे बाबा काही न बोलता निघाले होते. सहज संवाद तिनं साधला..!

......

१२.४.२००३

दुपारी जोरात वारा सुटून पाऊस आला. वार्‍याबरोबर झाडं गदागदा हलत होती. पिकली पानं गळत होती. वाटलं, असं आपल्याला आपल्यातलं नको ते गाळता आलं तर? किती वेळा एवढ्या तेवढ्यावरनं अस्वस्थ व्हायचं.. किती वेळा सावरायचं... किती वेळा सारवा सारव जगण्याची... किती वेळा तेच ते?

......

मेघना पेठेचं लेखन मला आवडतं. तिनं एका लेखात लिहिलेलं मला इतकं आवडलं की ते मी टिपून ठेवलं. आणि मग ते माझ्याही समजुतीचं भाग झालं... तिनं म्हटलंय, ‘लिहिण्याचा काळ हा बघण्याचा, समजण्याचा असतो. न लिहिण्याचा काळ हा जगण्याचा, सोसण्याचा असतो... चक्रधर स्वामींच्या ‘दृष्टान्तपाठात’ एक लेकुरवाळीचा दृष्टांत आहे. अनेकातलं एक मूल असं असतं, जे आईशिवाय कुठेच रमत नाही. रडत राहातं. ‘ते काईसेनि बुझावेना’ पाहिल्यावर अखेर आई येते.’ चक्रधर स्वामी परमेश्वर भेटीच्या संदर्भात हा दृष्टांत देतात. मेघना पेठे हा दृष्टांत लेखनाच्या संदर्भात वापरतात. त्यांनी म्हटलंय, आपला एखादा अनुभव, सल ‘काईसेनि बुझावेना’ झाल्याशिवाय लेखन होत नाही. होऊ नये...

......

हे लिहिताना एका जुन्या कवितेतल्या काही ओळी आठवतायत-

‘अस्वस्थतेचं अग्नीकुंड

एकसारखं पेटतं ठेवावं

तेव्हा कुठे

अग्नीशलाकेसारखी

कविता प्रगट होते..!’

(आकाश कवितासंग्रह)

***

आसावरी काकडे

Monday 14 February 2022

माझ्या डायरीतून- १३

३.४.२००३

निवृत्तीनंतर एस पी कॉलेजमधून एम. ए. (तत्त्वज्ञान) करत होते तेव्हा- आज वर्गात ‘स्व’ म्हणजे काय? What is Self? हा विषय झाला. हुसेर्लच्या मते ‘स्व’ पारदर्शी असतो. रिकरच्या मते नसतो...  विषय मनात घोळत राहिला. वाटलं, ‘स्व’विषयी असं काही कसं म्हणता येईल? मानवी जाणिवेलाच काय ते कळत असतं. ती स्वसंवेद्य- स्वतः स्वतःला जाणणारी असते. पुन्हा तिचं ‘स्वरूप’ तिलाच कसं काय कळावं? आपल्या देहासंदर्भात विचार केला तर आपला चेहरा कुठे आपल्याला दिसतो? त्यासाठी आरसा घ्यावा लागतो. किंवा कुणीतरी सांगावं लागतं. या दृष्टीनं विचार केला तर रिकर बरोबर वाटतो. त्याच्या मते ‘स्व’च्या आकलनासाठी मध्यस्थाची गरज असते..

मान-पाठ दुखतीय. त्यामुळं त्रासायला होतंय. कंटाळा येतोय... खरंतर अत्यंतिक आवडीतूनच मी हा एम. ए.चा घाट घातलाय. निवृत्तीनंतर छान मोकळं राहाता आलं नाही. मग अस्वस्थतेनं धावायला हे गाजर बांधलं डोळ्यासमोर. सतत काहीतरी व्यवधान का लागतं माणसाला? रिकामेपण सुखानं का उपभोगता येऊ नये?..... असंही वाटलं, आत्ता.. अजून लर्निंगच चालू ठेवलं तर डीलर्निंग कधी करायचं?... की नवं काही मिळवताना जुन्याचं डीलर्निंग आपोआप होतच असतं?

.......

९.४.२००३

पुस्तक वाचताना लिहिलेली अक्षरं, शब्दं दिसतात. वाचलेल्या मजकुराचा आशय कळतो. त्याच वेळी मधे मधे चष्म्याची फ्रेमही दिसते... जाणणारी ‘मी’ फ्रेमसारखी  अशीच अनुभवणार्‍या ‘मी’च्या मधे मधे येत असते. चष्म्यामुळेच दिसतं तरी त्याचं मधे मधे येणं अडचणीचं वाटतं. वाचताना व्यत्यय आणणारं वाटतं. तसं जाणणार्‍या ‘मी’चं भान अनुभवाच्या आड येतं. ‘मी’चं भान म्हणजे ईगो? सर्व बाबतीत ईगोलेस होणं आवश्यक मानतात ते यासाठीच असेल?

.....

११.४.२००३

आपलं सगळं वाटणं आपल्या विचार करण्याच्या पद्धतीनं ठरतं. ती पद्धतच बदलून पाहिली तर? माझं सकाळचं अमुक एक वागणं आता जुनं झालं... आताच्या ‘मी’नं ते अजून कशाला वागवायचं? जात्या क्षणाला सतत खो देऊन वर्तमानाच्या जागेवर येऊन बसायचं ते लगेच उठायच्या तयारीनच..!

***

आसावरी काकडे

Wednesday 9 February 2022

माझ्या डायरीतून- १२

५.२.२००३

काल कॉलनीतल्या तीन लहान मुलांनी मिळून एका बेडकीला खेळत असलेल्या बॅटनं ठेचून मारलं. मी गेटपर्यंत जाताना मुलांचं काहीतरी चाललेलं पाहिलं होतं. त्यांना बेडकाला त्रास देऊ नका असं म्हटलं होतं. मला वाटलं ती मुलं बेडकाला जाऊ देऊन खेळत असतील. पुढं गेल्यावर मी हे विसरूनही गेले होते. पण परत येताना पाहिलं तर त्यातला एक मुलगा बेडकीला पुन्हा पुन्हा बॅटनी मारूनच टाकत होता. मी त्यांच्यावर मनःपूर्वक रागावले. मला खूपच अस्वस्थ व्हायला झालं. रागावून घरी येताना वाटलं तीन..चार..पाच वर्षांच्या मुलांचं हे कृत्य क्रूरपणाचं म्हणता येईल का? त्यांनी काय म्हणून बेडकाला असं ठेचून मारलं असेल? केवळ खेळ म्हणून?... त्यांनी घरात मोठ्या माणसांना पाली, झुरळं मारताना पाहिलं असेल? अशा प्राण्यांना मारायचंच असतं असे संस्कार त्यांच्यावर नकळत झाले असतील? ... मेडीकलचे विद्यार्थी शिकण्यासाठी इतके बेडूक मारतात त्याच्याबद्दल काय म्हणायचं? ती मुलं आपापल्या अंतःप्रेरणेनं वागत होती? हे वाईट आहे. असं करू नये हे न कळता केलेलं कृत्य वाईट होईल? अस्वस्थतेला या प्रश्नांनी खोलवर गुंतवून ठेवलं..!

.....

रोजच्या सारखी सकाळी लवकर फिरायला गेले होते. दिवस कामाला लागला होता.. एक माणूस चहाची गाडी लावत होता. सर्व नीट लावून झाल्यावर पहिल्या चहातला थोडा चहा व पाणी त्यानं रस्त्यावर टाकलं... काय असेल हा ‘विधी’? काय भावना असेल त्याची या मागे?... दूध उतू घालवणे.. चित्राहुती.. अशा प्रथांशी काही नातं असेल याचं?

....

भर वाहत्या रस्त्याच्या कडेला भाजीवाले.. भाजी घेणारे यांच्या गर्दीत एक भाजी विकणारा १२-१३ वर्षांचा मुलगा पत्र्याचं एक पिटपिट वाजणारं छोटंसं खेळणं कानाशी धरून वाजवत होता. इतक्या तमाम आवाजांच्या गर्दीत खेळणं कानाशी धरून तो पिटपिट आवाज ऐकण्यातला आनंद घेत होता. त्याची ही सहज कृती बराच वेळ मनात रेंगाळत राहिली... आनंद किती हाताशी असतो ना..?

.....

२०.२.२००३

कवितेतील प्रतिमांचं एस्थेटिक फंक्शन समजणं म्हणजे कवितेचा आशय समजणं..! कुठून कुठून कमावलेल्या अशा आकलनांच्या सोबतीनं मी समृद्ध होत चाललेय आणि हे आकलन शेअर करावं असं कुणी समानधर्मी मला भेटेनासं झालंय...

***

आसावरी काकडे

माझ्या डायरीतून- ११

२१.१०.२००२

काल संध्याकाळी स्टेशनवर आण्णांना भेटून आलो. ते भडूचला निघालेत लेकाकडे... स्टेशनवर गेलं की तिथल्या माहोलमधे आतपर्यंत काहीतरी हलतं. तात्पुरतं, तरी जिवंत वाटतं सगळं. कुठल्याही परिस्थितीत जगलंच पाहिजे असं वाटतं. काहीही प्रश्न असले तरी जगलं तरच त्याला उत्तरं मिळण्याची शक्यता. प्रश्न असतात तेव्हा उत्तरं कुठेतरी असतातच..! एक दिशाभूल करणारं विधान?

आज वर्गात राईल या तत्त्वज्ञाच्या संकल्पना शिकवताना ‘पद्धतशीर दिशाभूल करणारी विधानं’ हा विषय होता. (त्यावेळी मी तत्त्वज्ञान विषयात एम. ए. करत होते.) त्याचा अर्थ आतून उमगल्यासारखं वाटलं.. ‘विचारविश्व – घटनाविश्व’ ही मांडणीही उलगडली. ‘सृष्टी त्रिगुणात्मक आहे.. स्थितप्रज्ञ.. निष्काम कर्मयोग..’ या संकल्पना विचारविश्वाचा भाग आहेत. आपण हे सगळं किती खरं मानून चालतो..! हेच ते दिशाभूल करणं..! वेगळ्या विश्लेषाणामुळे ही दिशाभूल लक्षात येत असेल तर ते एका अर्थी जाग आणणारं आहे. दुसर्‍या अर्थी सगळे आधार काढून घेणारं..!!

......

१०.११.२००२

Reality’ बद्दलच्या या नव्या आकलनामुळे मी आधारासाठी धरलेली खुंटी सुटल्यासारखं झालं होतं. अचानक जाणवलं की ‘Reality’च्या असंख्य शक्यता आहेत. आणि मी मानली ती त्यापैकी एक असू शकते. असंख्यांपैकी मी एक दर्शनबिंदू..!

....

३१.१२.२००२

दोन हजार दोन साल संपतंय. डायरी लिहायला घेतलीय. वर्षाच्या सुरुवातीला आखलेले बेत बरेचसे डायरीतच राहिले. एकूण वर्ष डल गेलं असा फील आहे. सर्व प्रश्नांना उत्तरं मिळाल्याचं समाधान होतं. एम. ए. च्या अभ्यासामुळे ते गेलं..! पण त्यामुळे क्रिएटिव्ह अस्वस्थता.. त्यातून नवे प्रश्न असं न होता शून्यावस्थाच आलीय. सगळी घुसळण थांबलीय. प्रश्न उरले नसल्यासारखी, उत्तरं अपुरी असल्यासारखी, काही मार्ग नसल्यासारखी एक मख्ख अवस्था आलीय.. अभ्यासामुळे घुसळण पूर्ण होऊन बाहेर पडल्यावर काय होतंय पाहू. मूड जाणं.. असणं अनुभवतेय. स्वस्थता आहेही आणि नाहीही...

***

आसावरी काकडे

Wednesday 2 February 2022

माझ्या डायरीतून- १०

१६.५.२००२

माझ्या सख्ख्या मैत्रिणीची आई गेली. तिला भेटायला गेले होते. ती स्थिर होती. थोडेच दिवसांपूर्वी तीची ताई गेलेली. ताईच्या आकस्मात मृत्युच्या धक्क्याहून कुठला धक्का मोठा असूच शकत नव्हता... आपल्या ताईचं मरण स्विकारून जणू काही तिनं मरण ही कल्पनाच स्विकारून टाकलीय असं तिच्याशी बोलताना वाटलं.... जवळच्या कुणाचा मृत्यु किंवा कुणाच्या मृत्युची बातमी पचवणं हा अनुभव प्रत्येकाला कधी ना कधी आलेला असतो. तरी त्याचं गूढ कुणाला म्हणून उकलत नाही. तो अनुभव क्षणकाल अंतर्मुख करून बाजूला होतो. मिनिमाइज करून ठेवलेल्या कॉम्प्युटरमधल्या फाइलसारखा खालच्या पट्टीवरच्या कोपर्‍यात पडून असतो काही काळ आणि मग आपल्या जागी जातो..!

आत्ता, या क्षणात मी काय आहे तेवढं महत्त्वाचं. बाकी सगळं काळाच्या बोगद्यात गुडुप असतं..! ‘आत्ता’च्या ‘मी’मधे गत ‘मी’च्या स्मृती असतात आणि आगामी ‘मी’विषयीचे संकल्प असतात. प्रत्येक क्षणी आपण त्रिमूर्तीसारखे असतो... दोन बाजूचे दोन ‘मी’ मूक.. अदृश्य..!

आज आम्ही दोघं स्मृतीबनात लावलेल्या झाडाला पाणी घालायला गेलो होतो. दोन कॅन भरून घेऊन वर चाललो होतो. चालता चालता हे वाटेतल्या झाडांनाही पाणी घालत होते. वर पोचेपर्यंत ‘आपल्या’ झाडाला उरू दे ना पाणी असं मनात आलं. पण म्हटलं नाही काही. वाटलं की ती वाटेतली झाडं चोची उघडून खुणावत असतील आणि त्या प्रेरणा बनून कुणाकुणाला कृतीशील करत असतील. ‘आपल्या’ झाडालाही कुणी घालत असेल पाणी...

........

२७.६.२००२

काल एक स्वप्न पडलं... कुठे तरी गावाला गेलीय आणि आता परतायचं म्हणून बॅगा भारतीय. गाडीची वेळ होत आली तरी मला माझं सामान सापडतच नाहीए. इतःस्ततः विखुरलेले कपडे गोळा करतेय आणि पुन्हा पुन्हा ते हरवतायत.  स्वप्नभर हाच शोध चाललेला. शेवटी थकले. जाग आली तरी थकवा गेला नव्हता. वाटलं, स्वप्नातला असो की जागेपणातला.. कोणताही शोध थकवणाराच असणार..!

***

आसावरी काकडे

२.२.२०२२