Sunday 27 February 2022

माझ्या डायरीतून- १४

११.४.२००३

संध्याकाळी डोंगरावर फिरायला गेलो. उन्हं उतरल्यावर हळूहळू छान प्रसन्न वाटू लागलं. फिरून येताना वाटेत बाकावर बसलो जरा वेळ. हे बासरी वाजवत होते. एक मतिमंद मुलगी वडलांबरोबर फिरायला आली होती. दोघं आमच्या मध्ये येऊन बसली. माझी चलबिचल झाली... परत जाताना ती मुलगी ह्याना म्हणाली, तुम्ही छान वाजवता. तुमचं नाव काय? मग ह्यानीही तिला नाव विचारलं. तिनं नाव सांगितलं. ‘हे माझे बाबा’ म्हणून ओळख करून दिली. आम्ही ‘सद्‍भाव’ मधे राहतो. आमच्याकडे या असं म्हणाली. त्या दोघांमधला हा साधासाच संवाद ऐकताना डोळ्यात पाणी आलं. ती आली तेव्हा तिच्याकडे बघून कसंतरी वाटलं होतं. दया वगैरे.. पण तिचं बोलणं ऐकल्यावर वाटलं, खरंतर तीच नॉर्मल आहे. सहज आहे. तिचे बाबा काही न बोलता निघाले होते. सहज संवाद तिनं साधला..!

......

१२.४.२००३

दुपारी जोरात वारा सुटून पाऊस आला. वार्‍याबरोबर झाडं गदागदा हलत होती. पिकली पानं गळत होती. वाटलं, असं आपल्याला आपल्यातलं नको ते गाळता आलं तर? किती वेळा एवढ्या तेवढ्यावरनं अस्वस्थ व्हायचं.. किती वेळा सावरायचं... किती वेळा सारवा सारव जगण्याची... किती वेळा तेच ते?

......

मेघना पेठेचं लेखन मला आवडतं. तिनं एका लेखात लिहिलेलं मला इतकं आवडलं की ते मी टिपून ठेवलं. आणि मग ते माझ्याही समजुतीचं भाग झालं... तिनं म्हटलंय, ‘लिहिण्याचा काळ हा बघण्याचा, समजण्याचा असतो. न लिहिण्याचा काळ हा जगण्याचा, सोसण्याचा असतो... चक्रधर स्वामींच्या ‘दृष्टान्तपाठात’ एक लेकुरवाळीचा दृष्टांत आहे. अनेकातलं एक मूल असं असतं, जे आईशिवाय कुठेच रमत नाही. रडत राहातं. ‘ते काईसेनि बुझावेना’ पाहिल्यावर अखेर आई येते.’ चक्रधर स्वामी परमेश्वर भेटीच्या संदर्भात हा दृष्टांत देतात. मेघना पेठे हा दृष्टांत लेखनाच्या संदर्भात वापरतात. त्यांनी म्हटलंय, आपला एखादा अनुभव, सल ‘काईसेनि बुझावेना’ झाल्याशिवाय लेखन होत नाही. होऊ नये...

......

हे लिहिताना एका जुन्या कवितेतल्या काही ओळी आठवतायत-

‘अस्वस्थतेचं अग्नीकुंड

एकसारखं पेटतं ठेवावं

तेव्हा कुठे

अग्नीशलाकेसारखी

कविता प्रगट होते..!’

(आकाश कवितासंग्रह)

***

आसावरी काकडे

No comments:

Post a Comment