Monday 14 February 2022

माझ्या डायरीतून- १३

३.४.२००३

निवृत्तीनंतर एस पी कॉलेजमधून एम. ए. (तत्त्वज्ञान) करत होते तेव्हा- आज वर्गात ‘स्व’ म्हणजे काय? What is Self? हा विषय झाला. हुसेर्लच्या मते ‘स्व’ पारदर्शी असतो. रिकरच्या मते नसतो...  विषय मनात घोळत राहिला. वाटलं, ‘स्व’विषयी असं काही कसं म्हणता येईल? मानवी जाणिवेलाच काय ते कळत असतं. ती स्वसंवेद्य- स्वतः स्वतःला जाणणारी असते. पुन्हा तिचं ‘स्वरूप’ तिलाच कसं काय कळावं? आपल्या देहासंदर्भात विचार केला तर आपला चेहरा कुठे आपल्याला दिसतो? त्यासाठी आरसा घ्यावा लागतो. किंवा कुणीतरी सांगावं लागतं. या दृष्टीनं विचार केला तर रिकर बरोबर वाटतो. त्याच्या मते ‘स्व’च्या आकलनासाठी मध्यस्थाची गरज असते..

मान-पाठ दुखतीय. त्यामुळं त्रासायला होतंय. कंटाळा येतोय... खरंतर अत्यंतिक आवडीतूनच मी हा एम. ए.चा घाट घातलाय. निवृत्तीनंतर छान मोकळं राहाता आलं नाही. मग अस्वस्थतेनं धावायला हे गाजर बांधलं डोळ्यासमोर. सतत काहीतरी व्यवधान का लागतं माणसाला? रिकामेपण सुखानं का उपभोगता येऊ नये?..... असंही वाटलं, आत्ता.. अजून लर्निंगच चालू ठेवलं तर डीलर्निंग कधी करायचं?... की नवं काही मिळवताना जुन्याचं डीलर्निंग आपोआप होतच असतं?

.......

९.४.२००३

पुस्तक वाचताना लिहिलेली अक्षरं, शब्दं दिसतात. वाचलेल्या मजकुराचा आशय कळतो. त्याच वेळी मधे मधे चष्म्याची फ्रेमही दिसते... जाणणारी ‘मी’ फ्रेमसारखी  अशीच अनुभवणार्‍या ‘मी’च्या मधे मधे येत असते. चष्म्यामुळेच दिसतं तरी त्याचं मधे मधे येणं अडचणीचं वाटतं. वाचताना व्यत्यय आणणारं वाटतं. तसं जाणणार्‍या ‘मी’चं भान अनुभवाच्या आड येतं. ‘मी’चं भान म्हणजे ईगो? सर्व बाबतीत ईगोलेस होणं आवश्यक मानतात ते यासाठीच असेल?

.....

११.४.२००३

आपलं सगळं वाटणं आपल्या विचार करण्याच्या पद्धतीनं ठरतं. ती पद्धतच बदलून पाहिली तर? माझं सकाळचं अमुक एक वागणं आता जुनं झालं... आताच्या ‘मी’नं ते अजून कशाला वागवायचं? जात्या क्षणाला सतत खो देऊन वर्तमानाच्या जागेवर येऊन बसायचं ते लगेच उठायच्या तयारीनच..!

***

आसावरी काकडे

No comments:

Post a Comment