Thursday 31 March 2022

माझ्या डायरीतून- २६



२४.१.२००६

भक्ती अभ्यासवर्ग सुरू झाला.... भक्तीचा प्रभाव अतिशय सूक्ष्मपणे पण स्पष्टपणे जीवनाच्या सर्व क्षेत्रांवर (साहित्य, कला, समाजकारण, अर्थकारण, राजकारण..) होत असतो. तरी त्या त्या विषयाच्या अभ्यासात भक्ती या मुद्द्याचा विचार केला जात नाही. त्यामुळे भक्ती हा स्वतंत्र अभ्यास विषय होऊ शकतो. भक्तीचा अशा तर्‍हेनं कधी विचार केला गेला नव्हता. तो करण्याची गरज आहे. अभ्यासवर्ग सुरू करण्यामागची ही भूमिका महत्त्वाची वाटली. त्यामुळे पुणे विद्यापिठात दिलीप चित्रे आणि सदानंद मोरे यांच्या कल्पनेतून भक्ती अभ्यासवर्ग सुरू होतायत असं कळल्यावर जायचं ठरलं....

आज पहिला दिवस... अभ्यासवर्गाचा हेतू आणि अभ्यासक्रमाचा आवाका तरी चांगला आहे. प्रत्यक्षात काय साध्य होतं बघू..!

.....

३.३.२००६

हायडेग्गर वाचतेय. समजत नाहीए. काल वाचताना वाटलं की कळलं नाही तरी वाचन थांबवू नये. कळत नाही हे कळणंही बरंच. या वाचनानं कोण कोण कुठल्या पातळीवर कसा विचार करत होतं हे तरी कळेल. पाश्चात्य तत्त्वज्ञानातले ‘वेगळे’ विचार वाचताना गोंधळून जाण्यातून विचार करण्याच्या साच्यातून बाहेर पडता येईल...

‘चांगदेव पासष्टी’चं आजच्या मराठीत अभंग छंदात रूपांतर केलंय. मनात आलं आणि सुरुवात केली तेव्हा पहिल्याच ओवीला इतकं अडायला झालं की जमणार नाही म्हणून नाद सोडून दिला. तरी ओवी मनात घोळत राहिली. ओवीतले शब्द आजच्या रूपात आणताना, त्यांची ओवीतली मूळ ‘व्यवस्था’ बदलताना त्यांच्या अधिक जवळ जाता आलं. ती एक आनंददायी कसरत होती... बौद्धिक पातळीवरची... पण एवढंच नाही झालं फक्त. या कसरतीमुळे आशय आणखी एक स्तर खाली झिरपला..! रूपांतर प्रक्रिया म्हणजे आकलनासाठी झालेला रियाजच असतो हे उमगलं.

एका बाजूला असं वाचन चालू असताना त्या जडपणावर उतारा म्हणून दूरदर्शन मालिका बघतेय. ‘भाग्यविधाता’ मधली सुनंदा (आई) भोंदू ज्योतिषाच्या आहारी गेलीय. आणि ती तन्वीला पांढर्‍या पायाची म्हणून त्रास देतीय. घरातून बाहेर काढलंय तिला. आणि काय काय चाललंय. फालतूपणा वाटतोय. पण सुनंदाचं बिनडोक खरेपणानं वागणं बघताना मनात आलं की कथानकाच्या दृष्टीनं असं घडणं आवश्यक असणार. कथानकाला कसं वळण द्यायचं ते कथाकार ठरवणार. त्यानुसार त्यातल्या पात्रांना वागणं भाग आहे. त्याला ती पात्रं काय करणार अभिनय निभावण्याखेरीज? प्रत्यक्ष जगण्यातही ‘माणसं’ अशी वागतातच का? असा प्रश्न पडतो तेव्हा ‘अज्ञात कथाकाराची तशी योजना असते म्हणून’ असं उत्तर देता येईल असं वाटून गेलं... पण कदाचित हा नियतीवाद झाला. तो नाकारून ‘का?’ या प्रश्नाला भिडायला हवं..!

......

१२.३.२००६

अवितोको संस्थेतर्फे येरवडा जेलमध्ये कवीसम्मेलन आयोजित केलं होतं. मला निमंत्रण होतं. गेले होते. बिचकतंच... तिथलं वातावरण नवं होतं. प्रत्येक गोष्ट लक्ष वेधत होती. तुरुंग असून स्वच्छता आणि फुलझाडं, हिरवळ इत्यादीमुळे प्रसन्नता होती. आम्हाला उशीर झाला होता. कवीसम्मेलन चालू झालं होतं. कैदी बायका गझल गायन enjoy करत होत्या. त्यांच्या चेहर्‍यवरचे भाव निरखत बसले. कवितेच्या शब्दांकडे लक्षच नव्हतं. त्यांच्या चेहर्‍यावरचं हसू पाहून गलबलायला झाला. ते हसू चेहर्‍यावर येण्यासाठी त्यांनी केवढ काय काय मागे टाकलं असेल... सगळ्या स्त्रिया तशा अशिक्षित, गरीब दिसत होत्या. झालं गेलं  विसरणं, अन्याय, अपमान, चीड, दुः, हताशता, आगतिकता, निराशा, असं  काय काय असेल जे हसून झाकून टाकलं जात होतं.. हे सगळं तितक्या तीव्रतेना त्यांना जाणवत असेल? की रक्तात स्वाभाविकपणे गोठण्याची क्षमता असते वाहून जाऊ नये म्हणून तशी मनाचीही रचना असेल आपोआप घट्ट होण्याची?... कुणाचा इतिहास कळण्यासारखा नव्हता. पण हिरव्या पिवळ्या साड्यांच्या गणवेषामधे काय काय लपवलं गेलं असेल त्या कल्पनेनंही व्याकुळ व्हयायला झालं.

कवीसम्मेलनासाठी आलेल्या कवयित्री नेहमीसारख्या तयार होऊन आल्या होत्या. तसं normal येणं त्यांनी जाणीवपूर्वक केलं असेल काय? सोशल वर्कचं टेकनिक म्हणून? निघताना तिथली एक बाई संस्थेच्या प्रमुख बाईंच्या गळ्यात पडून रडत होती. तुरुंगातल्या कुणाला असं जवळ घेणं, अगदी शो म्हणून देखील सोपं नाही. कोणत्याही हेतूनं असेना का, सर्व मर्यादांसह असं काही काम करतात त्यांचं कौतुक वाटतं. कारण मला यातलं काहीच जमत नाही..!

***

आसावरी काकडे 

Saturday 26 March 2022

माझ्या डायरीतून- २५

१७.११.२००५

We, wasters of sorrow.... Rainer Maria Rilke

आपण आपलं दुःख अकारणच वाया घालवतो, त्याच्यापासून सुटकेच्या प्रतीक्षेत...

किती मननीय आहे हा विचार..!

.....



४.१२.२००५

पुस्तक प्रकाशनाचा ठरलेला कार्यक्रम झाला. मी अध्यक्ष होते. ४.३० ते ७.३० असा तीन तास कार्यक्रम चालला. या तीन तासांपैकी दीड तास सत्कार होत राहिले. येतील/ दिसतील/ आठवतील तसतसे सत्कार चालले होते. प्रेक्षकात उपस्थित होते त्यापैकी अनेकांनी मनोगतं व्यक्त केली. सगळे हार्दिकतेनं बोलत होते. स्टेजवर येऊन सत्कार स्विकारताना सर्वांना कृतकृत्य वाटत होतं. कार्यक्रम चालू असताना खाणं चहाचालू होतं. स्टेजवरून उत्सवमूर्ती सारख्या सूचना देत होती. उठून खाली जाऊन मान्यवरांना वर घेऊन येत होती. जवळ बसवून घेत होती. त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. कौतुक, आभार, भरून येणं, धन्यता वाटणं, आशीर्वाद.. शुभेच्छा देणं चाललं होतं. श्रोत्यात सर्व कुटुंबीय होते. आणि संस्थेच्या विद्यार्थिनी. त्या शेवटपर्यंत बसल्या होत्या. त्यांना ऐकण्यात इतका रस होता? ऐकू येत होतं? कळत होतं?... की खाण्यापिण्यात लक्ष होतं? की दोन्ही?...

मनात आलं, व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य, क्षमता मिळाली... ते लोकांपर्यंत पोचवायचं बळ आलं. पोचल्याची पावती मिळत राहिली तर कुणी कृतकृत्य समाधानी का होऊ नये?

हे सर्व अनुभवत असताना एका बाजूला ‘काय चाललंय काय?’ म्हणून अवाक्‍ होत होते. दुसर्‍या बाजूला चिडचिड थोपवून सगळं समजून घ्यायचा प्रयत्न करत होते. बेअरिंग टिकवण्याचा, जे चाललंय त्यातली जमेची बाजू शोधण्याचा प्रयत्न करत होते. असंही वाटून गेलं की यांना उत्सवच साजरा करायचाय तर आम्हाला इथं बोलावलं तरी कशाला? अशा वातावरणात कवितेविषयी काही ‘ज्ञान पाजळावं’ असं वाटेना. कोणी ऐकू, समजू शकेल, कुणाला ते हवं असेल असंही वाटेना. आम्ही- पाहुणे, अध्यक्ष खरोखरच शोभेसाठी होतो काय? ... की मी त्या सगळ्याला अंडरएस्टिमेट करतेय / स्वतःला ‘वर’ वगैरे समजतेय?

एकूण त्या सगळ्यात मनापासून समरस होता आलं नाही. आणि मनःपूत बोअरही होता आलं नाही. माझ्यातली थोडी मी त्या सगळ्यातलं चांगलं काही टिपण्याच्या प्रयत्नात होती !

अध्यक्ष म्हणून सत्कार झाला. तारीफ झाली. शाल श्रीफळ मानधन जेवण झालं. हे सर्व आणि हा बोअर होऊ न देणारा अनुभव घेऊन घरी आले. परत कधी अशा कार्यक्रमांना बोलावलं तर दहादा विचार करावा काय?

......

७.१२.२००५

पल्लूला मुलगी झालीय. एवढासा जीव आता हळूहळू मोठा होणार. असंख्य अडथळे पार करत.... त्यासाठी आपण उपाय करतो ते किती वरवरचे, अंदाजे, अपुरे असतात... तरी कोट्यवधी माणसं जिवंत आहेत. आणि सर्वकाही चाललं आहे. जे बरं चाललंय त्यासाठी आपण काय केलेलं असतं? किती थोडंच कळतं आपल्याला. तेवढ्यातच हात-पाय हलवायचे. बरचसं आपोआपच होत असतं..!

दोन हजार पाच साल संपत आलं. तसं खास काहीच केलं नाही. तरी वर्ष बघता बघता संपलंही...!

***

आसावरी काकडे

Friday 25 March 2022

माझ्या डायरीतून- २४

२९.१०.२००५

फोन डेड आहे. तो आता फक्त एक हँडसेट आहे. कशाशीही, कुणाशीही न जोडलेला. तो चालू असतो तेव्हा त्यात जगातल्या कुणाशीही संपर्क करण्याच्या असंख्य शक्यता पडून असतात. तो चालू आहे की डेड आहे ते बाहेरून काहीच कळत नाही. उचलून कानाला लावला आणि त्याची धडधड ऐकू आली नाही की कळतं तो डेड आहे.

पोळीची वाफ हातावर आली आणि अंगठ्याला भाजलं. आग झाली. त्यावर पाणी ओतलं. मग कैलासजीवन लावलं. आग थांबली. त्वचा काळी पडली. जरा फुगवटा आला. आतून जखम बरी होईपर्यंत काळी त्वचा वर पांघरेलेली राहिली. तिचा रोल संपल्याचा आतून संदेश आल्यावर हळूहळू तडकत गळून पडायला लागली. तिच्या जागी तंतोतंत तशेच दुसरी त्वचा हजर झाली. मी काही न करता. प्रत्येक त्वचेखाली तिला रीप्लेस करण्याची शक्यता नेहमीच असते. पान गळून पडतं तिथूनच नवं उगवतं. ते असतं देठाच्या खाली शक्यतेच्या रूपात. प्रत्येक गळून पडण्याच्या क्रियेला उगवून येण्याची प्रतिक्रिया देत अनंत शक्यता ‘शून्यात’ असतातच.

पण असंही समजलं की शून्य.. emptiness अशी काही वस्तूस्थिती नाही. किंवा ती एक संकल्पनाही नाही. तर ‘विरचनेचं’ - deconstructionचं एक साधन आहे. (deconstruction म्हणजे साचेबद्ध विचार करण्याच्या सवयीतून बाहेर पडणं. परिस्थितीकडे पूर्णतः नव्या दृष्टिकोनातून पाहणं. एक प्रकारे ‘पुनर्वाचन’) ‘डेरीडा फॉर बिगीनर्स’ वाचून झालं. बरंचसं कळलं नाही. जे कळलं ते ग्रेट, वेगळं, नवी दृष्टी देणारं वाटलं. पुस्तकात शेवटी ‘बुद्धीझम आणि डीकन्सट्रक्शन’ अशी मांडणी केली आहे. बुद्धाचा शून्यवाद म्हणजे वैदिक परंपरेची विरचना करणं आहे.... शून्यवादाचं वेगळं आकलन झालं असं वाटलं.

‘डीकन्सट्रक्शन आणि मानसशास्त्र’ अशीही एक मांडणी आहे. तीही समजली. आवडली. पटली.... तसा विचार करून पाहावा असं वाटलं. ‘मी निराशेच्या गर्तेत आहे’ हे माझं, माझ्या अवस्थेचं एक वर्णन आहे. माझ्या वर्णनाच्या कित्येक शक्यता परिघावर आहेत. त्यातली कोणतीही मी केंद्रस्थानी आणू शकते. माझ्यावर नियंत्रण करणारा, मला दिग्दर्शन करणारा कुणी एक ‘स्व’ माझ्या आत आहे या समजुतीचं बोट सोडून मी मुक्त होणं शक्य आहे. असा कुणी एकच एक ‘स्व’ नाही. दर क्षणी बदलणारा, पूर्ण नवा विचार देऊ शकणारा ‘स्व’ मला कोणत्याही एका अवस्थेशी बांधून ठेऊ शकणार नाही.

......

३०.१०.२००५

तब्येत बरी नाही. काही उपाय म्हणून गव्हांकूर चूर्ण घेत होते. ते आज घेतलं नाही. पुन्हा ताकावरचं पाणी घेऊन बघतेय. दुर्लक्ष करून बघणं हाही एक उपाय करून बघावा म्हणतेय.... दिल्लीत बॉम्बस्फोट झालेयत. कुठेही होऊ शकतात. या ब्रेकिंग न्यूजनं आन्ध्र/तामिळनाडूतली अतिवृष्टी, वादळ, रेल्वे अपघात... या बातम्या मागे टाकल्यायत... भोवतीच्या सततच्या अशा काही वातावरणानं अस्वस्थ होतेय पण इतकी नाही की माझ्या त्रासाचा विसर पडावा... मनाच्या स्क्रीनवर तीच एक ब्रेकिंग न्यूज फ्लॅश होतीय. यातून सुटका करून घ्यायचा प्रयत्न केला. पण काही साधलं नाही... काही टाळण्याचं निमित्त म्हणून बरं नसणं मीच धरून ठेवलंय काय? पण मला काय टाळायचंय? तोल जाऊन पडायला लागलं की प्रतिक्षिप्तपणे हात जवळच्या कशाचा तरी आधार घेतात त्याप्रमाणे माझ्या आतल्या सिस्टिमला निमित्त पुरवायची सवय झालीय का? की या ना त्या प्रकारे मीच निर्माण केलेल्या बागुलबुव्याला मी घाबरतेय? हद्द म्हणजे हे कळूनही मी स्वस्थ होऊ शकत नाहीए. याला काय म्हणावं? डेरिडाच्या पुस्तकात एक वाक्य आहे- Intellectual clinging is one of the worst forms of suffering.... the meditator finds that there is no underlying basis for any emotion, experience or viewpoint- and with nothing to grasp, the mind is free.

......

१.१२.२००५

‘मी का लिहिते?’ या विषयावर लिहिण्याच्या निमित्तानं विचार करताना मी का वाचते? याचाही विचार झाला. असे प्रश्न पडणं महत्त्वाचं. पण केवळ प्रश्नांना धडकत राहाणं पुरेसं नाही. त्यांचा योग्य दिशेनं पाठपुरावा करायला हवा. तत्त्वज्ञानाच्या अभ्यासातून प्रश्न पडणं म्हणजे काय? आणि त्याचा पाठपुरावा कसा केला जातो ते उमगलं. तितकं आपल्याला शक्य नसलं तरी आपल्या पातळीवरच्या प्रश्नांना सामोरं जाताना त्या समजुतीचा उपयोग होतो. ‘मी का वाचते?’ असा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे बरेच विचारवंत दुसर्‍याचं वाचायला विरोध करतात. ज्ञान.. विचार आतून उगवायला हवेत.. इ. मी वाचते ते विचारांना चालना मिळावी म्हणून. वाचत नसते तेव्हा येणारं बौद्धिक शैथिल्य घालवण्यासाठी. अधिक वाचनाचे तथाकथित धोके (फुकाचा अहंकार वाढेल.. मनात अनावश्यक गर्दी होईल स्वतःचा स्वतंत्र विचार दबला जाईल.... इ.) मला घाबरवत नाहीत. कारण अधिक वाचनानं आपण किती अपुरे आहोत, खर्‍या ज्ञानापासून किती दूर आहोत हेच लक्षात येतंय. त्यामुळे अहंकार वाढण्याची शक्यता नाही. बाह्य वाचनाची गर्दी होऊ न देता त्याचा उपयोग आंतरिकतेला जाग आणण्यासाठी करून घेतेय. ही सजगता समजूत वाढवतेय ना हेही निरखत असते....

***

आसावरी काकडे

Monday 21 March 2022

माझ्या डायरीतून- २३



५.९.२००५

परवा फिरायला जाताना एक छोटा मुलगा दिसला. हातात काहीतरी घेऊन कुठेतरी मजेत चालला होता. मळलेला. कपडे तसेच.... वाटलं कितीतरी लोक असंख्य अभावांमधेही मजेत जगत असतात ना? जाताना मनात आलेला हा भाव परतेपर्यंतही टिकला नाही. आठवण झाली तेव्हा मनात आलं, त्यांची दया करावी असं काही नसेल. प्रत्येक दुःखद स्थितीला सावरणारे दुसरे बरेच मुद्दे असतात. आणि तथाकथित सुखाला ओरबाडणारेही.... तरी आत कुठेतरी वाटलं की ही चुकीची समर्थनं आहेत, जरी त्यात तथ्यांश असला....

पण अशा सामाजिक वास्तवात जगताना मी काय करायला हवं?... मी जे करू शकते ते प्रामाणिकपणे करत राहावं. जे करू शकत नाही ते करण्याचा प्रयत्न... जमत नाही म्हणून खंतावणं चालूच राहणार... राहायलाही हवं. आणि काही न केल्याची ‘शिक्षा’ भोगायचीही तयारी हवी....

ओला सुका कचरा वेगळा केला नाही तर सोसायटीला दंड होणार हे सर्वांना माहिती झालंय. पण सांगूनही लोक एवढी साधी गोष्ट करत नाहीत. त्यासाठी न कंटाळता, ते आमलात येईल इतका पाठपुरावा मी करते का? नाही. तर मग सोसायटीला दंड झाला तर मलाही दंड होईलंच जरी मी प्रामाणिकपणे कचरा वेगळा ठेवत असले तरी. मी, माझं घर, माझी बिल्डिंग, माझी सोसायटी, माझा परिसर, गाव.. देश... कोणताही बदल मी कुठपर्यंत घडवून आणते? त्याप्रमाणात मला समाधान किंवा त्रास होणार...

समाजात घडणार्‍या गोष्टींसाठी त्रासताना ह्या गोष्टी मनात स्पष्ट व्हायला हव्यात... आपली सामाजिक जबाबदारी आणि आपली कुवत यांचा मेळ बसेलच असं नाही. आपण आपल्या कुवतीनुसार कर्तव्य केल्याचं समाधान आणि करायला हवं ते न केल्याचा दंड दोन्ही आपल्या ओंजळीत राहणार. ‘दुसरे लोक काही का करत नाहीत’ हा त्यांचा प्रश्न आहे. eternity will ask them..! (किर्केगार्डचं वाक्य आठवलं)

.....

१६.९.२००५

काल एका घरगुती कार्यक्रमात माझं कवितावाचन झालं. जाणकार श्रोत्यांनी भरभरून दाद तर दिलीच. पण कवितावाचनानंतरही कवितेविषयी, त्यातील प्रगल्भ जाणिवांविषयी बरंच बोललं गेलं... या सगळ्याचं छान वाटलंय....

उंच उडी, रन्स, नेमबाजी... अशा विविध खेळात खेळाडूंचे विक्रम होतात. त्या विक्रमाचं एक बिरुद त्यांना चिकटतं. पण ‘उंच उडी’ साधलेला तो क्षण इतिहासजमा झालेला असतो. खेळाडूंना लाभलेलं बिरुद इतकंच सांगत असतं की या खेळाडूत ही क्षमता होती / आहे.... माझ्या कवितेत प्रगल्भपणानं गाठलेली उंची म्हणजे ती लिहिली त्या क्षणाचा ‘विक्रम’ आहे फक्त. आता या क्षणी मी जमिनीवरच आहे मातीचे पाय घेऊन...!

......

१७.९.२००५

गणेशोत्सव चालू आहे. नेहमीप्रमाणे ढोल वाजतायत. सहन करण्याच्या प्रयत्नात एक उपाय म्हणून या मनाविरुद्ध चाललेल्या जल्लोषाच्या चित्राशेजारी मी एक उदासीनतेनं मलूल झालेलं, स्तब्ध, सुनसान चित्र रंगवून पाहिलं. तर आधीचा जल्लोषच बरा वाटला... पण आपल्या दुःखाच्या रेषेपुढे एक मोठी रेघ ओढून आपलं दुःख सुसह्य करण्यासारखंच झालं हे.. या दोन चित्रांच्या मधली काही समतोल अवस्था असू शकते की नाही?

***

आसावरी काकडे

Thursday 17 March 2022

माझ्या डायरीतून- २२

३.८.२००५

बाहेर पुरामुळे इतका हाहाकार उडालाय तरी मी माझ्या स्वस्थपणात व्यत्यय येतोय एवढ्यानंही चिडचिड करतेयच कशी? प्राजक्ताची पडलेली फुलं ओलांडून जाताना त्याना उचलून घेतलं नाही तर वाईट वाटत असेल असं वाटून माघारी वळून फुलं वेचणारी माझी संवेदनशीलता कुठे गेली? 

कॉलनीत एक कुत्री व्यालीय आणि तिची सात पिल्लं सगळ्या संकटांना तोंड देत उघड्यावरच्या कुठल्यातरी आडोशाला तग धरून मोठी होतायत. आता चालायला लागलीत आणि कॉलनीभर फिरतायत. छान हवेत फेर्‍या मारताना त्यांचा अडथळा होतो त्रासायला होतंय. इतकं की त्यांना हाकलून लावतेय आणि ती जात नाहीएत म्हणून राग येतोय... त्यांना म्युनिसिपालटीनं किंवा कुणीही इथून घेऊन जावं असं वाटतंय. या अनावर रागाकडे पाहताना वाटतंय कुठे आहे माझी संवेदनशीलता? 

फुटपाथच्या आतल्या बाजूला लोकं झोपड्या करून राहायला लागलीयत नव्यानं. जाता येता त्या झोपड्या डोळ्यांना खुपतायत. त्यांना वेळीच उठवायला हवंय. तेही दुसर्‍या कुणीतरी... असं वाटताना त्यांच्या त्रासाचा विचारही येत नाहीए. ती जगतायतच कशाला असा उर्मट, अघोरी विचार डोकावून जातोय... असं, इतकं त्रासताना कुठं जाते संवेदनशीलता?

रजनीश वाचतेय... त्यातले विचार पुरात बेघर होणार्‍यांना, पुरात अडकलेल्यांना कसे तारणार?... सर्व काही स्वस्थ, स्थिर, शांत असताना तात्विक विचारांनी भारावून जाणं... गहिवरून येणं.. उन्नत वगैरे झाल्यासारखं वाटणं किती निरर्थक, पोकळ आहे..! आपण आपल्या त्वचेच्या बंधनातून बाहेर पडूच शकत नाही? ते कसलं ज्ञान जे बाहेर पडायला उपयोगी पडत नाही. अशा मानसिकतेत एक कविता लिहिली होती. त्यातल्या ‘कधी कधी अनावर होतो आपण आपल्याला मावत नाही त्वचेच्या झोळीत. सांडत राहातो बाहेर वेडेवाकडे...’ याचा अनुभव घेतेय परत... रजनीश, किर्केगार्ड, उपनिषदांनो मला आवरा. मला भीती वाटतेय माझी. या आवेगांना दिशा दाखवा.... Help me in making a virtue out of this suffering..!

......



२६.८.२००५

रजनीश वाचत असताना ‘वर्तमानात जगणे’ या मुद्द्यावर डोक्यात समांतरपणे विचार चालू झाले. जाणवलं की विषय मिळून मूर्त झालेली जाणीव हाही जाणिवेचा विषय होतो. संतत धारेसारखे जाणिवेला विषय मिळत राहतात. एक विषय मिळून मूर्त झालेली जाणीव स्मृतीकक्षात जाते. त्याची एक साखळीच तयार होत राहाते. नवा विषय मिळण्यापूर्वीची कोरी जाणीव (नदीच्या पात्रासारखी... अखंड प्रवाह अनुभवणारी) आपल्या कोरेपणाचा अनुभव घेई घेई पर्यंत तिला नवा विषय मिळतो. एक विषय विंगेत जाऊन दुसरा तिला लटकण्यापूर्वीचा सूक्ष्म काळ तो (म्हणे) मध्यसंधी.... यावेळी जाणीव सजग असेल तर ती हा क्षण जाणू शकते.... ‘विषय’ झालेली ‘मूर्त’ जाणीव ती प्रकृतीचा भाग... भोक्ता. आणि हा भोक्ता हाच जिचा विषय होतो ती साक्षी... सावध अशा मध्यसंधीकालात या दोन्ही एक होतात... असं खूपदा अनुभवलंय खरं म्हणजे. त्याचं आज शब्दांकन करता आलं. या अशा आकलनाचं ‘साधने’च्या संदर्भात स्थान काय?

भोक्ता मी आणि साक्षी मी यांचं नातं तपासून पाहावं असं काल मनात येऊन गेलं होतं. ते लक्षातही नव्हतं. पण आज वाचता वाचता अचानक असा उलगडा झाला. जणु काही माझ्या अपरोक्ष.. म्हणजे ‘प्रकृती मी’च्या नकळत... ‘साक्षी मी’च्या समोर..!

......

४.९.२००५

जगणं म्हणजे भोवतालाला दिलेल्या सततच्या प्रतिक्रिया. त्या असंख्य शारीरिक, मानसिक, बौद्धिक प्रक्रियांमधून व्यक्त होतात. ही समग्र प्रक्रिया अनंत भूतकालाशी जोडलेली आहे.... काल रात्री बाहेर संतत धार पाऊस आणि मनात विचलित करणारी भीती ही स्थिती ‘पाहात’ झोपले होते. तेव्हा किंचित काळ साक्षी मी’च्या जवळ जाता आलं. वाटलं माझं अस्तित्व म्हणजे शरीर+मन+बुद्धी यानी बनलेली एक संरचना आहे. एक कॉम्बिनेशन आहे. असंख्यातलं एक. त्यावर ‘आसावरी’ हे लेबल चिकटवलंय. ते इतकं पक्क चिकटलंय की तेही ‘संरचनेचा’ भाग झालंय. क्षणभर कल्पनेत हे नाव वजा करून पाहिलं. नावाशी जोडलेली मी-माझेपणाची नाळ कापणं अवघड तर आहेच पण कापल्यावर जगणं किती अवघड आहे असं वाटून गेलं. रेडिओवर चालू असलेल्या एका गाण्याची ओळ मनातल्या समग्र गोंगाटाला पार करून आतपर्यंत येऊन मला सुखावून गेली. तो क्षण पकडून ठेवावासा वाटला. ‘नाळ’ तोडल्यावर या सर्व लौकिक व्यवहाराचं काय होईल? दुभंगलेपण येईल की काय असं काहीतरी वाटून अस्वस्थ व्हायला झालं..... काल एक Atlas आणलाय. त्यात पृथ्वीची माहिती आहे. नकाशा आहे. यात संपूर्ण विश्वातील पृथ्वीचं स्थान आणि आकार दाखवलाय. तो डोळ्यासमोर आला. त्यात मला माझ्या अस्तित्वाचा कण दिसला नाही..!

***

आसावरी काकडे

Saturday 12 March 2022

माझ्या डायरीतून- २१

१२.५.२००५

लेखनासाठी भोवतालच्या पर्यवरणाबद्दल जागरुक असणं, समकालीन असणं आणि उपनिषदांचा अभ्यास करताना अंतर्मुख होत राहाणं या दोन विरुद्ध दिशांच्या डगरींवर पाय ठेवून मी निघालीय असं वाटत होतं. काल केनोपनिषदात असा उल्लेख अढळला की ‘आत्मसुख भोगण्यासाठी काव्य, संगीत, साहित्य, शास्त्राची उपासना इत्यादी गोष्टींचा अभ्यास करणे उचित ठरते.... आत्म्याचे ज्ञान करून घेण्यासाठी निराळी शक्ती आवश्यक असते. तिचे नाव प्रतिभा होय... शेवटी प्रतिभा जागृत होण्यासाठी आपली बुद्धी काही काळ विराम पावणे अवश्य असते. त्यासाठी तन्मयता हा उपाय आहे.’ हा उल्लेख मननीय आणि दिलासा देणारा वाटला.

.....

१५.६.२००५

मनापासून वाटतंय म्हणून उपनिषदं वाचतेय. पण भारावून जायला होत नाहीए. आत्मज्ञान करून घेणं हा उपनिषदांचा गाभा ‘माहिती’ झालाय. त्याची अनुभूती मिळणं अशक्य तर आहेच पण आवश्यक तरी आहे का? असा प्रश्न परत परत विचलित करतोय. वाचताना काही नवीन गोष्टी कळतायत. उदा. सद्‍बुद्धी म्हणजे प्रतिभा. तिच्यामुळे दृश्याच्या पलिकडला विचार शक्य होतो. त्याचं आकलन शक्य होतं. साधना, उपासना करण्याला या प्रतिभेचा उपयोग होतो. त्यासाठी ती एक प्रभावी साधन होते...

‘जागृती, स्वप्न, सुषुप्ती..’ विषयी वाचताना वाटलं की या अवस्थांचं आकलन करून घेणं हा आपल्या अस्तित्वाचं स्वरूप समजून घेण्याचा मार्ग आहे. स्वप्नात प्रत्यक्ष दृश्य जग नसतं. आणि त्याचं ज्ञान करुन घेणारी इंद्रियेही झोपलेली असतात. तरी दृश्याचे सर्व अनुभव येतात. त्या अर्थी स्थल-कालाची चौकट नसलेली स्थूलाची प्रतिरूप अशी सूक्ष्म सृष्टी असली पाहिजे... ती आपण स्वप्नात अनुभवतो...!

......

२५.६.२००५

उपनिषदं सांगतात की आत्मज्ञान करून घेणं हे माझ्या माणूस असण्याचं सार्थक. त्यासाठी मी बुद्धीला विराम द्यायचा, ‘मी’चं विसर्जन करायचं. त्यासाठी अनभ्यासाचा अभ्यास करायचा...’ वाचताना या सगळ्याचा मोह पडतोय... आणि ‘मराठी साहित्य आत्मकेंद्री आहे. त्याला भवतालाचं, वास्तवाचं भान नाही...’ असं काही वाचून, ऐकून एक साहित्य-रसिक, वाचक, लेखक म्हणून अस्वस्थ होतेय. एक माणूस म्हणून अशा ओढाताणीचं काय करायचं ते कळत नाही.....

***

आसावरी काकडे

Thursday 10 March 2022

माझ्या डायरीतून- २०

२६.१.२००५

आपण मणसाचे कितवे वंशज? या अनाकलनीय लांबीच्या वंशावळीचे आपण फलित... एवढ्या सगळ्यांच्या सतत बदलत गेलेल्या अंशांचे ओझे वागवत जगत असतो. ‘That Solitory Individual’- शुद्ध स्व-रूपाकडे परतण्यासाठी बाहेरच्या गर्दीपासून दूर जाता येईल कदाचित पण या आतल्या गर्दीचं काय करणार?

......

२९.१.२००५

ज्ञानेश्वरी वाचन बरेचदा केवळ एक रूटीन होतंय. अधुन मधून थांबवावं असं वाटतं. तरी चालू ठेवलंय. सायनेकर सरांशी या संदर्भात एकदा बोलले तर ते म्हणाले, ‘उत्कटतेनं आशयाला भिडता येण्याचे क्षण मोजकेच येतात. तंबोरा सारखा लागलेल्या अवस्थेत ठेवता येत नाही. तारा उतरवून ठेवाव्या लागतात..’ अशा संवादातून दिशा आणि दिलासा मिळत राहातो. विचारात स्पष्टता येते... मीही एका कवितेत लिहिलं होतं- ‘चैतन्यदायी क्षण कुछ ज्यादाही क्षणिक होता है..!’

.......

१४.२.२००५

एम. ए. प्रथम क्रमांकासाठी असलेले एस पी कॉलेजचे विठ्ठल रामचंद्र सासवडकर – स्वामी शिवानंद सरस्वती पुरस्कृत पारितोषिक १०६/- रुपये मिळाले...! घेताना मज्जा वाटली.

.......

८.५.२००५

ज्या स्वशोधाच्या वाटेने मी जाते आहे तो प्रत्येक शोध म्हणजे आकलनाची एकेक पातळी. ही प्रत्येक पातळी काही एक उंची गाठत जाते. पण प्रत्येक उंचीवर हेच अधिकाधिक खरेपणानं कळतं की खरं कळणं अजून दूर आहे. खरं कळणं म्हणजे प्रत्यक्ष अनुभूती... म्हणजे कळण्याचं विसर्जन. हे मला जाणवत असल्यामुळे मी ठाम उच्चरवात कोणताही दावा करत नाही. आणि हे कुणाला कळावं, कुणी मला त्याची पावती द्यावी यामुळे फारसं काही साधणार आहे असंही नाही. पण अधुन मधून तशा पावतीची तहान लागते...!

***

असावरी काकडे

Monday 7 March 2022

माझ्या डायरीतून- १९

२.९.२००४

‘मी’ कोण? या प्रश्नाचं उत्तर असलेलं श्रीमद्‍ शंकराचार्यांचं आत्मषटकम्‍ हे स्तोत्र मी उत्सुकतेनं समजून घेतलं. देहापासून ‘मुक्ती’पर्यंतच्या लौकिक जगण्यातल्या सर्व गोष्टींचा एकेका कडव्यात निर्देश करून, ते म्हणजे ‘मी’ नाही असं या स्तोत्रात म्हटलं आहे... मग ‘मी’ काय आहे तर ‘चिदानंदरूपः शिवोहं शिवोहं..!’ पण हे समजल्यावर वाटलं की हे कळण्यानी काय होईल?

हा प्रश्न मनात पडून होता... काल वसुधाशी अशा काही विषयावर बोलता बोलता एकदम क्लिक झालं की हे कळण्यानी दृष्टिकोन बदलेल. देहाच्या पायथ्याशी उभं उभं राहून काय दिसेल? काय कळेल? त्यापेक्षा ‘शिवोहं’ या आकलनाच्या शिखरावरून वेगळं दिसेल... वेगळं जाणवेल... जगण्याला प्रतिक्रिया देण्याची शैली बदलेल...

.....

१३.१०.२००४

सूक्ष्म आकलन विजेसारखं चमकून जातं. त्या क्षणार्धात त्याला पकडून शब्दबद्ध करावं लागतं... पण हे कठीणच. केशवसुतांनी कविता म्हणजे आकाशीची वीज पकडणं असं म्हटलंय तसं काहीसं... हे कठीण तर आहेच पण तसं करणं एका अर्थी केवळ अहं सुखावण्यासारखं आहे. ‘आकलनाचं शब्दांकन करता येणं म्हणजेच आकलन’ असं मानणं म्हणजे केवळ दंभ आहे. कारण हे आकलन जितकं सूक्ष्म तितकंच क्षणिकही असतं..! विजेच्या प्रकाशात क्षणभर उजळावं आणि वीज निरवताच काळवंडून जावं तशी ही प्रक्रिया..! काळवंडलेलं राहण्याचाच कालावधी दीर्घ. उजळण्याची क्षणचित्रं टिपण्यामुळे उजळलेपणात स्थिरावण्याची शक्यता दुरावत जाईल काय? ही क्षणचित्रं आतल्या आत मुरवत ठेवावीत की एखाद्या काळवंडल्या क्षणी आपल्यालाच किंवा इतरांनाही ती मार्ग दाखवतील म्हणून शब्दबद्ध करावीत?

.....

२४.१२.२००४

‘अस्तित्ववाद आणि मराठी कादंबरी’ हे रेखा इनामदार साने यांचं पुस्तक वाचतेय... एम. ए. अभ्यासाच्या निमित्ताने अस्तित्ववादाची ओळख झाली होती. तो अधिक समजून घ्यावा असं वाटत राहिलं. कारण जे समजलं होतं ते माझ्या दृढ झालेल्या समजुतींच्या विरोधी होतं. तोपर्यंतच्या वाचन-विचारातून, ‘या विश्वाचा.. एकूण ‘असण्या’चा आपण अविभाज्य भाग आहोत आणि वैश्विक घडामोडीत माणसाला अगदी मर्यादित स्वातंत्र्य आहे.’ या समजुतीत मी स्थिरावले होते. आणि अस्तित्ववाद तर सांगतो आहे की माणसाला अमर्याद स्वातंत्र्य आहे आणि त्याची जबाबदारी नाकारणं ही दुःश्रद्धा- बॅड फेथ आहे.... हे समजून घ्यायला हवं असं तीव्रतेनं वाटत होतं. त्याची सुरुवात झाली.. मनात आलं, दोन महायुद्धांनंतरच्या खचून जावं अशा वातावरणात ‘माणूस स्वतंत्र आहे’ असा विचार आला तरी कसा?...

***

आसावरी काकडे

Friday 4 March 2022

माझ्या डायरीतून- १८

२.४.२००४

कालच्या पेपरमधे राजेंद्र बर्वे यांनी छान लिहिलं होतं... ‘आजच्या युगाचं आर्यसत्य दुःख नाही कंटाळा हे आहे. ही मनस्थितीचीच दोन वेगळी नावं नाहीत. दुःखात मीपणाशी बांधलेपण आहे तर कंटाळ्यात एक प्रकारची परत्मता आहे.’ दुःख आणि कंटाळा याचं हे विश्लेषण मननीय वाटलं.

.....

२०.४.२००४

ज्या दिशेनं पाहिलं जाईल त्या दिशेचं दृश्य दिसेल. पाहिलंच नाही तर नाही दिसणार. बुद्धीचं तसंच आहे. एखाद्या प्रश्नाचा (अंतिम वगैरे सुद्धा) लक्षपूर्वक, सखोल विचार केला तर ज्ञान मिळतं.. आकलन होतं.. उत्तर मिळतं. ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटो यानं म्हटलं आहे, माणूस फक्त जड देह नाही. त्याच्यात आत्मा, मन, जाणीव, आणि अविनाशी चैतन्यतत्त्व आहे. त्यामुळे चिंतनाने, अनुस्मरणाने देहाच्या पलिकडचं आकलन होऊ शकतं. माणसाला विश्वाचं आकलन होतं तेव्हा तो प्रतिभावंत.. कलाकार असतो. जगाचं खरं स्वरूप ज्याला कळतं तोच खरा कलाकार..! कला आणि कलाकार या संदर्भातले हे विचार कलेकडे पाहण्याची दृष्टी प्रगल्भ करणारे आहेत.

एक आवडलेलं वाक्य...- ‘ब्रह्म ही मूळ साहित्यकृती असून जग हा तिचा अवकाश-काल यांच्या पातळीवरील एक अनुवाद आहे.’ –  

.....

१५.५.२००४

शब्दांचं आशयाशी तादात्म्याचं नातं नाही. शब्द वेगळा. आशय वेगळा. पण असंही नाही की शब्द म्हणजे फक्त टरफलं... लेबल.. त्यांच्यात आशय वाहून नेण्याचं सामर्थ्य असतं. आपण फक्त समजून घ्यायला हवं की शब्द म्हणजेच आशय नव्हे. तो समजून घेण्यात आपली सक्रियता अपेक्षित आहे. तत्त्वज्ञानातील संकल्पना, कविता यांच्या आकलनासंबंधात हे अधिक महत्त्वाचं आहे.

.....

६.६.२००४

शारीरिक.. मानसिक.. बौद्धिक.. तिन्ही पातळ्यांवरील ताणांना सामोरं जात एम. ए. चं दोन वर्षांचं प्रोजेक्ट पूर्ण झालं... हुश्य वाटलं. पण त्यातल्या अडकलेपणातून बाहेर पडल्यावर लगेच रिकामेपण अस्वस्थ करायला लागलं... त्या अवस्थेत लिहिलेल्या एका कवितेत शेवटी म्हटलंय-


‘....माझ्या भोवतीचा गराडा
पांगतो आहे
एकेक करत सर्व पाठमोरे होऊन
निघाले आहेत.
मी मुक्त त्यांच्या नजकैदेतून
हातात एक पोकळी निराकार
आणि मनावर
निरंकुश स्वतंत्र्याचा भार...
‘Man is condemnd to be free’
या सार्त्रच्या म्हणण्याचा आशय
नरसिंहासारखा प्रकटलाय समोर
मी भयव्याकुळ
आशयाला सामोरं जावं
की पाठमोरं व्हावं
या दुविधेत..!
***
आसावरी काकडे