Saturday 26 March 2022

माझ्या डायरीतून- २५

१७.११.२००५

We, wasters of sorrow.... Rainer Maria Rilke

आपण आपलं दुःख अकारणच वाया घालवतो, त्याच्यापासून सुटकेच्या प्रतीक्षेत...

किती मननीय आहे हा विचार..!

.....



४.१२.२००५

पुस्तक प्रकाशनाचा ठरलेला कार्यक्रम झाला. मी अध्यक्ष होते. ४.३० ते ७.३० असा तीन तास कार्यक्रम चालला. या तीन तासांपैकी दीड तास सत्कार होत राहिले. येतील/ दिसतील/ आठवतील तसतसे सत्कार चालले होते. प्रेक्षकात उपस्थित होते त्यापैकी अनेकांनी मनोगतं व्यक्त केली. सगळे हार्दिकतेनं बोलत होते. स्टेजवर येऊन सत्कार स्विकारताना सर्वांना कृतकृत्य वाटत होतं. कार्यक्रम चालू असताना खाणं चहाचालू होतं. स्टेजवरून उत्सवमूर्ती सारख्या सूचना देत होती. उठून खाली जाऊन मान्यवरांना वर घेऊन येत होती. जवळ बसवून घेत होती. त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. कौतुक, आभार, भरून येणं, धन्यता वाटणं, आशीर्वाद.. शुभेच्छा देणं चाललं होतं. श्रोत्यात सर्व कुटुंबीय होते. आणि संस्थेच्या विद्यार्थिनी. त्या शेवटपर्यंत बसल्या होत्या. त्यांना ऐकण्यात इतका रस होता? ऐकू येत होतं? कळत होतं?... की खाण्यापिण्यात लक्ष होतं? की दोन्ही?...

मनात आलं, व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य, क्षमता मिळाली... ते लोकांपर्यंत पोचवायचं बळ आलं. पोचल्याची पावती मिळत राहिली तर कुणी कृतकृत्य समाधानी का होऊ नये?

हे सर्व अनुभवत असताना एका बाजूला ‘काय चाललंय काय?’ म्हणून अवाक्‍ होत होते. दुसर्‍या बाजूला चिडचिड थोपवून सगळं समजून घ्यायचा प्रयत्न करत होते. बेअरिंग टिकवण्याचा, जे चाललंय त्यातली जमेची बाजू शोधण्याचा प्रयत्न करत होते. असंही वाटून गेलं की यांना उत्सवच साजरा करायचाय तर आम्हाला इथं बोलावलं तरी कशाला? अशा वातावरणात कवितेविषयी काही ‘ज्ञान पाजळावं’ असं वाटेना. कोणी ऐकू, समजू शकेल, कुणाला ते हवं असेल असंही वाटेना. आम्ही- पाहुणे, अध्यक्ष खरोखरच शोभेसाठी होतो काय? ... की मी त्या सगळ्याला अंडरएस्टिमेट करतेय / स्वतःला ‘वर’ वगैरे समजतेय?

एकूण त्या सगळ्यात मनापासून समरस होता आलं नाही. आणि मनःपूत बोअरही होता आलं नाही. माझ्यातली थोडी मी त्या सगळ्यातलं चांगलं काही टिपण्याच्या प्रयत्नात होती !

अध्यक्ष म्हणून सत्कार झाला. तारीफ झाली. शाल श्रीफळ मानधन जेवण झालं. हे सर्व आणि हा बोअर होऊ न देणारा अनुभव घेऊन घरी आले. परत कधी अशा कार्यक्रमांना बोलावलं तर दहादा विचार करावा काय?

......

७.१२.२००५

पल्लूला मुलगी झालीय. एवढासा जीव आता हळूहळू मोठा होणार. असंख्य अडथळे पार करत.... त्यासाठी आपण उपाय करतो ते किती वरवरचे, अंदाजे, अपुरे असतात... तरी कोट्यवधी माणसं जिवंत आहेत. आणि सर्वकाही चाललं आहे. जे बरं चाललंय त्यासाठी आपण काय केलेलं असतं? किती थोडंच कळतं आपल्याला. तेवढ्यातच हात-पाय हलवायचे. बरचसं आपोआपच होत असतं..!

दोन हजार पाच साल संपत आलं. तसं खास काहीच केलं नाही. तरी वर्ष बघता बघता संपलंही...!

***

आसावरी काकडे

No comments:

Post a Comment