Monday 21 March 2022

माझ्या डायरीतून- २३



५.९.२००५

परवा फिरायला जाताना एक छोटा मुलगा दिसला. हातात काहीतरी घेऊन कुठेतरी मजेत चालला होता. मळलेला. कपडे तसेच.... वाटलं कितीतरी लोक असंख्य अभावांमधेही मजेत जगत असतात ना? जाताना मनात आलेला हा भाव परतेपर्यंतही टिकला नाही. आठवण झाली तेव्हा मनात आलं, त्यांची दया करावी असं काही नसेल. प्रत्येक दुःखद स्थितीला सावरणारे दुसरे बरेच मुद्दे असतात. आणि तथाकथित सुखाला ओरबाडणारेही.... तरी आत कुठेतरी वाटलं की ही चुकीची समर्थनं आहेत, जरी त्यात तथ्यांश असला....

पण अशा सामाजिक वास्तवात जगताना मी काय करायला हवं?... मी जे करू शकते ते प्रामाणिकपणे करत राहावं. जे करू शकत नाही ते करण्याचा प्रयत्न... जमत नाही म्हणून खंतावणं चालूच राहणार... राहायलाही हवं. आणि काही न केल्याची ‘शिक्षा’ भोगायचीही तयारी हवी....

ओला सुका कचरा वेगळा केला नाही तर सोसायटीला दंड होणार हे सर्वांना माहिती झालंय. पण सांगूनही लोक एवढी साधी गोष्ट करत नाहीत. त्यासाठी न कंटाळता, ते आमलात येईल इतका पाठपुरावा मी करते का? नाही. तर मग सोसायटीला दंड झाला तर मलाही दंड होईलंच जरी मी प्रामाणिकपणे कचरा वेगळा ठेवत असले तरी. मी, माझं घर, माझी बिल्डिंग, माझी सोसायटी, माझा परिसर, गाव.. देश... कोणताही बदल मी कुठपर्यंत घडवून आणते? त्याप्रमाणात मला समाधान किंवा त्रास होणार...

समाजात घडणार्‍या गोष्टींसाठी त्रासताना ह्या गोष्टी मनात स्पष्ट व्हायला हव्यात... आपली सामाजिक जबाबदारी आणि आपली कुवत यांचा मेळ बसेलच असं नाही. आपण आपल्या कुवतीनुसार कर्तव्य केल्याचं समाधान आणि करायला हवं ते न केल्याचा दंड दोन्ही आपल्या ओंजळीत राहणार. ‘दुसरे लोक काही का करत नाहीत’ हा त्यांचा प्रश्न आहे. eternity will ask them..! (किर्केगार्डचं वाक्य आठवलं)

.....

१६.९.२००५

काल एका घरगुती कार्यक्रमात माझं कवितावाचन झालं. जाणकार श्रोत्यांनी भरभरून दाद तर दिलीच. पण कवितावाचनानंतरही कवितेविषयी, त्यातील प्रगल्भ जाणिवांविषयी बरंच बोललं गेलं... या सगळ्याचं छान वाटलंय....

उंच उडी, रन्स, नेमबाजी... अशा विविध खेळात खेळाडूंचे विक्रम होतात. त्या विक्रमाचं एक बिरुद त्यांना चिकटतं. पण ‘उंच उडी’ साधलेला तो क्षण इतिहासजमा झालेला असतो. खेळाडूंना लाभलेलं बिरुद इतकंच सांगत असतं की या खेळाडूत ही क्षमता होती / आहे.... माझ्या कवितेत प्रगल्भपणानं गाठलेली उंची म्हणजे ती लिहिली त्या क्षणाचा ‘विक्रम’ आहे फक्त. आता या क्षणी मी जमिनीवरच आहे मातीचे पाय घेऊन...!

......

१७.९.२००५

गणेशोत्सव चालू आहे. नेहमीप्रमाणे ढोल वाजतायत. सहन करण्याच्या प्रयत्नात एक उपाय म्हणून या मनाविरुद्ध चाललेल्या जल्लोषाच्या चित्राशेजारी मी एक उदासीनतेनं मलूल झालेलं, स्तब्ध, सुनसान चित्र रंगवून पाहिलं. तर आधीचा जल्लोषच बरा वाटला... पण आपल्या दुःखाच्या रेषेपुढे एक मोठी रेघ ओढून आपलं दुःख सुसह्य करण्यासारखंच झालं हे.. या दोन चित्रांच्या मधली काही समतोल अवस्था असू शकते की नाही?

***

आसावरी काकडे

No comments:

Post a Comment