Friday 4 March 2022

माझ्या डायरीतून- १८

२.४.२००४

कालच्या पेपरमधे राजेंद्र बर्वे यांनी छान लिहिलं होतं... ‘आजच्या युगाचं आर्यसत्य दुःख नाही कंटाळा हे आहे. ही मनस्थितीचीच दोन वेगळी नावं नाहीत. दुःखात मीपणाशी बांधलेपण आहे तर कंटाळ्यात एक प्रकारची परत्मता आहे.’ दुःख आणि कंटाळा याचं हे विश्लेषण मननीय वाटलं.

.....

२०.४.२००४

ज्या दिशेनं पाहिलं जाईल त्या दिशेचं दृश्य दिसेल. पाहिलंच नाही तर नाही दिसणार. बुद्धीचं तसंच आहे. एखाद्या प्रश्नाचा (अंतिम वगैरे सुद्धा) लक्षपूर्वक, सखोल विचार केला तर ज्ञान मिळतं.. आकलन होतं.. उत्तर मिळतं. ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटो यानं म्हटलं आहे, माणूस फक्त जड देह नाही. त्याच्यात आत्मा, मन, जाणीव, आणि अविनाशी चैतन्यतत्त्व आहे. त्यामुळे चिंतनाने, अनुस्मरणाने देहाच्या पलिकडचं आकलन होऊ शकतं. माणसाला विश्वाचं आकलन होतं तेव्हा तो प्रतिभावंत.. कलाकार असतो. जगाचं खरं स्वरूप ज्याला कळतं तोच खरा कलाकार..! कला आणि कलाकार या संदर्भातले हे विचार कलेकडे पाहण्याची दृष्टी प्रगल्भ करणारे आहेत.

एक आवडलेलं वाक्य...- ‘ब्रह्म ही मूळ साहित्यकृती असून जग हा तिचा अवकाश-काल यांच्या पातळीवरील एक अनुवाद आहे.’ –  

.....

१५.५.२००४

शब्दांचं आशयाशी तादात्म्याचं नातं नाही. शब्द वेगळा. आशय वेगळा. पण असंही नाही की शब्द म्हणजे फक्त टरफलं... लेबल.. त्यांच्यात आशय वाहून नेण्याचं सामर्थ्य असतं. आपण फक्त समजून घ्यायला हवं की शब्द म्हणजेच आशय नव्हे. तो समजून घेण्यात आपली सक्रियता अपेक्षित आहे. तत्त्वज्ञानातील संकल्पना, कविता यांच्या आकलनासंबंधात हे अधिक महत्त्वाचं आहे.

.....

६.६.२००४

शारीरिक.. मानसिक.. बौद्धिक.. तिन्ही पातळ्यांवरील ताणांना सामोरं जात एम. ए. चं दोन वर्षांचं प्रोजेक्ट पूर्ण झालं... हुश्य वाटलं. पण त्यातल्या अडकलेपणातून बाहेर पडल्यावर लगेच रिकामेपण अस्वस्थ करायला लागलं... त्या अवस्थेत लिहिलेल्या एका कवितेत शेवटी म्हटलंय-


‘....माझ्या भोवतीचा गराडा
पांगतो आहे
एकेक करत सर्व पाठमोरे होऊन
निघाले आहेत.
मी मुक्त त्यांच्या नजकैदेतून
हातात एक पोकळी निराकार
आणि मनावर
निरंकुश स्वतंत्र्याचा भार...
‘Man is condemnd to be free’
या सार्त्रच्या म्हणण्याचा आशय
नरसिंहासारखा प्रकटलाय समोर
मी भयव्याकुळ
आशयाला सामोरं जावं
की पाठमोरं व्हावं
या दुविधेत..!
***
आसावरी काकडे

No comments:

Post a Comment