Sunday 27 February 2022

माझ्या डायरीतून- १७

४.१.२००४
कालचा रा.ग.जाधव सरांच्या मुलाखतीचा कार्यक्रम छान झाला. त्यांचे विचार ऐकताना, खूप वाचन असलेला व्यासंगी माणूसही इतका सकारात्मक विचार करू शकतो हे जाणवून छान वाटलं.  ‘we all are guilty for all of us’ अशी बरीच मननीय विधानं कोट करत, अनेकांचे संदर्भ देत एकूण साहित्य व्यवहार आणि समाज-जीवन यावर केलेले त्यांचे भाष्य आवडले. खूप दिवसांनी एखाद्या कार्यक्रमाने प्रभावित झाले.
.....

२८.१.२००४
अस्वस्थ समाजाचा एक घटक असलेली मी अस्वस्थ आहे.... ‘आपल्याला वाटतं तेवढी परिस्थिती वाईट नसते.... श्रद्धा.. सबुरी.. लोका समस्ता सुखिनो भवन्तु...’ अशा समजुतींची चारी बाजुंनी फिल्डींग लावली आणि स्वस्थ व्हायचा प्रयत्न केला. तरी, असं स्वस्थ होणं म्हणजे पलायन... मुर्दाड होत जाणं असा एक क्षीण टाहो फुटण्याच्या प्रयत्नात होता. पण परीक्षेचा फॉर्म भरायचा होता.... इ. व्यापामुळे तिकडे दुर्लक्ष होऊ शकलं... ताण घ्यायची एक ठराविक क्षमता असते. ती अनेकात विभागली गेली त्यामुळे प्रत्येकाच्या वाट्याला थोडी थोडी आली.
.....

१५.२.२००४
मनाची अस्वस्थ चलबिचल स्थिरावण्यासाठी त्याला समजुतीचे वळसे देताना वाटलं की होऊदे ना चलबिचल. मी कशाला लक्ष देतीय? प्रतिक्रिया न देणं हा एक यावरचा उपाय आहेच. मग असंही वाचलेलं आठवलं की मनाची चलबिचल ही शरीरातील रासायनिक प्रक्रियेचा परीणाम असते. शरीरातील प्रेरित झालेल्या पेशींचा आवेग स्थिरावायला वेळ लागू शकतो. अस्वस्थतेचं कारण संपताक्षणी त्यांनी स्व-स्थ व्हावं ही अपेक्षा तशी चुकीचीच. वेगात असलेली गाडी हळूहळू थांबवावी लागते.

तर मनाची चुळबुळ ही एका अर्थी शारीरिक घटना.... तिला प्रतिक्रिया देणारी ती म्हणजे ‘मी’?.. ‘स्व’? मग ती थांबावी म्हणून प्रयत्न करणारी कोण? हे सगळं अनुभवणारी, त्याचा अन्वयार्थ लावणारी कोण? ...
तत्वज्ञानाच्या संकल्पना कोशात 'स्व' - 'सेल्फ'ची एक छान व्याख्या आहे-

'Self' is the elusive 'I' that shows an alarming tendency to disappear when we try to introspect it.'

त्यामुळे 'मी' कोण हे कधी ठरतच नाही..!
***
आसावरी काकडे

No comments:

Post a Comment