Friday 28 January 2022

माझ्या डायरीतून- ९

११.५.२००२

आम्ही तिघी मैत्रिणी वेताळ टेकडीच्या पुढे दगडाच्या खाणी आहेत तो परिसर बघायला.. फिरायला गेलो होतो. संध्याकाळचे सहा वाजून गेलेले... आकाशात काळ्या ढगांनी गर्दी करायला सुरुवात केली होती. वादळ/वावटळ दबा धरून बसल्याच्या खुणा वातावरणात स्पष्ट दिसत होत्या. आणि आम्ही तिघी निघालो होतो. दुतर्फा पसरलेली झाडी पूर्णतः झडून नग्न झालेली. आमच्या मागे पुढे कुणी दिसत नव्हतं. क्वचित कुणी दिसत होतं ते परत येतानाच. आणि आम्ही आता चाललो होतो. गप्पा तत्त्वज्ञानाच्या, शहाणपणाच्या, उभारी धरण्याच्या विविध युक्त्यांच्या... आणि मनात भीतीनं पंख पसरलेले. त्या पंखांनी अंतराकाश झाकोळून टाकलेलं. डोळ्यांनी सौंदर्य टिपण्याचं आणि मेंदूपर्यंत पोचवण्याचं आपलं काम केलेलं. पण भीतीनं आगोदरच संवेदनांच्या दारावर नजर ठेवलेली.

गप्पा मारत आम्ही पुढे पुढे चाललो होतो. परत जाऊया असं वाटणं मी आत दडवून ठेवलं होतं. माझं लक्ष गप्पा, आतली भीती आणि बाहेरचा भिववणारा भव्य निसर्ग या तिघात विभागलं गेलं होतं. चालता चालता अखेर तो स्पॉट आला... दगडांच्या खाणीचा.. बहुधा माणसांनीच सतत खणत राहून रुंद आणि खोल करत नेलेला. इतक्या दूरवर माणसांची रहदारी बेताची. तरी आधार वाटेल इतपत होती. खाली उतरणार्‍या ढगांना दडपण येईल इतकी जास्त नाही आणि सुनसान एकाकी निराधार वाटेल इतकी कमीही नाही.

तिथं जरा निवांत बसलो. छान वाटत होतं. पण तिकडं पुरेसं लक्ष जात नव्हतं. ते भीतीनं वेधून घेतलं होतं आणि मी तिला इतकी किंमत देत होते की ती समोर दिसत असलेल्या सौंदर्याच्या आनंदासाठी जास्त वाटत होती. आता उठूया असं मी म्हणायच्या आत मैत्रिण म्हणाली आणि आम्ही परतायला लागलो. हायसं वाटलं. भीती घाबरवून मनासमोर चित्र उभं करत होती तसं काही झालं नाही. वादळ वारा विजा पाऊस... काहीच आलं नाही. अंधारही अजून बाहेर पडला नव्हता. आम्ही सुखरूप घरी पोचलो.

आज दुर्गाबाईंच्या ‘पैस’ मधल्या लेखात भीतीबद्दल लिहिलेलं वाचताना हा प्रसंग आठवला. आणि लक्षात आलं की माझ्यातल्या निरीक्षकानं भीतीसह सगळंच टिपून ठेवलंय आणि मी मागताच माझ्या हातात दिलंय.

भीती वाटते तशी सर्वव्यापी नसतेच तर..! आताही त्या खाणी असलेला परिसर त्यावेळच्या वातावरणासह डोळ्यासमोर येऊ शकतोय. निरीक्षकानं व्हिडिओ रेकॉर्डिंग उत्तमच केलंय..!

.....

१३.५.२००२

आपण आपल्या मर्जीनं जन्माला येत नाही. मग त्या जन्माचं सार्थक करण्याची जबाबदारी आपल्यावर का असावी?

***

आसावरी काकडे

२९.१.२०२२

Wednesday 26 January 2022

माझ्या डायरीतून- ८

५.१.२००२

डोळ्यांचा नंबर वाढला म्हणून नव्या नंबरचा चष्मा करून घेतला. तो सूट होण्यात बराच वेळ गेला. सगळ्या गोष्टी मला मोठ्या दिसायला लागल्या. मी गोंधळून गेले. त्याच्याशी जुळवून घेताना मनात आलं हे मोठं दिसणं चुकीचं की आधीचं लहान दिसणं चुकीचं? कुठला आकार प्रमाण मानायचा? कुणाच्या दिसण्याशी कसं टॅली करून बघायचं? मला एक वस्तू एक फुटाची दिसली पण ती नऊच इंचाची होती असं होत नाहीय. मला फुटपट्टीच मोठी दिसतेय. दुसर्‍या कुणाच्या दिसण्याचा काहीच अंदाज घेता येत नाही. ज्यानं मापायचं ते साधनच जर प्रत्येकाला वेगळं दिसत असेल तर मग एकसूत्रता कशी येणार? 

माझा फूट वेगळा. दुसर्‍याचा वेगळा. सगळं जगच असं आहे.. प्रत्येकाला त्याच्या फूटपट्टीच्या मापात दिसतं. निश्चित असं काही नाही. सगळंच सापेक्ष..! प्रत्येकाचं ‘वास्तव’ त्याच्यापुरतं खरं. कुणाच्याही निरपेक्ष असं सत्य काय असेल?

......


१७.२.२००२

एस पी कॉलेजमधील तत्त्वज्ञान वर्गाला जातेय. काल नियतीवाद, नियतत्त्ववाद, आणि कर्मसिद्धान्त शिकवला. नियतत्त्ववाद निसर्गाला लागू आहे. मानवी घटनांच्या स्पष्टिकरणाकरता कर्मसिद्धान्त मांडला. ऐकताना वाटलं, माणूस हा माणूस या स्पेसीचा केवळ एक घटक असा विचार केला तर नियतत्त्ववाद माणसालाही लागू करता येईल. एका झाडाने आपल्या जगण्याबद्दलच्या, स्थितीबद्दलच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण विचारलं तर? त्याला काय उत्तर देणार? त्यालाही कर्मसिद्धान्त लावणार का?.. 

पण कर्मसिद्धान्त पुनर्जन्म संकल्पनेवर आधारीत आहे. झाडाचा पुनर्जन्म म्हणजे काय? त्याच्या बीजातून नवा वृक्ष तयार होणं? तो तर ते झाड जिवंत उभं असतानाच होतो...! याच प्रकारे माणसाचा पुनर्जन्म म्हणजे त्याची मुलं असा अर्थ लावता येईल....

.......

 

१२.३.२००२

कॉम्प्युटर वापरायला सुरुवात केलीय. एकेक शिकतेय. आज डीलीट करायला शिकले. समजलं की कॉम्प्युटरमधली एखादी फाईल डीलीट केल्यावर तो मॅटर रीसायकल बीनमधे जाऊन पडतो.... मनात आलं की मृत्यु म्हणजे आपला ‘मॅटर’ रीसायकल बीनमधे जाऊन पडणं..! मृत्युनंतर माणसाचे विचार, कमावलेलं ज्ञान, कला, अंतःकरण-शुद्धी... या सगळ्याचं ‘बीन’मधे काय होत असेल? 

असं काही वाटणं म्हणजे केवळ भाषेचे खेळ आहेत काय? उच्चारित भाषा म्हणजे आकारबद्ध ध्वनीमाला. मनातले विचार म्हणजे काय.. त्याच्या असण्याचे घटक कोणते?

***

२६.१.२०२२

माझ्या डायरीतून- ७

१५.११.२००१

प्रत्येक नवा शोध माणसाला त्याच्या माणूस म्हणून होणार्‍या प्रगतीपासून दूर नेतो आहे.

भाषेचा शोध लागला आणि जे ज्ञान, अनुभव रक्तातून संक्रमित होत होते ते भाषेतून होऊ लागले.. वरच्यावर विरून जाणारे

लिपीचा शोध लागला आणि मनात, बुद्धीत शब्दबद्ध राहिलेलं, राहू शकणारं ज्ञान, अनुभव कागदावर आले.

कॉम्प्युटरचा शोध लागला आणि सगळं भांडार एका अदृश्य हार्डडिस्कवर बंद झालं.

प्रत्येक नव्या शोधाच्या पायरीनं माणसाला खाली उतरवलं आणि आपण म्हणतो आहोत माणूस किती विकसित झाला..!

(हे लिहिताना आज वाटलं, आता स्मार्ट फोन.. आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाला खेळणं बनवणार की काय?)

...... 

२९.११.२००१

मी एका दरीत राहात असते. मला कुणीतरी वर बोलावतं. मी वर बघते. मला वर खेचणारा हात दिसतो. मला वर जावंसं वाटतं. पण मी हातही वर करत नाही. खालचं आकर्षण मला धरून ठेवतं. मग मी दुर्लक्ष करते कुणी मला बोलावतंय त्याकडे आणि निःशंक बुडी मारते आत.. खोलात.. तरी हाकांचे पडसाद उमटत राहतात... मला वाटतं तितकी निर्विवाद पाठ फिरवलेली नसते मी. हाका ऐकू येत राहतात. त्या विचलित करतात मला भुलवतात आणि नेतात वर खेचून. मग मी स्वतःला हाकांच्या हवाली करते. उपर्‍यासारखी भिरभिरत राहते त्यांच्या मागे मागे. दरीतल्या आकर्षणाची खेच कुरतडत राहाते मला. तिच्याशी झगडत मला हाकांच्या स्वरात स्वर मिळवावे लागतात. पट्टी जुळता जुळत नाही. जिवाच्या आकांताने मी कापून टाकते दरीच्या आकर्षणाचा दोर आणि मिळवते त्यांच्या स्वरात आपला स्वर. गाणे चांगले रंगते. दाद मिळते भरभरून. सुखावतं मन. तरी तिच्यासाठी मोजलेली किंमत, करावा लागलेला झगडा पुन्हा करावा इतका नसतो सहज. मला पुन्हा जाणवू लागते आतली खेच. मला वाटतं तितक्या निग्रहाने मी कापलेला नसतो दरीच्या आकर्षणाचा दोर..!

.....  

१९.१२.२००१

एक परदेशस्थ मनस्वी मैत्रिण- स्मिता पुण्यात आलीय. भेटायचंय... अशा विचारात होते तर कळलं की ती खूप आजारी आहे आणि भेटायला गेले तर कळलं की ती गेली..! धक्का बसला. खूप वाईट वाटलं... अस्वस्थता आली. तरी शेवटची दर्शन-भेट झाली..! पण खूप दिवसांचं वैचारिक शेअरिंग राहून गेलं. माणूस गेलं की त्याचे विचार कुठे जातात? काय होतं त्यांचं? ते ‘युनिव्हर्सल रीझन’मधे सामावून जातात? जिथून येतात तिथे जातात? विचार म्हणजे एका पातळीवर अनुभवणंच. तिचे अनुभव तिच्याबरोबर जाणार...! तिचा ईमेल पत्ता तिला जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात सापडवू शकत होता.... आता ती त्या पत्त्याच्या परिघाबाहेर गेलीय..!

***

आसावरी काकडे

Wednesday 19 January 2022

माझ्या डायरीतून- ६

 २३.६.२००१

डायरीचे नवे पान उलगडावे तसा दिवस उलगडतोय. कोरा. त्यावर तारीख नाही.. वार नाही.. सुट्टीची खूण नाही. सगळी पानं सारखी. त्यावर काय लिहायचं? समोर कोरा दिवस आणि त्याकडे बघणारं असंख्य कल्लोळ मागे टाकलेलं रिकामं मन... ‘मला निर्बुद्ध भक्ती आणि बुद्धीवादी अश्रद्धा यांचा मध्य गाठायचाय..’ मागे पडलेल्या कल्लोळातून काढून रिकाम्या मनानं एक सोंगटी टाकली कोर्‍या पटावर..!

.....

५.८.२००१

रेल्वेत झोपून प्रवास हा एक अनुभव असतो. गाडीच्या लयीत जोजवल्यासारखं पुढे पुढे जात झोपल्या झोपाल्या काही काही मनात येतं... आपण श्वास घेतो त्यामुळे बाह्य वातावरणाशी जोडले जातो. ही ये-जा नसती तर? आतल्या आत काय झालं असतं? आपलं अस्तित्व असतं लोखंडाच्या चिपेसारखं नाहीतर विटेसारखं बंदिस्त. पाच ज्ञानेंद्रियांच्या खिडक्यांतून सतत वर्दळ चाललेली असते. नाहीतर किती एकाकी झालो असतो आपण... या कल्पनेनं शहारे आले... गंमत वाटली तिची. पुन्हा पुन्हा खिडक्या बंद करून बघितल्या आणि दचकून पुन्हा पटकन उघडून टाकल्या...!

.....

२७.९.२००१

.... काल आणि अवकाश (Space and Time) मधला एक कण ‘मी’नं व्यापलाय... आणि मला ते समजतंय. जाणवतंय. ही सर्व सृष्टी निर्माण करणारं कुणी नाही.. ती स्वयंभू आहे. जर तिचा निर्माणकर्ता स्वयंभू मानायचा तर तिलाच का स्वयंभू मानायचं नाही? तर ती आहे स्वयंभू. निर्माणकर्ता सृष्टीच्या बाहेर नाही सृष्टीरूपच आहे. या सर्व असण्याचं मूलतत्व एक आहे ते म्हणजे vibrant energy ... तिचीच ही नाम-रूपं.. मी सुद्धा..!  Why me? By chance? मी इथं का आहे? उगीच?

***

आसावरी काकडे

Monday 17 January 2022

माझ्या डायरीतून... ५

 २१ ५ २००१

आंतरिक प्रेरणा म्हणजे काय? सगळ्याचं नियोजन करणार्‍या वैश्विक शक्तीची इच्छा? त्या प्रेरणा दडपून टाकून ‘मी’च्या प्रेरणा मला खेळवत असतात? माणसाव्यतिरिक्तच्या जीवसृष्टीत असे व्दंव्द नाही.. ‘मी’ला स्वतंत्र प्रेरणा देऊन काय साध्य झालं? जर ती वैश्विक शक्ती स्वयंभूपणे सर्व सृष्टीचे व्य्वस्थापन करते आहे तर माणसाला तेवढी स्वतंत्र बुद्धी का दिली? की स्वतंत्र बुद्धी आहे हा भ्रम आहे? हा भ्रम असेल तर माणसातही ते व्दंव्द नाही असं म्हणावं लागेल. मग माणूस करत असलेली सर्व ‘पापपुण्य’ही तिच्याच प्रेरणेनं होतात असं म्हणता येईल?...

....

२८.५.२००१

एकूण सृष्टीच्या, विश्वाच्या कार्यात सृजनाइतकेच विनाशाचे स्थान महत्त्वाचे आहे. मृत्यू म्हणजे एकाने उठून दुसर्‍याला जागा करून देण्यासाठी दिलेला खो..! या मृत्युची असंख्य रूपं... व्देष.. मत्सर.. क्रौर्य... सूड.. इ. या प्रेरणा भुकेसारख्या आहेत. त्या माणसाला कृती करायला लावतात. या प्रेरणांतून घडलेली कृतीही समर्थनीय ठरू शकेल. मात्र ती शुद्ध पशू-पातळीवरून झालेली असली पाहिजे..!

....

२९.५.२२०१

‘शब्द’ या आत्मचरित्रात माणसाच्या वागण्याला सार्त्र यांनी सतत अभिनय म्हटलं आहे....

अभिनय करणं हे आपल्या अंगात इतकं भिनलंय की तो अभिनय आहे हे लक्षातही येत नाही. अभिनय न करणं अशक्यच आहे. पण निदान आपण अभिनय करतोय हे लक्षात यायला हवं. स्वतःशी आपल्यापुरतं का होईना हे स्पष्ट व्हायला हवं की अभिनय कोणता आणि आपलं खरं वागणं कोणतं?

आत एक आणि बाहेर एक अशा वागण्यात केवळ दांभिकपणाच असतो असं नाही. चांगले संस्कार जपण्याचाही तो प्रयत्न असतो. उदा. घरी आलेल्या व्यक्तीशी मनात नसताना चांगलं वागणं इ. अभिनयाचं आणखीही काही प्रकारे समर्थन करता येईल आणि तो करत राहावं लागेल. तरी त्यासंदर्भातली स्पष्टता ‘स्व’चा शोध घेण्यासाठी उपयोगी पडणारी आहे.

***

आसावरी काकडे

१६.१.२०२२

Wednesday 12 January 2022

माझ्या डायरीतून... ४

 मे २००१

सध्या रामकृष्ण परमहंसांचं चरित्र वाचतेय.... त्याच्या प्रभावात आहे. त्यात म्हटलंय, ‘ते विराट चैतन्य जगद्रुपाने प्रकाशित असून सर्व चराचरात ओतप्रोत भरून निरनिराळ्या नामरूपात नटलेले आहे.’

मनात आलं, ‘मी’ त्यापैकी एक आहे.... माझे बोट साखळीसारखे त्याच्या हाती गुंफले आहे म्हणजे मीही विराट चैतन्यच आहे..!

....

१३ मे २००१

सर्व ईश्वरावर सोपवणे म्हणजे काय? निराकारावर कसे सोपवायचे?...

सोपवायचे म्हणजे खरं तर सोडून द्यायचे. पण या सोडून देण्यात बेफिकिरी, असहायता, नाइलाज असू नये. आणि सोडून दिल्यावर निराशा, उदासीनता असू नये.

सोडून देण्यात विश्वास असावा आणि सोडून दिल्यावर घडेल त्याबाबत हार्दिक स्विकाराची भावना असावी.

इथे मानवी प्रयत्न, विचार, प्लॅनिंग... हे सर्व गृहीतपणाने हवेच आहे.

या सोडून देण्याला, सोपवण्याला ईश्वराच्या सगुण रूपाचा आधार घेणं ही एक ‘सोय’ आहे..! तुकोबांनी म्हटलंच आहे, “तुका म्हणे येथे अवघेचि होय । धरी मना सोय विठोबाची ॥”

***

आसावरी काकडे

.१.२०२२

Sunday 9 January 2022

माझ्या डायरीतून... ३

ये कैसा एहसास है

जिसका कोई चेहरा याद नहीं..!

६७- “मी सगळ्यांना भासवले की मी तुला जाणले आहे. मग माझ्या प्रत्येक कामात त्यांना तुझी चित्रं दिसली. त्यांनी मला विचारलं कोण आहे हा? मला कळलं नाही काय उत्तर द्यावं. मग ‘मी’ म्हणाला, ‘खरंच मला मी नाही सांगू शकत’ मला दोष देत ते रागावून निघून गेले. आणि तू तिथे हसत बसलास.

मी लिहिलेल्या तुझ्या कथा मी चिरंतन गाण्यात गुंफल्या. माझ्या हृदयातून गुपित बाहेर पडलं. त्यांनी मला विचारलं, यातून तुला काय म्हणायचंय? मला काय उत्तर द्यावं कळेना. मी म्हणालो, कोणजाणे याचा अर्थ काय होतो.. ते हसले आणि रागानं तिथून निघून गेले आणि तू तिथे हसत बसलास...”

टीप- हे लिहिलेलं माझं नाही. कशातून लिहून घेतलेलंही वाटत नाही. कशाचा तरी अनुवाद असावा. पण खाली, सुरुवातीला काही उल्लेख नाही. तारीखही नाही. वर शीर्षकाच्या जागी लिहिलेल्या ओळीही अशाच हिंदी कविता सुचण्याच्या ओघात आलेल्या. पुढं काही सुचलं नाही. तशाच लटकत राहिल्या कोर्‍या पानावर. आज त्या या अनाम लेखनाच्या शीर्षक झाल्या..!

आसावरी काकडे

९.१.२०२२

Wednesday 5 January 2022

माझ्या डायरीतून- २

१९.३.२००१

जगाविषयी.. घटनांविषयी.. इव्हन स्वतःविषयी आपली काही मतं असतात. ते सर्व ‘असं असं आहे’ असं आपण मानतो. अगदी घट्टपणे...

वस्तुस्थिती वेगळी, पूर्ण वेगळी असणं शक्य आहे. अगदीच शक्य आहे. ‘जग मिथ्या आहे’ असं तत्त्वज्ञानात म्हटलं आहे ते या अर्थी असेल.

वस्तुस्थिती आपल्या जागी स्थिर, निर्विकार... तिच्याकडे बघणारे असंख्य दर्शनबिंदू तिचे आकलन करतात आणि असंख्य वस्तुस्थिती निर्माण करतात.. ज्या त्यांच्यापुरत्या, त्या क्षणापुरत्या असतात..!

.....

विचार हा अवकाश-पक्षी आहे.

शब्दाच्या पिंजर्‍यात तो आपले पंख पसरवू शकेल

पण उडू शकणार नाही.

.....

आसावरी काकडे
६.१.२०२२

Monday 3 January 2022

माझ्या डायरीतून- १


जानेवारी २०२२


वाचन-विचार.. घटना-प्रसंग.. भेटीगाठी.. प्रवास.. अशा बर्‍याच गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे घडवत असतात. त्या अनुभवताना अंतर्मुख क्षणी वेळोवेळी आतून उमगलेल्या उत्कट समजुतीच्या काही नोंदी मी माझ्या डायरीत नोंदवत राहिले... नवीन वर्षात त्यातील काही इथं शेअर करण्याचा संकल्प केला आहे.


६.३.२००१

.... हे सगळे शब्द आहेत. आकार आणि ध्वनी असलेले. त्यांनी निर्देशित केलेला अर्थ / आशय आपल्या मनात सूप्तावस्थेत असतोच. झोपलेले असताना आवाज झाला की जाग येते तसा आशय शब्दाच्या ध्वनीमुळे जागा होतो. हा जागा होणारा आशय ज्याचा त्याचा वेगळा..! हा आशय म्हणजे स्थळ-काळाच्या एका बिंदूवर उतरलेले ज्ञान..!

फुलात गंध असतोच. त्याच्या आस्वादाचा क्षण तो गंध जाणवण्याचा क्षण. गंधाचा पुनर्जन्म होतो अस्वादक्षणी. तसं ज्ञान होण्याचा क्षण हा ज्ञानाचा पुनर्जन्म..!

***

२.१.२०२२