Wednesday 26 January 2022

माझ्या डायरीतून- ७

१५.११.२००१

प्रत्येक नवा शोध माणसाला त्याच्या माणूस म्हणून होणार्‍या प्रगतीपासून दूर नेतो आहे.

भाषेचा शोध लागला आणि जे ज्ञान, अनुभव रक्तातून संक्रमित होत होते ते भाषेतून होऊ लागले.. वरच्यावर विरून जाणारे

लिपीचा शोध लागला आणि मनात, बुद्धीत शब्दबद्ध राहिलेलं, राहू शकणारं ज्ञान, अनुभव कागदावर आले.

कॉम्प्युटरचा शोध लागला आणि सगळं भांडार एका अदृश्य हार्डडिस्कवर बंद झालं.

प्रत्येक नव्या शोधाच्या पायरीनं माणसाला खाली उतरवलं आणि आपण म्हणतो आहोत माणूस किती विकसित झाला..!

(हे लिहिताना आज वाटलं, आता स्मार्ट फोन.. आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाला खेळणं बनवणार की काय?)

...... 

२९.११.२००१

मी एका दरीत राहात असते. मला कुणीतरी वर बोलावतं. मी वर बघते. मला वर खेचणारा हात दिसतो. मला वर जावंसं वाटतं. पण मी हातही वर करत नाही. खालचं आकर्षण मला धरून ठेवतं. मग मी दुर्लक्ष करते कुणी मला बोलावतंय त्याकडे आणि निःशंक बुडी मारते आत.. खोलात.. तरी हाकांचे पडसाद उमटत राहतात... मला वाटतं तितकी निर्विवाद पाठ फिरवलेली नसते मी. हाका ऐकू येत राहतात. त्या विचलित करतात मला भुलवतात आणि नेतात वर खेचून. मग मी स्वतःला हाकांच्या हवाली करते. उपर्‍यासारखी भिरभिरत राहते त्यांच्या मागे मागे. दरीतल्या आकर्षणाची खेच कुरतडत राहाते मला. तिच्याशी झगडत मला हाकांच्या स्वरात स्वर मिळवावे लागतात. पट्टी जुळता जुळत नाही. जिवाच्या आकांताने मी कापून टाकते दरीच्या आकर्षणाचा दोर आणि मिळवते त्यांच्या स्वरात आपला स्वर. गाणे चांगले रंगते. दाद मिळते भरभरून. सुखावतं मन. तरी तिच्यासाठी मोजलेली किंमत, करावा लागलेला झगडा पुन्हा करावा इतका नसतो सहज. मला पुन्हा जाणवू लागते आतली खेच. मला वाटतं तितक्या निग्रहाने मी कापलेला नसतो दरीच्या आकर्षणाचा दोर..!

.....  

१९.१२.२००१

एक परदेशस्थ मनस्वी मैत्रिण- स्मिता पुण्यात आलीय. भेटायचंय... अशा विचारात होते तर कळलं की ती खूप आजारी आहे आणि भेटायला गेले तर कळलं की ती गेली..! धक्का बसला. खूप वाईट वाटलं... अस्वस्थता आली. तरी शेवटची दर्शन-भेट झाली..! पण खूप दिवसांचं वैचारिक शेअरिंग राहून गेलं. माणूस गेलं की त्याचे विचार कुठे जातात? काय होतं त्यांचं? ते ‘युनिव्हर्सल रीझन’मधे सामावून जातात? जिथून येतात तिथे जातात? विचार म्हणजे एका पातळीवर अनुभवणंच. तिचे अनुभव तिच्याबरोबर जाणार...! तिचा ईमेल पत्ता तिला जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात सापडवू शकत होता.... आता ती त्या पत्त्याच्या परिघाबाहेर गेलीय..!

***

आसावरी काकडे

No comments:

Post a Comment