Sunday 24 April 2022

माझ्या डायरीतून- ३३

 १८.१.२००७

२००७ सालाची सुरुवात भरगच्च झाली. कार्यक्रम.. वाचन.. संकल्प जोरदार.. ‘ईशावस्य’च्या अभ्यासाला गती मिळालीय. प्रत्येक वाचनामुळे आकलनात नवी भर पडतेय. मला त्याचा अहंकार नाहीए. उलट आशयाच्या भव्यतेचं आकलन जितकं अधिक तितके जगण्यातल्या छोट्या छोट्या चुकांचे पराभवही मोठे आणि क्लेशकारक वाटतायत. पण होत असलेलं आकलन पोकळ, शाब्दिकही नाही म्हणता येणार... जगण्यात फारसं न उतरलेल्या या बौद्धिक आकलनाचं स्थान काय?

.....

६.२.२००७

नागपूरच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जाऊन आले. विविध साहित्यिक कार्यक्रमांचा आस्वाद.. साहित्यिकांच्या भेटीगाठी.. गप्पा... नोंदवावं असं बरंच काही घडलं... राम शेवाळकर यांची त्यांच्या घरी जाऊन घेतलेली भेट विशेष लक्षात राहिली. तीन मजली आलीशान घर. स्वतंत्र ग्रंथालय, अभ्यासिका, सन्मान चिन्हे..पदके..मानपत्रे..स्मृतीचिन्हे यांचा उत्तम सजावट केलेला वेगळा विभाग, खाली, वर सर्वत्र फोटोच फोटो थोरामोठ्यांबरोबरचे.. टेरेसवर गार्डन, स्विमिंग पूल, वर जाण्यासाठी लिफ्ट.. त्याच्या बाजूला ज्ञानेश्वर..तुकाराम अशी  डेकोरेटिव्ह अक्षरं.. नातीची स्वतंत्र खोली, किचन, डायनिंग हॉल दोन भागात, बाहेर झोपाळा.. मोठं आंगण.. हाताखाली नोकर-चाकर सूचनेनुसार आदबीनं काम करणारे. त्यातल्याच एकाने आम्हाला हे सर्व फिरवून दाखवलं. आल्या आल्या चहा-चिवडा.. सगळं बघून झाल्यावर पुन्हा चहा पोहे, घरचं दही.. निघताना त्यांनी आपली पाच-सहा पुस्तकं सही करून भेट दिली आणि सोडायला गाडी...!!

विद्वत्ता, साहित्यिक दबदबा, प्रत्यक्ष काम, यामुळं नागपुरात असलेलं मानाचं स्थान.. मला दिलेलं प्रोत्साहन आणि केलेलं कौतुक... हे सर्व आणि इतकं आगत्य.. याच्या जोडीला चकचकीतपणा.. प्रदर्शन.. यामुळं भांबावायला झालं. त्यांचं आतापर्यंतचं आयुष्य खडतर गेलं असेल. आता मुलानं वैभवात ठेवलंय. पण ते भोगण्याची शारीरिक कुवत नाही असं ते म्हणाले. ‘तात्विक विचार’ आणि ‘दरी’ वाढवणारं वैभव यांचा स्विकार त्यांनी कसा केला असेल? दोन्हींची सांगड कशी घातली असेल?... असंही मनात आलं वैभव असण्यात मला चूक का वाटतेय पण? ‘विचारां’ची सांगड साधेपणाशीच का असायला हवी?

कवीसंमेलनात एक बाई डायरेक्ट स्टेजवर आल्या आणि माईकचा ताबा घ्यायला लागल्या. संयोजकांनी त्यांना तिथून घालवलं. त्यांना कविता वाचायची होती. त्या पाया पडल्या. श्रोते आणि आम्ही काही कवयित्री ‘त्यांना कविता वाचूदे ना’ असं म्हणालो. पण त्यांना कविता वाचू दिली नाही. यावर वेगवेगळी मतं पडली. कार्यक्रमाची शिस्त म्हणून चिठ्ठी पाठवून नाही म्हटल्यावर गप्प राहणार्‍यांना डावलून असं घुसून येणार्‍यांना का संधी द्यायची? असं एक मत. नाही म्हणताना अधिक सुसंस्कृत पद्धतीनं ते म्हणता आलं असतं... ही कसली संवेदनशीलता? असं एक...

स्त्रीला व्यक्त होऊद्या असं कवितेतून मांडलं जातं. प्रत्यक्षात बोलायला आलेल्या स्त्रीला घालवून दिलं जातं..! अशा पेचात्मक विरोधांचं काय करायचं?

सर्व कार्यक्रम आटोपून परतीच्या प्रवासाला निघालो... गाडी येईपर्यंत वेटिंगरुममधे बसलो होतो. शेजारी एक बाई एक इंग्रजी पुस्तक घेऊन बसली होती. सहज बोलायला गेले तर उद्‍गारांची गरज असल्यासारखी ती बोलतच राहिली. अमरावतीहून लखनऊला चालली होती. नवरा-मुलांना सोडून... ‘मी दारात बसून राहाते. उन्हात.. मुलं हुशार आहेत लहान आहेत. पण ती मला मारतात.... नवर्‍यानं दागिने काढून घेतले...’ असं काय काय पुन्हा पुन्हा सांगत राहिली. मी ‘सई’ कवितासंग्रह वाचत होते. ती हिंदीभाषी होती. तरी बहुधा तिला जाणवलं की ते काहीतरी तिच्यासाठी आहे. तिनं हातातलं पुस्तक बाजूला ठेवून हे मागून घेतलं. पुस्तकांतल्या रेखाटनांवरून, थोडं वाचून तिला काही कळत होतं. त्यातून तिला दिला दिलासा मिळत होता. ती बोलत होती. मी ऐकत होते आणि टाळतही होते. आपणहोऊन काही विचारायला गेले नाही. समोर एक गुजराती फॅमिली होती. हातांवर पूर्ण मेंदी काढलेल्या बाया.. त्यांच्याकडे बघून ही विचलित होत होती. सारखं बोलत होती. पण डोळे कोरडे होते. कुणीतरी एक मुलगा बरोबर होता. तो कोण असं विचारलं तर म्हणाली अटेंडंट आहे. तो तिला चहा आणून देत होता. सामान आणत होता... तिची व्यथा मला कळली नाही. मी कळवून घेतली नाही. समजलं तेवढ्यावरूनच काहीतरी विचार करत राहिले....

ही अलिप्त संवेदनशीलता सलत राहिली तिच्या आठवणीबरोबर...

***

आसावरी काकडे

Friday 22 April 2022

माझ्या डायरीतून- ३२

१ ११ २००६

दापोली येथील तत्त्वज्ञान परिषदेला जाऊन आले. तीन चार दिवस खूप वेगळ्या वातावरणात गेले. परिषदेत बर्‍याच विषयांवरचे निबंध ऐकायला मिळाले. या बौद्धिक कमाईबरोबर सहलीचा आनंदही घेता आला. समुद्र, चिखली येथील रेणू-राजा दांडेकर यांची शाळा, हर्णे बंदर, मुरुड, लाटघर, केशवराज मंदिर, अंजर्ल्याचा कड्याचा गणपती.... अशा बर्‍याच ठिकाणी जाऊन आलो.  निसर्गाची लयलूट.. जाता-येता वरंदा घाटातला दीर्घ प्रवास.. गाण्याच्या भेंड्या, कविता-वाचन, गप्पा... या सगळ्यात हर्णे बंदरावरचा सनसेट पाहाणं हा क्लायमॅक्स वाटला. उत्स्फूर्तपणे म्हटल्या गेलेल्या ‘मावळत्या दिनकरा.... कहीं दूर जब दिन ढल जाएँ...’ अशा गाण्यांनी तो अनुभव अधिक उत्कट केला. एकूण रूटीनमधला बदल चांगला वाटला.... त्या दरम्यान ईशावास्य उपनिषदाचं पद्यरूपांतर करत होते. ते थोडं वाचून दाखवलं. चांगली दाद मिळाली. बरं वाटलं.

......

१५.१२.२००६

वाचन..विचार.. साहित्यिक कार्यक्रम.. घारातला राबता.. या सगळ्यात ‘ईशावास्य’ उत्कट आनंद देतं आहे. त्यातच अधिक वेळ राहावं असं वाटतंय. पण जमत नाहीए.

काल बागेत फेर्‍या मारताना ‘ईशावास्यम् इदं सर्वम्..’चा किंचित फील आला. ‘तुका म्हणे एका देहाचे अवयव’ या ओळीची आठवण झाली आणि वाटलं की लिहिण्याची क्रिया चालू असताना प्रत्यक्षात उजव्या हाताची दोन बोटं पेन धरतात. तिसरं त्या पेनाला खालून आधार देतं. तिसर्‍या बोटाला बाकीची दोन बोटं आणि पंजा यांचा ठोस आधार असतो. दुसरा हात वही/कागद धरतो. डोळे पाहतात... मार्गदर्शक असल्यासारखे. मन आशय पुरवते. आणि माहिती नसल्यामुळे नाव नसलेली क्षमता शब्द सुचवते. देहातले सर्व ‘रस’ एकमेकांशी हातमिळवणी करत सार्‍याचे संतुलन राखत लेखन-क्रिया होऊ देतात. देहात ज्यामुळे जिवंतपण आहे त्यामुळे हे सर्व शक्य होते. ईशावस्यच्या पद्य रूपांतरात एकेठिकाणी म्हटलं आहे, ‘‘ते आहे म्हणून विश्व चालतसे..’’ याचा उलगडाच झाला असं वाटून गेलं.

लिहिण्याच्या क्रियेत कागद सरकू नये म्हणून कागदावर असलेला डावा हातच नुसता पाहिला तर हाताच्या त्या स्थितीचा काही संदर्भ लागणार नाही, महत्त्व कळणार नाही. त्यासाठी संपूर्ण क्रिया लक्षात यायला हवी.... विश्वाच्या एकूण व्यापारात आपल्या नजरेला दिसणार्‍या घटना... अवस्था... अशाच एका प्रक्रियेचा भाग म्हणून आहेत तशा असतात. आपल्याला त्याचं समग्राच्या संदर्भातलं औचित्य कळणं अवघड आहे. फुलाच्या उमलण्याची गती किंवा पृथ्वीच्या दुहेरी भ्रमणाची गती आपल्याला दिसत नाही, जाणवत नाही... आकलनाचे आपल्याला पेलणारे स्केलच आपल्या मेंदूत ठोकून बसवलेले असते. त्यामुळे घटना-दृश्यांचे आंतरिक संदर्भ समग्रपणे आपल्याला कळत नाहीत. एका देहाचे अवयव असावेत तशा सर्व घटना दृश्ये विश्वात नांदत असतात..!

वृत्तपत्रात जाहीर केल्यानुसार ‘नासा’ने सोडलेले ‘डिस्कव्हरी’ यान पुण्यात काल संध्याकाळी ७.०१ ते ७.०५ दरम्यान दिसले. हजारो मैलांवरून चालणारे यान एखाद्या चांदणीसारखे दिसत होते. ही धावती चांदणी इतक्या दुरून दृष्टीच्या कक्षेत नेमकी केव्हा आणि कुठे येईल याचं गणित मांडणं आणि प्रत्यक्षात ते तसं घडणं यातल्या विस्मयाचा काल अनुभव घेतला. सूक्ष्म पार्टिकल्सच्या जगात इतकी गतिमानता, अनिश्चितता, अखंड परिवर्तन असताना लार्ज स्केलवर असा मिनिट-सेकंदांचा अंदाज वर्तवणं आणि तो बिनचुक ठरणं हे थक्क करणारं आणि अनाकलनीय आहे....

.....

१८.१२.२००६

‘स्त्री असण्याचा अर्थ’ पुस्तक प्रिंटिंगला गेलंय. कव्हर-चित्र आवडलं म्हणून मैत्रिणीकडून आणलं होतं. पण तसंच्या तसं पूर्ण स्कॅन करून प्रिंटाउट काढल्यावर छानच वाटेना. गडद.. फिकं करून पाहिलं तरी आवडेना. मग ते छोटं करून त्याला टेक्स्चर असलेल्या ग्रीन कलरची चौकट केली तेव्या कॉम्प्युटरवर तरी चांगलं दिसलं.... चौकट हाही चित्राचाच भाग असतो तर..! तो काढून टाकल्यावर उरलेलं अपुरं चित्र कसं आवडणार?

***

आसावरी काकडे

Tuesday 19 April 2022

माझ्या डायरीतून- ३१

८.८.२००६

सध्या Will Durant यांच्या ‘The Story of Philosophy’ या पुस्तकाचा ‘पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाची कहाणी’ हा साने गुरुजी यांनी केलेला अनुवाद वाचते आहे. जागोजागी मननीय विचार भेटत आहेत. त्यातले काही नोंदवल्याशिवाय पुढे जाववत नाहीए... त्यातल्या काही नोंदी-

‘जीवन दुःखमय आहे. तेच त्याचं मूलभूत आणि यथार्थ स्वरूप आहे. Pain is the basic stimulus and reality. सुख म्हणजे दुःखाचे केवळ थांबणे.

‘गरज, दुःख संपले, स्वास्थ्य यायला लागलं की माणूस निरुत्साही होतो. त्याला कंटाळा येतो.

‘जसजसे यश मिळत जाते तसतसे जीवन रसहीन आणि कंटाळवाणे व्हायला लागते. जीवन जितके अधिक उच्च दर्जाचे तितके दुःख अधिक. ज्ञानाने दुःख कमी होत नाही, ते स्पष्ट होते, वाढते. स्मृती, दूरदृष्टीही मानवी दुःखात भर घालतात.

The man who is gifted with genius suffers most of all.“प्रत्येक व्यक्तीला आवश्यक इतके दुःखाचे माप तिच्या प्रकृतीने निश्चित करून टाकलेले असते.

‘तृप्ती नव्या इच्छेला जन्म देते. ‘संकल्पशक्ती’ (will) सदैव भुकेलीच राहात असते.  जीवनाचे खरे रूप आपल्याला कळत नाही म्हणूनच केवळ आपण जगू शकतो. आपलं चालत राहाणं म्हणजे पडण्यापासून सतत वाचत राहाणे आणि जगणं म्हणजे मृत्यु पुढे ढकलला जाणे.’

हे सर्व मननीय आहे... आता, इतक्या वर्षांनी या नोंदी वाचताना मनात आलं की एवढ्या मोठ्या पुस्तकातून आपण नेमकी काही वाक्येच का निवडत असू डायरीत नोंदवण्यासाठी? आपलं काही खोल.. आंतरिक नातं असेल का त्यातल्या आशयाशी?

.....

२.१०.२००६

बुचाच्या फुलांच्या झाडाखाली पांढर्‍या फुलांचा सडा पडलाय. काळ्या जमिनीवर हा सडा आणि मधे झाड रोवल्यासारखे... बागेत हिरवळीच्या कडेला दोन झाडं अशीच आपल्या पिवळ्या.. गुलाबी फुलांचा सडा हिरवळीवर घालून उभी आहेत.... मी अनुभवतेय ही दृश्यं डोळ्यांना सुखावणारी आणि मनात ‘The Tao of Physics’ या नुकत्याच वाचलेल्या पुस्तकातले विचार रेंगाळतायत... तेही पाहतायत या दृश्यांकडे. त्यांना प्रश्न पडलाय, स्पेस आणि टाईम यांचं वेगळं नसणं, ‘नथिंगनेस’चं असणं, एका लयीत सर्व काही गतीमान असणं... या पदार्थविज्ञानाच्या शोधाचं या फुलांशी काय, कसं असेल नातं?

......

२१.१०.२००६

‘कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेत शतं समः ....’ असं मनात घोकतेय पण प्रत्यक्षात सर्वाचा.. सगळ्याचा कंटाळा आलाय. पुरे पुरे झालंय.... ‘ज्ञान’ कळण्याच्या अतिरिक्त आनंदाचा काय उपयोग?.... की त्याचंच हे दुसरं टोक?... बाहेर उत्साहाला उधाण आलंय. फटाक्यांचे आवाज.. धूर यांनी हैराण केलंय... काही समजेनासं होण्याचं आणखी एक आवर्तन.. असो.

......

२४.१०.२००६

वाचनातून बुद्धीला कळणारं ‘ज्ञान’ आणि जगणं यांची झटापट चालू आहे. हे तसं नवीन नाही. फक्त शून्यांची संख्या वाढत चाललीय. वरच्या संख्येतली शून्यं वाढतायत आणि त्यांच्या बरोबरीनं माझ्या नकळत त्यांची ‘अँटीपार्टिकल्स' लगेचच तयार होतायत. हाती काही न उरण्याचा आणखी एक दंश..! जे जे उत्पन्न होतं ते ते त्याच्या दुसर्‍या टोकासहच उत्पन्न होत असतं हे समजूनच घ्यायला हवंय. या समजुतीचा विसर पडू नये म्हणूनच होत असतात काय असे जीवघेणे दंश पुन्हा पुन्हा? असे दंश पचवत ‘आकांत’ धगधगता ठेवणं हेच खरं जगणं काय?

***

आसावरी काकडे

Thursday 14 April 2022

माझ्या डायरीतून- ३०


६.७.२००

टिपून घेतलेले काही...

‘असे कधीही म्हणू नका की मी एक वस्तू गमावलीय. म्हणा की वस्तू परत केली गेली...’

‘शब्दात प्रकट झाल्याने आपले विचार कसे ‘दिसतात’ ते कळते. अशा प्रकटीकरणामुळे शेवटी आपण स्वतःपेक्षा अधिक शहाणे होतो. एका तासाच्या अशा अभिव्यक्तीने आपण जितके शहाणे होतो तितके दिवसभराच्या चिंतनानेही होणार नाही’

‘तू स्वतःला जाण’ एवढे म्हणून भागणार नाही. स्वतःचे ज्ञान म्हणजे अर्धे ज्ञान. दुसर्‍याचे, भवतालाचे ज्ञान होणे आवश्यक आहे.’

‘माणूस स्वतःच्या क्षमतांनुसार वस्तूंचे आकलन करून घेतो. म्हणून आपले आकलन हे वस्तूंचे आकलन नसते तर ते आपले स्वतःचेच आकलन असते.’

......

२४.७.२००६

‘तत्त्वज्ञानाच्या प्रत्येक पंथातील प्रत्येक आचार्य हा थोडासा लबाड असतो. जगात ढोंगी लोकानाच सदैव खात्री असते. ते निःशंक असतात. त्यांना प्रश्न पडत नाहीत. संशय वाटणे ही काही चांगली स्थिती नाही पण खात्री वाटणे हे तर हस्यास्पद आहे.’

‘विचार करण्यामुळे दुःखी झालेल्या आणि न करण्यामुळे सुखी झालेल्या दोघांची गोष्ट.. दुःखी माणूस म्हणतो, मी विचार केला नाही तर मीही सुखी होईन पण ते सुख असे आहे जे मी इच्छित नाही.’

‘तत्त्वज्ञानाचा शेवट जरी अनुत्तरीत प्रश्नांनीच व्हायचा असेल तरी तत्त्वज्ञान हे माणसाचे परमोच्च साहस आहे. सद्‍वस्तूशास्त्राची (Metaphysics) चार हजार पुस्तकेही आत्मा काय ते तुम्हाला शिकवू शकणार नाही.’

......

२५.७.२००६

त्रेपन्न फूट खोल कोरड्या विहिरीत पडलेल्या पाच वर्षांच्या ‘प्रिन्स’ला लष्कराच्या जवानांनी दोन दिवसांच्या शर्थीच्या प्रयत्नांनी बाहेर काढले. सर्व न्यूज चॅनल्सचा आणि वृत्तपत्रांच्या मथळ्यांचा विषय (एक दिवसापुरता) प्रिन्स हा होता.... एका सामान्य लहान मुलाला इतक्या अशा प्रयत्नांनी बाहेर काढण्यासाठी केवढी यंत्रणा कार्यान्वित झाली..! त्या विहिरी शेजारी एक विहिर खणून खालून बोगदा करून त्या मुलापर्यंत जवान पोचले आणि त्यांनी त्याला वर काढलं. या सगळ्यासाठी मेहनत, खर्च, कौशल्य, आणि धाडस या सगळ्याची फार मोठ्या प्रमाणावर गरज होती. ती उपलब्ध झाली. या सगळ्यामागे कोणती प्रेरणा प्रभावी ठरली असेल? सरकारी आदेश, आणि तो आंमलात आणण्याच्या यंत्रणेतले सर्व दुवे झपाटल्यासारखे कुठल्या आवेगांनी कार्यान्वित झाले असतील? पाच वर्षाच्या मुलाची स्वतःची अशी काय जिजीविषा असणार? एवढ्या प्रचंड प्रयत्नांनी जीवदान मिळालेल्या आयुष्याचं पुढं काय होईल? हे सर्व मिरॅकल कशामुळे, कशासाठी घडलं? मूल दोन दिवस अन्नपाण्यावाचून जगलं, त्याला वाचवण्याचे प्रयत्न झाले, ते यशस्वी झाले.... या सर्व नाट्यातला प्रत्येक क्षण मिरॅकल घडवण्यासाठी राबत होता. कोणी घडवलं हे सारं की केवळ एक हॅपनिंग?

***

आसावरी काकडे

Monday 11 April 2022

माझ्याडायरीतून- २९

 २०.४.२००६

‘ज्ञाना’साठी श्रद्धेची गरज नाही आणि ज्ञानप्राप्तीनंतर भक्तीची गरज नाही हे आधीच्या लेक्चर्समधून लक्षात आलं होतं. भक्ती-अभ्यास वर्गात आज समजलं की ज्ञान मिळवण्याची पात्रता येण्यासाठी विवेक, वैराग्य, क्षमादी सहा गुण, आणि मुमुक्षुत्व (मोक्ष मिळण्याची इच्छा) या साधन चतुष्टयाची गरज आहे. असा मुमुक्षु (मोक्ष मिळण्याची इच्छा असणारा साधक) वेदान्त वाक्यांचे योग्य गुरूकडून श्रवण करतो. त्यावर मनन चिन्तन, निदिध्यास, तत्त्वपदार्थ शोधन... साक्षात्कार या मार्गाने ज्ञान मिळवू शकतो. असा ज्ञानातून झालेला साक्षात्कार क्षणिक नसेल. आणि असा ज्ञानी, जो ज्ञानपूर्व अवस्थेतच विवेकी, वैराग्यसंपन्न असेल तो ज्ञानी झाल्यावर कसा वागेल याची कल्पना करता येईल. अनिष्ट काही त्याच्या हातून घडणारच नाही...

अव्दैत वेदान्ताची ही भूमिका न सोडता ज्ञानेश्वरांनी भक्तीचा पुरस्कार केला हे विलक्षण आहे. पूर्णतः रॅशनल असूनही, नव्हे रॅशनल राहूनच सर्व समजून घेता येणं शक्य आहे. आणि अशा परिपूर्ण समजुतीनंतरची भक्तीच खरी भक्ती आहे. ती जगणं हार्दिक करेल, प्रेममय करेल. अशा भक्तीला पंचम पुरुषार्थ म्हटलं आहे. अमृतानुभव ग्रंथात ज्ञानेश्वरांनी भक्तीचं समर्थन फार सुंदर आणि बुद्धीला पटेल असं केलेलं आहे. ती ओवी-

‘अहो ऐक्याचे मुद्दल न ढळे । आणि साजिरेपणाचा लाभ मिळे ।

तरी स्वतरंगांची मुकुळे । तुरंबु का पाणी ॥१/५९॥

भावार्थ- पाण्याचा अखंड एकपणा अबाधित राहूनही पाणी आपल्या तरंगफुलांचा आस्वाद घेत असते तसा ज्ञानी भक्त भक्तीप्रेम अनुभवतो... ज्ञानी भक्ताच्या मनातील अव्दैत भाव स्थिर असल्यामुळे सगुण भक्ती केल्यानेही त्याच्या मनातील ऐक्याचे मुद्दल कमी होत नाही.

......

११.५.२००६

भारतीय तत्त्वज्ञानाची पूर्ण मांडणी मोक्ष हे साध्य केंद्रस्थानी ठेवून झाली. अशा मोक्षालाही गौण मानणार्‍या भक्तीला ज्ञानेश्वरादी संतांनी पाचव्या पुरुषार्थाचं स्थान देऊन चार पुरुषार्थांची चौकट ओलांडली. भक्तीचं हे स्वरूप साद्यंत समजावून दिल्यावर भक्ती-अभ्यास वर्गाची सांगता झाली... या निमित्तानं सर्वांनी भक्तीच्या स्वरूपाविषयी निबंध लिहायचा होता. मीही लिहिला....

......

२३.५.२००६

तत्त्वज्ञानाच्या वाचनाबरोबर इतर वाचनही चालू आहे. काल ‘आयदान’ हे उर्मिला पवार यांचं आत्मचरित्र वाचून झालं. उर्मिला पवार या व्यक्तीबद्दल काय ढालगज बाई आहे अशी समजूत व्हावी इतकं खरंखुरं थेट लेखन आहे. व्हीलनचा खराच राग यावा ही त्याच्या अभिनयाला पावती असते तसं उर्मिला पवार यांनी त्या किती ग्रेट आहेत याचं दर्शन न घडवता त्या त्या प्रसंगी त्या जशा आहेत त्याचं प्रामाणिक दर्शन घडवलंय....

पुस्तकात एका वेगळ्या आयुष्याचं दर्शन घडलं. इतकी गरीबी की पाणी घालून वाढवलेलं अन्न एका ताटात पसरून एकत्र जेवायचं. प्रत्येकानं मोजून घास घ्यायचे. कुणी एखादा जास्त घेतला तर त्यावरून भांडणं... दोन पैशाचं लोणचं आणायला जाण्याचा प्रसंग.. कुणीतरी वाढून दिलेला उरलेला/उष्टा भात एकत्र करून नदीत धुऊन घेऊन परत गरम करून खाणं... होळीत ‘इडा पिडा टळो...’ अशी प्रार्थना म्हटली जाणं... जन्मलेल्या मुलाला अंघोळ घालताना कानात चुळा टाकणं... अंघोळ झाल्यावर नखाची माती कपाळाला लावणं... असल्या असंख्य गोष्टी वाचून थक्क व्हायला झालं. किती गरीबी, अज्ञान, कसल्या कसल्या चालीरीती, किती सहज अन्याय.....करतोय, सोसतोय हेही समजू न देता होत राहणारा..!

तत्त्वज्ञानाच्या वाचनातून होणार्‍या वैचारिक आकलनाचा आनंद या जीवनदर्शनापुढे तग धरू शकला नाही.....!

***

आसावरी काकडे

Thursday 7 April 2022

माझ्याडायरीतून- २८


१३.४.२००६

हेलेन केलरचं आत्मचरित्र वाचायला घेतलंय. अंध, मूक, बधीर असलेल्या या बाई कशा शिकल्या ते वाचताना भाषेसंबंधीचं काही खोलातलं लक्षात येतंय..... आपल्या बाह्य जगाच्या आकलनानुसार पुस्तकात दिसणे, पाहणे, बघणे ही क्रियापदं खूपदा आलीयत. सांगणे, ऐकणे ही क्रियापदंही आहेत. दिसणं, ऐकणं या संवेदनातून आपल्याला आकलन होत असतं त्यामुळे त्याला ती क्रियापदं योजली गेली. ज्या व्यक्तीला ऐकण्याचा, बघण्याचा अनुभवच नाही ती व्यक्तीही लिहिताना.. भाषेतून व्यक्त होताना या क्रियापदांशिवाय मांडणी करूच शकत नाहीए. उदा. एक वाक्य आहे- ‘सांताक्लॉज आल्यानंतर काय करतात ते मला बघायचे होते.’ यात बघणे क्रियापदा ऐवजी दुसरे कोणते क्रियापद वापरता येईल? आणि दुसरं काही वापरलंच तर वाचकांना ते कसं समजेल? 

मी आत्मचरित्राचा अनुवाद वाचते आहे. मूळ काय लिहिलंय पाहायला हवं...

भाषेचा असा विचार करताना लक्षात आलं की आपल्या पाच ज्ञानेंद्रियांपैकी डोळ्यांचा वापर सर्वाधिक होतो. आकलनासाठी डोळे हे माध्यम सर्वाधिक वापरलं जातं. पण त्यामुळे स्पर्श ही संवेदना तिच्या पूर्ण क्षमतेने अनुभवली जात नाही.

भाषा/शब्द यांचं स्वरूप ध्वनी+आकार असं आहे. या दोन्ही गोष्टींच्या आकलनाची क्षमता नसलेल्यांनी भाषा कशी शिकायची? स्पर्शानं..! अक्षरांना स्पर्श करून. वस्तूंना स्पर्श करून... स्पर्शातून पाहायचं.. ऐकायचं.. बोलायचं... (ब्रेल लिपीबद्दल एक छान वाक्य आहे. There is a wonder in reading braille that sighted will never know to touch words and have them touch you back. -Jim Fiebig.)

लहान हेलेनला भाषेची ओळखच नाही. तरी तिला काही वाटत असणारच.. त्या वाटण्याचं माध्यम काय असेल? सौंदर्याच्या अनुभवाचा बरेचदा उल्लेख आहे. तो वाचून वाटलं की सौंदर्य हा दृष्टीचा विषय असं इतकं पक्क मनात बसलंय की सौंदर्याचा अनुभव स्पर्श.. गंध अशा इतर माध्यमांतूनही घेता येऊ शकतो हे पटकन लक्षातच येत नाही..

आपल्याला वस्तू दिसते म्हणजे काय? वस्तूविषयीचं काही एक आकलन आपल्या मेंदूत नोंदवलं जातं. तसंच काही वेगळ्या पातळीवरचं आकलन स्पर्शातून होत असेल.... स्पर्श संवेदना तीव्र असेल तर प्रत्यक्ष स्पर्श न करताही वातावरणातल्या हालचालींचा स्पर्श आपल्या असण्याला होऊ शकेल. कुणी आल्याचा वास येऊ शकेल. आपली एकूण क्षमता आपल्या सर्व संवेदनांमधे विभागली जात असेल. ज्यांना दिसत नाही त्यांची दृष्टीच्या वाटची क्षमता स्पर्श/गंधाला मिळत असेल. आवाजाचाही स्पर्श होऊ शकेल. न ऐकता आवाज झाल्याचं कळू शकेल. आवाजांनी वातावरणात कंपनं निर्माण होतात. त्यांचा स्पर्श होऊ शकेल.

केवळ स्पर्शानं अख्खी भाषा आणि त्या माध्यमातून अख्खं वस्तू-ज्ञान मिळवणं आणि ते शेअर करता येणं किती अवघड आहे..!

.......

१७.४.२००६

हेलेन केलरच्या आत्मचरित्रात श्रवण, दृष्टी यांच्या अभावातून आलेल्या मर्यादांवर कशी मात केली त्याविषयी शेवटी बराच खुलासा होतो.... स्पर्शानं कसं समजतं त्यासंदर्भात एके ठिकाणी फार सूक्ष्म विचार मांडलाय... म्हटलंय, ‘मला असे वाटते की मानवजातीच्या सुरुवातीपासून अनुभवलेल्या भावना आणि मनावर झालेले परिणाम ही एकत्र करण्याची आणि समजावून घेण्याची सूक्ष्म शक्ती आपणा सर्वांमधे आहे. प्रत्येक माणसाच्या अर्धजागृत स्मृतीकोशात हिरवीगार वनराजी.... अशा सर्व ऐंद्रिय संवेदनांची आठवण असते. ती आठवण किंवा मागील पिढीपासून मिळालेला तो ठेवा आंधळेपणा अथवा बहिरेपणा लुबाडून घेऊ शकत नाही. ही वंशपरंपरेनं आलेली शक्ती म्हणजे एक प्रकारचे सहावे इंद्रियच आहे म्हणाना. त्या आत्मशक्तीच्याच आधारे आपण बघू, ऐकू किंवा स्पर्श करू शकतो..’

मूळ इंग्रजी वाचायची उत्सुकता वाटते आहे.

प्रत्यक्ष बघणं, ऐकणं, स्पर्श करणं हे ते ते ज्ञान होण्यासाठीचं, त्या विषयीचं सूप्त ज्ञान जागृत करण्याचं केवळ निमित्त ठरत असेल का?  

.....

अंधांच्या जीवनात स्पर्शाचं स्थान काय असेल ते सांगणार्‍या माझ्या एका कवितेच्या काही ओळी

दृष्टीने प्रवेश नाकारला त्यांना

स्पर्श झाला पान्हा त्यांच्यासाठी

स्पर्श त्यांची माता स्पर्श त्यांचा पीता

स्पर्श सर्व गात्रा बळ देई

सर्वांगास त्यांच्या फुटतात नेत्र

जिवलग मैत्र तेच त्यांचे..

(‘उत्तरार्ध’ मधून)

***

आसावरी काकडे

Saturday 2 April 2022

माझ्या डायरीतून- २७

१५.३.२००६

‘बहु ये हे त्रिपुटी । सहजे हो तया राहटी । प्रतिक्षणी काय ठी । करीतसे ॥’ अमृतानुभव ७/१८२ भावार्थ- दृश्य द्रष्टा दर्शन, ज्ञेय ज्ञाता ज्ञान, भोग्य भोक्ता भोगणे,... अशा असंख्य त्रिपुटी, रहाटाप्रमाणे फिरणार्‍या विश्वाच्या दिनचर्येत दर क्षणाला निर्माण होतात आणि लय पावतात... त्या सगळ्याचे किती स्मरण (ठी) ठेवणार?

हे समजून घेताना मनात आलं, स्वप्न पाहताना स्वप्नातल्या सर्व गोष्टी या स्वप्न पाहणार्‍याचीच (फक्त) निर्मिती असतात. तोच पाहणारा, पाहणे आणि स्वप्न सर्व तोच असतो. दिवसा, जाग आल्यावर यातलं काहीच उरत नाही.

पण जागेपणीही तो जे जे बघतो, अनुभवतो, ते ते सर्व फक्त त्याचंच नसतं काय? ‘झाड’ भलेही वस्तुनिष्ठपणे स्वतंत्र अस्तित्वात असेल. पण माझ्या खिडकीतून, माझ्या खुर्चीवरून मला या क्षणी दिसलेलं, माझ्या नजरेच्या कॅमेर्‍यानं टिपलेलं झाड फक्त माझंच नाही काय? कोणत्याही व्यक्तीचं माझ्याशी असलेलं नातं फक्त माझंच नाही काय? कोणत्याही घटनेचा मी लावलेला अन्वयार्थ फक्त माझाच नाही काय?... माझ्या भोवती जे जे काही आहे ते ते सर्व एकप्रकारे माझीच निर्मिती...! मला एकटं अगदी निखालस एकटं राहाता येत नाही. मग मी असंख्य परीच्या सुखदुःखांची निर्मिती करत राहते. ही सर्व निर्मिती अगदी पूर्णतः वेगळ्या तर्‍हेनं करता येणं शक्य आहे...

आपल्याला जे कळतं, जाणवतं आवडतं... ते सगळं संस्कारांमुळे, सतत सांगितलं, ऐकलं गेल्यामुळे असेल का? तसं तर असंख्य गोष्टी आपल्या भोवती असतात. असंख्य प्रकारे आपल्यावर संस्कार होतात. त्यातला एखादाच विचार आपल्याला का पटतो, जवळचा वाटतो? तो आपल्या आत असतोच म्हणून?

 

तत्त्वज्ञानाचा प्रत्यक्ष जगण्यात कसा उपयोग होईल? प्रत्यक्ष जगण्यात चांगलेपणा उतरणं ही ज्ञानाची कसोटी ठरेल का? या प्रश्नाचं उत्तर हो असं देणं बरोबर- चूक म्हणण्यापेक्षा हिताचं असतं. म्हणून चांगलं जगण्याशी ज्ञानाची सांगड घालणं आवश्यक आहे. ‘तत्’चं ‘ज्ञान झालं की मोक्ष मिळतो म्हणतात. मनात आलं की असं ज्ञान झाल्यावर जगणं अवघड होत असेल. दर क्षणी विसंगतीग्रस्त व्हायला होत असणार. जगणं आणि ज्ञान सम पातळीवर राहूच शकत नाही. म्हणूनच काही जण समाधी घेता. काहींना जगण्याच्या आंतरिक संघर्षात लवकर मृत्यू येतो...

ओवीच्या निमित्तानं कुठं कुठं गेलं मन..!

......   

२०.३.२००६

भक्ती अभ्यासवर्गात ज्ञान (अंतिम सत्याचं ज्ञान) मिळवण्यासाठी श्रद्धा लागते का यावर चर्चा झाली... श्रद्धा ठेवणं म्हणजे काहीतरी गृहीत धरणं, त्यावर विश्वास ठेवणं... असा विश्वास ठेवून त्याच्या प्रत्यक्ष अनुभूतीचा ध्यास घेतला आणि तशी अनुभूती आली तरी ते खरं ज्ञान ठरेल का? की जे मानलं होतं ते पटलं एवढंच होईल? काहीही न मानता, म्हणजेच कोणतीही श्रद्धा न ठेवता कोर्‍या मनानं शोध घेत गेल्यावर जे हाती लागेल ते खरं ज्ञान असू शकेल? ते प्रत्येकाचं प्रत्येक वेळचं वेगळं  असणार...  थोडक्यात, झालेल्या चर्चेतून ज्ञानासाठी श्रद्धेची गरज नाही असं निष्पन्न झालं.

भक्ती अभ्यासवर्गात ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग, प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन सनातन निष्ठांविषयी परत परत सांगितलं जातंय. भारतीय तत्त्वज्ञानात या दोनच प्रमुख निष्ठा मानल्या गेल्या. त्यात भक्ती येत नाही. भक्तीचा विचारच कुठे येत नाही. म्हणजे श्रद्धा.. भक्तीची सुट्टीच झाली की असं वाटून गेलं...

गीतारहस्य ग्रंथात टिळकांनी लोकांना कर्मप्रवृत्त करण्यासाठी कर्ममार्गाची महती सांगितली. ज्ञानी माणसानेही कर्म केलेच पाहिजे हे सांगितलं. भक्तीचा उल्लेख केला पण कर्माच्या आड येणारी भक्ती अवैध ठरवली. शंकराचार्यांनीही कर्म, भक्ती ही चित्तशुद्धीची साधनं आहेत ती ज्ञानाची साधनं नाहीत असं सांगितलं.

......

१.४.२००६

श्रद्धा.. भक्ती विषयीचे तात्त्विक विचार आपल्या जागी... रोजच्या जगण्यात घडणारं तिचं दर्शन वेगळंच..! फिरण्याच्या वाटेवरचा एक टप्पा म्हणून नेहमीसारखी साईबाबा मंदिरात गेले होते. तिथे येणार्‍या भक्तांचा भाव बघून खूपदा गहिवरून येतं. ईश्वर या कल्पनेविषयी ‘विस्मय’भाव उमटतो. किती सर्वव्यापी कल्पना आहे ही..! तिनं कुणालाही सोडलेलं नाही. जगातल्या कुठल्याही कोपर्‍यातली कुठलीही व्यक्ती घ्या. तिच्या भावविश्वात कुठल्या ना कुठल्या प्रकारे ईश्वर असतोच. कुणालाच न दिसता, न समजता एकाच वेळी अनेकांचा असतो. कुणीही केव्हाही कुठेही त्याच्याशी संवाद करू शकतं. त्याला सर्वसाक्षी म्हणतात ते याच अर्थानं असेल.!

मंदिरात डोळे मिटून बसलेली माणसं बघते... ती काय म्हणत असतील मनात? कुणी कशी कधी पेरली ही ईश्वरकल्पना ज्याच्या त्याच्या मनात? ज्याच्यावर विश्वास ठेवावा, भिस्त ठेवावी असं ‘सदातत्पर’ प्रत्यक्षात कोण असणार? रात्री दोन वाजता जाग आली आणि अस्वस्थ, निराधार वाटलं तर ईश्वराइतकं तत्पर, इतकं जवळचं, इतकं सहज कोण येईल धीर द्यायला? अशा ईश्वराच्या कल्पनेनं भरून येतात डोळे मंदिरात जाते तेव्हा बर्‍याच वेळा. ईश्वर-कल्पनेचं कौतुक वाटतं ओतप्रोत....

डायरी-लेखन म्हणजे अनुभव-चिंतन. अनुभवाचा अनुभव घेत त्याचं शब्दांकन करणं. त्यावेळी प्रत्यक्ष अनुभवाचा सर्व तपशील कंसात टाकला जातो. त्यापासून आपण अलिप्त होतो. अतीत होतो. किंचित वर उचलले जातो. त्यावेळी चिंतन करणार्‍या ‘स्व’ला ‘साक्षी मी’ म्हणता येईल. लेखनाच्या निमित्तानं वर उचललं जाण्याची प्रक्रिया उन्नत करून दिलासा देणारी, आनंद देणारी असते.

***

आसावरी काकडे