Tuesday 19 April 2022

माझ्या डायरीतून- ३१

८.८.२००६

सध्या Will Durant यांच्या ‘The Story of Philosophy’ या पुस्तकाचा ‘पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाची कहाणी’ हा साने गुरुजी यांनी केलेला अनुवाद वाचते आहे. जागोजागी मननीय विचार भेटत आहेत. त्यातले काही नोंदवल्याशिवाय पुढे जाववत नाहीए... त्यातल्या काही नोंदी-

‘जीवन दुःखमय आहे. तेच त्याचं मूलभूत आणि यथार्थ स्वरूप आहे. Pain is the basic stimulus and reality. सुख म्हणजे दुःखाचे केवळ थांबणे.

‘गरज, दुःख संपले, स्वास्थ्य यायला लागलं की माणूस निरुत्साही होतो. त्याला कंटाळा येतो.

‘जसजसे यश मिळत जाते तसतसे जीवन रसहीन आणि कंटाळवाणे व्हायला लागते. जीवन जितके अधिक उच्च दर्जाचे तितके दुःख अधिक. ज्ञानाने दुःख कमी होत नाही, ते स्पष्ट होते, वाढते. स्मृती, दूरदृष्टीही मानवी दुःखात भर घालतात.

The man who is gifted with genius suffers most of all.“प्रत्येक व्यक्तीला आवश्यक इतके दुःखाचे माप तिच्या प्रकृतीने निश्चित करून टाकलेले असते.

‘तृप्ती नव्या इच्छेला जन्म देते. ‘संकल्पशक्ती’ (will) सदैव भुकेलीच राहात असते.  जीवनाचे खरे रूप आपल्याला कळत नाही म्हणूनच केवळ आपण जगू शकतो. आपलं चालत राहाणं म्हणजे पडण्यापासून सतत वाचत राहाणे आणि जगणं म्हणजे मृत्यु पुढे ढकलला जाणे.’

हे सर्व मननीय आहे... आता, इतक्या वर्षांनी या नोंदी वाचताना मनात आलं की एवढ्या मोठ्या पुस्तकातून आपण नेमकी काही वाक्येच का निवडत असू डायरीत नोंदवण्यासाठी? आपलं काही खोल.. आंतरिक नातं असेल का त्यातल्या आशयाशी?

.....

२.१०.२००६

बुचाच्या फुलांच्या झाडाखाली पांढर्‍या फुलांचा सडा पडलाय. काळ्या जमिनीवर हा सडा आणि मधे झाड रोवल्यासारखे... बागेत हिरवळीच्या कडेला दोन झाडं अशीच आपल्या पिवळ्या.. गुलाबी फुलांचा सडा हिरवळीवर घालून उभी आहेत.... मी अनुभवतेय ही दृश्यं डोळ्यांना सुखावणारी आणि मनात ‘The Tao of Physics’ या नुकत्याच वाचलेल्या पुस्तकातले विचार रेंगाळतायत... तेही पाहतायत या दृश्यांकडे. त्यांना प्रश्न पडलाय, स्पेस आणि टाईम यांचं वेगळं नसणं, ‘नथिंगनेस’चं असणं, एका लयीत सर्व काही गतीमान असणं... या पदार्थविज्ञानाच्या शोधाचं या फुलांशी काय, कसं असेल नातं?

......

२१.१०.२००६

‘कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेत शतं समः ....’ असं मनात घोकतेय पण प्रत्यक्षात सर्वाचा.. सगळ्याचा कंटाळा आलाय. पुरे पुरे झालंय.... ‘ज्ञान’ कळण्याच्या अतिरिक्त आनंदाचा काय उपयोग?.... की त्याचंच हे दुसरं टोक?... बाहेर उत्साहाला उधाण आलंय. फटाक्यांचे आवाज.. धूर यांनी हैराण केलंय... काही समजेनासं होण्याचं आणखी एक आवर्तन.. असो.

......

२४.१०.२००६

वाचनातून बुद्धीला कळणारं ‘ज्ञान’ आणि जगणं यांची झटापट चालू आहे. हे तसं नवीन नाही. फक्त शून्यांची संख्या वाढत चाललीय. वरच्या संख्येतली शून्यं वाढतायत आणि त्यांच्या बरोबरीनं माझ्या नकळत त्यांची ‘अँटीपार्टिकल्स' लगेचच तयार होतायत. हाती काही न उरण्याचा आणखी एक दंश..! जे जे उत्पन्न होतं ते ते त्याच्या दुसर्‍या टोकासहच उत्पन्न होत असतं हे समजूनच घ्यायला हवंय. या समजुतीचा विसर पडू नये म्हणूनच होत असतात काय असे जीवघेणे दंश पुन्हा पुन्हा? असे दंश पचवत ‘आकांत’ धगधगता ठेवणं हेच खरं जगणं काय?

***

आसावरी काकडे

No comments:

Post a Comment