Saturday 2 April 2022

माझ्या डायरीतून- २७

१५.३.२००६

‘बहु ये हे त्रिपुटी । सहजे हो तया राहटी । प्रतिक्षणी काय ठी । करीतसे ॥’ अमृतानुभव ७/१८२ भावार्थ- दृश्य द्रष्टा दर्शन, ज्ञेय ज्ञाता ज्ञान, भोग्य भोक्ता भोगणे,... अशा असंख्य त्रिपुटी, रहाटाप्रमाणे फिरणार्‍या विश्वाच्या दिनचर्येत दर क्षणाला निर्माण होतात आणि लय पावतात... त्या सगळ्याचे किती स्मरण (ठी) ठेवणार?

हे समजून घेताना मनात आलं, स्वप्न पाहताना स्वप्नातल्या सर्व गोष्टी या स्वप्न पाहणार्‍याचीच (फक्त) निर्मिती असतात. तोच पाहणारा, पाहणे आणि स्वप्न सर्व तोच असतो. दिवसा, जाग आल्यावर यातलं काहीच उरत नाही.

पण जागेपणीही तो जे जे बघतो, अनुभवतो, ते ते सर्व फक्त त्याचंच नसतं काय? ‘झाड’ भलेही वस्तुनिष्ठपणे स्वतंत्र अस्तित्वात असेल. पण माझ्या खिडकीतून, माझ्या खुर्चीवरून मला या क्षणी दिसलेलं, माझ्या नजरेच्या कॅमेर्‍यानं टिपलेलं झाड फक्त माझंच नाही काय? कोणत्याही व्यक्तीचं माझ्याशी असलेलं नातं फक्त माझंच नाही काय? कोणत्याही घटनेचा मी लावलेला अन्वयार्थ फक्त माझाच नाही काय?... माझ्या भोवती जे जे काही आहे ते ते सर्व एकप्रकारे माझीच निर्मिती...! मला एकटं अगदी निखालस एकटं राहाता येत नाही. मग मी असंख्य परीच्या सुखदुःखांची निर्मिती करत राहते. ही सर्व निर्मिती अगदी पूर्णतः वेगळ्या तर्‍हेनं करता येणं शक्य आहे...

आपल्याला जे कळतं, जाणवतं आवडतं... ते सगळं संस्कारांमुळे, सतत सांगितलं, ऐकलं गेल्यामुळे असेल का? तसं तर असंख्य गोष्टी आपल्या भोवती असतात. असंख्य प्रकारे आपल्यावर संस्कार होतात. त्यातला एखादाच विचार आपल्याला का पटतो, जवळचा वाटतो? तो आपल्या आत असतोच म्हणून?

 

तत्त्वज्ञानाचा प्रत्यक्ष जगण्यात कसा उपयोग होईल? प्रत्यक्ष जगण्यात चांगलेपणा उतरणं ही ज्ञानाची कसोटी ठरेल का? या प्रश्नाचं उत्तर हो असं देणं बरोबर- चूक म्हणण्यापेक्षा हिताचं असतं. म्हणून चांगलं जगण्याशी ज्ञानाची सांगड घालणं आवश्यक आहे. ‘तत्’चं ‘ज्ञान झालं की मोक्ष मिळतो म्हणतात. मनात आलं की असं ज्ञान झाल्यावर जगणं अवघड होत असेल. दर क्षणी विसंगतीग्रस्त व्हायला होत असणार. जगणं आणि ज्ञान सम पातळीवर राहूच शकत नाही. म्हणूनच काही जण समाधी घेता. काहींना जगण्याच्या आंतरिक संघर्षात लवकर मृत्यू येतो...

ओवीच्या निमित्तानं कुठं कुठं गेलं मन..!

......   

२०.३.२००६

भक्ती अभ्यासवर्गात ज्ञान (अंतिम सत्याचं ज्ञान) मिळवण्यासाठी श्रद्धा लागते का यावर चर्चा झाली... श्रद्धा ठेवणं म्हणजे काहीतरी गृहीत धरणं, त्यावर विश्वास ठेवणं... असा विश्वास ठेवून त्याच्या प्रत्यक्ष अनुभूतीचा ध्यास घेतला आणि तशी अनुभूती आली तरी ते खरं ज्ञान ठरेल का? की जे मानलं होतं ते पटलं एवढंच होईल? काहीही न मानता, म्हणजेच कोणतीही श्रद्धा न ठेवता कोर्‍या मनानं शोध घेत गेल्यावर जे हाती लागेल ते खरं ज्ञान असू शकेल? ते प्रत्येकाचं प्रत्येक वेळचं वेगळं  असणार...  थोडक्यात, झालेल्या चर्चेतून ज्ञानासाठी श्रद्धेची गरज नाही असं निष्पन्न झालं.

भक्ती अभ्यासवर्गात ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग, प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन सनातन निष्ठांविषयी परत परत सांगितलं जातंय. भारतीय तत्त्वज्ञानात या दोनच प्रमुख निष्ठा मानल्या गेल्या. त्यात भक्ती येत नाही. भक्तीचा विचारच कुठे येत नाही. म्हणजे श्रद्धा.. भक्तीची सुट्टीच झाली की असं वाटून गेलं...

गीतारहस्य ग्रंथात टिळकांनी लोकांना कर्मप्रवृत्त करण्यासाठी कर्ममार्गाची महती सांगितली. ज्ञानी माणसानेही कर्म केलेच पाहिजे हे सांगितलं. भक्तीचा उल्लेख केला पण कर्माच्या आड येणारी भक्ती अवैध ठरवली. शंकराचार्यांनीही कर्म, भक्ती ही चित्तशुद्धीची साधनं आहेत ती ज्ञानाची साधनं नाहीत असं सांगितलं.

......

१.४.२००६

श्रद्धा.. भक्ती विषयीचे तात्त्विक विचार आपल्या जागी... रोजच्या जगण्यात घडणारं तिचं दर्शन वेगळंच..! फिरण्याच्या वाटेवरचा एक टप्पा म्हणून नेहमीसारखी साईबाबा मंदिरात गेले होते. तिथे येणार्‍या भक्तांचा भाव बघून खूपदा गहिवरून येतं. ईश्वर या कल्पनेविषयी ‘विस्मय’भाव उमटतो. किती सर्वव्यापी कल्पना आहे ही..! तिनं कुणालाही सोडलेलं नाही. जगातल्या कुठल्याही कोपर्‍यातली कुठलीही व्यक्ती घ्या. तिच्या भावविश्वात कुठल्या ना कुठल्या प्रकारे ईश्वर असतोच. कुणालाच न दिसता, न समजता एकाच वेळी अनेकांचा असतो. कुणीही केव्हाही कुठेही त्याच्याशी संवाद करू शकतं. त्याला सर्वसाक्षी म्हणतात ते याच अर्थानं असेल.!

मंदिरात डोळे मिटून बसलेली माणसं बघते... ती काय म्हणत असतील मनात? कुणी कशी कधी पेरली ही ईश्वरकल्पना ज्याच्या त्याच्या मनात? ज्याच्यावर विश्वास ठेवावा, भिस्त ठेवावी असं ‘सदातत्पर’ प्रत्यक्षात कोण असणार? रात्री दोन वाजता जाग आली आणि अस्वस्थ, निराधार वाटलं तर ईश्वराइतकं तत्पर, इतकं जवळचं, इतकं सहज कोण येईल धीर द्यायला? अशा ईश्वराच्या कल्पनेनं भरून येतात डोळे मंदिरात जाते तेव्हा बर्‍याच वेळा. ईश्वर-कल्पनेचं कौतुक वाटतं ओतप्रोत....

डायरी-लेखन म्हणजे अनुभव-चिंतन. अनुभवाचा अनुभव घेत त्याचं शब्दांकन करणं. त्यावेळी प्रत्यक्ष अनुभवाचा सर्व तपशील कंसात टाकला जातो. त्यापासून आपण अलिप्त होतो. अतीत होतो. किंचित वर उचलले जातो. त्यावेळी चिंतन करणार्‍या ‘स्व’ला ‘साक्षी मी’ म्हणता येईल. लेखनाच्या निमित्तानं वर उचललं जाण्याची प्रक्रिया उन्नत करून दिलासा देणारी, आनंद देणारी असते.

***

आसावरी काकडे  

No comments:

Post a Comment