Friday 22 April 2022

माझ्या डायरीतून- ३२

१ ११ २००६

दापोली येथील तत्त्वज्ञान परिषदेला जाऊन आले. तीन चार दिवस खूप वेगळ्या वातावरणात गेले. परिषदेत बर्‍याच विषयांवरचे निबंध ऐकायला मिळाले. या बौद्धिक कमाईबरोबर सहलीचा आनंदही घेता आला. समुद्र, चिखली येथील रेणू-राजा दांडेकर यांची शाळा, हर्णे बंदर, मुरुड, लाटघर, केशवराज मंदिर, अंजर्ल्याचा कड्याचा गणपती.... अशा बर्‍याच ठिकाणी जाऊन आलो.  निसर्गाची लयलूट.. जाता-येता वरंदा घाटातला दीर्घ प्रवास.. गाण्याच्या भेंड्या, कविता-वाचन, गप्पा... या सगळ्यात हर्णे बंदरावरचा सनसेट पाहाणं हा क्लायमॅक्स वाटला. उत्स्फूर्तपणे म्हटल्या गेलेल्या ‘मावळत्या दिनकरा.... कहीं दूर जब दिन ढल जाएँ...’ अशा गाण्यांनी तो अनुभव अधिक उत्कट केला. एकूण रूटीनमधला बदल चांगला वाटला.... त्या दरम्यान ईशावास्य उपनिषदाचं पद्यरूपांतर करत होते. ते थोडं वाचून दाखवलं. चांगली दाद मिळाली. बरं वाटलं.

......

१५.१२.२००६

वाचन..विचार.. साहित्यिक कार्यक्रम.. घारातला राबता.. या सगळ्यात ‘ईशावास्य’ उत्कट आनंद देतं आहे. त्यातच अधिक वेळ राहावं असं वाटतंय. पण जमत नाहीए.

काल बागेत फेर्‍या मारताना ‘ईशावास्यम् इदं सर्वम्..’चा किंचित फील आला. ‘तुका म्हणे एका देहाचे अवयव’ या ओळीची आठवण झाली आणि वाटलं की लिहिण्याची क्रिया चालू असताना प्रत्यक्षात उजव्या हाताची दोन बोटं पेन धरतात. तिसरं त्या पेनाला खालून आधार देतं. तिसर्‍या बोटाला बाकीची दोन बोटं आणि पंजा यांचा ठोस आधार असतो. दुसरा हात वही/कागद धरतो. डोळे पाहतात... मार्गदर्शक असल्यासारखे. मन आशय पुरवते. आणि माहिती नसल्यामुळे नाव नसलेली क्षमता शब्द सुचवते. देहातले सर्व ‘रस’ एकमेकांशी हातमिळवणी करत सार्‍याचे संतुलन राखत लेखन-क्रिया होऊ देतात. देहात ज्यामुळे जिवंतपण आहे त्यामुळे हे सर्व शक्य होते. ईशावस्यच्या पद्य रूपांतरात एकेठिकाणी म्हटलं आहे, ‘‘ते आहे म्हणून विश्व चालतसे..’’ याचा उलगडाच झाला असं वाटून गेलं.

लिहिण्याच्या क्रियेत कागद सरकू नये म्हणून कागदावर असलेला डावा हातच नुसता पाहिला तर हाताच्या त्या स्थितीचा काही संदर्भ लागणार नाही, महत्त्व कळणार नाही. त्यासाठी संपूर्ण क्रिया लक्षात यायला हवी.... विश्वाच्या एकूण व्यापारात आपल्या नजरेला दिसणार्‍या घटना... अवस्था... अशाच एका प्रक्रियेचा भाग म्हणून आहेत तशा असतात. आपल्याला त्याचं समग्राच्या संदर्भातलं औचित्य कळणं अवघड आहे. फुलाच्या उमलण्याची गती किंवा पृथ्वीच्या दुहेरी भ्रमणाची गती आपल्याला दिसत नाही, जाणवत नाही... आकलनाचे आपल्याला पेलणारे स्केलच आपल्या मेंदूत ठोकून बसवलेले असते. त्यामुळे घटना-दृश्यांचे आंतरिक संदर्भ समग्रपणे आपल्याला कळत नाहीत. एका देहाचे अवयव असावेत तशा सर्व घटना दृश्ये विश्वात नांदत असतात..!

वृत्तपत्रात जाहीर केल्यानुसार ‘नासा’ने सोडलेले ‘डिस्कव्हरी’ यान पुण्यात काल संध्याकाळी ७.०१ ते ७.०५ दरम्यान दिसले. हजारो मैलांवरून चालणारे यान एखाद्या चांदणीसारखे दिसत होते. ही धावती चांदणी इतक्या दुरून दृष्टीच्या कक्षेत नेमकी केव्हा आणि कुठे येईल याचं गणित मांडणं आणि प्रत्यक्षात ते तसं घडणं यातल्या विस्मयाचा काल अनुभव घेतला. सूक्ष्म पार्टिकल्सच्या जगात इतकी गतिमानता, अनिश्चितता, अखंड परिवर्तन असताना लार्ज स्केलवर असा मिनिट-सेकंदांचा अंदाज वर्तवणं आणि तो बिनचुक ठरणं हे थक्क करणारं आणि अनाकलनीय आहे....

.....

१८.१२.२००६

‘स्त्री असण्याचा अर्थ’ पुस्तक प्रिंटिंगला गेलंय. कव्हर-चित्र आवडलं म्हणून मैत्रिणीकडून आणलं होतं. पण तसंच्या तसं पूर्ण स्कॅन करून प्रिंटाउट काढल्यावर छानच वाटेना. गडद.. फिकं करून पाहिलं तरी आवडेना. मग ते छोटं करून त्याला टेक्स्चर असलेल्या ग्रीन कलरची चौकट केली तेव्या कॉम्प्युटरवर तरी चांगलं दिसलं.... चौकट हाही चित्राचाच भाग असतो तर..! तो काढून टाकल्यावर उरलेलं अपुरं चित्र कसं आवडणार?

***

आसावरी काकडे

No comments:

Post a Comment