Sunday 24 April 2022

माझ्या डायरीतून- ३३

 १८.१.२००७

२००७ सालाची सुरुवात भरगच्च झाली. कार्यक्रम.. वाचन.. संकल्प जोरदार.. ‘ईशावस्य’च्या अभ्यासाला गती मिळालीय. प्रत्येक वाचनामुळे आकलनात नवी भर पडतेय. मला त्याचा अहंकार नाहीए. उलट आशयाच्या भव्यतेचं आकलन जितकं अधिक तितके जगण्यातल्या छोट्या छोट्या चुकांचे पराभवही मोठे आणि क्लेशकारक वाटतायत. पण होत असलेलं आकलन पोकळ, शाब्दिकही नाही म्हणता येणार... जगण्यात फारसं न उतरलेल्या या बौद्धिक आकलनाचं स्थान काय?

.....

६.२.२००७

नागपूरच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जाऊन आले. विविध साहित्यिक कार्यक्रमांचा आस्वाद.. साहित्यिकांच्या भेटीगाठी.. गप्पा... नोंदवावं असं बरंच काही घडलं... राम शेवाळकर यांची त्यांच्या घरी जाऊन घेतलेली भेट विशेष लक्षात राहिली. तीन मजली आलीशान घर. स्वतंत्र ग्रंथालय, अभ्यासिका, सन्मान चिन्हे..पदके..मानपत्रे..स्मृतीचिन्हे यांचा उत्तम सजावट केलेला वेगळा विभाग, खाली, वर सर्वत्र फोटोच फोटो थोरामोठ्यांबरोबरचे.. टेरेसवर गार्डन, स्विमिंग पूल, वर जाण्यासाठी लिफ्ट.. त्याच्या बाजूला ज्ञानेश्वर..तुकाराम अशी  डेकोरेटिव्ह अक्षरं.. नातीची स्वतंत्र खोली, किचन, डायनिंग हॉल दोन भागात, बाहेर झोपाळा.. मोठं आंगण.. हाताखाली नोकर-चाकर सूचनेनुसार आदबीनं काम करणारे. त्यातल्याच एकाने आम्हाला हे सर्व फिरवून दाखवलं. आल्या आल्या चहा-चिवडा.. सगळं बघून झाल्यावर पुन्हा चहा पोहे, घरचं दही.. निघताना त्यांनी आपली पाच-सहा पुस्तकं सही करून भेट दिली आणि सोडायला गाडी...!!

विद्वत्ता, साहित्यिक दबदबा, प्रत्यक्ष काम, यामुळं नागपुरात असलेलं मानाचं स्थान.. मला दिलेलं प्रोत्साहन आणि केलेलं कौतुक... हे सर्व आणि इतकं आगत्य.. याच्या जोडीला चकचकीतपणा.. प्रदर्शन.. यामुळं भांबावायला झालं. त्यांचं आतापर्यंतचं आयुष्य खडतर गेलं असेल. आता मुलानं वैभवात ठेवलंय. पण ते भोगण्याची शारीरिक कुवत नाही असं ते म्हणाले. ‘तात्विक विचार’ आणि ‘दरी’ वाढवणारं वैभव यांचा स्विकार त्यांनी कसा केला असेल? दोन्हींची सांगड कशी घातली असेल?... असंही मनात आलं वैभव असण्यात मला चूक का वाटतेय पण? ‘विचारां’ची सांगड साधेपणाशीच का असायला हवी?

कवीसंमेलनात एक बाई डायरेक्ट स्टेजवर आल्या आणि माईकचा ताबा घ्यायला लागल्या. संयोजकांनी त्यांना तिथून घालवलं. त्यांना कविता वाचायची होती. त्या पाया पडल्या. श्रोते आणि आम्ही काही कवयित्री ‘त्यांना कविता वाचूदे ना’ असं म्हणालो. पण त्यांना कविता वाचू दिली नाही. यावर वेगवेगळी मतं पडली. कार्यक्रमाची शिस्त म्हणून चिठ्ठी पाठवून नाही म्हटल्यावर गप्प राहणार्‍यांना डावलून असं घुसून येणार्‍यांना का संधी द्यायची? असं एक मत. नाही म्हणताना अधिक सुसंस्कृत पद्धतीनं ते म्हणता आलं असतं... ही कसली संवेदनशीलता? असं एक...

स्त्रीला व्यक्त होऊद्या असं कवितेतून मांडलं जातं. प्रत्यक्षात बोलायला आलेल्या स्त्रीला घालवून दिलं जातं..! अशा पेचात्मक विरोधांचं काय करायचं?

सर्व कार्यक्रम आटोपून परतीच्या प्रवासाला निघालो... गाडी येईपर्यंत वेटिंगरुममधे बसलो होतो. शेजारी एक बाई एक इंग्रजी पुस्तक घेऊन बसली होती. सहज बोलायला गेले तर उद्‍गारांची गरज असल्यासारखी ती बोलतच राहिली. अमरावतीहून लखनऊला चालली होती. नवरा-मुलांना सोडून... ‘मी दारात बसून राहाते. उन्हात.. मुलं हुशार आहेत लहान आहेत. पण ती मला मारतात.... नवर्‍यानं दागिने काढून घेतले...’ असं काय काय पुन्हा पुन्हा सांगत राहिली. मी ‘सई’ कवितासंग्रह वाचत होते. ती हिंदीभाषी होती. तरी बहुधा तिला जाणवलं की ते काहीतरी तिच्यासाठी आहे. तिनं हातातलं पुस्तक बाजूला ठेवून हे मागून घेतलं. पुस्तकांतल्या रेखाटनांवरून, थोडं वाचून तिला काही कळत होतं. त्यातून तिला दिला दिलासा मिळत होता. ती बोलत होती. मी ऐकत होते आणि टाळतही होते. आपणहोऊन काही विचारायला गेले नाही. समोर एक गुजराती फॅमिली होती. हातांवर पूर्ण मेंदी काढलेल्या बाया.. त्यांच्याकडे बघून ही विचलित होत होती. सारखं बोलत होती. पण डोळे कोरडे होते. कुणीतरी एक मुलगा बरोबर होता. तो कोण असं विचारलं तर म्हणाली अटेंडंट आहे. तो तिला चहा आणून देत होता. सामान आणत होता... तिची व्यथा मला कळली नाही. मी कळवून घेतली नाही. समजलं तेवढ्यावरूनच काहीतरी विचार करत राहिले....

ही अलिप्त संवेदनशीलता सलत राहिली तिच्या आठवणीबरोबर...

***

आसावरी काकडे

No comments:

Post a Comment