Thursday 17 March 2022

माझ्या डायरीतून- २२

३.८.२००५

बाहेर पुरामुळे इतका हाहाकार उडालाय तरी मी माझ्या स्वस्थपणात व्यत्यय येतोय एवढ्यानंही चिडचिड करतेयच कशी? प्राजक्ताची पडलेली फुलं ओलांडून जाताना त्याना उचलून घेतलं नाही तर वाईट वाटत असेल असं वाटून माघारी वळून फुलं वेचणारी माझी संवेदनशीलता कुठे गेली? 

कॉलनीत एक कुत्री व्यालीय आणि तिची सात पिल्लं सगळ्या संकटांना तोंड देत उघड्यावरच्या कुठल्यातरी आडोशाला तग धरून मोठी होतायत. आता चालायला लागलीत आणि कॉलनीभर फिरतायत. छान हवेत फेर्‍या मारताना त्यांचा अडथळा होतो त्रासायला होतंय. इतकं की त्यांना हाकलून लावतेय आणि ती जात नाहीएत म्हणून राग येतोय... त्यांना म्युनिसिपालटीनं किंवा कुणीही इथून घेऊन जावं असं वाटतंय. या अनावर रागाकडे पाहताना वाटतंय कुठे आहे माझी संवेदनशीलता? 

फुटपाथच्या आतल्या बाजूला लोकं झोपड्या करून राहायला लागलीयत नव्यानं. जाता येता त्या झोपड्या डोळ्यांना खुपतायत. त्यांना वेळीच उठवायला हवंय. तेही दुसर्‍या कुणीतरी... असं वाटताना त्यांच्या त्रासाचा विचारही येत नाहीए. ती जगतायतच कशाला असा उर्मट, अघोरी विचार डोकावून जातोय... असं, इतकं त्रासताना कुठं जाते संवेदनशीलता?

रजनीश वाचतेय... त्यातले विचार पुरात बेघर होणार्‍यांना, पुरात अडकलेल्यांना कसे तारणार?... सर्व काही स्वस्थ, स्थिर, शांत असताना तात्विक विचारांनी भारावून जाणं... गहिवरून येणं.. उन्नत वगैरे झाल्यासारखं वाटणं किती निरर्थक, पोकळ आहे..! आपण आपल्या त्वचेच्या बंधनातून बाहेर पडूच शकत नाही? ते कसलं ज्ञान जे बाहेर पडायला उपयोगी पडत नाही. अशा मानसिकतेत एक कविता लिहिली होती. त्यातल्या ‘कधी कधी अनावर होतो आपण आपल्याला मावत नाही त्वचेच्या झोळीत. सांडत राहातो बाहेर वेडेवाकडे...’ याचा अनुभव घेतेय परत... रजनीश, किर्केगार्ड, उपनिषदांनो मला आवरा. मला भीती वाटतेय माझी. या आवेगांना दिशा दाखवा.... Help me in making a virtue out of this suffering..!

......



२६.८.२००५

रजनीश वाचत असताना ‘वर्तमानात जगणे’ या मुद्द्यावर डोक्यात समांतरपणे विचार चालू झाले. जाणवलं की विषय मिळून मूर्त झालेली जाणीव हाही जाणिवेचा विषय होतो. संतत धारेसारखे जाणिवेला विषय मिळत राहतात. एक विषय मिळून मूर्त झालेली जाणीव स्मृतीकक्षात जाते. त्याची एक साखळीच तयार होत राहाते. नवा विषय मिळण्यापूर्वीची कोरी जाणीव (नदीच्या पात्रासारखी... अखंड प्रवाह अनुभवणारी) आपल्या कोरेपणाचा अनुभव घेई घेई पर्यंत तिला नवा विषय मिळतो. एक विषय विंगेत जाऊन दुसरा तिला लटकण्यापूर्वीचा सूक्ष्म काळ तो (म्हणे) मध्यसंधी.... यावेळी जाणीव सजग असेल तर ती हा क्षण जाणू शकते.... ‘विषय’ झालेली ‘मूर्त’ जाणीव ती प्रकृतीचा भाग... भोक्ता. आणि हा भोक्ता हाच जिचा विषय होतो ती साक्षी... सावध अशा मध्यसंधीकालात या दोन्ही एक होतात... असं खूपदा अनुभवलंय खरं म्हणजे. त्याचं आज शब्दांकन करता आलं. या अशा आकलनाचं ‘साधने’च्या संदर्भात स्थान काय?

भोक्ता मी आणि साक्षी मी यांचं नातं तपासून पाहावं असं काल मनात येऊन गेलं होतं. ते लक्षातही नव्हतं. पण आज वाचता वाचता अचानक असा उलगडा झाला. जणु काही माझ्या अपरोक्ष.. म्हणजे ‘प्रकृती मी’च्या नकळत... ‘साक्षी मी’च्या समोर..!

......

४.९.२००५

जगणं म्हणजे भोवतालाला दिलेल्या सततच्या प्रतिक्रिया. त्या असंख्य शारीरिक, मानसिक, बौद्धिक प्रक्रियांमधून व्यक्त होतात. ही समग्र प्रक्रिया अनंत भूतकालाशी जोडलेली आहे.... काल रात्री बाहेर संतत धार पाऊस आणि मनात विचलित करणारी भीती ही स्थिती ‘पाहात’ झोपले होते. तेव्हा किंचित काळ साक्षी मी’च्या जवळ जाता आलं. वाटलं माझं अस्तित्व म्हणजे शरीर+मन+बुद्धी यानी बनलेली एक संरचना आहे. एक कॉम्बिनेशन आहे. असंख्यातलं एक. त्यावर ‘आसावरी’ हे लेबल चिकटवलंय. ते इतकं पक्क चिकटलंय की तेही ‘संरचनेचा’ भाग झालंय. क्षणभर कल्पनेत हे नाव वजा करून पाहिलं. नावाशी जोडलेली मी-माझेपणाची नाळ कापणं अवघड तर आहेच पण कापल्यावर जगणं किती अवघड आहे असं वाटून गेलं. रेडिओवर चालू असलेल्या एका गाण्याची ओळ मनातल्या समग्र गोंगाटाला पार करून आतपर्यंत येऊन मला सुखावून गेली. तो क्षण पकडून ठेवावासा वाटला. ‘नाळ’ तोडल्यावर या सर्व लौकिक व्यवहाराचं काय होईल? दुभंगलेपण येईल की काय असं काहीतरी वाटून अस्वस्थ व्हायला झालं..... काल एक Atlas आणलाय. त्यात पृथ्वीची माहिती आहे. नकाशा आहे. यात संपूर्ण विश्वातील पृथ्वीचं स्थान आणि आकार दाखवलाय. तो डोळ्यासमोर आला. त्यात मला माझ्या अस्तित्वाचा कण दिसला नाही..!

***

आसावरी काकडे

No comments:

Post a Comment