Sunday 8 May 2022

माझ्या डायरीतून- ३७

१६.७.२००७

‘अहं’चं विश्वात्मकतेत विसर्जन करायचं तर ‘अहं’ म्हणजे काय, कोण हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. ते समजून घेणं ही प्रक्रिया विसर्जनाच्या दिशेनंच जाणारी असू शकेल... ‘अहं’चे स्वरूप समजल्यावर ते या विराटाचाच अविभाज्य भाग आहे असं कळेल. मग विसर्जन ही क्रिया वेगळी राहणारच नाही..!

पण अस्तित्ववादी तत्त्वज्ञ सार्त्र वेगळंच काही सांगताहेत. त्यांच्या मते माणसाला जाणीव असल्यामुळे माणसाचा अहं- सेल्फ वस्तूविश्वाहून वेगळा आहे. वस्तू, वनस्पती, प्राणी... सगळ्यांनी भरलेल्या विश्वाचा अविभाज्य भाग नाही. हे वेगळेपण समजून घ्यायचं म्हणजे जन्मानं दिलेल्या वेगळ्या सेल्फचं, देहातल्या ‘मी’चं स्वरूप समजून घ्यायचं...

आध्यात्मिक ‘विसर्जन’ या संकल्पनेत देहात राहून देहातीत होणं अभिप्रेत आहे... या देहातल्या ‘मी’चं देहात असतानाच काय ते करायचं आहे.

‘ईशावास्य’च्या स्पष्टीकरणात हे सर्व कसं सामावून घ्यायचं? ‘मी- सेल्फ’च्या ‘वेगळं’ असण्या-नसण्याची सांगड कशी घालायची?

.......

२३.८.२००७

हैदराबाद-पुणे विमान-प्रवासात... ढगांचे प्रचंड पुंजके.. आकाश, त्यातले रंग.. क्षितिज.. सूर्यकिरणांमुळे चमकणारे ढग... त्यांच्या थरांमधून मधेच पृथ्वीवरचे रस्ते, शेतं, घरं.. यांचं दूरदर्शन...! आकाश अगदी हाताशी असल्याइतकं जवळ, ढग त्याच्या खाली आणि त्यांच्या खाली भूतल... या हाताशी असणार्‍या आकाशाच्या वर आणखी एक, तितकंच दूर असलेलं आकाश... एकाच दृष्टीक्षेपात तीन पातळ्या दिसत होत्या. भूतल, हाताशी आलेलं आकाश आणि वरचं/दूरचं नेहमीचं अप्राप्य आकाश... मी खालच्या पातळीपासून खूप वर गेले होते, त्या ‘उंची’चं सौंदर्य, आनंद अनुभवत होते. आणि ‘ते’ आकाश कितीतरी दूरच होतं...! विमान प्रवास नेहमी असं भारावून टाकतो. पण ते भारावलेपण टिकत नाही घरी पोचेपर्यंत सुद्धा..!

.....

१५.९.२००७

दादरला मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात टेकायला होईल, फ्रेश होता येईल म्हणून रूम बुक केली होती. त्याचा उपयोग झालाही.. नाहीही. फ्रेश झालेलं रूममधून खाली उतरेपर्यंतही टिकलं नाही. दादरहून ४५ नंबरच्या मंत्रालय बसनं चर्चगेटला पोचेपर्यंतचा एक प्रवासच झाला. बसमधून झालेलं ‘मुंबईदर्शन’ अवाक् करणारं होतं. गर्दी तर खूपदा अनुभवाला येते. वाहणारी माणसं दिसतात. पण काल बसमधून जाताना लागलेली दोन मजली(?) घरांची रांग पाहताना डोळ्यांवर विश्वासच बसेना. कच्च्या भिंतींच्या छोट्या छोट्या खोल्या आणि त्यावर माळा असावा तसा दुसरा मजला. त्यात ताठ बसताही येणार नाही इतक्या कमी उंचीचा. वर जायला शिड्या... खालच्या खोलीत, वरच्या जागेत, शिड्यांवर.. नजर पडेल तिथं उघडीवाघडी काळी हडकुळी माणसं.. लहान मुलं.. रस्त्यातही फुटपाथवर जागोजागी उघडी मळलेली माणसं झोपलेली डाराडूर... मधल्या आयलंडच्या जागी पार्क केलेल्या मोटरसायकलींवरही माणसं झोपलेली भर उन्हात भर वाहतुकीत... हे सगळं मी प्रत्यक्ष पाहात होते. अनाकलनीय, असंबद्ध उलगडणारं स्वप्न नव्हतं ते..! बसमधे विविधरंगी लोक चढत उतरत होते.. कंडक्टर भराभर पुढे मागे होत तिकिटं देत होता. भेंडीबाजार... इत्यादी स्टॉप येत होते मागे पडत होते. सगळ्याला एक गती होती. लय होती. केव्हाही काहीही होईल अशी मनाची तयारी असलेली स्वस्थता होती त्या धावत्या गर्दीला.... प्रत्येक माणूस, इमारती, दुकानं, रस्ते.. सगळंच वापरून वापरून जुनं, मोडकळीला आल्यासारखं.... जागोजाग मोठमोठी होर्डींग्ज राज्यकर्त्यांच्या हसर्‍या चेहर्‍यांची. कुठेही कशीही सांडलेली... वाहणारी त्यांची जनता.. तिनं काय करावं या चेहर्‍यांचं? त्यांनी काय करावं या अनावर, बेढभ जनतेचं? प्रत्येक प्रश्नापुढचा हतबलतेचा पूर्णविराम सगळ्यांनी स्वीकारलेला..!

......

१६.९. २००७

‘मुंबईदर्शन’ अजून कुरतडतंय.... यानं मी खरंच अस्वस्थ झालीय की असाही अनुभव मिळाला हे जमा बाजूत जमा करून घेऊन चक्क छान वाटून घेतीय? छान ग्रेट वाटण्याच्या शामियान्यात असुरक्षित वाटण्याच्या पताका फडफडत असतात आणि दुःख क्लेष त्रास होण्याच्या क्षणांना देणं चुकतं झाल्याच्या समाधानाची चमक असते का?

****

आसावरी काकडे

No comments:

Post a Comment