Friday 6 May 2022

माझ्या डायरीतून- ३६

 २९.४.२००७

ईशावास्य उपनिषदाचा अभ्यास चालू आहे. या उपनिषदांवरील भाष्यांवर अवलंबून न राहता थेट संस्कृतमधूनच समजून घेते आहे. वैदिक संस्कृत व्याकरण हाच अभ्यास-विषय असलेल्या भाग्यलता पाटसकर यांच्याकडून एकेक मंत्र शिकते आहे. त्या एकेका शब्दाची व्युत्पत्ती सांगत अर्थ समजावत आहेत. यातून होणार्‍या सूक्ष्म आकलनाचा थरार अनुभवते आहे. हे शिकत असताना संस्कृत भाषेविषयीही काही खोलातले उमगत आहे....

संस्कृत भाषेतली बहुतेक सर्व नामं ही क्रियापदाची साधित रूपं आहेत. किंवा सामासिक रूपं आहेत. (उदा. ईश् = ‘असणे’ चे ईश्वर = असण्याची क्रिया करणारा हे नाम, जग = जन्माला येऊन गमन करणारे ते जग) क्रियापदं गतीची / स्थित्यंतराची निर्देशक.. त्यापासून नामं बनतात. शक्ती आणि वस्तूमान (एनर्जी आणि मॅटर) यात जो संबंध तोच क्रियापद आणि नाम यात आहे. ‘क्षेत्र’ (फील्ड) साकळून ‘कण’ (पार्टिकल) बनतात तशी क्रियापदापासून नामं बनतात. वैश्विक प्रक्रियेशी संस्कृत भाषा अशी निगडित आहे..!

......

९.७.२००७

अरुण गद्रे यांचं ‘भावपेशी’ हे पुस्तक वाचते आहे.- पेशीचे तीन भाग- पेशीकेंद्र- डीएनएच्या प्रथिनांनी बनलेलं, पेशीद्रव- यात जिवंत ठेवणारी यंत्रणा असते, पेशीभिंत- बाह्य जगापासून स्वतंत्र अस्तित्व देणारी. या मूळ पेशीचे विभाजन होत होत अब्जावधी पेशींमुळे एकेक अवयव बनत माणूस तयार होतो. आणि तो ‘पूर्ण’ झाला की त्याच्यात ‘पूर्ण’ माणूस तयार करणारी, माणसाचा सारांश असलेली बीजं तयार होतात. स्त्री-पुरुष बीजांच्या संयोगातून माणूस तयार होतो. ‘भावपेशी’ मधली ही माहिती तशी नवीन नाही. तरी ‘पेशीभिंत’ आणि ‘माणसाचा सारांश असलेलं बीज’ या कल्पना थ्रिलींग वाटल्या. अब्जावधी पेशींच्या सर्व क्षमतांचा सारांश असलेली असंख्य बीजं माणसात तयार होतात.. कुठल्या पेशींनी हात व्हायचं, कुठेल्या पेशींनी हृदय व्हायचं.. इत्यादी डीएनएच्या अज्ञावलीतून ठरतं म्हणे....

हे वाचून मनात आलं, अशा असंख्य आश्चर्यांना अंगाखांद्यावर खेळवत आपण वावरत असतो... धावत असतो एखाद्या रेलवेसारखे... तिच्या आत आणि बाहेर असतात अशी असंख्य आश्चर्ये..! आणि सगळ्यात मोठं आश्चर्य हे की आपल्याला यातलं काहीही समजलं नाही तरी हा खेळ निर्वेध चालू असतो.

......

१५.७.२००७

काल बागेत बाकावर बसले होते. तेव्हा आकाशात भिरभिरणारं एक पाखरू दिसलं... (ईशावास्य उपनिषदाचा अभ्यास सतत मनात घोळत असल्यामुळे) वाटलं ‘ईशत्व’ बरोबर घेऊन किती सहज मजेत भिरभिरतंय ते.... न आकाशाच्या असीमपणाची धास्ती न ईशत्वाच्या आशयाची चिंता...! एक कविताच दिसली त्याच्या रूपात...

आज वाटलं ते पाखरू आपल्यातल्या ईशत्वाशी खेळतंय ते अजाणतेपणी. जाणतेपणानं, जाणीवेचा विषय करून ईशत्वाशी खेळणं म्हणजे भक्ती.... ईश हा जाणीवेचा विषय होण्याच्या अनुभवाचा अनुभव घेत राहणं म्हणजे भक्ती... या सततच्या अनुभूतीचंच वर्णन संत तुकारामांनी ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती / चालविसी हाती धरोनिया’ असं केलं असेल. आपण असतो त्या प्रत्येक क्षणाला आपलं ईशत्व (म्हणजे असणेपण) आपल्यात असतंच. त्याची जाणीव जागी होते तेव्हा त्याची सोबत असल्याचा आनंद होतो...

विषयाचा नुसता अनुभव येऊन चालत नाही त्या अनुभवात आपण उपस्थित असावं लागतं..!

**

आसावरी काकडे

No comments:

Post a Comment