Sunday 1 May 2022

माझ्या डायरीतून- ३५

२१.३.२००७

मुंबई-नागपूर-मुंबई विमान-प्रवासात दोन्ही वेळा खिडकीजवळ जागा मिळाली. इतक्या खूप उंचीवरून खाली बघताना टोलेजंग इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या, वाहनं काडेपेटी एवढी दिसत होती. विमान आणखी उंच गेलं तसं त्रिमिती चित्र सपाट होत गेलं. भल्या मोठ्या कॅनव्हासवर अमूर्त शैलीत केलेल्या पेंटिंगसारखे लहान मोठे चौकोन... लांब लांब रस्ते.. जलप्रदेशाचे पट्टे.. मग पुढे पर्वतरांगा... खालून वर पाहताना उंच दिसतात. त्याच्या विरुद्ध वरून खाली पाहताना बुटक्या दिसत होत्या. पर्वत उंच असतात की बुटके? आपण कुठे आहोत त्यावर याचं उत्तर ठरेल... माणसं.. घटनाही अशाच आपण ‘असतो’ त्यानुसार ‘दिसतात’...

अशा प्रवासाची सवय नसल्यामुळे आकाशातून जातानाचा अनुभव भरभरून घ्यावासा वाटत होता.... मधे काही काळ तर विमान इतक्या उंचीवर होते की खालचं काहीच दिसत नव्हतं. नजर पोचेल तिथपर्यंत आकाशच आकाश एकच एक स्थिर असं. त्या दृश्याच्या पुढून प्रचंड वेगाने जातानाही बाहेरचं दृश्य तेच राहिल्यामुळे विमानही स्थिरच आहे असं वाटत होतं. गतीचा अनुभव बाहेरचं दृश्य वेगात बदलण्यामुळे येतो. दृश्य स्थिर तर धावणारे आपणही स्थिरच वाटतो. प्रचंड वेगात जात असूनही तो वेग आपल्यात मुरल्यामुळे जाणवत नाही... पृथ्वीवर तिच्या दुहेरी भ्रमणाचा वेग मुरवून आपण स्थिरच असतो की..! आपल्या आतल्या शारीर स्थित्यंतराची गती तरी कुठे जाणवते आपल्याला?

विमानप्रवासानी दिलेल्या या अद्‍भुत अनुभवापुढे ज्यासाठी गेले होते तिथले अपेक्षाभंग आणि दुखावणारे अनुभव छोटेसेच वाटले. मूड गेला. कंटाळा आला तरी त्रासले नाही. आतपर्यंत दुखले नाही. शांत राहता आलं आणि घरी परतल्यावर बरंच काही मिळवून आल्यासारखं वाटलं..!

......

१८.४.२००७

कुंडीत एक कळी आली होती. ती काल उमलली. तिला ऊन लागेल म्हणून कुंडी उचलून सावलीत ठेवताना धक्क्यानं फूल गळून पडलं. वाईट वाटलं.. उचलून घेतलं. वाटलं देवाला घालावं. पण मग वाटलं त्याचा वास घेता येणार नाही. आणि असं त्याचा आस्वाद न घेताच देऊन टाकायचं... बरोबर वाटेना. खरंतर त्याचा आस्वाद घेणं, तो जाणवणं हाच पूजाविधी नाही काय? हा आस्वाद ‘मी’ घेणं यात ‘मी’ म्हणजे जाणिवेचं एक रूप... फुलाला जिवंत आस्वादाची दाद मिळाली तर ते अधिक सुखावेल ना?

......

२५.४.२००७

भाचीच्या साखरपुड्याला कोल्हापूरला जाऊन आले. भावाशी गप्पा झाल्या. त्यात त्याला पडलेले प्रश्न विचार करण्यासारखे वाटले. विचार कुठून येतात? आणि आनंदानं मोहरून यावं असं बरंच काही घडत असूनही तितकं मोहरता का येत नाही?

परतीच्या प्रवासात नकळत त्यावर विचार झाला.... विचार म्हणजे काय? त्याचं द्रव्य कोणतं? हे लक्षात घेतलं तर ते कुठून येतात ते समजू शकेल. मला वाटतं विचार म्हणजे वाटण्याचं, जाणवण्याचं शब्दांकन... भलेही ते मनातल्या मनात असेल. अमूर्त रूपात काहीतरी वाटतं/ जाणवतं ते शब्दांकनामुळं विचाररूपात व्यक्त होतं....

अमूर्त रूपात जे वाटतं/ जाणवतं ते म्हणजे आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या रासायनिक द्रव्यांच्या विशिष्ट प्रमाणात एकत्र येण्यातून निर्माण होणार्‍या क्रिया-प्रतिक्रिया..! विचार जर असे शरीरातल्या रासायनिक प्रक्रियेतून निर्माण होत असतील तर ते बदलणं शक्य आहे.. ! त्यासाठी आहार नियंत्रण, यम-नियम-प्राणायाम इत्यादी मार्ग सतत सांगितले जातात. ते करणं हातात आहे. पण विचार बदलावेसे वाटणं, हे ‘वाटणं’ टिकून राहाणं, आणि त्याचा तीव्र इच्छाशक्तीनिशी पाठपुरावा केला जाणं हे अधिक अवघड आहे..! त्यासाठी तर वाचन-मनन.. स्व-संवाद करणारं डायरीलेखन..!

**

आसावरी काकडे

2 comments:

  1. तुमचा पूजाविधी फारच भावला मनाला!
    विमान प्रवास वर्णन फारच सुंदर अणि एक वेगळा दृष्टीकोन देणारे आहे!!

    ReplyDelete
  2. धन्यवाद आनंदी..

    ReplyDelete