Monday 16 May 2022

माझ्या डायरीतून- ३९

२९.९.२००७

ईशावास्यच्या पहिल्या मंत्राच्या पहिल्या ओळीत आहे विश्वाचं तत्त्वज्ञान आणि दुसर्‍याच ओळीत आता-इथं जगण्याचं भान..! मी पहिल्या ओळीच्या आशयाच्या भव्यतेत हरवत होते. ‘भिन्न’च्या निमित्तानं अंतर्मुख होऊन विचार करताना दुसर्‍या ओळीनं लक्ष वेधून घेतलं... मग एकूण तत्त्वज्ञान आणि दैनंदिन जगण्यातलं वास्तव यांची सांगड समजून घ्यायचा प्रयत्न झाला...

भोवतीचं क्लेशकारक वास्तव बदलायचं तर समजून घ्यावे लागतात सर्व आयाम ज्यामुळे ते घडतंय. ते समजून घेण्यासाठी केंद्रात शिरून मग परीघावर यावं लागतं. जरा दूर गेल्याशिवाय मावत नाही पूर्ण दृश्य छायाचित्रात. फोटोग्राफरला व्हावं लगतं अलग दृश्यापासून...

जरा बाजूला होऊन विचार केला की कळतात कारणं. पण ती कारणं सामान्य नजरेला दिसतात तशी, तेवढीच नसतात. त्या कारणांमागे गुंता वाढवणार्‍या कारणांची रांगच उभी असते. उदा. एड्स का? एक.. दोन.. तीन कारणं.. ती कळूनही का टाळली जात नाहीत? तर अज्ञान, बेपर्वाई, असंयम, अगतिकता, वखवख... या गोष्टी का? तर दारिद्र्य.. मणूस असण्याचं भान नसणं.. हे का तर वाढती लोकसंख्या.. हे का? पुन्हा पुन्हा असं पतन का? तर ‘निर्मिती’ची योजनाच तशी असेल..?

प्रत्येक समस्येच्या कारणांच्या मागे मागे जात राहिलं तर असे बरेच प्रश्न पडतात. मुळात हे सगळं इथं का आहे? काय स्वरूप आहे या असण्याचं? ज्यांना हे प्रश्न पडतात अगदी आतून, खूप आतून अस्वस्थ करतात ते जगण्याच्या भर माध्यान्हीतून एकेक प्रहर ओलांडत मौनाच्या गाढ निरभ्र अंधारात बसतात तप करत अस्वस्थतेचा स्फोट होईपर्यंत. तेव्हा त्यांच्या प्रज्ञेला ‘मा निषाद...’ सारखा टाहो फुटतो. आणि दाह शमल्यावर उमटतात ईशावास्यचे मंत्र जे उत्तर देत नाहीत इथे-आत्ताच्या प्रश्नांना. ते राहतात खूप दूर शिखरावर... पण म्हणूनच ते सार्वकालिक आणि सार्वत्रिक होऊ शकतात.. नेहमी समकालीन ठरतात. त्यातल्या शब्दांचं डीकोडींग करत करत प्रत्येकाला मिळवता येते आपापल्या ‘क्ष’ची किंमत. आपल्या काळाला अनुरूप असलेली...!

तत्त्वज्ञानाचे आदर्श अवघड असतात नेहमीच. अप्राप्य असतात. पराभव करणारे.. बिथरवणारे असतात खूपदा. तरी आवश्यक असतो त्यांचा उच्चार... त्यांचे प्रतिध्वनी निनादत राहणं अवती-भोवती आवश्यक असतं. कधी कुणाला कसा दिलासा मिळेल... आधार मिळेल कोसळत्या क्षणी काय सांगता येतं?

......

१.११.२००७

गोवा ट्रीप भरगच्च कार्यक्रमांची.. प्रोत्साहित करणारी झाली. सर्व कार्यक्रम पार पडल्यावर स्कुटर घेऊन फिरायला गेलो. दोना पावला, मीरामार, बामणोली, काकरा, कलंगुट.. इथं मनसोक्त समुद्र अनुभवला. काकरा बीच काकरा खेड्याला लागून. अगदी लहान. तिथे मच्छीमार त्यांची कामं करत होते. अखंड रोरावत लाटा उसळवून किनार्‍याशी धावणार्‍या, लक्ष वेधून घेणार्‍या समुद्राचं त्यांना कौतुक नव्हतं. अंगणात खेळत असलेल्या मुलांकडे कामात असलेल्या आईचं जसं जेवढं लक्ष असेल तसं.. तेवढंच लक्ष मच्छीमार आणि समुद्र यांच्यात होतं असं वाटलं. प्रत्यक्ष जगण्याहून काहीच मोठं नसतं.. समुद्र सुद्धा..!

मिळून सार्‍याजणीची प्रतिनिधी उज्ज्वला आचरेकर कडे जमलो होतो. गप्पा झाल्या. तिथं आलेली डॉ. नीलप्रभा तेलंग तिच्याकडे आलेल्या केसेसबद्दल सांगत होती... नवरा नंपूसक म्हणून घरातल्यांच्या संमतीनं दीरापासून मूल होऊ देणारी, काही वर्षांनी पाळी चुकली म्हणून भांबावलेली स्त्री,  बालविधवा असून इतकी वर्षे कुणाशी (रांडांशीही) संबंध न ठेवलेली, ते अभिमानानं.. आवर्जून सांगणारी प्रौढ स्त्री.... असं आणखी काय काय... ज्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असेल, ज्यांची सर्व क्षमता त्यासाठीच खर्ची पडत असेल त्यांना नीतीमान असण्याची, त्यावर चर्चा करण्याची चैन परवडत नाही..

अंतर्मुख होऊन विचार करायला लावणार्‍या या दोन आठवणी..!

***

आसावरी काकडे

No comments:

Post a Comment