Sunday 3 July 2022

माझ्या डायरीतून- ५७

११.४.२०१३

आज पाडवा. नव्या वर्षाची सुरुवात. मनातला संकल्प इथं नोंदवण्याचा दिवस..! वेळोवेळी पडणार्‍या प्रश्नांच्या निमित्तानं अभ्यास, विचार केला. त्यातून उमगलेलं वेगवेगळ्या तर्‍हेनं शब्दबद्ध झालंय... ते शहाणपण, ‘ज्ञान’ आत्मसात करणं म्हणजे ‘भक्ती’ असं समजून घेत असा ‘भक्तीमार्ग’ स्वीकारायचा संकल्प आज करते आहे...

डॉक्टरी उपचारांच्या चक्रात सापडले आहे. माझ्या बरोबर सगळी आहेत. ‘जत्रे’तल्या भव्य चक्रात बसण्याचं तिकीट काढून आत पाय ठेवलाय.... भीती ओलांडून हसत खेळत मजेत चक्र वर गेलंय.... आता त्याच उमेदीनं पुढचा प्रवास पार पाडण्याचाही एक संकल्प... कोणताही विकल्प मनात न आणता, हात-पाय न गाळता, न घाबरता, स्वतःला.. डॉक्टरांना, उपचारांना, भोवतीच्या सर्व सुहृदांना पूर्ण सहकार्य देत... डॉ.नी आखलेला ‘आठ केमो, २९ रेडीएशन, नंतर औषधं..’ हा कोर्स पूर्ण करायचा.. बिनबोभाट..!

......

२७.४.२०१३

ऑपरेशन नंतर ड्रेन होत राहणारा स्त्राव (fluid) ड्रेन ट्यूब बसवून काढला जात होता. ती ट्यूब काढल्यावर तो आतच जमायला लागला. दोनदा सिरींजनं काढून टाकला होता. आता पुन्हा जमलाय.. डॉ. कसबेकरांना कळवलं. ते म्हणाले सोमवारी या. सारखं सारखं सुई लावणं योग्य नाही. काही दुखत नाहीए. पण भीतीनं अस्वस्थ केलंय. सोमवारपर्यंत धीर धरवत नाहीए. सारखं तिकडे लक्ष वेधतंय. ‘होण्यावर’ सोपवण्याच्या प्रक्रियेत मी अज्ञ लुडबुड करू नये असं स्वतःला समजावतेय. पण जमत नाहीए... डॉ.नी सांगितलंय त्या अर्थी त्यांना अंदाज असेलच ना की आठवड्याभरात किती जमू शकेल... तो आत राहिला तरी चालणार असेल.. मी त्यांचं का ऐकत नाहीए?..

ही गोष्ट इतकी त्रासण्यासारखी नाहीए खरंतर... आजारातच पाय रोऊन उभं राहायचं आणि चालता येत नाही म्हणून कुथायचं... हे बरं नाही. तिकडे दुर्लक्ष करून या आजारानंतर अंतर्बाह्य बदललेलं माझं नवं रूप पाहायची उत्सुकता मी ठेवायला हवी.... खरंच कशी दिसेन मी नव्या उगवलेल्या केसांमधे? कसे असतील ते? काळे? कुरळे? पिकलेले तरी सुंदर.. रेशमी? आतून किती बदललेली असेन मी?

पूर्ण निष्पर्ण झालेलं झाड पुन्हा नखशिखांत बहरतं तेव्हा फक्त पानंच नवी उगवलेली असतात की आतही होते पुनर्मांडणी?

.......

२९.४.२०१३

स्वतःला इतकं समजावूनही काल नाराज होण्यात, काळजी करण्यात, रडण्यात.. दिवस घालवला.... पूर्ण निष्पर्ण होऊन पुन्हा उगवताना आत पुनर्मांडणी होते का या प्रश्नाचं उत्तरच मिळालं जणू... काही करा आंतरिक परिवर्तन होणं मुष्कीलच दिसतंय...!

रडू रडू झालेल्या मनाला दीर्घ वाटावी अशी वाट पाहिल्यानंतर तो सोमवार आला. डॉ. कसबेकरांकडे संध्याकाळी जायचं होतं ‘भरलेला स्त्राव’ काढून घेण्यासाठी. त्यांना तसा sms केला तर त्यांचा फोन आला की आताच या देशमुख हॉस्पिटलमधे म्हणजे तुम्हाला संध्याकाळपर्यंत वाट पाहायला नको... फोन आल्यावर हुश्श झालं. काही आवरलेलं नव्हतं. तरी येते म्हणून सांगितलं. आर्ध्या तासात आवरून गेलो. डॉ.नी लगेच आत या म्हटलं. गेले. तपासलं. म्हणाले फ्लुइड जमलेलंच नाहीय..!!

अरे.. असं कसं.. आश्चर्य वाटलं. विश्वासच बसेना... भानावर आल्यावर स्वतःच्या काळजी करत आठवडाभर सगळ्यातून लक्ष उडण्याइतकं अस्वस्थ होण्याचं हसू आलं. लाज वाटली...!

जरावेळ बसले. डॉ. देशमुख मला ओळखतात, माझ्या कविता वाचल्यायत... इत्यादी बोलणं झालं. ते आणि कसबेकर नुकतंच ऑपरेशन करून आले होते. त्यांना ‘केमोपोर्ट’बद्दल (केमोसाठी सलाइन देताना सुई सहज लावता येण्याची सुविधा..) विचारलं. त्यांनी बसवून घ्यायला सांगितलं. आजची ‘मिटिंग’ अनपेक्षित झाली. अचानक. संध्याकाळऐवजी सकाळीच. मी काळजीच्या / त्रासण्याच्या ‘शिखरा’वर असताना डॉ.चा फोन आल्यावर भावूक व्हायला झालं. आपल्या मनातलं डॉ.ना कळलं वगैरे वाटलं...

आठवडाभर या गोष्टीचा विचार, काळजी करण्यात घालवला असं म्हटल्यावर डॉ. म्हणाले, असं करू नका. याचा तुम्हालाच त्रास होईल. यापेक्षा किती वाईट स्थिती असते एकेकांची वगैरे.. रडू येण्याबद्दल म्हटलं तर म्हणाले, तुम्हाला psychiatrist कडे जायचंय का?... नाही म्हटलं....

खरंच मी काय वेडेपणा चालवलाय... हातात काही काम नाही म्हणून अतिरिक्त लक्ष जातंय स्वतःकडे आणि आणखी खोलात बुडायला होतंय. मला बाहेर यायला पाहिजे यातून लवकरात लवकर...

(या अनुभवानं मला मनाच्या सामर्थ्याचं दर्शन घडवलं...! नसलेल्या गोष्टीच्या कल्पनेनं ते इतका त्रास करून घेऊ शकतं...!!)

***

आसावरी काकडे

No comments:

Post a Comment