Wednesday 6 July 2022

माझ्या डायरीतून- ५९

नुसतं असण्याचा आनंद...

१५.५.२०१३

एवढा सगळा विचार केला... त्याचा परिणाम म्हणून ठरल्याप्रमाणे १३ तारखेला केमोपोर्ट बसवण्याचं छोटं ऑपरेशन झाल्यावर शुद्ध आली तेव्हा काही क्षण मनात ‘लोका समस्ता सुखिनो भवन्तु...’ असं म्हणता आलं. पण नंतर दुखायला लागल्यावर कुरकुर सुरू झाली... आणि एकदा तिला वाट मिळाल्यावर तिनं चांगलेच हात-पाय पसरले. दोन दिवस सलाईन लावून ठेवलं होतं. सहनशक्तीची कसोटी होती. पण अखेर संपले ते दोन दिवस.... डॉ. कसबेकर शुभेच्छा द्यायला आले होते. बरं वाटलं...

In a state of mere being lies the ectasy of living..’ हे दादाजींचं वाक्य समोर आहे. अर्थ कळतोय. पण तसा आनंद घेता येत नाहीए. ‘मी आहे’ याचा अनुभव वेदनेला चिकटून येतो. तेव्हा वेदनाच लक्ष वेधून घेते. तिच्या तावडीतून सुटून ‘केवल असणं’ अनुभवता येत नाही...

......

२७, ३०, ३१. ५. २०१३

‘पोर्ट’ प्रकरण किरकोळ असेल असं वाटलं होतं. त्या मानानं ते बरंच दमवतंय. इतका त्रास होईल असं आधी कळलं असतं तर त्यामानानं काही नाही त्रास असं वाटलं असतं... त्रास वाटणं किती सापेक्ष असतं..! जे होतंय ते त्याच्या ‘in itself’ आकारात मी अनुभवावं...

......

शरीराचं स्वतःचं म्हणून एक व्यवस्थापन असतं. ते निकराच्या प्रयत्नानं तग धरायचा प्रयत्न करत असतं. मनानं त्याच्या व्यवस्थापनात लुडबुड करू नये.... हरप्रकारे लुडबुडीपासून मनाला परावृत्त करणं चालू आहे.... लुडबुडणारं तेच आणि परावृत्त करणारंही तेच..! मजा आहे सगळी...

.....

आता एकदम रिकामपण जाणवलं. एखादं काम संपल्यावर येतं तसं.... ‘दुखण्या’ला त्याच्या जागी ठेवून दिलं आणि त्याच्या कुरकुरीकडे दुर्लक्ष करायचं ठरवून टाकलं. त्याला प्रतिसाद म्हणून कुथणं बंद केलं. काळजीची घडी करून ठेवली.... तर चक्क रिकामपण यावं? ... म्हणजे ते भरण्यासाठीच मी कुथत होते की काय? कमाल आहे..!!

Mere Being’ मधला आनंद का अनुभवता येत नाहीए? काही तरी काम करत राहून नाहीतर दुखण्याचं कौतुक करतच ‘असणं’ साजरं करता येतं का?

.....

१, ३, ४, ५. ६.२०१३

जाणीव लखलखित जागी आहे तोपर्यंत तिच्या विस्ताराचे मार्ग क्षणिक कुरकुरीनं रोखून ठेवू नयेत... भोवर्‍यासारखी जागीच गरगरत भोवळ आणण्यापेक्षा दूर इकडे तिकडे बघावं.. ऐकावं.. स्पर्शावं.. हुंगावं.. चाखावं... सगळं ‘असणं’

पण...Spirit is powerful but flesh is weak..’ याचा ठायी ठायी प्रत्यय येतो आहे.

.....

खरंतर आपल्या कितीतरी गोष्टी परस्वाधीन असतात. तरी बर्‍या-वाईटाला आपण स्वतःला जबाबदार धरतो... आपल्या हातात करण्यासारखं जे काही आहे ते करून मग पूर्णपणानं जे वाट्याला येईल ते ‘प्रसाद’ (हा शब्द कसा काय सुचला मधेच?) म्हणून स्वीकारावं.... नुसत्या विवेकानं स्वीकारण्यापेक्षा त्याला प्रसाद ग्रहण करण्याची भावना जोडण्यानं काय होईल? ती भावना आतून सहज यायला हवी.. नाहीतर ते स्वतःला फसवणंच होईल बहुधा... की सवयीनं हार्दिकता येईल त्यात?

नुसतं असणं ‘Mere Being’ कसं अनुभवता येईल? त्याचा आनंद का, कसा वाटायला हवा?

.....

नुसतं असणं अनुभवणं म्हणजे त्याची जाणीव करून देणार्‍या वेदनांमधून मुक्त होणं. त्या फक्त ‘मी आहे’ हे लक्षात आणून देण्यापुरत्या असतात...  आनंद... सुख किंवा दुःख... वेदना यांच्या आवरणांच्या आतलं केवळ असणं जाणवणं, अस्तित्वभानात सजग असणं ‘आनंद’दायी असणारच ना..!

.....

आनंद / दुःख वेदनाविरहित केवल / नुसतं असणं असं काही आहे का? की ती केवळ कल्पना आहे? की ‘केवळ असण्या’चा वेध म्हणजे एकेका आवरणाचे ओझे ओझे कमी करत जायचे...?

***

आसावरी काकडे

No comments:

Post a Comment