Thursday 7 July 2022

माझ्या डायरीतून- ६०

आजाराचं असंही ‘पुनर्वाचन’..!

१२, १३, २१.६.२०१३

डॉ. कसबेकरांना फोन केला होता हात काखेत ओढल्यासारखा दुखतोय म्हणून.. तर ते म्हणाले की ते हीलींगमुळे होतंय... तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून सगळं केलंय. तुम्ही फक्त काळजी करू नका. ते माझ्या हातात नाही....

....

पाठ, मान, खांदा, पोर्टची जागा सगळं दुखतंय. रोज. सहन होईना झालं की पेन कीलर घेतेय. रडू येतंय मधून मधून.. बधीर संवेदना जागी होतेय.. अजून काही दिवस वेदनांची बदलती रूपं अनुभवायची आहेत या आजाराच्या नावाची. डॉ.च्या मते हे सगळं किरकोळ, अटळ आणि न्यूनतम आहे. त्याचा मी बाऊ करू नये...

.....

गेले काही दिवस मान-पाठ... दुखत होती. काल पेट स्कॅनसाठी सकाळी ११-११.३० पासून तीन वाजेपर्यंत वेगवेगळ्या अवस्थांमधे बसावं लागलं. स्कॅन टेस्टसाठी अरुंद पट्टीवर अर्धा तास ए. सी. मधे गच्च पडून राहावं लागलं.... तरी मान-पाठ जराही दुखली नाही. घरी आल्यावरही नाही. उलट फ्रेश वाटत होतं... आश्चर्यच आहे ना? म्हणजे दुखणं सतत लक्ष जाण्यामुळे वाढतं? कळत? निर्माण होतं? दुसरं व्यवधान आल्यामुळे दुखण्याकडं लक्ष गेलं नाही म्हणून दुखलं नाही? ... विचार करण्यासारखी गोष्ट आहे...!

..... 

२२.६, १.७, ४.७.२०१३

काल मनीषा आणि तिचे मिस्टर आले होते. त्यांनी NLP तंत्राविषयी सांगून त्याचे दोन प्रकार करून घेतले... ही सर्व तंत्र म्हणजे इच्छाशक्ती वाढवण्याची आणि विचलित होण्यापासून दूर नेणारी आहेत... त्याचा उपयोग करून घ्यायला हरकत नाही.

नंतर बर्‍याच गप्पा झाल्या... त्यांना म्हटलं की आजार आपल्याला माहीत नसलेलं काहीतरी बरं करण्यासाठी असतो / आहे असं वाटतं आहे... ‘फानूस बनके जिसकी हिफाजत हवा करे...’ ही ओळ या संदर्भात आठवतेय. निद्रिस्त ‘स्व’ला जाग आणण्यासाठी आलेलं हे वादळ आहे. पण ते ‘ज्योती’चं कवच बनून आलंय...! आजाराचं असंही ‘पुनर्वाचन’..!  

....

पाचव्या केमोत दिलेल्या स्ट्राँग औषधांचे परिणाम हळूहळू रंग दाखवायला लागलेत. काल.. परवा डाऊन व्हायला झालं. अंग दुखणं, तोंड येणं, कॉन्स्टिपेशन.... चालू आहे... या निमित्तानं ६३ वर्षे आत शरीरात.. मनात कुठे कुठे काय काय साचलं असेल त्याचा निचरा होतोय... नव्याला जागा तयार होतेय.. असा अंतर्बाह्य निचरा होताना थोडी उलथापालथ होणारच ना... या साफसफाईची ‘दमणूक’ एवढी किंमत जास्त नाही...

केमोमुळे केस जायला लागले तेव्हा रडू यायला लागलं होतं खूप. अपेक्षित होतं तरी. आता भुवया, पापण्यांचे... पूर्ण शरीरावरचे केस गेलेत. या घटनेकडेही आता मी ‘स्वच्छता’ म्ह्णून पाहतेय. केसांची अशी समूळ सफाई एरव्ही कधीच शक्य नव्हती... साइड इफेक्ट्स असेही असतात..!

......

५, ६.७.२०१३

दिलीप चित्रे यांची ‘मी’ नावाची एक कविता ‘प्रिय रसिक’च्या मुखपृष्ठावर आलीय. त्यात एक ओळ आहे, ‘... हे मी स्वतः अनुभवलं तरी अनुभव म्हणजे खरं शहाणपण नव्हे.’ या ओळीनं भानावर आणलं. सध्या मी प्रत्यक्ष अनुभवण्याला अधिक मह्त्त्व द्यायला लागलेय... आपण अनुभवाकडे कसं बघतो त्याला महत्त्व आहे. म्हणजे आपला दृष्टिकोन महत्त्वाचा. त्या संदर्भातला विचार, जाणीव महत्त्वाची.

तरी ज्याचा विचार करायचा तिथे ठोस अनुभव हवा ना... पोकळीत, तर्कानं विचार नाही करता येणार. तसंच अनुभवही सजगपणे अनुभवता यायला हवा... तो नुसता शरीर-मनावरून ओघळून चालणार नाही.

अशा संदर्भात संकल्पनात्मक विचार-व्युहाबद्दल काय म्हणता येईल? म्हणजे गणित, विज्ञानातले हायपॉथिसिस इत्यादी... हा खूप वेगळा मुद्दा होऊ शकेल.

......

स्वतःची हार्दिक सेवा चालू आहे.... विचारांना नवे नवे आयाम कळतायत. वैचारिक बधीरतेला तडा जाणं हा सध्याचा सगळ्यात मोठा उपचार म्हणता येईल...

***

आसावरी काकडे

No comments:

Post a Comment