Friday 22 July 2022

माझ्या डायरीतून- ७५

प्रत्येकाचा स्वतःचा तुरुंग...

३-२९.१.२०२०

या वर्षी माझ्या ‘गुड मॉर्निंग’ या व्हॉट्सॅप ग्रुपवरील उपक्रमात छायाचित्र कविता देण्याऐवजी वेगळं काही करावं असं मनात आलं. आधी हा विचार सांगून काही अभंगांचं दोहा फॉर्ममधे मी केलेलं रूपांतर कालपासून शेअर करायला सुरुवात केली... थोडे दिवस ते झाल्यावर ‘तुकोबा ते विठोबा’ असा विषय घेतला..

....

२, ११, २८.२.२०२०

तीस जानेवारीला विद्याताई बाळ गेल्या. जसं ठरवलं होतं तसं सामोरं गेल्या मृत्यूला... अंत्यदर्शनाला कधी जात नाही कुणाच्या. पण या वेळेस गेले होते. रडू आलं. खूप आठवणी आहेत... माझ्या कोणत्याही मनोगताची सांगता त्यांच्या उल्लेखाशिवाय होत नाही...

‘मिळून सार्‍याजणी’साठी त्यांच्यावर लेख लिहायला सांगितला होता. लिहून पाठवलाय.

‘भेटे नवी राई’ कवितासंग्रह तयार होऊन हातात आला. निर्मिती छानच झाली आहे... प्रकाशन समारंभ करायचा आहे महिनाअखेर असं नीतीन मोरे यांनी सांगितलंय...

.....

११.३.२०२०

जगावर कोरोना व्हायरसचं संकट आलंय. बातम्यांचा पाऊस पडतोय सगळीकडून. नाही म्हटलं तरी भीती वाटतेच आहे. जी लक्षणं सांगतायत ती तर आपल्यात दिसतायतच असं वाटत राहिलं... एक बरं की नुकतंच डॉक्टरकडे जाऊन आल्यामुळे खुलासा झाला जरा...

मिळून सार्‍याजणी अंकात विद्याताईंचं शेवटचं मनोगत छापलंय. ते काहीसं हतबल निराशेतून, त्राग्यातून आलेलं वाटलं. त्यांच्या बोलण्यातले त्रोटक उद्‍गार- सुपारी देऊन काम करून घेणे.. सर्प मित्रांना बोलावणे... इ. संभ्रमात टाकणारे आहेत. त्यातून सूचित होतंय ते अतर्क्य आहे. त्यांच्याही विचारात बसणारं नाही... लिव्हिंग विलचा काही उपयोग नाही, इ ओ एल (एंड ऑफ लाईफ) फॉर्मचा काही उपयोग नाही.... मग मृत्यूची वाट पाहावी लागणारांसाठी असे मार्ग उरावेत... हा अनुभव निराश करणारा आहे...

थोडक्यात, जीव आहे तोपर्यंत आपण त्याच्या बाजूनं उभं राहायला हवं. तपासण्या, उपचार बंद करण्याचा तर काहीच उपयोग नाही. ते बंद करून लगेच मृत्यू येईल असं थोडंच आहे?

.....

२३.३.२०२०

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी हळूहळू एकेक बंदी आणत आता आज कर्फ्यूच लागू केला आहे. युद्धकाळात अशी वेळ येते.... रोज या विषयाचं गांभिर्य वाढत चाललं आहे. जगभरात ही बंदी आहे. वरून कोणी पाहात असेल तर ही ‘शांतता’ कशी वाटेल? हे कधी आटोक्यात येणार?

सगळ्या जगाला कुणीतरी वेठीस धरलं आहे. युरोपमधली स्थिती दाखवणारे व्हिडीओज, मेसेजेस येत आहेत. ते भयंकर आहेत. तशी वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून इथले सरकार सगळीकडून बंदी आणत आहे...

मला घरात राहण्याची सवय आहे. बाहेर जाण्याचा कंटाळाच आहे. तरी आता खाली सुद्धा जाता येत नाहीए.. हे अवघड वाटते आहे....

हे काहीतरी फॅड आहे, उगीच काहीतरी पसरवतायत असं वाटता वाटता त्याचं गांभिर्य स्वीकारणं भाग पडतं आहे... प्रत्येकजण आपापल्या कुटुंबासोबत घरात बंद आहेत. प्रत्येकाचा स्वतःचा तुरुंग. आत सगळे स्वातंत्र्य. काही शिक्षा नाही.....

.....

२५,२९.३.२०२०

काल पंतप्रधानांनी जगातली परिस्थिती लक्षात घेऊन चौदा एप्रिलपर्यंत पूर्ण भारत बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कुणीही घराबाहेर पडायचे नाहीए. परदेशातल्या बातम्या तर घाबरवतायत.. वैश्विक महामारीचं हे संकट कोणत्याही जागतिक युद्धापेक्षा भयंकर आणि तोंड द्यायला अवघड आहे. या शत्रुशी लढण्याचे प्रयत्न तज्ञ लोक आपापल्या परीनं करत आहेत. सामान्य लोकांनी घरात राहून स्वतःचं स्वास्थ्य सांभाळून त्यांना मदत करायची आहे.

सगळा वेळ रिकामा आहे... पण या विषयीच्या बातम्यांनी मन ग्रस्त आहे. लेखन वाचन काही सुचत नाहीए...  

पूर्ण लॉकडाऊन आहे. वेगवेगळ्या कारणांनी कुठे कुठे अडकलेली माणसं गर्दी करून सैरभैर होऊन धावत आहेत. त्यांची सोय कशी करावी हे कुणाला सुधरत नाहीए... विषाणूचं स्वरूप पाहता हे चित्र हताश करणारं आहे.

गरजेच्या गोष्टी दूध.. खाद्यपदार्थ उपलब्ध आहे. गरजूंना पाकिटं पुरवली जात आहेत.... बाहेरून आणलेल्या वस्तू घरात घेताना कोणती, किती काळजी घेणार..? कशाला हात लागला तर ते लगेच धुवायचे... आपल्याच हातांवर सतत अविश्वास... समस्या आणि उपाय-योजना यांची सांगड कितपत घातली जातेय कोणजाणे... प्रत्येक दिवस अधिक गंभीर रूप घेऊन उगवतोय.. जगानं अशी परिस्थिती पूर्वी कधी अनुभवली नसेल...

***

आसावरी काकडे

No comments:

Post a Comment