Tuesday 19 July 2022

माझ्या डायरीतून- ७२

जिवंत राहिल्याचं सार्थक झालं..

१४,१५.८.२०१८

आज ‘ओम पूर्णमदः पूर्णमिदं..’ हा मंत्र म्हणताना जाणवलं की मृत्यू म्हणजे या जगण्याच्या त्रासातून सुटका नाही. सगळं पूर्ण, एकाकार असेल तर जगणं – मरणं, असणं – नसणं.. म्हणजे ताटात काय आणि वाटीत काय..! कुठल्या ना कुठल्या आकारात असावंच लागणार.. असण्यातून सुटका नाही... Man is condemned to be free’ च्या चालीवर माणसाला ‘असावं’च लागतं.. असं म्हणता येईल.. एक मुक्तक लिहिलं-

‘कळी असा वा गळुन पडा असण्यातुन सुटका नाही

इथे रमा वा निघून जा असण्यातुन सुटका नाही

पूर्णच असते आहे ते अन पूर्णच बाकी उरते

नसण्याला नाही जागा असण्यातुन सुटका नाही..!’


असं जाणवून काल एकदम मोकळं वाटायला लागलं..!

.....

३.९.२०१८

काल एकांचा फोन होता... ‘शिक्षण संक्रमण’ अंकातील इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमात असलेल्या ‘खोद आणखी थोडेसे’ या माझ्या कवितेवर लिहिलेला लेख वाचून त्यांना नैराश्याच्या काळात धीर आला असं सांगत होते. ते जिल्हा परिषदेच्या शाळेत नोकरीला आहेत. त्यांची नोकरी धोक्यात आहे. सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही यश मिळत नाही म्हणून जीव देण्याच्या टोकाचे निराश झाले होते. कविता वाचून त्यांना या परिस्थितीत उभं राहायचं बळ मिळालं असं म्हणाले.... ऐकून बरं वाटलं.

एवढा व्याप करून जिवंत राहिल्याचं सार्थक झालं असं मनात येऊन गेलं..!

‘पहाट पावलं’ मधल्या लेखांनाही छान प्रतिसाद मिळतो आहे..

.....

७.११.२०१८

परवा रेखाशी बर्‍याच गप्पा झाल्या. बरेच दिवस मनात येतं आहे की मी सतत ‘स्वीकारा’च्या टोकावरच उभी असते सारी आवराआवर करून.. ‘परततच होते मी..’ असा भाव असतो. माझ्या या मानसिकतेची समीक्षा कशी करता येईल? जे स्वीकारतेय ते निमूट, तक्रार न करता हे ठीक. पण बदलण्याचा प्रयत्न न करता हा स्वीकार आहे का? तसं नाही खरं तर.. कारण लेखनाच्या बाबतीत मी कृतीशील आहे. मागे लागत नाही, हाव धरत नाही पण समोर येतंय ते नाकारतही नाहीए. तब्येतीच्या बाबतीत वेळोवेळी तपासण्या, वेळेवर औषधं, पथ्य इ. सर्व प्रामाणिकपणे करतेच आहे. या सर्व प्रयत्नांचं चित्र मी स्वीकाराच्या कॅनव्हासवर रेखते आहे.... मी संघर्ष करत नाही याचा अर्थ मी अट्टहास करत नाही. माझा ‘स्वीकार’ म्हणजे लढण्याआधीच शस्त्र टाकणं नाही तर अपेक्षांवर तुळशीपत्र ठेवणं..! त्यामुळं जे मिळतं ते सगळंच जमेत दाखल होतं आणि म्हणता येतं की मृगजळासारखं माझं कुंपण आणखी थोडं दूर गेलंय...

.....

१०.१२.२०१८

साहित्य प्रेमी भगिनी मंडळाच्या स्त्री साहित्य संमेलनात पाच संक्षिप्त कादंबर्‍यांचं प्रकाशन झालं. त्यात ‘आनंदी गोपाळ’ कादंबरीही होती. पुस्तकाची एक प्रत, मानधन देऊन सत्कार झाला सगळ्यांबरोबर. पुस्तक हातात आल्याचा आनंद झाला मनापासून. स्क्रिप्ट एकदा दिल्यावर परत काहीच करावं लागलं नाही. वाटही पाहावी लागली नाही....

.....

२०.१२.२०१८

बोनडेन्सिटी टेस्ट झाली. डॉ. गोडबोलेंना रिपोर्ट दाखवून आलो. वयानुसार बोनडेन्सिटी कमीच होत जाते. ती स्थिर राहिली हे महत्त्वाचं असं म्हणाले. परत टेस्ट सांगितली नाही... हेच अपेक्षित होतं.

छांदोग्य उपनिषद वाचतेय... भाग्यलता पाटसकर मॅडमचा फोन होता. हे उपनिषद शिकवताना त्यांनी माझ्या ‘मॅरेथॉन’ या ‘पहाट पावलं’मधल्या लेखाचा संदर्भ दिला असं सांगत होत्या. एखादी कल्पना मनाचा ठाव घेऊन सर्वत्र जाणवणे म्हणजे काय ते कळावे म्हणून... छांदोग्य उपनिषदात त्या ऋषींना सगळीकडे ‘साम’ जाणवू लागला म्हणजे काय हे त्या समजावत होत्या.. हे ऐकून साम म्हणजे काय याची उत्सुकता वाटली. त्यातून हे वाचन सुरू झाले. सायनेकर सरांशी या संदर्भात बोलणं झालं. ते छान समजावून सांगतात. ते म्हणाले, साम म्हणजे एका वाक्यात ‘ईशावस्य’मधे जे ईश तेच ‘छांदोग्या’त साम..! ऐकताना असं वाटलं की वेद-उपनिषदं म्हणजे ऋषींचा आकलन-प्रवासच आहे....

.....

सध्या मूड छान आहे. ‘आवराआवरी’चा मूड ‘रहाटाला पुन्हा गती दिली’ असा बदलतोय...

***

आसावरी काकडे

No comments:

Post a Comment