Tuesday 12 July 2022

माझ्या डायरीतून- ६५

पेशींच्या कार्यात लुडबुड नको...

३, १३.१.२०१४

नवीन वर्ष सुरू झालं... सध्या बाहेर जाणं.. फिरणं.. घरी कुणी कुणी येणं.. घरकाम आणि आराम यातच वेळ जातोय. लेखन-वाचन होत नाहीए.. तब्येत आणि मानसिकता नॉर्मल होण्याच्या दिशेनं जातायत. नॉर्मल म्हणजे आजारपूर्व स्थितीत. अपेक्षा.. कल्पना केली होती त्यानुसार एकदम फिट, उन्नत वगैरे  नाही. त्याविषयीचा भ्रम दूर झाला. निराशा विरून गेली. तशी angst / तसा आकांत करायचा त्राण राहिला नाही... किंवा हार मानून टाकलीय.. असो.

.....

आज सकाळी ६-६.३० ला खाली कॉलनीत आम्ही दोघं फेर्‍या मारत होतो. गेटपाशी क्षणभर थांबलो. नेहमीचाच चौक, वाहनांची वर्दळ.. उजाडत जाणारा अंधार- उजाडेपर्यंत दिव्यांनी सावरलेला... आज एकदम चमकून गेलं मनात की हे आपल्या आंगणातलंच दृश्य आहे. आपलंच घर- आंगण... गेट म्हणजे आपल्या घराचंच दार जणू जिथे मी उभी होते.... हे इतकं खरेपणानं वाटलं की आतून गहीवरून आलं....

.....

२१, २४.१.२०१४

काल ‘प्राणिक हीलींग’ विषयक पुस्तिका पाहिली. त्याचा आपण उपयोग करून घ्यावा असं वाटलं. चाललेल्या उपचारांना चालना मिळेल. मदत होईल असं वाटलं.... पण विचार सगळीकडे फिरून पुन्हा आवडत्या मुद्द्यावर आले... होण्यावर सोपवणे. विवेकाला पटेल ती, तशी काळजी घ्यायची, उपचार करायचे आणि शरीराच्या स्वयंशिस्तीवर सर्व सोडून द्यायचं... पेशींच्या कार्यात लुडबुड करायची नाही. डोकवायचंही नाही. त्यांच्या प्रायव्हसीत व्यत्यय आणायचा नाही. त्यांना त्यांचं काम त्यांच्या परीनं करू द्यायचं....

बोनडेन्सीटी कमी आहे म्हणून सलाईन मधून इंजेक्शन घेतलं... पाणी घातल्यावर रोप तरारून मान वर करतं तसं होईल असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही. उलट सगळं अंग जड झालंय. दुख दुख वाढलीय... आज असं वाटलं एकदम की औषधाचा परिणाम होतोय. हाडं भरून यायला लागली असतील... या आतल्या बदलाला मी दुखतंय असं म्हणत असेन.. दुखण्याचंही असं पुनर्वाचन शक्य आहे....

.....

सकारात्मक विचार आपल्या झगडणार्‍या पेशींना चिअर अप करण्यासाठी उपयोगी पडत असतील... कल्पना, विचारच करायचा तर ‘मी लुटला गेलेला नाही, खजिना शोधायला निघालेला वीर आहे...’ असं स्वतःचं वर्णन का नाही करायचं? वैचारिक.. मानसिक पातळीवर स्वास्थ्य मिळवायचं तर दृष्टिकोन प्रगल्भ करणं आपल्या हातात आहे. प्रत्येक क्षणी प्रत्येक गोष्टीचं पुनर्वाचन शक्य असतं. कोणतीच गोष्ट स्थीर, कायमची तशीच असत नाही. व्यक्ती, घटना, परिस्थिती तर बहुआयामी असतात. त्यातला एखादा विकल करणारा आयाम निवडून त्रास का करून घ्यायचा? वेगळा, नवा, अधिक मौल्यवान आयाम शोधणं अशक्य नसतं... नसणार. तसं करायला मला बळ मिळो....

......

२८, २९.१.२०१४

डॉ.नी सांगितल्यानुसार काल ब्लड टेस्ट झाली. संपूर्ण रिपोर्ट एकदम नॉर्मल आला. कुठेही ‘हाय.. लो’ असा शेरा नाही. एकदम स्वच्छ. बरं वाटलं. आज रानडे क्लिनिकला गेलो. रिपोर्ट आणि मी दोन्ही नॉर्मल.... आता एप्रिलमधे बोनडेन्सिटी टेस्ट करायचीय. दिलेली इंजेक्शन्स, कॅल्शियमच्या गोळ्या यांनी काय फरक पडतोय ते पाहून पुढची ट्रीटमेंट ठरेल. ‘व्हिटॅमिन डी’ची गंभीर कमतरता दोन अडीच महिन्यात औषधांमुळे एकदम नॉर्मल झाली तसं हेही होईल.... मी होऊन दाखवीन... ‘बघता बघता पाच वर्षांची गोळ्यांची ट्रीटमेंटही संपेल...’ असं चक्क मनात उमटलं..!

.....

‘मी होऊन दाखवीन’ हा मूड सकाळी आणखी स्पष्ट झाला. त्यासाठी कॅल्शियमच्या गोळ्या, डी व्हिट. गोळ्या, उन्हात फिरणं, आहार, व्यायाम... आणि सोबत चिअर अप करणारं मन एवढी फौज तैनात करतेय... एप्रिलमधे  बोनडेन्सिटीची परीक्षा होईल... एवढं केल्यावर १००% मार्क्स का नाही मिळणार? आणि रिपोर्टमधले आकडे काहीही सांगतील. मी किती घट्ट आहे हे त्यांनी नाही ठरवायचं. मी ठरवणार..!

***

आसावरी काकडे

No comments:

Post a Comment