Saturday 16 July 2022

माझ्या डायरीतून- ६९

आता असे क्षण अनुभवायचे..

, ४.१.२०१६

मागील पानावरून पुढे नव्या वर्षाचा पहिला दिवस उगवला आहे. लेखन-वाचन फारसं होत नाहीए.... पण त्या बद्दल खंत करत राहून स्वतःला कुरतडणं आता थांबवावं म्हणतेय...

सध्या सुचत असलेल्या छायाचित्र-कविता मला आणि इतरांनाही आनंद देतायत.. सृजनाचा हा नवा मार्ग आतल्या अव्यक्ताला नवी जाग आणणारा आहे...  हे सर्व ब्लॉग-स्वरूपात संग्रहित करण्याची कल्पना सुचून आमलात आणते आहे.

नव्या वर्षात ‘पुणे पोस्ट’ अंकासाठी सदर लिहायचं आहे...

.....

८.१.२०१६

सोनोग्राफी.. चेस्ट एक्सरे टेस्ट झाल्या.. रिपोर्ट्स नॉर्मल आहेत... दर तीन महिन्यांनी अशा काही टेस्ट्स.. सहा महिन्यांनी पेट स्कॅन.. वर्षानं बोनडेन्सिटी.. असे रूटीन चेक अप चालूच राहाणार आहे.. त्यातल्या त्रासाची सवय झालीय आता. स्वतःला होणार्‍या त्रासापेक्षा या प्रत्येक ठिकाणची गर्दी पाहून प्रत्येक वेळी मन अस्वस्थ होतं. इतक्या जणांना हा वेदनादायी.. खर्चिक आजार...! लहान-मोठे.. शिक्षित-अशिक्षित.. सर्व जाती-धर्माचे.. स्त्री-पुरूष.. सर्व सामावलेल्या त्या गर्दीत सगळे फक्त एक माणूस.. एक पेशंट.. सगळी बिरुदं गळालेला एक नंबर असतात..!

.....

२९.३.२०१६

एकातून एक कल्पना सुचत वेगवेगळे ब्लॉग बनवले. एकूण दहा ब्लॉग झालेत. एकदा शिकून घेतल्यावर सर्व ब्लॉग मी बनवू शकले. विषयानुसार डिझाईन करता आले. ‘ब्लॉग, एक नवी सुरुवात’ असा एक ब्लॉग करून त्यात सर्व ब्लॉगचा अल्प परिचय आणि लिंक्स असं एकत्र केलंय. होम-ब्लॉगच्या मुखपृष्ठाशी वेबसाइट जोडण्याची कल्पना सुचली आणि आमलातही आणता आली. आता पुस्तक-रूपात न आलेलं माझं सर्व सृजन संचित एका क्लिकवर हजर होईल..! सध्या अशी ऑनलाईन क्रिएटिव्हिटी चालू आहे...

......

२५.५.२०१६

‘व्यक्त-अव्यक्ताच्या मध्यसीमेवर’ हा कवितासंग्रह तयार होऊन हातात आला. निर्मिती सुंदर झाली आहे. राजहंस प्रकाशनाचे डॉ. बोरसे यांनी अगदी आदरपूर्वक लक्ष घालून संग्रह केला आहे. चंद्रमोहन कुलकर्णी यांचं मुखपृष्ठ आहे.... संग्रह हातात आल्याचा आनंद वाटला...

......

१२.८, ८.९.२०१६

सोनोग्राफी टेस्ट झाली परवा. नॉर्मल आहे सगळं.... नेहमीचं ताटकळणं.. अस्वस्थ होणं.. नको नको होणं पार करून परतलो. हवं हवं मधे गुंतलो पुन्हा...

सध्या कविता सुचतायत... समाधान झालं तरी सुचणं चालूच आहे. आग्रहानं जेवण वाढावं तसं वाढतंय कुणीतरी..!  

असलेल्या वेळाचं आणि क्षमतेचं काय करायचं ते कळत नाही म्हणून मुलं खिदळतात.. ओरडतात.. उड्या मारतात.. कशातही मजा घेतात. पाहणारालाही ते विचित्र वाटत नाही. पण वय वाढत जातं तसं बालपणाचे हे उपाय शोभत नाहीत. जमतही नाहीत. मग माणसं काळजी करतात, रडकथा गातात, व्यसनी होतात, गुन्हेगारी करतात, अत्याचार करतात... नाहीतर वेडे होतात..!

.....

२७.१०.२०१६

कुमार गटातील मुलांसाठी मोठ्या कादंबर्‍यांचं संक्षिप्तीकरण करण्याची कल्पना बर्‍याच वर्षांपूर्वी मी मंदाताईंना सुचवली होती. त्याचा योग आत्ता जुळून आलाय. साहित्य प्रेमी भगिनी मंडळाच्या या प्रकल्पात मीही एखादी कादंबरी संक्षिप्त करावी असं मंदाताईनी सुचवलंय. त्या दृष्टीनं आनंदी गोपाळ कादंबरी वाचायला आणलीय... हे काम हाती घ्यावं असं मनात येतं आहे..

पुणे पोस्टसाठी सदर लेखन.. साप्ताहिक सकाळसाठी पुस्तक परिचय.. आकाशवाणीसाठी नाटकांचे अनुवाद.. व्हॉट्सअपवर उपक्रम... असं काय काय चालू आहे. एकेक बुडबुडा क्षणिक आनंद निर्माण करून फुटतोय... आता असे क्षण अनुभवायचे.. या क्षणातला जगण्याचा आनंद घ्यायचा..!

***

आसावरी काकडे

No comments:

Post a Comment