Monday 18 July 2022

माझ्या डायरीतून- ७१

खुराड्यातून बाहेर पडल्यासारखं वाटलं...

१.१.२०१८

आजपासून ‘पहाट पावलं’ हे ‘सकाळ’मधलं सदर सुरू झालं.

‘अथांग’ कादंबरीचे काम प्रकाशनाच्या शेवटच्या टप्प्यावर आहे आणि ‘आनंदी गोपाळ’ कादंबरीचे काम हातावेगळे होऊन प्रकाशनाच्या पहिल्या टप्प्यावर गेलेय.

सध्या लेखन जोरात आहे.. छोटं..मोठं बरंच काही चालू आहे. ‘भेटे नवी राई’ कवितासंग्रह करावा असं मनात यायला लागलंय...

.....

२७.२, १९.४.२०१८

‘पहाट पावलं’ लेखांना चांगला प्रतिसाद मिळतोय..

‘संवादु अनुवादु’ हे उमा कुलकर्णी यांचं आत्मचरित्र वाचतेय... ग्रीप आलीय. किती सहज साधेपणानं लिहिलंय.. केवढा समृद्ध अनुभव.. समोर येईल तसा स्वीकारलाय.. छान वाटतंय वाचताना.. आपणही लिहावं असं मनात तरळून गेलं. वैचारिक प्रवास असं सूत्र घ्यावं.. ‘लाहो’ असं शीर्षकही सुचलं..! मजा....

सध्या डॉक्टरखेरीज इतरत्र जाणं पूर्वीसारखं चालू झालंय. अचानक ठरून कोल्हापूर.. पन्हाळा... पारगाव प्रवासही झाला...

.....

१, १२.५.२०१८

महाराष्ट्र दिनानिमित्त मेजर जनरल शशीकांत पित्रे यांचं भाषण कॉलनीच्या हॉलमधे झालं... भारत-चीन सीमा प्रश्न असा विषय होता. दोन्ही देशांचा इतिहास, भूगोल थोडक्यात सांगून ते विषयाला भिडले. एवढा मोठा विचार-व्यूह तासाभरात डोळ्यासमोर उभा केला. आर्मीतल्या माणसाच्या तटस्थ दृष्टिकोनातून हे ऐकताना फार छान वाटलं.... खुराड्यातून बाहेर पडल्यासारखं वाटलं.... रोज बातम्यांमधे बघतो, ऐकतो तो भारत आणि आज दिसलेला भारत... केवढी तफावत आहे.. कुठे कुठे काय काय चाललेलं आहे आणि आपण त्यापासून किती दूर आहोत..!

.....

काल ‘अथांग’च्या प्रती हातात आल्या. छान वाटलं. एक प्रतीक्षा संपली..!  आमच्या बँकेच्या मैत्रिणींच्या ग्रुपमधे.. मीना देशपांडेच्या घरी ‘अथांग’चे प्रकाशन साजरे केले. प्रस्तावना आणि एक प्रकरण वाचले. चर्चा झाली.

....

१०.७, १.८.२०१८

भाच्याच्या लग्नाच्या रिसेप्शनला कोल्हापूरला जाऊन आलो. कार्यक्रम, प्रवास सर्व छान झाले. सगळ्यांच्या भेटी झाल्या. ‘पहाट पावलं’ वाचत असल्याचं कुणी कुणी सांगितलं. आवडतंय, वाचलं जातंय हे कळल्यावर बरं वाटलं...

प्रचंड पाऊस होता. तिथल्या मुक्कामात एकदा भर पावसातून घरी जाताना वाटेतल्या कडाप्पा कठड्याला जोरात थडकले. पाय घासला गेला. थोडक्यात निभावलं असं वाटलं. पण हळूहळू पाऊल काळेनिळे होऊन सूज आली. घरगुती औषधं पुरली नाहीत. डॉक्टरकडे जावं लागलं. त्यांनी तपासून औषधं दिली. एक्सरे काढावा लागला नाही. काही दिवसांनी बरं वाटलं.. ही एक बोनडेन्सिटी टेस्टच झाली. हाडं इतकी काही ठिसूळ झालेली नाहीत. असा रिपोर्ट आला...!

.....

१.८.२०१८

आज एक टेस्ट झाली. पोर्ट बसवला होता त्या बाजूला गळ्याला शिरेजवळ पुटकुळीसारखं हाताला लागत होतं. डॉक्टरना सांगितलं. त्यांनी तपासलं. त्यांना तसं काही वाटलं नाही. पण माझी शंका म्हणून Doppler neck views sonography करायला सांगितली. ती आज झाली.. आत बाहेर कुठेही काही आढळलं नाही... टेस्ट रिपोर्ट नॉर्मल आले. खर्च आणि त्रास झाला पण शंकानिरसन झालं. काही नसताना केवळ शंका काय करु शकते त्याचा अनुभव घेऊन झाला होता.. त्यातून धडा घेतला..! ऑपरेशनच्या वेळी इतकी शांत राहिले आणि आता छोट्या छोट्या गोष्टींचा एवढा बाऊ करतेय.. गंमतच आहे मनाची...

***

आसावरी काकडे

No comments:

Post a Comment