Sunday 10 July 2022

माझ्या डायरीतून- ६३

केमो पर्व संपलं...

२०.८.२०१३

छान वाटण्याचा एक दिवस आणि मूड जाण्याचा एक दिवस... मूड जाण्याची स्थिती कशाचं तरी बोट धरते.. काहीतरी कारण शोधते नाव देण्यासाठी... स्वतःला समजवायचा कंटाळा आलाय... Come what may... तुका म्हणे उगी राहावे...

.....

२८, २९.८, ५, ८.९.२०१३

काल ठरल्याप्रमाणे आठवी, शेवटची केमो पार पडली. औषधांचा फ्लो पोर्टमधून एकसारखा जात नव्हता त्यामुळं बराच वेळ लागला... पण बाकी काही त्रास झाला नाही. घरी यायला रात्रीचे ११ वाजून गेले.... आवरून खाऊन झोपायला १२ वाजले. रात्री शांत झोप लागली. सकाळचं रूटीन उशीरा पण नेहमीप्रमाणे पार पडलं....

‘पोर्ट’ची काही अडचण येईल असं वाटलं होतं. पण निभावलं. ट्रीटमेंटचा एक महत्त्वाचा भाग पार पडला... धन्यवाद डॉक्टर्स, योग्य उपचार आणि मार्गदर्शन केलंत... सर्व जिवलग ज्यांनी हार्दिक सहभाग दिला माझ्या सर्व गोष्टीत आणि धन्यवाद शरीरा, मना, बुद्धी.. तुम्हीही साथ दिलीत सर्वाला सामोरं जाताना....

.....

काल सर्व डॉक्टर्सना धन्यवाद देणारे एस एम एस केले. त्यांनीही चांगला प्रतिसाद दिला. बरं वाटलं.

.....

फेब्रुवारीपासून तपासण्या.... डॉक्टर्स... वेगवेगळे उपचार... पथ्य चालू आहे. पण आता या क्षणी कसलाही ओरखडा जाणवत नाहीए. सगळ्यांनी मिळून फुलासारखं उचलून ठेवलंय मला...!

.....

हदरवून सोडणार्‍या या अनुभवानंतर अंतर्बाह्य परिवर्तन होईल, व्हावं.. नवा जन्म... वगैरे वाटतंय. पण हे वाटणं भाबडं.. हळवेपणाचं आहे. सगळं ये रे माझ्या मागल्या होणार असं जाणवून गेलं काल. कितीही ठरवलं तरी चिडचिड होतेच आहे. मूळ स्वभाव बदलून बदलून किती बदलणार?... असो.

सर्व पूर्ववत सुरू होणं म्हणजे नॉर्मल होणं एवढंच अपेक्षित आहे डॉक्टर्सना.. सर्वांना. मला अधिक चांगलं, नवं काही तरी हवंय... मिळेल का?

.....

१२, १८.९.२०१३

केमो पर्व संपलं. आता रेडीएशनच्या उपचारांना सामोरं जायचंय. केमोच्या मानानं हा उपचार कमी त्रासाचा आहे म्हणे... तरी त्याला सामोरं जाताना चलबिचल होतेच आहे. आक्टोबर अखेर सर्व चालेल. मनाची तयारी ठेवायची त्यासाठी. काल येता येता 2 D Echo टेस्ट करून आलो. आज रिपोर्ट मिळाला. नॉर्मल आहे... इतक्या टेस्ट्स सारख्या करायला लागतायत की आता येता जाता झेरॉक्स करावं तसं होऊन गेलंय....

.....

बाहेर धुवांधार पाऊस कोसळतोय. आठवून आठवून रडल्यासारखा मधेच त्याचा जोर वाढतोय. केव्हाची टक लावून पाहातेय. पावसाच्या सुरुवातीचं टोक तर सोडाच पण नजरेच्या टप्प्यात दिसणार्‍या रिकाम्या अवकाशातला पाऊसही दिसत नाहीए... जोपर्यंत अवकाश झाकणार्‍या इमारती किंवा वृक्ष पार्श्वभूमीवर अवतरत नाहीत तोपर्यंत तोही दृश्यमान होत नाही. पार्श्वभूमीवर काहीतरी असल्याशिवाय पाऊस दिसत नाही... वेग जाणवत नाही... पार्श्वभूमी हे जाणवून देण्याचं कार्य करत असते हे लक्षातही येत नाही आपल्या... अंतराळात पाय टेकवायला जमीन नसते तेव्हा कसं वाटत असेल?

आज अनंत चतुर्दशी. गणपती विसर्जन. जीव खाऊन ढोल वाजवला जातोय केव्हाचा. पावसाच्या आवाजानं त्याचा आवाजही झाकून टकलाय. कोण हरेल पाऊस की ढोल वाजवणारे?

***

आसावरी काकडे

No comments:

Post a Comment