Friday 1 April 2016

आपल्याही हालचाली अशाच कुणी निरखत असेल काय?

१९ जून १९९७

      काल आम्ही टेकडीवर फिरायला गेलो होतो. निघताना वाटलं नव्हतं की वरपर्यंत जाऊ. पण सहज जमलं. जरा थांबून अनुभवला भवताल. खाली उतरताना एका जागी बसावसं वाटलं. बसलो. आकाशाचा भव्य घुमट नेहमीच लक्ष वेधून घेत असतो आपल्या नित्य बदलत्या विलोभनीय रूपांनी. काल टेकडीच निरखत बसले. टेकडीत सरळ उभा छेद देऊन रस्ता करतायत. एका प्रचंड यंत्राच्या सहाय्यानं दगड माती बाजूला करायचं काम चाललंय. तिथेच बाजूला त्याचा भला मोठा ढीग तयार होतोय. टेकडीची ही उलथापालथ पाहातेय अधुनमधून.

तंद्रीत विचार करता करता जमिनीवर समोर लक्ष गेलं. मुंगळ्यापेक्षा किंचित मोठा एक किडा दिसला. चकचकित निळसर काळा रंग, चार-सहा पाय, दोन मिशा आणि एवढुसं धड. स्वतःच्या आकाराहून मोठा एक खडा (तो गोल दिसत होता. पोकळ होता की काय कोणजाणे.) मिशांनी ढकलत खाच खळग्यातून, त्याच्या दृष्टिनं कडेकपार्‍यातून तो कुठेतरी चालला होता. विलक्षण वाटत होतं त्याचं ते खडा ढकलत कुठेसं जाणं. एके ठिकाणी तो थांबला. दमला असावा असं वाटलं. पण नाही. मातीत रुतलेल्या दुसर्‍या त्याहून मोठ्या खड्याला उचकटून काढायचा प्रयत्न करत होता. खालून पायांनी माती उकरून ( माती पण कसे खेळ करू देते सगळ्यांना ना? कुणी अशी उकरतं माती तर कुणी प्रचंड यंत्राच्या सहाय्यानं..) मिशा की डोक्यानं तो त्या खड्याला धडका देत होता. त्याच्या मानानं ती प्रचंड मोठी शीलाच होती. त्याचे प्रयत्न फसले. सगळं तसंच तिथेच टाकून तो दुसरीकडे निघाला. बरोबर ‘तो खडा’ होताच आता वाटायला लागलं की ते कदाचित अंड्याचं कवच असेल. आत चिमुकली अंडी असतील? कोणजाणे किड्यांचं पुनरुत्पादन कसं होतं ते... तो किडा स्वतःहून मोठा खडा ढकलत चाललाच होता... त्याच्या गावीही नसेल की आम्ही त्याच्या हालचाली निरखतोय ते!

      अंधार झाला तसे आम्ही परतलो. पाऊस केव्हाही येईल ही शक्यताही होतीच. मोठा पाऊसच काय थोडी दमदार वार्‍याची झुळुक जरी आली तरी तो किडा त्याच्या दृष्टिनं मौल्यवान अशा त्या खड्यासह फेकला जाईल कुठेही. काहीच उरणार नाही त्याचं असं!

      आपल्या यच्चयावत् हालचाली अशाच कुणी निरखत असेल काय?

***   

२५ जून १९९७

संस्थेत फिरायला जाते रोज सकाळी. कडक उन्हाळा होता.. थंडी होती.. सध्या पावसाळा आहे. संस्थेतल्या झाडांशी दोस्ती झालीय. त्यांच्यातले बदल निरखत असते. निव्वळ खोडं आणि वाळक्या फांद्या असतात कित्येक दिवस.. गळून पडलेल्या पानांचे ढीग असतात. चालताना चुरा होतो त्यांचा. इतका बारीक की मातीत मिसळून जातो. आता पाऊस पडतोय ना तर त्या पानांचा थर जमिनीचाच भाग झालाय. असं वाटलं, ही जमीन नाही. शेकडो युगं दर ऋतुत गळणार्‍या पानांचे थर आहेत एकमेकांवर साचलेले! आणि ही ताजेपणानं चमकणारी झाडं आहेत ना ती म्हणजे जमीन आहे आतलं सृजनेच्छेचं वादळ घेऊन उफाळून वर आलेली..!  
***

२६ जून १९९७

      एक कविता लिहिली या आशयाची.. कविता म्हणजे फँटसाइजिंगच! फँटसाइज करण्यामुळं आपलं आकलन वाढू शकतं. समज वाढू शकते. एवढंच नाही तर फँटसाइज करता येण्यानंच फँटसाइज न करणं म्हणजे काय ते कळू शकतं... जगताना आपण एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो तेव्हा त्या गोष्टी नकळत फँटसाइज करतो. त्या आहेत तशा, तेवढ्याच बघायला आलं पाहिजे.

No comments:

Post a Comment