Tuesday 29 March 2016

आपलं मन म्हणजे अजबच आहे ना?

१३ जून १९९७

      काल विमला ठकार यांचं ‘ध्यानमय दैनंदिन जीवन’ हे छोटसं पुस्तक वाचलं. आवडीचा विषय असल्यामुळे सध्याच्या वेगळ्या मूडमधेही वाचता आलं. मूळ इंग्रजी मिळवून वाचावसं वाटलं. त्यात एके ठिकाणी म्हटलंय, आपलं मन काही केवळ मेंदूत स्थानबद्ध झालेले नसते तर संपूर्ण, अगदी नखशिखांत आपण म्हणजेच आपलं मन असते. हे वाचताना क्लोनिंग पद्धतीनं मेंढी बनवली त्या संदर्भातली नुकतीच वाचलेली सगळी माहिती आठवली. आपली प्रत्येक पेशी एक पूर्ण अस्तित्व असते. बीजात वृक्ष लपलेला असावा तसं प्रत्येक पेशीत एक पूर्ण अस्तित्व असणार..! (गझलेचा प्रत्येक शेर एक स्वतंत्र कविता असतो.. हे कशाला आठवलं इथे? मजाच आहे मनाची.. असो.)
     
      ध्यान साधनेनं निरीक्षण करण्याची कला आत्मसात केली जाते तेव्हा आपण आपल्याला समोर ठेवून आपलं निरीक्षण करू शकतो. आपल्या चांगलेपणाबरोबर आपल्या क्षूद्रपणाचेही दर्शन आपल्याला घडते. या संदर्भात या पुस्तकात खूप छान लिहीलंय- अशा निरीक्षणानंतर तुम्ही तुमच्या क्षूद्रपणाचे बेगुमान समर्थन करणार नाही. तेव्हा तुम्ही एका विलोभनीय अशा असहाय अवस्थेत उभे असता. अशी निव्वळ असहायता अथवा असुरक्षितता म्हणजेच खरी निरागसता.. इनोसन्स..!
***  

१८ जून १९९७

      मी रोज लिहायला बसते त्या खोलीच्या खिडकीतून बाहेर बघितलं की झाडं दिसतात. मोठी झालीयत आता ती. पानांनी गच्च भरलीयत. त्यांच्या पलिकडे एक इमारत आहे. अर्धवट बांधकाम झालेली. झाडांच्या आड झाकली गेलीय. पण मधल्या फटींमधून दिसते ती. त्यात एक खोली बांधली असावी. दार (?) आमच्या बाजूला. बाकीच्या बाजू पूर्ण बंद असाव्यात. कारण इथून फक्त अंधार दिसतो. त्या अंधाराचा आकार वेड्यावाकड्या त्रिकोणासारखा आहे. तो रोज दिसतो मला आणि उगीचंच बर्म्युडा ट्रँगलची आठवण होते. आपलं मन म्हणजे अजबच आहे ना? कशाशी काय रिलेट करेल सांगता येत नाही. इतकंच नाही तर त्यानं अशीही कल्पना करून टाकली की आपल्या प्रत्येकात असा एक बर्म्युडा ट्रँगल असतो. त्याचा कुणालाही, अगदी आपल्यालाही तपास लागत नाही. त्याच्या जवळपास गेलेले आपले प्रश्न उत्तर घेऊन कधीच परत येत नाहीत. आतल्या आत गडप होऊन जातात..!

***

No comments:

Post a Comment