Friday 22 April 2016

अरेच्चा इथून वाढायचं राहूनच गेलं..!

२९ ऑगस्ट १९९७

आज मनात आलं की जाणीवेचा प्रगल्भ होण्याचा प्रवास चालूच राहणार. ‘मी’ हे या प्रवासात लागलेलं गाव. या गावातला मुक्काम संपला म्हणजे प्रवास संपला असं होत नाही. या मुक्कामात ती ‘क्ष’ या पातळीत पोहोचली असेल तर पुढच्या मुक्कामात क्ष+..... अशीच सुरवात होईल ना ?
***

४ ९ १९९७

      रेडिओवर हिरव्या पाणकावळ्यांबद्दल माहिती सांगत होते. प्रजनन काळात त्यांच्या डोक्यावर हिरवा तुरा येतो म्हणे. आणि ते घरटी बांधायला लागले की नाहीसा होतो तुरा.. माहिती interesting वाटली. निर्मितीप्रक्रिया या विषयावर विद्यापीठात बोलायचं होतं. त्या संदर्भात विचार चालला होता. त्यामुळं या माहितीकडं लक्ष गेलं. आणि मनात आलं निर्मितीप्रक्रियेचा आंतरिक व्यवहार चालू असल्याच्या खुणा माणसाच्याही चेहर्‍यावर उमटत असतील का..?

१४ ९ १९९७

      आत्ता छान मूड आहे. बरं नाहीए तरी झाडासारखं थेंब थेंब वाढत जाणं अनुभवतेय. लिहिता लिहिता किंवा बोलता बोलता नवीन काहीतरी मिळतंय. किंवा माहीत असलेलं नव्यानं उलगडतंय...

      परवा लयबद्ध कवितेविषयी बोलताना म्हटलं, कविता गुणगुणाविशी वाटणं हा काही चांगल्या कवितेचा निकष होऊ शकत नाही. कवितेचा आशय मनात रेंगाळत राहिला आणि तो पुन्हा शब्दात वाचावा असं वाटलं तर ते गुणगुणल्यासारखंच नाही का? एखादी कविता गुणगुणली जाते तेव्हा आशयापेक्षा त्याची लयच आठवलेली असते. गुणगुणाविशी वाटते ती लय. आशय तेव्हा अभिप्रेत असेलच असं नाही...

      पूर येऊन गेला तरी या वेळचा पावसाळा दुरून गेला. त्यानं माझी दखल घेतली नाही. की मीच आक्रसलेली राहिले?.. बाहेर ढोल वाजतायत. त्याचा व्यत्यय होत नाहीए.

      फांदिवर पान.. फळ.. फूल उगवण्याचं ठिकाण किंवा बिंदू ठरलेला असतो. फांदीच्या प्रत्येक बिंदूतून पान उगवत नाही. जिथून उगवतं त्या बिंदूला उचकटून निघावं लागतं फांदितून. वाट करून द्यावी लागते पाना-फुला-फळाला. कोणता असतो हा नवं उगवण्याचा नेमका बिंदू?...

आपल्यावर आलेलं संकट, वाट्याला आलेलं दुःख किंवा टीका म्हणजे असे बिंदू असतात. तिथून फुटून बाहेर पडायचं. वाढायचं. बहरायचं. मनाला तर काय पडेल त्या फटीतून बाहेर पडता येतं. वाढता येतं.. म्हणता येतं की वाढायला नवी दिशा मिळाली. किंवा असंही की अरेच्चा इथून वाढायचं राहूनच गेलं होतं..!

*** 

No comments:

Post a Comment