Wednesday 17 August 2022

मार्च १९९८-२००० मधील नोंदी- ५

२०

मग मीही सुंदर दिसेन झाडासारखी..!

 

१३,१४.१.१९९९

चंद्रकोर कपाळावर कोरावी असं प्रथम कुणाला सुचलं असेल? चेहर्‍याला चंद्राची उपमा देणार्‍या कवीपेक्षा ही कल्पना व्यापक आहे..! कपाळ म्हणजे आकाशच झालं की..!

ज्ञानेश्वरांनी ‘ब्रह्म सत्य जगन्मिथ्या’ मधलं ‘ब्रह्म सत्य’ मानलं. पण विश्व मिथ्या हे मानलं नाही. विश्व हे मिथ्या, खोटं नाही तर ते ‘ब्रह्म’चा विलास आहे असं म्हटलं. शंकराचार्यांच्या तत्त्वाचं असं आकलन करून घेणं हे ज्ञानेश्वरांचं ज्ञानेश्वरपण..! जगन्मिथ्या याचा शब्दशः अर्थ न घेता त्यातलं काव्यात्म सत्य (पोएटिक ट्रुथ) लक्षात घ्यायला हवं ते घेतलं जात नव्हतं ‘जगन्मिथ्या’चा निराशावादी, स्थितीप्रिय बनवणारा परिणाम होऊ लागला होता. ज्ञानेश्वरांनी ‘नाही असं नाही’ ही भाषा बदलली. शून्यामागे एक अंक काढला. आणि निरर्थकाला अर्थपूर्ण केलं. ‘मिथ्या’ला चिद्‍विलास म्हटलं..! अभ्यासाच्या निमित्तने चाललेल्या आजच्या वाचनातून हे समजलं आणि ग्रेट वाटलं. ज्ञानेश्वरी वाचनाचा मूड आला.

 

बुद्ध, शंकराचार्य, चक्रधर यांच्या व्यापक अलिप्त दृष्टीला जगातील व्यवहार क्षणिक, आभासमय वाटणारच. त्यांनी आपले हे जाणवणे, आकलन सर्वसामान्यांसमोर मांडले ते प्रपंचात अतिरिक्त लडबडण्याच्या संदर्भात. अतिरिक्तपणाची सीमा ओळखता आली पाहिजे. आपण मोठे झाल्यावर पेन्सिल हरवली म्हणून रडणार नाही. त्या हरवण्याचं दुःख आपल्याला रडण्याइतकं मोठं वाटणार नाही. बुद्ध, शंकराचार्य, चक्रधर हे बुद्धी, ज्ञान, अनुभूतीच्या पातळीवर इतके ‘मोठे’ झाले की जगातले कुठलेच दुःख त्यांना रडण्याइतके मोठे वाटले नाही. इतकंच नाही तर ते दुःख, दुःखच वाटलं नाही. ते दुःख निर्माण करणार्‍या घटना तात्कालिक, क्षणिक, आभासमय, खोट्या वाटल्या. एखाद्या कवीने आपले ‘वाटणे’ शब्दबद्ध करावे तसे त्यांनी हे उत्कट, प्रगल्भ ‘वाटणे’ तत्त्वविचार म्हणून सांगितले असेल...

......

 

२८.२.१९९९

कवितेचा एक दुसरा प्रवाह जो मला आतापर्यंत अपरिचित होता, आता ओळखीचा झाला आहे, त्या प्रवाहामागच्या कविताबाह्य भूमिकेसह.. आणि मी अस्वस्थ होते आहे. माझी अस्वस्थता नक्की कशासाठी आहे? ती मला कुठे नेणार आहे? माझ्या कवितेतील वैचारिकता हे कदाचित तिचं सामर्थ्यही असेल. पण तसं ठामपणे म्हणणारं कोणी भेटत नाहीए.... जसजसं वाचन वाढतं आहे तसतसं आपण काहीच नाही.. कुठेच नाही हे असमाधान वाढतं आहे. त्यामुळे अस्वस्थता? मी स्वतःशी प्रामाणिक राहून लिहीत राहावं... स्वतःला वाढवत राहावं..

सकाळी फार ग्रेट वाटतं ते संध्याकाळी बुटकं वाटतं... हे माझ्या वाढीचं चिन्ह आहे आणि अस्वस्थतेचंही....

.....

 

१९.४.१९९९

कॉलनीच्या सुरुवातीला एक झाड आहे. वाळक्या, मळक्या पानांनी भरलेलं होतं. त्याच्या शेजारचं झाड पिवळ्या फुलांनी नखशिखांत भरलेलं... हे झाड सहनसिद्धी प्राप्त झाल्यासारखं उभं होतं स्वस्थ. हळूहळू पानगळ झाली. हे पुरतं रिकामं झालं. मग शेंड्यापासून पिवळ्या फुलांची झुंबरं लटकू लागली. हिरवी कोवळी पानं लकाकू लागली. मधून मधून वाळक्या शेंगा आणि गळता गळता लटकून राहिलेली काही पानं तशीच त्या झळाळत्या झुंबरांच्या मधून... त्याला हे झटकावसं वाटलं नाही. जे जसं आलं.... गेलं त्याचा सहज स्वीकार करत राहिलं ते.... मी रोज त्याच्याकडे बघते जाता-येता. ते खूप सुंदर दिसते आहे. जसे आहे तसे. वाळक्या शेंगा आणि मळक्या पानांसकट... पिवळी झुंबरं आणि कोवळ्या पोपटी पानांसकट...! या झाडासारखं नुसतं असण्याचा सराव करायला हवा. सहनसिद्धी असो नसो.. नुसतं सहज असणं.. आहे त्या सगळ्यासकट.. मग मीही सुंदर दिसेन झाडासारखी..!

......

 

३१.५.१९९९

एम.ए. मराठी पार्ट २ परीक्षा संपली. छान लिहीता आलं नाही याची रुखरुख वाटत राहिली बराच वेळ....

परीक्षा झाल्याबरोबर सातारा- औंध ठरल्याप्रमाणे झालं... परतीच्या प्रवासात गाडीत माझ्या शेजारी एक शेतकरीण होती. तिच्याशी चक्क गप्पा मारल्या. तिची मळलेली मुलं फरसाण खात होती. ती ज्योतिबाला जाऊन आली होती. त्यांनी होळीत वाजवतात तसला डमरू (टिमकी) आणला होता. त्या मुलानं तो काढला आणि वाजवायला लागला. त्रासायला झालं नाही. उलट मजा वाटली. तो बसमधे खुशाल खाली बसला.. त्याच्या आईनं बसू दिलं.. खालच्या कचर्‍याचं त्यांना काही वाटलं नाही. त्यांच्या या करण्याचाही एक जैविक अर्थ भावून गेला. ‘सुसंस्कृत’ होता होता आपण जगण्यापासूनच दुरावत जातो... ही माणसं जगण्याच्या जवळ राहतात असं वाटून गेलं..

गाडीत एक मुलगा अचानक किंचाळला. सगळी ताडकन त्याच्याकडे बघायला लागली. काय झालं? कुणाला काही कळेना... मग तो ओरडला ‘इंडिया जीत गया..’ जिंकल्यामुळे आपण महत्त्वाच्या फेरीत प्रवेश केला. सगळ्यांनी त्याच्या उत्स्फूर्त प्रतिसादाला दाद दिली. इंडियानं जिंकणं या विषयीचा हा सार्वत्रिक आनंद बराच बोलका आहे..

***

No comments:

Post a Comment