Wednesday 17 August 2022

मार्च १९९८-२००० मधील नोंदी- ३

१८

माझं निरीक्षण हा एका माणसाचा स्व-शोध आहे.

 

१६.४.१९९८

काल चिडाचिड झाली मनातल्या मनात सगळं फेकून दिलं. फाडाफाडी केली. उव्देगाच्या टोकाशी जाऊन आले. उबग.. कंटाळा सर्वव्यापी झाला. अशा मूडमधे अभ्यास झालाच नसता म्हणून बँकेत गेले. या मूडने बर्‍यापैकी असर टिकवला. पण काम हातावेगळं केलं याचं समाधान वाटलं. संध्याकाळी खूप दमायला झालं तरी थोडा अभ्यास झाला.

माझं बिथरणं हे दाखवण्यासाठी असावं की अजून घसरवणारे बरेच अवशेष बाकी आहेत...

आज सकाळी संस्थेत फिरायला गेले होते. माझ्या नेहमीच्या दगडावर बसले. डोळे मिटून सूर्याकडे बघण्याचा अनुभव घ्यायची सवय झालेली. प्रथम पिवळा सोनेरी, मग केशरी रंग गडद गडद होत पुन्हा सोनेरी पिवळा होतो.. आणि डोळ्यांवर हात ठेवला की शांत करणारी अखंड निळाई... हा रंगाचा खेळ पुन्हा पुन्हा अनुभवण्यासारखा असतो. पण आज सूर्य अजून वर आला नव्हता. त्यामुळे रंगांचा खेळ अनुभवता आला नाही. तरी डोळे मिटून बसले. सकाळी रेडीओवर ऐकलेल्या गाण्याची एक ओळ तरंगत होती मनात... दरशन दे रे दे रे भगवंता.. मिटलेल्या डोळ्यांसमोरच्या अंधार-उजेडात त्याच पोताची एक बारीक कड्यासारखी आकृती दिसली. मनात कल्पना केली की तो मुकुट आहे कृष्णाचा. खूप दुरून कुणीतरी आपल्याकडे यावं तशी ती आकृती जवळ येत होती. वाटण्याकडे दुर्लक्ष करून तिचं जवळ येणं पाहात राहिले. तर ती पणतीची कड आणि ज्योत असल्यासारखी वाटली. अगदी जवळ आली असं वाटत होतं तेव्हाही ती अजून कितीतरी वेळ येतच होती. विचलित न होता पाहात राहिले. मग सारं सारखं झालं. अंधार-उजेडाची छटा सर्वभर ताणून बसवल्यासारखी एकसंध निराकार झाली...

जे काही अनुभवलं त्याचा आनंद वाटला प्रसन्न करणारा.... असा आनंद शेअर करता येत नाही..!

या सगळ्याचा व्यवहारी जगण्याशी काय संबंध? काही नाही.. पण तो कशाला असायला हवा? क्षण एक पुरे... स्टाईल असा निखळ आनंदाचा एक क्षण.. बस इतकंच.

......

 

२८.४.१९९८

एम. ए. (मराठी) साठी एकेक विषय अभ्यासताना अधिकाधिक अंतर्मुख होते आहे आणि बाह्य घटनांबद्दलही जागरुकता वाढते आहे. माझ्या अंतर्मुखतेला नेहमीच वस्तुनिष्ठतेचं परिमाण मिळत असतं. माझं निरीक्षण हा एका माणसाचा स्व-शोध आहे.

अभ्यासाच्या निमित्ताने दोन्ही महायुद्धे.. जगभरातल्या क्रांत्या या बद्दलची अधिक माहिती समजून घेण्यातून आकलनात भर पडली. इतिहास आणि भूगोल याची समज हे आकलन वाढण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. नाथपंथापासून सर्व संप्रदायातील संत महात्मे तीर्थयात्रेच्या निमित्ताने पदयात्रा करीत. त्यामुळे त्यांना होणारे समाज, सृष्टी यांचे आकलन त्यांच्या अंतर्मुखतेला पूर्णतेचे परिमाण देत असेल.

मागे एकदा असं वाचल्याचं आठवलं की अंतःकरणाची अत्यंत निर्मल, अत्यंत पवित्र अवस्था म्हणजे मुक्ती. आणि हेही आठवलं की माझ्या आंतरिक प्रवासाचे ध्येय ते आहे. आज असं वाटलं की आप्पांची (माझे वडील) हीच इच्छा माझ्यात उतरली आहे. मध्यंतरी एकदा जाणवलं होतं तेही आठवलं..-

‘तीव्र इच्छाच आपल्याकडून सर्व करून घेते, आपण स्वतःला ‘इच्छेच्या’ स्वाधीन करायचं. किंवा इच्छेला आपल्या रक्तात मिसळून द्यायचं. मग ती आपल्या निरपेक्ष आपल्या माध्यमातून काम करते. जसे रक्त, श्वास.. आपल्यासाठी काम करतो. आपली जगण्याची इच्छा जन्मक्षणीच आपल्या पेशींमधे संक्रमित होते आणि पेशींबरोबर वाढत वाढत अनेक होते. अंतर्बाह्य आपल्याला लपेटून बसते. इतकी की कधी कधी क्षणिक उव्देगाच्या भरात ‘आता पुरे’ असं वाटलं तरी ‘पुरे’ होत नाही. थांबत नाही जगणे. श्वासांची जेवढी पुंजी बरोबर आणली असेल ती संपेपर्यंत ती इच्छा आपल्यात सळसळतच राहते.’

आपण ‘निवडलेली’ अशी इच्छा जिव्हारी लागलेली असली की तीच आपल्यातील कार्यकारी अभियंत्याची जागा घेते. आणि आतल्या बाहेरच्या सर्व उपलब्धतांना साधन बनवते आणि पूर्णत्वास जाते.

आत्ता लिहिता लिहिता असं वाटलं की आपली कोणती इच्छा अशी जिव्हारी लागेल, तीव्र बनेल, आणि केव्हा बनेल यावर बाह्य, वैश्विक इच्छेचे नियंत्रण असते काय? साधी एखाद्यासाठी मनात उगवणारी शुभेच्छाही प्रत्येक वेळी तितकी हार्दिक असत नाही, तेव्हा वाटलं तरी...

.....

घरातला पसारा ही नेहमीच चीड आणणारी गोष्ट. आताशा त्याचा त्रास होत नाही. यात बेफिकीरी नाही. त्याहून महत्त्वाच्या गोष्टीत लक्ष असल्यामुळे त्याचं महत्त्व कमी वाटणंही नाही. त्या पसार्‍यात, त्याच्या अस्ताव्यस्ततेत एक व्यवस्था, सौंदर्य आहे असं जाणवलं. छान वाटलं. आप्पा ‘कुठे काय विस्कटलंय’ असं म्हणायचे त्यामागे मनाची ही अवस्था असेल?

***

No comments:

Post a Comment