Wednesday 17 August 2022

मार्च १९९८-२००० मधील नोंदी -२

१७

‘हृदयी स्वयंभचि असे’

१.४.१९९८

‘जो जे वांछिल तो ते लाहो प्राणिजात’.... सातशे वर्षांपूर्वी सर्वांसाठी केलेली ही प्रार्थना आत्ता माझ्या डोळांसमोर आहे. ती मला दिलासा देते आहे. प्रार्थनेच्या उद्‍गारपूर्व अवकाशातील सदिच्छांची कंपनं या पट्टीवर छापलेल्या अक्षरांत बद्ध आहेत. त्या अक्षरांपलिकडे जाऊन त्या कंपनांना स्पर्श करण्याचा प्रयत्न मी करते आहे.....

आज सकाळी झोपेत ‘प्रभाते मनी राम चिंतीत जावा’ हे आठवलं. यातील ‘चिंतीत’मधे बरंच काही मननीय आहे, ‘पुढे वैखरी राम आधी वदावा’ यातही समजलेय त्याहून अधिक काही आहे... उच्चार नंतर... त्या आधीच राम मनात उमटावा.. असं काही...

सकाळी अभंगांची कॅसेट ऐकली.. ‘तुका म्हणे सोपी केली पायवाट..’ ही ओळ पूर्वसूरींची कृतज्ञता म्हणून त्यांनी लिहिली. ती त्यांच्यासाठी म्हणाविशी वाटली..

 

२.४.१९९८

भाषाशास्त्राचा अभ्यास चाललाय. ओम या उच्चाराची व्याप्ती ‘अ ऊ’ (कण्ठ्य उच्चार) ते ‘म’ (ओष्ठ्य उच्चार) जाणवून स्तिमित व्हायला झालं...

भाषा कशी निर्माण झाली ते वाचताना मजा आली. घशातून आवाज निघतो याची समज माणसाला आली आणि या आवाजांचा उपयोग संदेशनासाठी होतो हेही लक्षात आलं. तेव्हा गंमत वाटून मुलांनी खेळण्याशी खेळ करावा तसा माणसाने घशातून निघणार्‍या ध्वनीशी केला असेल. खेळता खेळता त्याला वेगवेगळे ध्वनी सापडले असतील. आणि अधिक चांगले संदेशन साधले गेले असेल. त्याची पुनरावृत्ती झाली असेल. मग अनुकरण झाले असेल. रूढी बनली असेल. संकेत मान्यता पावले असतील.... हे वाचताना मनात आलं, ‘मा निषाद...’ हे वाल्मिकी ऋषींचे काव्योद्गार नोंदले गेले म्हणून आपल्याला माहिती झाले. पहिली ध्वनीसंहिता केव्हा निर्माण झाली असेल? कोणत्या अनुभूतीला प्रथम उच्चार मिळाला? असे उच्चार मिळून अभिव्यक्ती व्दारा ते इतरांपर्यंत पोचवले जाऊ लागले त्यापूर्वी या आतच पडून राहणार्‍या अनुभवांचे काय होत असेल? त्यांचे स्वरूप कसे असेल?

.....

 

३.४.१९९८

ज्ञानेश्वरीतल्या १०८ ओव्यांचं छोटं पुस्तक पुन्हा वाचतेय. अधिक आतला अर्थ कळतोय. या अर्थाच्या जवळ जातेय असाही अनुभव येतो आहे. कृतज्ञतेचा एक निश्वास आपोआप बाहेर पडला आत्ता.... त्यातली एक ओवी अशी-

मोटके गुरुमुखे उदैजत दिसे । हृदयी स्वयंभचि असे । प्रत्यक्ष फावो लागे तैसे । आपैसयाचि ॥ 

इथे ‘गुरू’ संदर्भात ‘जग संपूर्ण गुरु दिसे’ (संत एकनाथ) हे आठवलं. आणि  ‘हृदयी स्वयंभचि असे’ या संदर्भात प्रॉफेटमधलं शेवटचं अल्‍मुस्तफाचं म्हणणं...

I only speak to you in words of that which you yourselves know in thoughts... And what is word knowledge but a shadow of wordless knowledge..!

***

No comments:

Post a Comment