Wednesday 17 August 2022

मार्च १९९८-२००० मधील नोंदी- ४

१९

सगळंच at somebody else’s cost

२.५.१९९८

समोरच्या कुंडीतल्या मोगर्‍याच्या पानावर वरून थेंब थेंब पाणी पडतंय... प्रत्येक टपोर्‍या थेंबाच्या धक्क्यानं ते छोटसं झाड हलतंय. पानावर पडलेला पाण्याचा थेंब पानानं सांभाळून ठेवलाय... त्याच्या टोकाशी येऊन तो थांबलाय. त्या दोघांचा सहवास काही क्षणांपुरता. वरून आणखी एखाद-दुसरा थेंब येईल, फार तर तिसरा चौथा.. मग त्यांच्या धक्क्यानं हा पहिला थेंब गळून पडेल. आणि त्याजागी हळूहळू दुसरा थंब येईल. या थेंबांची ये-जा सांभाळणारं, अनुभवणारं पान स्वतःही हळुच केव्हातरी गळून पडेल. आणि त्याच्या जागी दुसरं उगवेल. पानांची ही ये-जा सोसणारं झाडही... हे चक्र फिरत राहातं. निरोप आणि स्वागत दोन्ही दोन अवस्थांच्या प्रतिक्रिया आहेत फक्त. त्या नाइलाजानं द्याव्या लागतात तशा सहर्ष स्वीकारताही येतात..

....

 

१३.८.१९९८

काल ‘विद्रोही कविता’ या कवितासंग्रहाची प्रस्तावना वाचली. केवळ सुख-चैनच नाही तर सर्व श्रेष्ठ कला, मूल्ये, उच्चतम असं सगळंच at somebody else’s cost असा फील आला. जसं मुळं आणि फळं.... फिरणार्‍या राहाटाची भरलेली गाडगी वर येतात.. रिकामी होऊन परत खाली जातात... झाडं स्थिर दिसली तरी तिथंही असंच चक्र चालू आहे. मुळं जीवनरस पुरवतात झाडांना आणि पानं फळं फुलं अखेर सुकून खाली पडतात.. जमिनीत गाडली जातात.. खत बनून मुळांना जीवनरस पुरवतात. एका वेगळ्या अर्थानी, वेगळ्या तर्‍हेनी वेगळ्या पातळीवर ‘आहेरे’ वर्ग देणं चुकतं करतच असतो. शोषण करण्याची क्रिया शोषले जाण्याच्या क्रियेची दृश्य बाजू असते. जन्माला आल्यापासून जसा आपला मृत्यूकडेच प्रवास चाललेला असतो...

तरी क्रांती व्हावी. उलथापालथ व्हावी. फळांना फळ या अवस्थेतच कळावं मुळांचं गाडलेलं असणं.. आणि मुळांनाही कळावी फळ-फुलांच्या शोषणाची जीवघेणी रीत...

.....

 

२७.९.१९९८

आवाजाच्या अनावर लाटांपासून बचावेल असे एकही बेट उरलेले नाही. मेंदूतील श्रवण केंद्रावर एकामागून एक आघात होताहेत. बांधकामावरच्या सिमेंट-वाळूच्या पाट्या एकीकडून दुसरीकडे जलद पोचवणार्‍या मजुरांच्या रांगेप्रमाणे मेंदूतील पेशी ध्वनी-संवेदन एकमेकींच्या हाती देत पुढे पोचवताना त्यांना निमिषभराचीही उसंत मिळत नाहीए... पुराचे पाणी घरात शिरल्यावर जीवाच्या भीतीने वरच्या वरच्या मजल्यावर जात राहावे तसे या आवाजाच्या पुरापासून बचाव करण्यासाठी कुठे जाता येईल?...

भोवतीच्या समाजात आपापल्या वृत्ती-कोषात जगत असतात सगळे... आवाजाच्या भोवर्‍यात भेलकांडून झिंग एन्जॉय करणारे आणि त्रासून त्रासून अगतिकतेच्या दरीत कोसळणारे... खुशाल झापडं लावून जगणारे आणि भोवतीच्या अनाचाराबद्दल आक्रोश करणारे... बदलासाठी झगडणारे किंवा कुरतडत राहणारे स्वतःला... त्याच त्याच रेकॉर्ड्स आलटून पालटून लावणारे आणि नव्यासाठी आसुसलेले... स्वतःच्या नावाची पाटी घेऊन भिरभिरत राहणारे आणि तहानेमागे तृप्तपणे धावणारे... प्रतिक्षिप्तपणे वागण्याचे कार्य असलेल्या इंद्रियांप्रमाणे अंतःप्रेरणेच्या आदेशाची वाट न पाहताच प्रतिक्षिप्तपणे जगत असतात माणसं..!

.....

 

९.१२.१९९८

‘ते’ पूर्ण आहे... हे पूर्ण आहे...’ ही विनोबांनी मराठीत केलेली प्रार्थना मूळ संस्कृतमधून समजून घ्यावी असं वाटलं... प्रथम ज्याला ही पूर्णत्वाची जाणीव झाली असेल तो किती उंचीवर पोचला असेल..! त्याची खूण म्हणून त्यानं ती अनुभूती शब्दबद्ध करून ठेवली. तिथे निशाण रोवून सर्वांना आवाहन देत राहिला. एक सर्वकालिक शहाणपण नोंदवून ठेवलं. त्यानं जाणिवेचा एक मार्ग प्रशस्त केला. आपण त्यावरून चालत गेलो तर त्या उगमाच्या शिखरावर पोचू शकतो...

 

१८.१२.१९९८

आज रेडिओवर ‘चिंतन’मधे जे कृष्णमूर्तींचे विचार सांगितले. त्यातल्या एका वाक्याने लक्ष वेधले- ज्ञान म्हणजे खरंतर अनावरण. पण आपण पुस्तकं वाचून, शिकून त्यावर आवरणं घालत राहातो...!

***

No comments:

Post a Comment