Wednesday 17 August 2022

मार्च १९९८-२००० मधील नोंदी- ७

२२

छोट्याशा प्रमोशनचा ‘अपूर्व’ अनुभव

३, ५.१.२०००

नवीन वर्षाची सुरुवात छान मूडने झाली. काहीतरी निर्णय झाल्यासारखी स्वस्थता होती. सकाळी फिरायला गेले तेव्हा चंद्र आणि चांदणी छान दिसली. तिकडे लक्ष गेलं हे विशेष.. परत येताना वाटेतल्या शेळ्या मी आले तरी बाजूला झाल्या नाहीत. त्याचंही बरं वाटलं. मूड कोसळवतो तसा सगळं छानही वाटवतो...

मजल दर मजल करत वर्ष निघाले आहे आपल्या गतीने. एका बाजूला हा वेग अनावर वाढतो आहे आणि एका बाजूने कसली तरी घाई झाल्यासारखी वाट पाहातेय मोकळं होण्याची. अस्थिरतेतून बाहेर पडण्याची... इथे आहे तोवर इथे असून घ्यायला हवंय...

.....

 

६, ७.२.२०००

ठरल्याप्रमाणे काल झोनल ऑफिसमधून रिलीव्ह झाले. सगळं काम संपवल्याचं समाधान, मैत्रिणींना सोडून निघण्याचं दुःख, सेंड ऑफमुळे आलेली रुखरुख, नवीन जागी जाण्यातली धाकधुक... असं काय काय रेंगाळतंय मनात आणि कॅलिडोस्कोप मधल्या काचांसारख्या त्याच्या हिंदकळण्यातून वेगवेगळ्या आकृत्या तयार होतायत...

दत्तवाडी ब्रँचला हजर होऊन प्रत्यक्ष काम करताना टेन्शन आलं.. वाटलं जमेल की नाही.. नकोच.. पण संध्याकाळी सगळं काम झाल्यावर सगळ्यांनी खूप मनापासून धीर दिला. इतका की त्या चांगुलपणानं गहिवरून आलं. असं मनात आलं की ज्या निष्ठेनं आणि जिद्दीनं मी तुकाराम-गाथा वाचली तशी भूमिका आताही घ्यावी. सगळ्यांनी धीर दिलाय तर मी आपल्या सूप्त क्षमता वापरायला हव्यात.. प्रमोशन घेतलंय तर हे काम निभावणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे असं वाटतं आहे. हा प्रामाणिकपणाच मला ते निभवायचं बळ देईल. आणि त्याचं बक्षिस म्हणून सर्वांचं सहकार्य मिळेल असा आतून विश्वास वाटतो आहे...

बघता बघता नवीन कामात रुळले. हळूहळू ते सोप्पं वाटायला लागलंय.. नेहमीचं पासिंग ऑफिसरचं काम.. वेळ पडली तर कॅश ऑफिसर म्हणून कॅशच्या किल्ल्या सांभाळणे, दिवसाच्या शेवटी कॅश बॅलन्स करणे, कॅशची ने-आण करणे... अशी कामं मी कधी करीन असं चित्रच रंगवलं नव्हतं... मी घेत असलेला नोकरीतला हा अनुभव माझ्यासाठी ‘अपूर्व’ आहे...

....

१४, १५.३.२०००

म.सु. पाटील यांचं पत्र आलंय. ‘मी एक दर्शनबिंदू’ हा नवा कवितासंग्रह अपेक्षाभंग करणारा आहे म्हणून. ८-९ मुद्द्यातून उणीवा दाखवल्या आहेत. पत्र वाचून धक्का बसला. पण उपेक्षा करण्यापेक्षा सविस्तर पत्र लिहिलं याचंच बरं वाटलं. पत्र पुन्हा पुन्हा वाचून त्यांना सविस्तर उत्तर लिहिलं तेव्हा बरं वाटलं...

उपनिषदांचा अनुवाद वाचतेय. एकच गोष्ट आपण पुन्हा पुन्हा वाचतोय असं वाटत राहिलं. उपनिषदातील तत्त्वज्ञानात नंतर कुणी भर घातली का असा प्रश्न पडला..

.....

२.४.२०००

आज व. दि. कुलकर्णी सरांची भेट झाली. त्यांनी मी पीएच डी करू नये असा सल्ला दिला. समीक्षेबद्दल विचार करू नये, आपणच आपली समीक्षा करावी असंही सांगितलं...

गेले काही दिवस वेणू पळशीकर यांनी अनुवाद केलेलं ‘एका काडातून क्रांती’ हे पुस्तक वाचतेय. आज पूर्ण झालं. या पुस्तकानं बरंच अंतर्मुख केलं, अस्वस्थ केलं आणि दिलासाही दिला.. बर्‍याच नोंदी केल्यायत डायरीत.

निसर्ग हे विश्वातील घडामोडींचे अविचल उगमस्थान आहे. आताचं निसर्गापासूनचं तुटलेपण सांधणं अवघड आहे. या वन वे रस्त्यावरून आता मागं फिरणंही अशक्य आहे. आता फेरा पूर्ण करायलाच हवा..!

....

१६.५.२०००

काल विद्या सप्रे चौधरी यांचा फोन होता. नवीन संग्रहातल्या कविता वाचून त्यांना वाटलं की माझ्या व्यक्तिमत्वात फार मोठं परिवर्तन घडतं आहे. कदाचित ते मलाही माहिती नाही. मला काहीतरी हवंय त्याच्या परीघापर्यंत मी आलीय... इत्यादी. ऐकून बरं वाटलं...! त्यांना सविस्तर पत्र लिहिलं...

आज संस्थेत फिरताना गुलमोहराच्या झाडाखाली उभी राहून आस्वादत होते झाडाचा बहर... ऐसपैस बहर... परवा वाचलं.. Share in the joy of someone else’s glory’.. तसं शेअरिंग अनुभवत होते... तिथं नेहमी फिरायला येणार्‍या कुणाला वाटलं मला फुलं हवीयत... कुणाला वाटलं माझा हात पोचत नाहीए.. कुणी म्हणालं आम्हाला कविता ऐकायला मिळणार या झाडावर... मी त्या झाडाचा बहर आस्वादला.. अनुभवाच्या ओंजळीत ते जमा झालं..!

***

No comments:

Post a Comment