Wednesday 29 June 2022

माझ्या डायरीतून- ५५

७.२.२०१३

बघता बघता नव्या वर्षाचा पहिला महिना संपत आला. कार्यक्रम, प्रवास, वाचन असं काय काय चालू आहे. पण गुंतवून ठेवणारं मोठं प्रोजेक्ट हातात नाहीए... तब्येतीकडे लक्ष जातंय. काहीतरी होत असतंच. मूड डाऊन होतोय... म्हणून अलिकडे लिहिलेल्या नवीन कविता एकत्र करून ‘आगामी’ संग्रहाचं स्क्रिप्ट बनवण्याचं काम चालू केलंय. पुस्तक छापील स्वरूपात येईपर्यंत इ-बुक रूपात करावं असा विचार आहे...

१७.२.२०१३ / २४ २. २०१३

स्क्रिप्ट तयार झालं. ‘जगण्याचा बेहिशोबी तपशील’ या नावानं त्याचं इ-पुस्तक बनवलं. १३ फेब्रुवारी (गणेशजयंती) तारीख टाकून हे आणि आधीचं.. दोन्ही ईपुस्तकं माझ्या वेबसाइटवर अपलोड केली. ठरवल्याप्रमाणे करता आलं याचा खूप आनंद झाला. इतका की तब्येतीच्या तक्रारीकडे, त्यातलं गांभिर्य जाणवूनही सहज पाहता आलं. डॉ. कसबेकरांकडे जावं लागलं. त्यांनी बर्‍याच टेस्ट्स करायला सांगितल्या. केल्या. सगळ्या नॉर्मल आल्या आहेत.

पण पी एफ टी टेस्ट नॉर्मल आली नाही. या टेस्टमधे फुफ्फुसांची आकुंचन-प्रसरण होण्याची क्षमता तपासली जाते. ती माझी ९७ वयाची आहे असं निघालं.... कारण काय असावं? पुरेसा वापर न केल्यामुळे यंत्र बिघडतात तसं झालं असावं. थोडक्यात समाधान, भागवून घेणं... ही वृत्ती श्वास घेण्यातही असावी? मी ‘घुसमट’ स्वीकारत राहिले की काय?

माझ्या बायोडाटात दोन ई-पुस्तकांची छान भर पडली.. या दमदार बायोडाटाचा कणभरही संदर्भ उपयोगास आला नाही जोशी हॉस्पिटलमधे....

खूप सार्‍या तपासण्या झाल्या. देहाचा एकेक भाग सुटा तपासला यंत्रांनी... शरीरशास्त्राने ठरवलेले अद्ययावत निकष लावले गेलेत... मी जन्मतारखेनुसार ६४ वर्षांची आहे. पण माझ्या हाडांचं, हृदयाचं, फुफ्फुसाचं... पेशीपेशीचं वय वेगवेगळं आहे..! त्वचेच्या खोळीत सगळं नांदतंय आपापल्या मगदुराप्रमाणे.....

......

२६.२.२०१३

या सगळ्या टेस्ट्समुळे जरा विचलित झाले होते. त्या अस्वस्थतेतून एक कविता लिहिली गेली. कुणाकुणाला मेलनं पाठवली... फेसबुकवर शेअर केली. कविता आवडल्याच्या बर्‍याच प्रतिक्रिया मिळाल्या... फ्रेश व्हायला झालं. उत्साहाचा प्राणवायू मिळाला... आता माझी फुफ्फुसं हळूहळू तरुण होणार..!

१२.३.२०१३

डॉक्टरांनी सर्व कल्पना दिली होती. त्यानुसार सात मार्चला बायप्सी टेस्ट झाली ब्रेस्टची. रिपोर्ट येईपर्यंत भूल दिलेल्या अवस्थेत ठेवलं होतं. टेस्ट पॉझिटिव्ह आली. लेगेच ऑपरेशन झालं. आजार होता आणि आता तो काढून टाकला दोन्ही एकदमच समजलं. विश्वास वाटत होता खूप निर्विवाद की काही निघणार नाही. पण तसं झालं नाही. मी फसले गेले... शुद्धीवर आल्यावर नक्की काय ऑपरेशन केलंय हे कुणी स्पष्ट सांगत नव्हतं.... जरी अंदाज आला होता तरी स्पष्ट ऐकायचं होतं... ते कळल्यावर विशेष काही वाटलं नाही...

वेदनांपेक्षा ऑपरेशनमुळे आलेल्या पोकळीकडे बघवत नाहीए.... जगाजवळ इतक्या भयंकर गोष्टींची रेलचेल आहे की माझ्या प्रत्येक तक्रारीला तरी बरं म्हणून गप्प करता येईल...!

कितीही ज्ञान मिळवलं तरी गर्व करायला जागा असत नाही... कितीही उंच गेलं तरी आकाश तितकंच दूर राहातं... तसं प्रत्येक वेदनेसमोर काढता येतील अशा असंख्य मोठ्या रेघा असतातच....

***

आसावरी काकडे


Monday 27 June 2022

माझ्या डायरीतून- ५४

२५.७.२०१२

आज ‘ईशावास्यम् इदं सर्वम्....’ पुस्तक तयार होऊन हातात आलं. छान झालंय. आनंद हर्डीकरांनी प्रकाशकीय मनोगत लिहिलंय आणि पुस्तकाबरोबर एक छान पत्रही दिलंय. या पुस्तकाबाबत ते समाधानी आहेत याचं समाधान झालं. पुस्तकाच्या प्रतींसोबत मानधनाचा चेकही मिळाला. पुस्तक छान झालं या बरोबरच ते आदरानं झालं याचंही समाधान वाटलंय.

......

९.८.२०१२ / २१.८.२०१२ / १.९.२०१२

सुधानं घरी बोलवून ईशावस्यम्..’चं प्रकाशन साजरं केलं... भागवत मॅडम, बेलसरे मॅडम, सुषमा. अंजली आल्या होत्या... गप्पा.. खाणं पिणं.. कौतुक झालं...

चंद्रशेखर बर्वे सरांनी पुस्तक विकत घेतलेय. वाचताहेत. फोन करून आवडत असल्याचं सविस्तर सांगितलं.... अनिरुद्ध कवीश्वरांची मेल आलीय. चांगला सविस्तर अभिप्राय दिलाय... काही पत्र अंतर्मुख करणारी, विचारात पाडणारीही आलीयत.

कोल्हापूरला गेलो. आईनं कौतुक केलं...

पुस्तकाच्या प्रकाशनाची वाट पाहणं संपलं. उत्सुकता संपली. काही पुस्तकं भेट पाठवून झाली. अनेक वर्षांच्या जिज्ञासेचं समाधान करणारं सगळं पुस्तकरूपात साकारलं हा आनंद, मोठा कार्यक्रम करून साजरा करण्याची कल्पना होती. पण ती मावळली. हातातली इतर कामं हातावेगळी झाली...

रिकामपण आलं. लगेच अस्वस्थता आत शिरली... तिचा पाहुणचार करायला हवा खरंतर. लगेच पिटाळून लावायचे प्रयत्न कशाला?

......

२१.९.२०१२

आनंद हर्डीकरांचा फोन होता की ‘अस्तित्वनो उत्सव’ (‘ईशावास्यम्...’ मधे मी अनेक पुस्तकांतील विचारांचे संदर्भ घेतले आहेत. त्यातलं हे एक गुजराती पुस्तक...) पुस्तकाच्या प्रकाशकाचं त्यांना पत्र आलंय की ‘ईशावास्यम्...’ मधे मी त्या पुस्तकातला पानंच्या पानं मजकूर वापरला आहे... या कम्प्लेंटला लगेच उत्तर द्यायचं आहे. त्यांनी मेल तयार केलीय... या निमित्तानं पुस्तक पुन्हा पाहून घेतलं. तीन ठीकाणी (लेखक-पुस्तकाच्या) नावासह त्यातील विचारांचा उल्लेख आहे... अनपेक्षित कारणासाठी आलेला हा फोन धक्का देणारा होता...

२७.९.२०१२

या पत्रासंदर्भात काल ‘राजहंस’ मधे मिटिंग झाली. हर्डीकरांनी त्या पत्राला व्यवस्थित उत्तर दिलं आहे... एखाद्या पुस्तकातील थोडा मजकूर (३०० शब्दांपर्यंत- जसाच्या तसा) कोट करण्याकरता परवानगी लागत नाही. नावासह, योग्य ते क्रेडीट लेखकाला देऊन घेतलेली कोटेशन्स ‘वांग्मय चौर्य’ ठरत नाहीत. त्यानुसार ‘आमची’ काहीही चूक नाही. त्यामुळं माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही... अशी प्रत्येक वेळी परवानगी घेत बसलं तर संशोधनपर लेखनाची कामंच होणार नाहीत... कालच्या मिटिंगमधे ही माहिती मिळाली. हर्डीकरांनी पाठवलेल्या पत्राची प्रत मेलवर मला आली आहे.... यातून शिकायला मिळालं. काहीही कोट करताना सावध राहायला हवं....

या प्रकरणानं पुन्हा बरंच अस्वस्थ केलं....

......

३१.१२.२०१२

आज वर्षाचा शेवटचा दिवस... या वर्षात गद्य लेखन बरंच झालं. पण वाचन फारसं झालं नाही. डायरीत विचारांच्या नाही घटनांच्या नोंदी जास्त झाल्या... दोन महत्त्वाची पुस्तकं प्रकाशित झाली... दोन कवितासंग्रहांचे मी केलेले अनुवाद- ‘तरीही काही बाकी राहील’ पद्मगंधा प्रकाशनाकडे आणि ‘तू लिही कविता’ दिलीपराज प्रकाशनाकडे सुपूर्द केले. माझ्या दोन कवितासंग्रहांचे अनुवाद- ‘मेरे हिस्से की यात्रा’ (तमिल) आणि ‘स्त्री असण्याचा अर्थ’ (कोंकणी) अनुवादकांच्या प्रकाशकांकडे सुपूर्द झाल्याचं समजलं...  वैयक्तिक जीवनात अशा बर्‍याच जमेच्या गोष्टी घडल्या. पण राज्यात... देशात अस्वस्थ करणारं बरंच काही घडतंय.. डोकं चालेनासं व्हावं असं...

***

आसावरी काकडे 

Saturday 25 June 2022

माझ्या डायरीतून- ५३

१८.७.२०१२

‘कवितेभोवतीचं अवकाश’ लेखसंग्रह तयार होऊन हातात आला. छान झालाय. वाट बघून बघून इतक्या दिवसांनी आलेला समाधनाचा, आनंदाचा क्षण पुटकन हातातून निसटला... पुस्तकाचं आगमन साजरं करणं चालू आहे....

५.८.२०१२

ठरल्याप्रमाणे काल कॉन्टिनेन्टल प्रकाशनाच्या हॉलमधे डॉ. सदानंद मोरे सरांच्या हस्ते ‘कवितेभोवतीचं अवकाश’चा प्रकाशन समारंभ झाला. छान.. हृद्य झाला. मोरे सर पुस्तकाविषयी खूप छान बोलले. या लेखनाचं वेगळेपण काय आहे ते अधोरेखित केलं.... त्यांचं बोलणं ऐकल्यावर ते रेकॉर्ड करायला हवं असं वाटलं. माझाही पुस्तकाविषयीचा आदर वाढला.... ‘कवितेविषयी कसं लिहायला हवं त्याचं रोल मॉडेल असं हे पुस्तक आहे... कवितेविषयी कवी लिहितो तेव्हा समीक्षकाच्या भूमिकेत जातो. यातलं लेखन कवीच्या भूमिकेतूनच केलेलं आहे.... स्वशोध ते ईश्वर-शोध याचं माध्यम असते कविता ही इनसाइट वेगळी आहे... कवितेचं मूलभूत सामर्थ्य जाणण्याचा आणि तो मांडण्याचा प्रयत्न या लेखनात आहे... स्वतःच्या आणि इतरांच्या कवितेबद्दल सारख्याच भूमिकेतून लिहिलेलं आहे... हायडेग्गर यांच्या लेखनाचा प्रभाव या लेखांत आहे... पण त्या विचारांची कॉपी केलेली नाही. समजून, पटवून घेऊन लिहिलेलं आहे. कवी निराकाराला साकार कसं करतो याचं उदाहरण तुकोबांच्या अभंगांमधून दाखवून दिलेलं आहे.... रॉय किणीकरांच्या ‘उत्तररात्र’वर लिहिलेला लेख उत्तम झाला आहे.... कवितेचं स्वरूप, निर्मिती-प्रक्रिया, आस्वाद-प्रक्रिया, अनुवाद अशा वेगवेगळ्या प्रकारे कवितेविषयी लिहिलेलं आहे. कवितेभोवतीचं अवकाश जगण्यातल्या तपशिलांनी भरलेलं असतं.. जगणं कवितेहून मोठं आहे. म्हणून कविता सतत लिहिली जाणार.. शेवटच्या लेखात कुसुमाग्रजांची अर्थपूर्ण कविता अगदी योग्य तर्‍हेनं उद्‍धृत केलेली आहे...’ असं बरंच काही मर्मग्राही बोलले. श्रोत्यांनाही आवडलं भाषण आणि कार्यक्रमही. खूप जणांनी पुस्तकं विकत घेऊन सही घेतली...

.......

९.८.२०१२

पुस्तक प्रकाशनानंतर प्रतिक्रिया येत आहेत.... ‘अवकाश’ शब्द पुल्लिंगी आहे’.. पण मी ‘कवितेभोवतीचं अवकाश’ असा नपुसकलिंगी वापर केला आहे. या संदर्भात चंद्रकांत पाटील सारांची मेल आली आहे. मी अशा वापरामागचा माझा विचार कळवलाय. त्यानिमित्तानं त्यावर पुन्हा विचार झाला. भाषातज्ञ  सत्वशीला सामंत म्हणाल्या, ‘पुस्तकाच्या शीर्षकात प्रथम असा नपुसकलिंगी वापर सुनिताबाई देशपांडे यांनी केला होता. नंतर ज्ञानेश्वर मुळे यांनी केला होता. आता तुम्ही... आता हा शब्द उभयलिंगी असल्याची नोंद शब्दकोशात होईल....

अशा वेगवेगळ्या स्पष्टीकरणांना सामोरं जावं लागेल हळू हळू... चंद्रकांत पाटील सारांच्या मेलला मी दिलेलं उत्तर वाचून त्यांची अपमानास्पद मेल आली... ‘उतारवयातही नवेपणा, उथळपणा असणं दुर्दैवी आहे.... इत्यादी. त्यांनी ‘अवकाश’चा अर्थ आकाश कधीच होत नाही असं ठाम विधान केलंय. आणि आकाश आणि आभाळ मधला बाळबोध फरक सांगितलाय..... ज्ञानेशवरांपासून फारच व्यापक असलेल्या अवकाश शब्दाचा विशिष्ट अर्थाने वापर होत आला आहे असा मोघम शेरा मारलाय.... अवकाश शब्दाविषयीचा माझा ‘आग्रह’ चुकीचा आणि अडाणीपणाचा आहे असं म्हटलंय.... या मेलमुळं अस्वस्थ व्हायला झालं खूप... पण त्यांना धन्यवाद अशी मेल करून ‘अवकाश’च्या अर्थाचा शोध घेतला, घेतेय. अवकाश आणि आकाश यातील एका बिंदूवरील साम्याचे कितीतरी पुरावे मिळाले. सरांची विधानं साधार खोडून काढता येतील. पण कितीही आधार मिळाले तरी त्यांना याबद्दल काही लिहिण्यात एनर्जी वाया घालवायची नाही असं ठरवतेय. ‘न पाठवलेलं पत्र’ म्हणून त्याविषयीची माझी प्रतिक्रिया लॅपटॉपमधे नोंदवून ठेवलीय... या अस्वस्थतेतून अधिक विचार, संशोधन झालं, होतं आहे... स्वतःवर खूश होण्याच्या अधांतर अवस्थतेतून जमिनीवर आलेय...

***

आसावरी काकडे

Thursday 23 June 2022

माझ्या डायरीतून- ५२

१.१.२०१२

आज नव्या वर्षाची सुरुवात झाली. नवीन वर्षात माझी दोन महत्त्वाची पुस्तकं प्रकाशन-प्रक्रियेत आहेत. राजहंसकडे ईशावास्यम्‍... आणि कॉन्टिनेन्टल प्रकाशनाकडे ‘कवितेभोवतीचं अवकाश’. जानेवारीचा प्लॅनर भरलाय. गोव्याला शेकोटीसंमेलनाची अध्यक्ष म्हणून जायचंय आणि कोल्हापूरला एका संमेलनातील कवीसंमेलनासाठी जायचंय... ‘तुम लिखो कविता’ या हिंदी कवितासंग्रहाचा अनुवाद करणं चालू आहे. काही लेख लिहायचे आहेत... सर्व लेखन लॅपटॉपवर करायला लागल्यामुळे सगळ्याला गती आलीय....

२६.१.२०१२

एस टी चालकाने बेभान एस टी चालवून आठ जणांना जागीच ठार केले. ३० लोक जखमी. चाळीस वाहनांची मोडतोड... काल दिवसभर दूरदर्शनवरच्या या बातम्यांनी अस्वस्थ केले... तीन-चार दिवसात दोन व्यक्तींनी आपल्या पूर्ण कुटुंबाला ठार करून स्वतः आत्महत्या केली अशाही बातम्या आल्यात... आता अपघातात एखादा मणूस मरत नाही. बरेच जण मरतात. आता कुटुंबच्या कुटुंब आत्महत्येच्या विळख्यात सापडतात.. काय चाललंय...! काही कळेनासं झालंय. अस्वस्थ होण्याच्या क्षमतेच्या पलिकडलं आहे सगळं...

.....

२.४. / २३.५. २०१२

लॅपटॉप पुन्हा दुरुस्तीला गेला. तोपर्यंत वापरायला दिलेलाही बंद पडला. कामं खोळांबली... लगेच मूड गेला. वाटलं सगळं जगणं हँग झालंय. कोणत्याही बटणावर करसर नेऊन क्लिक केलं तरी स्क्रीन ढिम्म... काही हालचाल नाही... करण्यासारखं काहीच नसल्यासारखं रिकामपण अस्वस्थ करतंय. झोप येतेय सारखी. कंटाळा आलाय. काय काय होतंय देहाला.... छान वाटण्यासाठी सतत काहीतरी करण्याचा तगादा बाहेरून का यावा लागतो? वाचनातही लक्ष लागत नाहीए. विचारही फिरकत नाहीएत...

......

४ ७ २०१२

आजची बातमी – God particle- ईश्वरीय कण मिळाला. (sub automic particle) जेनेव्हा इथं प्रयोग केला. जमिनीखाली १०० मीटर खोल २७ किलो मीटरचा बोगदा बनवून अणुची टक्कर घडवली...

आधीच्या शोधांमधे एक मिसिंग लिंक होती. त्यामुळे पहिल्यांदा फक्त एनर्जी होती त्यातून ‘मास’ – वस्तूमान कसं तयार झालं? हे कळत नव्हतं. एनर्जीपासून वस्तूमान कसं तयार झालं या संदर्भातला खुलासा हे गॉड पार्टिकल करू शकेल. हा कण अत्यंत सूक्ष्म आणि अस्थिर आहे. तो थेट दिसू शकणार नाही...

इतका मोठा प्रयोग प्रत्यक्ष करून शोधलेल्या कणाला ‘ईश्वरीय’ असं पारंपरिक (प्रत्येक कृती ही ईश्वरीय कृती असते या समजुतीची आठवण देणारं..) नाव का दिलं असेल ?

***

आसावरी काकडे 

Tuesday 21 June 2022

माझ्या डायरीतून- ५१

१७.९.२०११

मुंबई विद्यापीठात मंगेश पाडगावकर यांच्या अनुवादांवर चर्चासत्र आयोजित केलंय. त्यात मला त्यांच्या ‘मीरा’ या अनुवादावर निबंध सादर करायचा आहे. त्या निमित्तानं मीरेविषयी कुठून कुठून माहिती मिळवतेय. त्यात आशा साठे यांनी किरण नगरकर यांच्या ककल्ड ( Cuckold ) कादंबरीचं नाव सांगितलं. या मूळ इंग्रजी कादंबरीचा मराठी अनुवाद ‘प्रतिस्पर्धी’ या सौम्य नावानं रेखा सबनीस यांनी केला आहे. ती कादंबरी मिळवली... मीरेची भक्ती ही काय चीज आहे? हे समजून घेणं अवघड आहे. त्या दिशेनं विचार... वाचन घडू लागलं आहे. या कादंबरीत त्याचा शोध लागतोय का बघतेय...

‘जीवनात रंगीत तालमीला वाव नसतो..’

‘तिला आपली उत्कटता काव्यात व्यक्त करायला आवडायची. तिचं नाच, गाणं म्हणजे फक्त तिच्या कवितेचं वेगळं आणि विस्तृत स्वरूप..’

‘माझ्या बायकोने शांत हळूवारपणे आपल्या मनाचा शोध घेत संगीताची सुरुवात केली. हा वेगळाच विस्तार होता. प्रमाणबद्ध नसूनही अस्ताव्यस्त नसलेला. तिचं संगीत म्हणजे शुद्ध आनंद...’

अशी टिपून घेण्यासारखी बरीच वाक्यं या कादंबरीत आहेत. वाचताना ती आपली पकड घेते. पूर्ण केल्याशिवाय ठेवता येत नाही. विशेष म्हणजे अनुवाद असूनही लेखनातला प्रवाहीपणा कुठेही कमी वाटत नाही की भाषेत कृत्रिमता जाणवत नाही.

मीरेचा पती- युवराज भोजराजाविषयी ऐतिहासिक माहिती फारशी उपलब्ध नसताना ६०० पानी कादंबरी लिहिणं म्हणजे कमाल आहे. युद्धनीती, राजघराण्यातलं वातावरण, कटकारस्थानं, वेगवेगळ्या व्यक्तीरेखा, निसर्ग वर्णन, संगीताविषयीचं भाष्य, स्त्रियांशी आलेल्या वेगवेगळ्या स्तरांवरच्या संबंधांची सूक्ष्म तपशिलासह वर्णनं, मीराबाईशी असलेलं नातं (पूर्ण कादंबरीत मीरा हे नाव एकदाही येत नाही. मेरठच्या राजाची कन्या, राजकुमारी, राजकन्या, बायको, हिरवे डोळेवाली, छोटी संतमाई.. असे तिचे उल्लेख आहेत.) हे सर्व खरंखुरं वाटावं इतकं प्रभावी लेखन झालं आहे.

मीराबाईच्या भक्तीचं स्वरूप नक्की काय असेल ? या प्रश्नाचं उत्तर प्रश्न स्वरूपातच मिळतं. पण तिच्या निस्सिमतेचा प्रभाव भोजराजावरही होता आणि घरातील व समाजातील सर्वांवर होता. तिला छोटी संतमाई म्हटलं जाऊ लागलं होतं.... भोजराजा तिचं ‘प्रेम’ समजून घेतो, तिचा आदर करतो पण व्देषही करतो, राग राग करतो. पण शेवटी (कादंबरीत तरी) तिचाच मार्ग अनुसरतो.... शेवटी बन्सीबाजाला मारायला धावणं आणि त्याच्याशी एकरूप होणं यातून त्याची व्दिधा मनःस्थिती परिसीमा गाठते.

वाचताना मनात येत राहिलं, मीराबाईनं कृष्ण-प्रेमात स्वतःला बुडवून घेतलं, त्यात ‘भक्ती’खेरीज आणखी कुठली प्रेरणा असेल काय?... म्हणजे पहिल्याच ‘रात्री’चा अनुभव लक्षात घेऊन, चितोडचं कौटुंबिक.. राजकीय वातावरण बघून मीरा सगळ्यापासून अलिप्त झाली असेल काय?... एक प्रकारे स्वतः अलिप्त होऊन भोजराजाची झाकली मूठ ठेवली असेल का? की मीराबाईनं भोजराजाचं नुकसान केलं... त्याला सतत व्देष करायला लावून विचलित करून? सगळी सूत्र हातात घेऊन कर्मावतीचं कारस्थान मोडून काढून भोजराजाला गादीवर बसवण्यात मीरेनं पुढाकार घेतला असता तर बाबराशी झालेल्या युद्धाला.. इतिहासाला... वेगळं वळण मिळालं असतं का?  

पूर्ण कादंबरीभर भोजराजाचं परोपरीचं मनोगत वाचूनही भोजराजाचं एकच एक रूप साकारत नाही... इतिहासात गडप झालेल्या त्याच्या व्यक्तिमत्वाच्या वेगवेगळ्या प्रतिमा साकारता येण्याच्या शक्यता सूचित करून ठेवल्यायत. मीराबाईच्या जनमानसातील प्रतिमेला धक्का लावलेला नाही. उलट ती तिच्या काळातच छोटी संतमाई म्हणून मान्यता पावली.. तिचा छळ झाला तो सावत्र सासू आणि दिराकडून.. पती- सासू-सासर्‍याकडून नाही...

‘ती एक व संपूर्ण, बंदिस्त वर्तुळ झाली होती. ज्यात त्याला जागा नव्हती. ती आणि बन्सीबाज एकमेकात परिपूर्ण गुंतले होते. त्या वर्तुळात शिरकाव अशक्य. त्याला वगळण्यात आलं होतं...’

‘आजूबाजूच्या जगाचं भान विसरायला लावणारा हा सर्वव्यापी अत्यानंद एका साधारण मानवाला कसा शक्य होता?’

मीराबाईचं व्यक्तित्व आणि तिच्या भक्तीचं स्वरूप कादंबरीतील अशा काही जागांमधून समजून घेता येतं...

.....

३.१०.२०११

मुंबई विद्यपिठातल्या चर्चासत्रात सहभागी होण्याचा अनुभव बरच काही शिकवणारा झाला. अनुवादासंदर्भात नवीन विचार, दृष्टिकोन मिळाला. अनुवादाचं मूल्यमापन करताना फक्त अनुवादित पुस्तकाच्या संहितेचा विचार करून चालत नाही. अनुवादकाचा जीवनविषयक दृष्टिकोन, त्याचा वर्ल्ड व्ह्यू या बाजूही महत्त्वाच्या असतात.. असे काही मननीय मुद्दे मिळाले.

.....

२३.१०.२०११

फोटो काढण्याची सुविधा असलेला मोबाईल मिळाल्यापासून भरपूर फोटो काढले. ते काढण्याच्या अनुभवाच्या कविता ‘छायाचित्र चौकटी आणि दृश्य : मालिका-कविता’ या शीर्षकाखाली लिहून ठेवलेल्या... दिलीपशी (भाऊ) सहज बोलण्यातून इ-बुकची कल्पना निघाली आणि आठ दिवसात पुस्तक प्रकाशितही झाले. काढलेल्या फोटोंमधला साधारण जुळणारा फोटो एकेका कवितेवर टाकलाय आणि बॅकग्राउंडला फोटोला साजेसा रंग टाकलाय. लॅपटॉपमधे हे तयार करून अपलोड करण्यापर्यंतची ही पूर्ण निर्मिती भावानं फोनवर सांगितल्यानुसार मी केली... मस्त वाटतंय पाहायला- वाचायला. मजा आली करतानाही आणि आता भरभरून येणारे अभिप्राय ऐकतानाही...! कवितांचं असं सादरीकरण हा अनुभव नवीन आहे. आतून सुखावणारा....

***

आसावरी काकडे

Saturday 18 June 2022

माझ्या डायरीतून-५०

२७.३.२०११

पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासनातर्फे नामदेवांचे कार्यक्षेत्र असलेल्या घुमान (पंजाब) येथे स्टडी टूर जाणार आहे. त्यात सहभागी होण्याची संधी आम्हाला मिळालीय. तिथे नामदेवांचा हरिपाठ पारायण, भजन इ. आहे. त्यात म्हणण्याची नामदेवांची आरती आणि नामदेवांचे पसायदान.. दोन्हीचा हिंदी अनुवाद प्रा. नि. ना. रेळेकर सरांच्या सांगण्यावरून करून दिला. तिथल्या वातावरणात मिसळून तिथला आनंद / भक्तीभावाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करायचाय... भक्ती अभ्यासाच्या ‘रेसिपी’ज बर्‍याच वाचून लिहून झाल्यायत. आता प्रत्यक्ष स्वयंपाक बनवायचा अनुभव घेण्याची संधी या दृष्टीनं घुमानला जायचं आहे...

४.४.२०११

घुमानला जाऊन आलो. एक धावती ट्रीप झाली. खर्‍या भक्तीभावाची प्रचिती एकदाच आली. आमच्या बरोबर आलेल्या वनारसे पती-पत्नीच्या भजनाला एक शिख भक्त तबल्यावर साथ करत होता तेव्हा... त्याला मराठी भजनं कळतही नसतील पण त्याच्याकडे पाहून तो भक्तीभावानं वाजवत होता असं जाणवलं.. त्याच्या रूपात भक्तीचं दुरून दर्शन झालं..!

एकूण ट्रीपमधे घरी येईपर्यंत बर्‍याच अडचणी आल्या..... सुवर्ण मंदीर, वाघाबॉर्डर, जालियनवाला बाग, राधास्वामी मंदीर, जालंधर येथील वैष्णवीदेवी मंदीर.. यांना भोज्याला शिवून आल्यासारखी धावती भेट झाली. दोन ठिकाणी ग्रुपमधली माणसं हरवली. त्यांची शोधाशोध.. पोलीस कंप्लेट.. यात सगळ्यांचाच खोळंबा झाला. वाट पाहण्याच्या कसोटीच्या वेळात सर्वांनी हास्य-विनोद गाणी गप्पा करून मजा आणली...

पहिल्या दिवशी (३० मार्च) सकाळी नामदेवांच्या पाच मंदिरांचे दर्शन झाले. आणि दुपारी सर्वांनी मिळून भारत-पाक सेमी फायनल मॅच बघितली. फटाके वाजवून विजय जल्लोषात साजरा केला. परतीच्या रेल्वे-प्रवासात फायनल मॅच मोबाईलवर स्कोअर विचारत ऐकली आणि जिंकल्यावर हल्लागुल्ला केला. बाहेर, समूहात मॅचचा असा आनंद घेण्याचा अनुभव संस्मरणीय झाला.

जालंधरला गाडी पाचच मिनिटं थांबणार होती तेवढ्यात सगळ्यांनी कसं चढायचं याचं टेन्शन होतं. गाडी वेळेवर आली पण वेगळ्या प्लॅटफॉर्मवर.. मग धावाधाव.. आमची स्वतंत्र बोगी होती. ती सापडली. पण आतून बंद केलेली. ती टीसीला सांगून उघडून घेतली. पण आत लाइट नव्हते. रात्री २-२.३० ची वेळ. अंधारात घुसाघुशी.. सामान खिडकीतून टाकणं... सगळं झालं. मग टीसीनं आत येऊन दिवे चालू केले. हळू हळू स्थिर स्थावर झालं. ... आमच्याच मुळे गाडी लेट होत गेली. पण पाणी संपलं मग स्टेशनवर पाणी भरण्यासाठी दोनदा चेन ओढून गाडी थांबवली. त्यावरून भांडणं.. तक्रारी.. पोलीस.. इ. झालं.

गाडी दोन अडीच तास लेट झाली. वंदनाचे मिस्टर गाडी घेऊन आले होते. पण गाडीपर्यंत येण्यात दमछाक झाली. त्यांनी नो पार्किंगमधे गाडी लावली होती. पुन्हा पोलीस.. वाद.. अखेर निघालो. गप्पा हसणं करत. वाटेत पुढच्या गाडीला धडक होता होता वाचली. जोरात ब्रेक लावला.. मागे कुणी नव्हतं लगेच त्यामुळं मागून धडक बसायचंही वाचलं...

एकूण ट्रीपमधे तब्येत चांगली राहिली. ऊन.. थंडी.. चालण्याची दगदग, वेगळं खाणं पिणं.. सगळ्याशी जमवून घेता आलं. सगळ्या हास्य-विनोद गप्पांमधे थोडा थोडा भाग घेतला... थोडी थोडी चिडचिड झाली. माणसांशी वागताना खुली उदारता दाखवता आली नाही. स्व पलिकडे डोकावता आलं नाही...

संत नामदेव पायी चालत इतक्या दूर पोचले... तिथं जाऊन त्यांचं कार्य समजून घेताना मला स्व पलिकडेही डोकावता आलं नाही...! भक्तीभावाची अनुभूती तर दूरच...

......

२४.८.२०११

अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस. देशभरातून त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळतो आहे. भ्रष्टाचार-विरोधी आंदोलनाचा ‘विजय’ होऊ घातला आहे.... नीतीमूल्यांची घसरण होते आहे तरी प्रत्येकाच्या अंतर्मनात नीतीमूल्यांविषयी आदर आहे... निस्वार्थी, नैतिक वर्तन करणाराला अजून मान मिळतो आहे याचं दर्शन या आंदोलनानं दिलं.

भ्रष्टाचाराची झळ प्रत्येकाला बसते आहे. प्रत्येकाच्या मनात त्याविषयी चीड आहे. त्याची छोटी छोटी स्फुरणं एकत्र आलीयत.... त्यांना अण्णांच्या रूपात नेता मिळालाय. आंदोलन कर्त्यांवर आक्षेपही घेतले जातायत की ते सरकारला वेठीस धरतायत.. आडमुठेपणा करतायत... पण कुणी तरी केव्हातरी असं लावून धरायला हवंच.. कुणी याला केवळ एक वावटळ म्हणून भारावलेपणातली हवाही काढून घेत होतं...

निदर्शनं करत, घोषणा देत निघालेल्या एका मोर्चाबरोबर थोडं चालून त्यात सहभागी झाल्याचं क्षीण समाधान मिळवलं. अण्णांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून एक वेळचा चहा / कॉफी बंद करावी असं ठरवत होते. पण एकदाही जमलं नाही. तेवढा निर्धार केला गेला नाही....

***

आसावरी काकडे

Wednesday 15 June 2022

माझ्या डायरीतून- ४९

 १.२.२०११

लहानपणापासूनचा अस्वस्थ ध्यास आणि २००६ पासूनचा प्रत्यक्ष अभ्यास याच्या घुसळणीतून ‘ईशावास्यम् इदं सर्वम् : एक आकलन-प्रवास’ या पुस्तकाचं हस्तलिखित तयार झालं. हे काम व्हावं अशी त्या कामाचीच इच्छा असल्यासारख्या काही गोष्टी घडल्या. पुन्हा पुन्हा तपासून फायनल केलेलं स्क्रिप्ट राजहंस प्रकाशनाकडे सुपूर्द केलं. राजहंसचे संपादक आनंद हर्डीकर चांगलं बोलले. लवकरच करू म्हणाले.

४.२. २०११

‘ईशावास्यम् इदं सर्वम्..’चं मनोगत वाचून माजगावकर यांचा फोन आला अभिनंदन करण्यासाठी. ‘या विषयावर जसं पुस्तक असायला हवं होतं तसं हे असेल असं वाटतंय’ असं म्हणाले. स्क्रिप्ट देताना लेखनाबद्दल मी समाधानी होतेच. त्यांचा फोन आल्यावर आणखी समाधान झालं..!

......

२६.२.२०११

मंगला आठल्येकरचं ‘जगायचीही सक्ती आहे’ हे पुस्तक वाचतेय. बरीच पुनरावृत्ती वाटतेय... त्यातले मुद्दे खोडता येण्यासारखे नाहीत. तरी पटत नाहीए. इच्छामरण हा गुन्हाच आहे असं म्हणण्याकडे कल होतोय... सर्वांसाठी एक नियम / कायदा करावा असा हा विषय नाही. हा निर्णय ज्याचा त्यानं घ्यावा....

१.३.२०११

‘जगायचीही सक्ती आहे’ हे पुस्तक वाचताना बरेच विचार मनात येत आहेत....

ज्या अनेक सामाजिक प्रश्नांसंदर्भात शहरांमधून बुद्धिवाद्यांमधे चर्चा होतात, त्याला चळवळींचं रूप येतं त्या प्रश्नांना ‘सामान्य’ माणसं सहज सामोरी जातात, गवगवा न करता त्याचा स्वीकार करतात.... त्यापैकी स्वेच्छामरण / दयामरणाचा प्रश्न सर्वात सहजपणे हाताळला जातो. ‘अनावश्यक’ उपचार त्यांना बंद करावेच लागतात. परवडतच  नाहीत... घरी आलेल्या पेशंटची ते यथाशक्ती सेवा करतात आणि त्याला सुखाने मरू देतात....

अगदी शेवटच्या अवस्थेतही स्वेच्छामरण / दयामारण हा गुन्हाच आहे. कारण ती ‘ऋत’ (निसर्ग-नियम... विश्वाचा कायदा) च्या विरोधातील कृती आहे.

कृत्रिम साधनांच्या आधारे जगणं हेही ‘ऋत’विरोधी नाही का? असं वाटू शकेल. पण तशा जगण्याची सुरुवात चाळीशीपासूनच होते.... चष्मा, कृत्रिम दात, व्हिटॅमिन्स.. बी पी डायबेटिस औषधांच्या गोळ्या, श्रवणयंत्र... अशा अनेक टेकूंनी शरीराची गुढी उभी ठेवली जाते.

पूर्णतः परावलंबी झालेल्या / शरीरावर मेंदूचं नियंत्रण नसलेल्या म्हणजे समजतंय की नाही हे कोणत्याही  प्रतिक्रियांनी दुसर्‍यांपर्यंत पोचवता येत नसलेल्या अवस्थेचा स्तर कोणता? व्यक्तिगत जगण्याच्या संदर्भातल्या निरुपयोगी अवस्थेला ‘ऋत’ संदर्भातही निरुपयोगी म्हणता येईल का?

मला भावनिक दृष्ट्या वैयक्तिक दृष्टिकोनातून, विवेक दृष्ट्याही दयामरण / स्वेच्छामरण स्वीकार्य वाटतं. पण तत्त्वतः तो गुन्हाच आहे. त्याला कायद्याने सार्वत्रिक संरक्षण मिळू नये असं वाटतं.... केवळ कायद्याचा दुरुपयोग होईल म्हणून नव्हे. तर कायदा असो नसो लोकांना जे जसं जेव्हा करायचं तसंच ते करतात आणि माणसाच्या कायद्यापलिकडल्या कायद्यात ते बसणारं नाही म्हणून..!

२.३.२०११

कुटुंब-नियोजन म्हणजे जिवांची जन्माला येण्याची संधीच हिरावून घेणं आणि फाशीची शिक्षा म्हणजे जगणं हिरावून घेणं.. पण माणसानं माणसाच्या भल्यासाठी हे स्वीकारलं, कायदे केले. तसंच काही दिवसांनी लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी वेगवेगळ्या कारणांनी ‘निरुपयोगी’ ठरलेल्यांना जगण्याचा अधिकार नाही असा कायदा केला जाणं शक्य आहे....

.....

२०.३.२०११

पिंपरीला दादांना भेटून आलो. ८०च्या पुढे वय. आय सी यु मधे ठेवलं होतं. आता बाहेर आणलंय. भेटल्यावर त्यांनीच आमचे हसत स्वागत केले. कसे आहात विचारले. सगळीकडे नळ्या लावलेल्या. खाण्यावर नियंत्रण... श्वास घ्यायला त्रास... युरीनचा त्रास.. पण तोंडानं म्हणत होते आनंदी आनंद आहे. सगळं छान होणार आहे... काही अडचण नाही. श्वासासाठी तोंडावर व्हेंटिलेटर लावलेला तरी ओम नमः शिवाय म्हणत होते. त्यांच्या या प्रतिक्रियांचं, इतकं प्रसन्न असण्याचं आश्चर्य आणि कौतुक वाटलं...!

शेवटच्या अवस्थेला असं सामोरं जाता येणंही शक्य आहे..!

***

आसावरी काकडे

Thursday 9 June 2022

माझ्या डायरीतून- ४८

१.१०.२०१०

आज एक तारीख म्हणून प्लॅनर तयार केलाय. करायच्या गोष्टी बर्‍याच आहेत. उत्साह आहेही... नहीही... आकाशवाणीचं काँट्रॅक्ट आलंय बालोद्यानमधे कविता वाचण्यासाठी. ‘मायमावशी’ अंकासाठी लेख लिहायचाय. चालू कामं हातात आहेतच. ‘आगामी पुस्तके’ स्वप्नांसारखी समोर आहेत. तब्येत ठीक आहे. तरी परतीचे विचार सगळ्यातली हवा काढून घेतायत... काल दुर्गा भागवतांवर चर्चासत्र होतं. त्या म्हणायच्या म्हणे, ‘मला जगण्याचं सुख वाटतं’.... मिळालेला प्रत्येक दिवस बक्षिसासारखा साजरा करायचा.. खरंतर मीही असा विचार करायला हवा. पण सगळ्या बाबतीत एक साचलेपण आलंय. त्याला आपणच गती द्यायला हवी ना?.. (आत्ता वाचतानाही दमायला होतंय इतकं काय काय चाललेलं असताना साचलेपण कसं ? असं वाटलं हे लिहिताना.)

.....

६.१०.२०१०

काल एका मंडळात बोरकरांवरच्या कवितांचा कार्यक्रम ऐकायला जायचं होतं. वादळी पावसाच्या भीतीचं निमित्त करून जायचं टाळायला बघत होतं मन. कविता ऐकण्यापेक्षा कार्यक्रम करणार्‍यांना आनंद द्यायला जायचं होतं.. पण उत्साह नव्हता. आतून अगदी नको वाटत असताना गेले. पाऊस आला नाही. काही त्रास झाला नाही... पण परतताना कार्यक्रमातल्या सगळ्या गोष्टी फारच बालीश वाटत होत्या... हे वाटणं, सगळं किरकोळ.. फालतू वाटणं चुकीचं आहे असं मनाला समजावत राहिले.... 

जगण्यातलं बालीश सुख किंवा तुच्छ / निरर्थक भाव यांना ओलांडणारी प्रगल्भ अवस्था कोणती? बालीशपणा जाणूनही त्यात रमणं ही? ही प्रगल्भता की स्वतःला फसवणं?

‘ईशावास्य’मधे शंभर वर्षे जगण्याची इच्छा धरावी असं का म्हटलं असेल?... असं म्हणण्याआधी ‘कर्मं करत..’ हे महत्त्वाचे शब्द आहेत. जन्माला आल्यावर कर्म करणं अनिवार्य आहे. ती टाळण्यासाठी संन्यास तर नाहीच पण मरणाची पळवाटही धरायची नाही. कर्म करतच जगायचं असं म्हणण्यात जगराहाटी / जीवनचक्र चालू ठेवणं, ‘ऋत’च्या (निसर्ग नियम..) विरोधात न जाणं अभिप्रेत आहे?.... आपलं भलं-बुरं.. लहान-मोठं जीवन जगणं (जगण्याला पर्याय नाहीच... असंही पुढं म्हटलेलं आहे.) म्हणजे विश्वाच्या कायद्याचं पालन करणं ही जाण ठेवून ‘सामान्य’ (असलं तरी) जगणं ही प्रगल्भता असेल?

......

२७.१०.२०१०

सध्या वाचन कमी झालंय. जे वाचतेय त्यानं विचारमंथन होत नाहीए. नवं, नव्यानं काही कळत नाहीए. त्यामुळं डायरीलेखन म्हणजे दिनचर्येच्या नोंदी इतकंच होतंय. मनातली प्रश्नोत्तरं थांबल्यासारखी झालीयत.

.....

१०.१२.२०१०

आनंद हर्डीकरांनी दिलेलं ‘The Riddle of the Self – by F. T. Mikhailov हे पुस्तक पाहातेय.... त्यात सुरुवातीलाच म्हटलंय- ‘At each new departure it seems to man that the time of real knowledge has come. आतापर्यंत आपण अज्ञानाच्या आणि गैरसमजुतींच्या अंधारातच वावरत होतो.  But as a poet said, superstitions are but the ruins of old truths..! Everything that is new brings with it a new confidence....

***

आसावरी काकडे

माझ्या डायरीतून- ४७

२५.१.२०१०

दोन ठरलेली कवीसंमेलनं, बोरन्हाण- हळदीकुंकू कार्यक्रम आणि माझा वाढदिवस... सर्व छान पार पडलं. मजा आली... साठीचा टप्पा ओलांडला. कृतकृत्य वाटण्यासारख्या बर्‍याच गोष्टी झाल्या आहेत. वाढदिवसानिमित्त दिलीपनं फोटो काढता येतील असा मोबाईल भेट दिला. विक्रमनी हँडसेट हतात आणून दिला. ह्यांनी कार्ड आणलं. सचिननं रीचार्ज करून फोन चालू करून दिला. सगळं वाढदिवशीच..!

फोटो काढता येणार्‍या या छोट्याशा मोबाईलनं माझ्यासाठी अभिव्यक्तीचं एक नवं दालन खुलं केलं...!

......

५.२.२०१०

राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालक व उपसंचालक पदासाठी व्यक्तींची निवड करणार्‍या निवडसमितीची सदस्य म्हणून माझी निवड झाल्याचे पत्र शासनाकडून आले आहे.... महाराष्ट्र राज्य सिंहावलोकन परिषदेचेही निमंत्रण आले आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील ‘क्रियावान पंडितांची’ ही परिषद आहे. अशा एक हजार निमंत्रितांत माझं नाव आहे..! अशा गोष्टी सहज स्वीकारता येत नाहीत. यासाठी आपण पात्र आहोत का असा विचलीत करणारा विचार अस्वस्थ करतो. व्यक्ती म्हणून घडण होताना पहिली २०-२१ वर्षे झापडबंद अवस्थेत गेली. आणि नंतरची ८-१० वर्षे भानावर येण्यात, स्थिरावण्यात गेली. सगळ्याची सुरुवात व्हायलाच उशीर झाला.... बाह्य जगातल्या घडामोडींचा आवाका, अंदाज, ज्ञान हे सगळं दूर राहिलं... त्यामुळे आत्मविश्वास वाटत नाही... लोप्रोफाईल राहिलं जातं.. त्याचंही काही महत्त्व आहेच म्हणा... असो. जे आहे ते आहे..!

......

८.३.२०१०

आज महिला आरक्षण विधेयक संमत झालं नाही. सहा वेळा गोंधळामुळे राज्यसभा स्थगीत करावी लागली. दोघांनी विधेयकच फाडून टाकलं. हे असभ्य वर्तन बघून अवाक् व्हायला झालंय..!

२७.३.२०१०

साहित्य संमेलन चालू आहे. आज सकाळी श्याम मनोहर आणि मेघना पेठे यांची मुलाखत होती. प्रश्न पडणं, शोध घेणं, स्वतःशी प्रामाणिक राहाणं, खरं लिहिणं, डायरी लिहिणं... असे मुद्दे होते. ऐकायला छान वाटलं.

......

४.७.२०१०

काल इमेल करायला शिकले. परागनं माझी वेबसाईट बनवलीय. त्याची लिंक फेसबुकवर टाकलीय. तीस जणांनी पाहिली अशी नोंद आलीय. या नव्या तंत्रानं प्रभावित होताना गोंधळायला झालंय. लिहिलेले, छापलेले शब्द कॉम्प्युटरच्या पडद्यावर दिसून नको तेव्हा बंद करता येतील. त्यांची अडगळ राहणार नाही.. या नव्या तंत्राशी जमवून घ्यायला हवं...

मोबाईलनं फोटो काढण्याचा छंद जडवलाय. फोटो काढताना नकळत दृश्य वाचली जातात.. तेव्हा जाणवलेल्या प्रक्रियेच्या कविता झाल्यायत. या कविता म्हणजे ‘छायाचित्र चौकटी आणि दृश्य’ यातलं नातं उमगणं... पहिल्या कवितेत म्हटलंय, छायाचित्र म्हणजे अनंत काळाच्या प्रवाहातला एक थेंब चौकटीत पकडून ठेवणं.. थेंबातल्या प्रतिबिंबात मावतं तेवढंच उतरतं छायाचित्रात पण केवळ एक चौकट देऊन पूर्णतेचा सुखावणारा अनुभव देतं ते नजरेला आणि दृश्यालाही..!

इंटरनेटसाठी नवा मोबाईल घेतलाय. त्यावर काम करणं जमायला लागलंय. मजा येतेय. हे नवं वळण आकलनाच्या नव्या तिठ्यावर नेणारं आहे असं वाटलं...!

***

आसावरी काकडे

Tuesday 7 June 2022

माझ्या डायरीतून- ४६

२९.३.२००९

‘आईन्स्टाइनचे मनोविश्व’ हे डॉ. मो रा गुण्ये यांचं पुस्तक वाचलं. त्यातली एक इंटरेस्टिंग माहिती... ‘ज्योतिर्मय कुटुंब’ म्हणजे प्रकाशाचे कुटुंब. आपल्याला दिसतो तो प्रकाश ‘ता ना पि हि नि पा जा’ या वर्णपटाचा आहे. वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीजनुसार हे रंग दिसतात. ‘ता’ आणि ‘जा’ या दोन टोकांच्या पलिकडेही प्रकाश असतो. तो क्ष किरण, गामा किरण रेडिओ तरंग... अशा स्वरूपात असतो. तो आपल्याला दिसत नाही. ज्योतिर्मय कुटुंबात हे सर्व येतं..!

पराकोटीचं स्थूल आणि पराकोटीचं सूक्ष्म डोळ्याला दिसत नाही. दुर्बिण, मायक्रोस्कोपनेही पुरेसं स्पष्ट दिसत नाही. आपल्या ऐंद्रिय आकलन-क्षमतेच्या बाहेरचं सगळं गणितानं ठरतं. गणित, समिकरणं म्हणजे वेगवेगळ्या पातळीवरचे तर्कच..! ध्यान धारणेतून समजलेलं (ईशावास्यम्‍ इदं सर्वम्‍’ सारखं)  सत्य आणि या गणिताच्या आधारानं समजलेलं सत्य यात गुणात्मक फरक काय? कोणतं अधिक बरोबर?

विज्ञानात जसे पुढचे अधिकाधिक सूक्ष्म शोध लागताहेत समजुतीत बदल होतायत तसे वेद-उपनिषद कालीन ज्ञानात काही बदल होत नाहीत. आधीचं चूक ठरून नवं समोर येत नाही. त्या काळानंतर कुणीच तेवढं ‘प्रतिभा’वान झालं नाही? की जे म्हणून ठेवलंय तेच असं आहे की त्यातूनच वेगवेगळे अर्थ निघावेत. नवा अन्वयार्थ म्हणजे नवा शोधच..!

शास्त्रज्ञ आधी कल्पना करतात. ती गणिती सूत्र मांडून स्पष्ट करून घेतात आणि मग प्रत्यक्ष प्रयोग करून सिद्ध करतात. ही प्रक्रिया महत्त्वाची आहे. आध्यात्मिक संकल्पना, ‘निष्कर्ष’ ही ध्यान-धारणेतून गवसलेली सत्ये असतात. ती शब्दबद्ध केली तरी त्याचं डीकोडींग करून सत्यापर्यंत पोचण्याची प्रक्रिया वैयक्तिक राहते. ती ज्याच्या त्याच्या मनातल्या ‘प्रयोग शाळेत’ व्हावी लागते.

सध्याचा काळ घाबरवणारा, गोंधळवणारा आहे. विज्ञानानं धुंवाधार ओतलेल्या ‘सुविधां’नी सगळी व्यवस्था विस्कटवून टाकलीय. सगळ्याला एक भयंकर गती आलीय. सगळं भराभर जुनं, कालबाह्य होतंय... सगळेच हरवल्यासारखे, बिथरल्यासारखे झालेत. आणि गंमत म्हणजे हे कुणाला जाणवतही नाहीए. कुणीतरी खो दिला की पटकन उठायचं खेळाचा नियम पाळत आणि पाठ दिसेल त्याला खो देऊन बसायचं.... उठ – बस करत पळापळ चाललीय नुसती.... आतल्या प्रयोगशाळेत बसायला कुणाला वेळ नाही..!

......

२८.५.२००९

संगीता, गिरिजा या गोव्याच्या मैत्रिणी आल्या होत्या. घरगुती कवीसंमेलन, गप्पा झाल्या. संगीताकडून बायालॉजीतल्या काही संकल्पना समजल्या. ऐकताना थरार जाणवला. शरीरशास्त्रीय दृष्ट्या ‘जाणीव’ म्हणजे नक्की काय? ती कुठे असते ते कळलेलं नाही असं ती म्हणाली. (ती बायालॉजीची प्राध्यापक आहे)

कमावलेल्या शहाणपणाचं मृत्युनंतर मेडीकली काय होत असेल? यावर पुन्हा विचार होत राहिला... शहाणपण, ज्ञान याचं ‘मॅटर’ काय? ते केवळ भाषिक स्वरूपात असेल की मेंदूतील प्रोग्रॅमिंगचा भाग झालेलं असेल? एखाद्या सीडीमधे बरंच काय काय असतं. सीडीप्लेअरमधे टाकून तो ऑन केल्यावर त्यातलं सर्व आपल्यासमोर साकारतं. पण सीडी लावली जात नाही तोपर्यंत ती एक निर्जीव असा भौतिक पदार्थ असते. माणूस सीडीप्लेअरसारखा असतो आणि या प्लेअरमधे असंख्य सीड्या एकाच वेळी घालूनच ठेवलेल्या असतात. ‘विद्युतप्रवाह’ही अखंड वाहात असतो. कोणतीही सीडी केव्हाही चालू होऊ शकते. पण चैतन्यप्रवाह थांबल्यावर उरतो केवळ एक भौतिक पदार्थ- देह, जो जाळल्यावर त्याच्या नावचं असं काहीही उरत नाही.

कमावलेलं शहाणपण याच जगण्यातही वेळेवर उपयोगी पडत नाही खरंतर. जिवंतपणीच त्याची वाट लागलेली असते. मृत्युबरोबर नष्ट व्हायलाही काही राहिलेलं नसतं

.....

१५.१०.२००९

समोरच्या बुचाच्या फुलांच्या झाडाचा बुंधा निम्म्यातून वरच्या सर्व फांद्यांसह तुटून पडला अचानक. वारा नव्हता. काही कारण नव्हतं.... कडकड आवाज झाला. सगळी धावली. झाड पडलं.. झाड पडलं म्हणत.. मुलं पडलेल्या बुंध्यावर चढून नाचायला लागली. ‘मी झाडावर चढलो बघ’... एक मुलगा म्हणाला. बाकीची नाचायला लागली. कुणी म्हणालं, खाली गाड्या नव्हत्या, मुलं.. मणसं नव्हती म्हणून बरं.. कुणी म्हणालं, मी म्हणतच होतो एवढं वाढलंय पडेल एखादेवेळी... एक मुलगी म्हणाली, त्यावर पक्ष्यांची घरटी होती का हो?...

लगेच झाड तोडून तोडून बाजूला करायला सुरुवात झाली. थोड्याच वेळात वर्दळीला जागा साफ झाली. झाड कसं तुटलं? काय झालं असेल? मागे राहिलेल्या झाडाला काय वाटलं असेल?

.....

३१.१२.२००९

रमेश गोविंद वैद्य यांच्या ‘काव्यसप्ताह’ या कार्यक्रमात माझी मुलाखत झाली. आश्लेषा महाजन आणि अनील किणीकर यांनी घेतली. कार्यक्रम छान झाला. सुरुवातीला ‘इसीलिए शायद’ या माझ्या हिंदी कवितासंग्रहाचं प्रकाशन झालं. नंतर जेवण..आईस्क्रीम पार्टी झाली... एकूण मजा आली. वर्षाची अखेर समाधानकारक आणि उत्साहवर्धक झाली.

***

आसावरी काकडे 

Saturday 4 June 2022

माझ्या डायरीतून- ४५

६.२.२००९

काल बारामती ट्रीप झाली. Agro tourism. सकाळी एकदा बैलगाडीनं, एकदा ट्रॅक्टरमधून आणि एकदा बांधावरून चालत शेती बघितली. चिंचा गोळा केल्या.... गव्हाच्या शेतात गव्हाचे तुरे आले होते. ते तोडून त्यातला कोवळा गहू खावा म्हणून उघडून पाहिला. वरचं साल काढत गेले तर सालाखाली सालच होतं. सर्व सालं काढून टाकल्यावर आत अजून गहू झालेलाच नाही असं लक्षात आलं. खरं तर गहू म्हणून आत वेगळं काही होणार नसेलंच. हीच आवरणं पुष्ट होत होत घट्ट होत जात असतील... उन्ह त्यातले अनावश्यक द्राव शोषून घेत असेल आणि सगळी आवरणं एकमेकाला बिलगून राहता राहता एकरूपच होऊन जात असतील. तेव्हा टणक गहू तयार झाला असं आपल्याला वाटतं, कळतं, दिसतं प्रत्यक्ष..!

मनात आलं प्रत्येकच वस्तूवरची, घटनांवरची अशी आवरणं काढत गेलं तर आत वस्तू, घटना म्हणून काहीच मिळणार नाही. प्रत्येक वस्तू, घटना, व्यक्ती म्हणजे असंख्य आवरणांची भेंडोळी... एकेका आवरणाकडेच आपलं लक्ष जातं. ज्याला जे आवरण दिसतं, कळतं ते आवरण म्हणजेच ती व्यक्ती, घटना, वस्तू असं त्याला वाटतं.... सगळी आवरणं सगळ्यांना कळू शकणारच नाहीत. पण तशी ती आहेत, असतात.. हे ‘असण्या’चं स्वरूप कळलं तरी आपण आपल्या दृष्टिकोनाबद्दल दूराग्रही राहणार नाही..!

एकूण ट्रीप छान झाली. मजा आली.

.....

१४.२.२००९

बंगलोरला सखी मंडळाच्या मेळाव्याला गेले होते. मेळावा झाल्यावर नेहाकडे गेले. तिथं Ayn Rand या लेखिकेचं ‘Atlas Shrugged’ हे पुस्तक पाहायला मिळालं. जरा वेळ चाळलं. सुरुवातीला आयन रँड यांची लेखनाबद्दलची मतं दिलीयत. त्यातली एक दोन अशी-

Art is a recreation of reality according to artist’s metaphysical value judgements.

Creative fiction writing is a process of translating an abstraction into concrete.

अशा लेखनाच्या तीन पातळ्या.. तर्‍हा असतात. १- जुन्या, सर्वपरिचित कल्पना, विचार जुन्या पात्रांच्या, मिथकांच्या माध्यमातून मांडणे. २- जुन्या, सर्वपरिचित कल्पना, विचार नवनिर्मित पात्रांच्या माध्यमातून मांडणे. आणि ३- नवे विचार, कल्पना, नव्या पर्यावरणात, नवनिर्मित पत्रांच्या माध्यमातून मांडणे.

Atlas Shrugged’ या पैकी तिसर्‍या प्रकारचं लेखन असलेली दीर्घ कादंबरी आहे.

‘विचार’ जगण्यात उतरले पाहिजेत. अनुवादित झाले पाहिजेत. जगण्यात उतरणं म्हणजे ते ‘विचार’ कुणीतरी जगून दाखवतंय हे लेखनातून पटवून देता येणं. मंडलेले ‘वेगळे विचार’ व्यवहार्य आहेत असं दाखवता येणं. म्हणजे फक्त थेअरी नाही लिहायची तर ती जगण्यात apply करून दाखवायची हे आयन रँडचं ध्येय होतं.... ‘विचार’ जगण्यात उतरणं म्हणजे पात्रांच्या नाही, स्वतःच्या खर्‍या जगण्यात उतरणं असं मला वाटायचं... आयन रँडनी या वाटण्याला एक वेगळा आयाम दिला..!

......

१९.३.२००९

डॉ. आनंद यादव यांनी त्यांच्या ‘संतसूर्य तुकाराम’ या कादंबरीत भावना दुखवणारं, चुकीचं लेखन केलं म्हणून जोरदार आक्षेप घेतले गेले. त्यांनी माफी मागूनही वारकर्‍यांसारख्या समूहाने त्यांना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला भाग पाडलं... यात विरोध करणारे वारकरी आणि त्यांचे समर्थन करणारे या दोघांविषयी आदर असल्यामुळे हा टोकाचा विरोध समजून घेणं अवघड जातंय. माफी मागून, पुस्तक मागे घेऊनही ‘शिक्षा’ पुरेशी झाली नाही... मनात आलं,  डॉ. यादव अधक्ष म्हणून निवडून आले नसते तर मग त्यांना कोणती शिक्षा दिली गेली असती? पुस्तक प्रसिद्ध होऊन इतके दिवस झाल्यावर आताच त्यातल्या ‘आक्षेपार्ह’ मजकुराकडे लक्ष कसे गेले?

अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय? यापूर्वी कितीतरी प्रसंगात अभिव्यक्तीला विरोध करणार्‍यांच्या विरोधात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभे राहणार्‍यांनी ठाम भूमिका घेतली. आता मात्र या चुकीला क्षमा का नाही?

हे समजून घेण्यासाठी ती कादंबरी मिळवून वाचली. ज्याला आक्षेप घेतला गेला तो मजकूर अनावश्यक, चीप आणि फालतू वाटला. पण पूर्वग्रह न ठेवता कादंबरी वाचली तर पुढील सर्व मांडणीमुळे तुकारामांविषयी वाईट मत होणार नाही.  आदरच वाटेल. आक्षेपार्ह मजकूर विसरूनच जाईल... कादंबरीत शेवटी अधोरेखित करावेत असे काही विचार आले आहेत. तरी ही कादंबरी फारशी आवडली नाही. पण न आवडणं आणि इतक्या टोकाचा विरोध करणं यात खूपच फरक आहे. यादवांनी राजिनामा दिल्यावर तो स्थगित ठेवला गेला. पण त्यांची खूर्ची रिकामी ठेवली नाही. लेखी भाषण हातात असून वाचून दाखवले नाही. स्मरणिकेत फोटो छापला गेला नाही... (खरं तर स्मरणिका केव्हाच तयार असणार) हे सर्व अनाकलनीय आहे.

पण सध्याच्या गतिमान युगात ही घटना आता केव्हाच जुनी, बिन महत्त्वाची झाली. याबद्दल कुणाला काही देणं घेणं नाही....

***

आसावरी काकडे