Thursday 9 June 2022

माझ्या डायरीतून- ४८

१.१०.२०१०

आज एक तारीख म्हणून प्लॅनर तयार केलाय. करायच्या गोष्टी बर्‍याच आहेत. उत्साह आहेही... नहीही... आकाशवाणीचं काँट्रॅक्ट आलंय बालोद्यानमधे कविता वाचण्यासाठी. ‘मायमावशी’ अंकासाठी लेख लिहायचाय. चालू कामं हातात आहेतच. ‘आगामी पुस्तके’ स्वप्नांसारखी समोर आहेत. तब्येत ठीक आहे. तरी परतीचे विचार सगळ्यातली हवा काढून घेतायत... काल दुर्गा भागवतांवर चर्चासत्र होतं. त्या म्हणायच्या म्हणे, ‘मला जगण्याचं सुख वाटतं’.... मिळालेला प्रत्येक दिवस बक्षिसासारखा साजरा करायचा.. खरंतर मीही असा विचार करायला हवा. पण सगळ्या बाबतीत एक साचलेपण आलंय. त्याला आपणच गती द्यायला हवी ना?.. (आत्ता वाचतानाही दमायला होतंय इतकं काय काय चाललेलं असताना साचलेपण कसं ? असं वाटलं हे लिहिताना.)

.....

६.१०.२०१०

काल एका मंडळात बोरकरांवरच्या कवितांचा कार्यक्रम ऐकायला जायचं होतं. वादळी पावसाच्या भीतीचं निमित्त करून जायचं टाळायला बघत होतं मन. कविता ऐकण्यापेक्षा कार्यक्रम करणार्‍यांना आनंद द्यायला जायचं होतं.. पण उत्साह नव्हता. आतून अगदी नको वाटत असताना गेले. पाऊस आला नाही. काही त्रास झाला नाही... पण परतताना कार्यक्रमातल्या सगळ्या गोष्टी फारच बालीश वाटत होत्या... हे वाटणं, सगळं किरकोळ.. फालतू वाटणं चुकीचं आहे असं मनाला समजावत राहिले.... 

जगण्यातलं बालीश सुख किंवा तुच्छ / निरर्थक भाव यांना ओलांडणारी प्रगल्भ अवस्था कोणती? बालीशपणा जाणूनही त्यात रमणं ही? ही प्रगल्भता की स्वतःला फसवणं?

‘ईशावास्य’मधे शंभर वर्षे जगण्याची इच्छा धरावी असं का म्हटलं असेल?... असं म्हणण्याआधी ‘कर्मं करत..’ हे महत्त्वाचे शब्द आहेत. जन्माला आल्यावर कर्म करणं अनिवार्य आहे. ती टाळण्यासाठी संन्यास तर नाहीच पण मरणाची पळवाटही धरायची नाही. कर्म करतच जगायचं असं म्हणण्यात जगराहाटी / जीवनचक्र चालू ठेवणं, ‘ऋत’च्या (निसर्ग नियम..) विरोधात न जाणं अभिप्रेत आहे?.... आपलं भलं-बुरं.. लहान-मोठं जीवन जगणं (जगण्याला पर्याय नाहीच... असंही पुढं म्हटलेलं आहे.) म्हणजे विश्वाच्या कायद्याचं पालन करणं ही जाण ठेवून ‘सामान्य’ (असलं तरी) जगणं ही प्रगल्भता असेल?

......

२७.१०.२०१०

सध्या वाचन कमी झालंय. जे वाचतेय त्यानं विचारमंथन होत नाहीए. नवं, नव्यानं काही कळत नाहीए. त्यामुळं डायरीलेखन म्हणजे दिनचर्येच्या नोंदी इतकंच होतंय. मनातली प्रश्नोत्तरं थांबल्यासारखी झालीयत.

.....

१०.१२.२०१०

आनंद हर्डीकरांनी दिलेलं ‘The Riddle of the Self – by F. T. Mikhailov हे पुस्तक पाहातेय.... त्यात सुरुवातीलाच म्हटलंय- ‘At each new departure it seems to man that the time of real knowledge has come. आतापर्यंत आपण अज्ञानाच्या आणि गैरसमजुतींच्या अंधारातच वावरत होतो.  But as a poet said, superstitions are but the ruins of old truths..! Everything that is new brings with it a new confidence....

***

आसावरी काकडे

No comments:

Post a Comment