Tuesday 7 June 2022

माझ्या डायरीतून- ४६

२९.३.२००९

‘आईन्स्टाइनचे मनोविश्व’ हे डॉ. मो रा गुण्ये यांचं पुस्तक वाचलं. त्यातली एक इंटरेस्टिंग माहिती... ‘ज्योतिर्मय कुटुंब’ म्हणजे प्रकाशाचे कुटुंब. आपल्याला दिसतो तो प्रकाश ‘ता ना पि हि नि पा जा’ या वर्णपटाचा आहे. वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीजनुसार हे रंग दिसतात. ‘ता’ आणि ‘जा’ या दोन टोकांच्या पलिकडेही प्रकाश असतो. तो क्ष किरण, गामा किरण रेडिओ तरंग... अशा स्वरूपात असतो. तो आपल्याला दिसत नाही. ज्योतिर्मय कुटुंबात हे सर्व येतं..!

पराकोटीचं स्थूल आणि पराकोटीचं सूक्ष्म डोळ्याला दिसत नाही. दुर्बिण, मायक्रोस्कोपनेही पुरेसं स्पष्ट दिसत नाही. आपल्या ऐंद्रिय आकलन-क्षमतेच्या बाहेरचं सगळं गणितानं ठरतं. गणित, समिकरणं म्हणजे वेगवेगळ्या पातळीवरचे तर्कच..! ध्यान धारणेतून समजलेलं (ईशावास्यम्‍ इदं सर्वम्‍’ सारखं)  सत्य आणि या गणिताच्या आधारानं समजलेलं सत्य यात गुणात्मक फरक काय? कोणतं अधिक बरोबर?

विज्ञानात जसे पुढचे अधिकाधिक सूक्ष्म शोध लागताहेत समजुतीत बदल होतायत तसे वेद-उपनिषद कालीन ज्ञानात काही बदल होत नाहीत. आधीचं चूक ठरून नवं समोर येत नाही. त्या काळानंतर कुणीच तेवढं ‘प्रतिभा’वान झालं नाही? की जे म्हणून ठेवलंय तेच असं आहे की त्यातूनच वेगवेगळे अर्थ निघावेत. नवा अन्वयार्थ म्हणजे नवा शोधच..!

शास्त्रज्ञ आधी कल्पना करतात. ती गणिती सूत्र मांडून स्पष्ट करून घेतात आणि मग प्रत्यक्ष प्रयोग करून सिद्ध करतात. ही प्रक्रिया महत्त्वाची आहे. आध्यात्मिक संकल्पना, ‘निष्कर्ष’ ही ध्यान-धारणेतून गवसलेली सत्ये असतात. ती शब्दबद्ध केली तरी त्याचं डीकोडींग करून सत्यापर्यंत पोचण्याची प्रक्रिया वैयक्तिक राहते. ती ज्याच्या त्याच्या मनातल्या ‘प्रयोग शाळेत’ व्हावी लागते.

सध्याचा काळ घाबरवणारा, गोंधळवणारा आहे. विज्ञानानं धुंवाधार ओतलेल्या ‘सुविधां’नी सगळी व्यवस्था विस्कटवून टाकलीय. सगळ्याला एक भयंकर गती आलीय. सगळं भराभर जुनं, कालबाह्य होतंय... सगळेच हरवल्यासारखे, बिथरल्यासारखे झालेत. आणि गंमत म्हणजे हे कुणाला जाणवतही नाहीए. कुणीतरी खो दिला की पटकन उठायचं खेळाचा नियम पाळत आणि पाठ दिसेल त्याला खो देऊन बसायचं.... उठ – बस करत पळापळ चाललीय नुसती.... आतल्या प्रयोगशाळेत बसायला कुणाला वेळ नाही..!

......

२८.५.२००९

संगीता, गिरिजा या गोव्याच्या मैत्रिणी आल्या होत्या. घरगुती कवीसंमेलन, गप्पा झाल्या. संगीताकडून बायालॉजीतल्या काही संकल्पना समजल्या. ऐकताना थरार जाणवला. शरीरशास्त्रीय दृष्ट्या ‘जाणीव’ म्हणजे नक्की काय? ती कुठे असते ते कळलेलं नाही असं ती म्हणाली. (ती बायालॉजीची प्राध्यापक आहे)

कमावलेल्या शहाणपणाचं मृत्युनंतर मेडीकली काय होत असेल? यावर पुन्हा विचार होत राहिला... शहाणपण, ज्ञान याचं ‘मॅटर’ काय? ते केवळ भाषिक स्वरूपात असेल की मेंदूतील प्रोग्रॅमिंगचा भाग झालेलं असेल? एखाद्या सीडीमधे बरंच काय काय असतं. सीडीप्लेअरमधे टाकून तो ऑन केल्यावर त्यातलं सर्व आपल्यासमोर साकारतं. पण सीडी लावली जात नाही तोपर्यंत ती एक निर्जीव असा भौतिक पदार्थ असते. माणूस सीडीप्लेअरसारखा असतो आणि या प्लेअरमधे असंख्य सीड्या एकाच वेळी घालूनच ठेवलेल्या असतात. ‘विद्युतप्रवाह’ही अखंड वाहात असतो. कोणतीही सीडी केव्हाही चालू होऊ शकते. पण चैतन्यप्रवाह थांबल्यावर उरतो केवळ एक भौतिक पदार्थ- देह, जो जाळल्यावर त्याच्या नावचं असं काहीही उरत नाही.

कमावलेलं शहाणपण याच जगण्यातही वेळेवर उपयोगी पडत नाही खरंतर. जिवंतपणीच त्याची वाट लागलेली असते. मृत्युबरोबर नष्ट व्हायलाही काही राहिलेलं नसतं

.....

१५.१०.२००९

समोरच्या बुचाच्या फुलांच्या झाडाचा बुंधा निम्म्यातून वरच्या सर्व फांद्यांसह तुटून पडला अचानक. वारा नव्हता. काही कारण नव्हतं.... कडकड आवाज झाला. सगळी धावली. झाड पडलं.. झाड पडलं म्हणत.. मुलं पडलेल्या बुंध्यावर चढून नाचायला लागली. ‘मी झाडावर चढलो बघ’... एक मुलगा म्हणाला. बाकीची नाचायला लागली. कुणी म्हणालं, खाली गाड्या नव्हत्या, मुलं.. मणसं नव्हती म्हणून बरं.. कुणी म्हणालं, मी म्हणतच होतो एवढं वाढलंय पडेल एखादेवेळी... एक मुलगी म्हणाली, त्यावर पक्ष्यांची घरटी होती का हो?...

लगेच झाड तोडून तोडून बाजूला करायला सुरुवात झाली. थोड्याच वेळात वर्दळीला जागा साफ झाली. झाड कसं तुटलं? काय झालं असेल? मागे राहिलेल्या झाडाला काय वाटलं असेल?

.....

३१.१२.२००९

रमेश गोविंद वैद्य यांच्या ‘काव्यसप्ताह’ या कार्यक्रमात माझी मुलाखत झाली. आश्लेषा महाजन आणि अनील किणीकर यांनी घेतली. कार्यक्रम छान झाला. सुरुवातीला ‘इसीलिए शायद’ या माझ्या हिंदी कवितासंग्रहाचं प्रकाशन झालं. नंतर जेवण..आईस्क्रीम पार्टी झाली... एकूण मजा आली. वर्षाची अखेर समाधानकारक आणि उत्साहवर्धक झाली.

***

आसावरी काकडे 

No comments:

Post a Comment