Thursday 9 June 2022

माझ्या डायरीतून- ४७

२५.१.२०१०

दोन ठरलेली कवीसंमेलनं, बोरन्हाण- हळदीकुंकू कार्यक्रम आणि माझा वाढदिवस... सर्व छान पार पडलं. मजा आली... साठीचा टप्पा ओलांडला. कृतकृत्य वाटण्यासारख्या बर्‍याच गोष्टी झाल्या आहेत. वाढदिवसानिमित्त दिलीपनं फोटो काढता येतील असा मोबाईल भेट दिला. विक्रमनी हँडसेट हतात आणून दिला. ह्यांनी कार्ड आणलं. सचिननं रीचार्ज करून फोन चालू करून दिला. सगळं वाढदिवशीच..!

फोटो काढता येणार्‍या या छोट्याशा मोबाईलनं माझ्यासाठी अभिव्यक्तीचं एक नवं दालन खुलं केलं...!

......

५.२.२०१०

राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालक व उपसंचालक पदासाठी व्यक्तींची निवड करणार्‍या निवडसमितीची सदस्य म्हणून माझी निवड झाल्याचे पत्र शासनाकडून आले आहे.... महाराष्ट्र राज्य सिंहावलोकन परिषदेचेही निमंत्रण आले आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील ‘क्रियावान पंडितांची’ ही परिषद आहे. अशा एक हजार निमंत्रितांत माझं नाव आहे..! अशा गोष्टी सहज स्वीकारता येत नाहीत. यासाठी आपण पात्र आहोत का असा विचलीत करणारा विचार अस्वस्थ करतो. व्यक्ती म्हणून घडण होताना पहिली २०-२१ वर्षे झापडबंद अवस्थेत गेली. आणि नंतरची ८-१० वर्षे भानावर येण्यात, स्थिरावण्यात गेली. सगळ्याची सुरुवात व्हायलाच उशीर झाला.... बाह्य जगातल्या घडामोडींचा आवाका, अंदाज, ज्ञान हे सगळं दूर राहिलं... त्यामुळे आत्मविश्वास वाटत नाही... लोप्रोफाईल राहिलं जातं.. त्याचंही काही महत्त्व आहेच म्हणा... असो. जे आहे ते आहे..!

......

८.३.२०१०

आज महिला आरक्षण विधेयक संमत झालं नाही. सहा वेळा गोंधळामुळे राज्यसभा स्थगीत करावी लागली. दोघांनी विधेयकच फाडून टाकलं. हे असभ्य वर्तन बघून अवाक् व्हायला झालंय..!

२७.३.२०१०

साहित्य संमेलन चालू आहे. आज सकाळी श्याम मनोहर आणि मेघना पेठे यांची मुलाखत होती. प्रश्न पडणं, शोध घेणं, स्वतःशी प्रामाणिक राहाणं, खरं लिहिणं, डायरी लिहिणं... असे मुद्दे होते. ऐकायला छान वाटलं.

......

४.७.२०१०

काल इमेल करायला शिकले. परागनं माझी वेबसाईट बनवलीय. त्याची लिंक फेसबुकवर टाकलीय. तीस जणांनी पाहिली अशी नोंद आलीय. या नव्या तंत्रानं प्रभावित होताना गोंधळायला झालंय. लिहिलेले, छापलेले शब्द कॉम्प्युटरच्या पडद्यावर दिसून नको तेव्हा बंद करता येतील. त्यांची अडगळ राहणार नाही.. या नव्या तंत्राशी जमवून घ्यायला हवं...

मोबाईलनं फोटो काढण्याचा छंद जडवलाय. फोटो काढताना नकळत दृश्य वाचली जातात.. तेव्हा जाणवलेल्या प्रक्रियेच्या कविता झाल्यायत. या कविता म्हणजे ‘छायाचित्र चौकटी आणि दृश्य’ यातलं नातं उमगणं... पहिल्या कवितेत म्हटलंय, छायाचित्र म्हणजे अनंत काळाच्या प्रवाहातला एक थेंब चौकटीत पकडून ठेवणं.. थेंबातल्या प्रतिबिंबात मावतं तेवढंच उतरतं छायाचित्रात पण केवळ एक चौकट देऊन पूर्णतेचा सुखावणारा अनुभव देतं ते नजरेला आणि दृश्यालाही..!

इंटरनेटसाठी नवा मोबाईल घेतलाय. त्यावर काम करणं जमायला लागलंय. मजा येतेय. हे नवं वळण आकलनाच्या नव्या तिठ्यावर नेणारं आहे असं वाटलं...!

***

आसावरी काकडे

No comments:

Post a Comment